अपोलो ११ – चंद्रावरील माणसाच्या यशस्वी स्वारीची रोमांचक कहाणी

‘The Egle has landed..’ (ईगल उतरले आहे)

अपोलो ११ यानाने पृथ्वीवर पाठवलेला हा संदेश ऐकण्यासाठी समस्त मानवसमाज कित्येक वर्षे धडपडत होता, संघर्ष करत होता.

काय होते अपोलो ११ मिशन?

अपोलो ११ केवळ एक नाव नाही 

अपोलो ११ म्हणजे माणसाच्या जिद्दीचे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक!

अपोलो ११ म्हणजे असंख्य अपयशे येऊन सुद्धा खचून न जाता यशासाठी अविरत धडपडणाऱ्या संघर्षाची कहाणी !

अपोलो ११ म्हणजे कोणत्याही आव्हानांना निडरपणे सामोरे जाणाऱ्या तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचे प्रतीक!

अपोलो ११ म्हणजे जमिनीवर सीमारेषा, धर्म, जात, वंश यामध्ये विभागलो गेलो असलो तरी अवकाशातून आपण सर्व एकच दिसतो याची जाणीव करून देणारा एक नितांतसुंदर अनुभव!

२० जुलै १९६९ मध्ये अपोलो ११ मिशन अंतर्गत नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन अंतराळवीराने सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवले आणि पृथ्वीवासियांसाठी नेहमीच आकर्षण राहिलेला चंद्र आपल्या आवाक्यात आला.

अपोलो ११ - मोहिमेचे बोधचिन्ह
अपोलो ११ – मोहिमेचे बोधचिन्ह (फोटो साभार -गूगल)

चंद्रावर पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग याने आपले इतिहास प्रसिद्ध वाक्य उच्चारले ‘माणसासाठी हे एक लहानसे पाऊल आहे, मात्र मानवतेसाठी मोठी झेप आहे’. 

हो खरेच बोलला तो. पण या एका पावलामागे अविरत प्रयत्नांचा, संघर्षाचा, बलिदानाचा, यशापयशाचा, स्पर्धेचा प्रचंड असा इतिहास होता. या सर्व इतिहासाचा सर्वंकष आढावा सुधीर फाकटकर यांनी आपल्या ‘अपोलो ११’ या पुस्तकात घेतला आहे.

अपोलो ११ च्या प्रत्यक्ष मोहिमेची माहिती देण्यापूर्वी लेखकाने अंतराळ प्रवासासंबंधी विकसित होत गेलेल्या तंत्रज्ञानाचा एकदम नियोजनपूर्वक आढावा घेतला आहे. अंतराळ प्रवासासाठी अंतराळयानाला अवकाशात नेऊन पोचवणारा अग्निबाण महत्त्वाचा असतो. दुसऱ्या महायुध्दावेळी अग्निबाणाचे तंत्रज्ञान चांगलेच विकसित झाले होते. खासकरून जर्मन लोकांनी बनवलेल्या अग्निबाणांनी मित्र राष्ट्रांच्या तोंडचे पाणी पळविले होते. यातूनच पुढे महायुद्धानंतर अग्निबाणांचा अंतराळ प्रवासाच्या दृष्टीने विकास करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर्मन शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी बजावली.

जर्मन V२ रॉकेट - दुसरे महायुद्ध
जर्मन V२ रॉकेट – दुसरे महायुद्ध (फोटो साभार- गूगल)

दुसऱ्या महायुध्दानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांनी कुशल जर्मन शास्त्रज्ञांना आपापल्या देशात नेले (यासाठी अमेरिकेने ‘ऑपरेशन पेपरक्लिप’ नावाची गुप्त मोहीम राबवली होती) आणि त्यांना अग्निबाण विकासाच्या कामात गुंतवण्यात आले. शीत युद्धासोबतच दोन्हीं महासत्तांमध्ये अंतराळ स्पर्धा सुरू झाली. प्रथम कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडण्यावरून सुरू झालेली ही स्पर्धा नंतर मानवाला सर्वप्रथम अंतराळात पाठवणे आणि शेवटी चंद्रावर सर्वप्रथम माणसाला पाठवणे इथपर्यंत येऊन पोचली.

रशियाने सर्वप्रथम आपला स्पुटनिक हा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडून यात आघाडी घेतली असली तरी नंतर कधी रशिया पुढे तर कधी अमेरिका पुढे अशी ही स्पर्धा रंगत गेली. दोन्ही बाजूंनी यशाची चव चाखली तसेच अपयशाचे तोंडही पहिले. पण एक गोष्ट दोन्हीकडे समान होती. हार न मानता सतत प्रयत्न करणे! कितीही अपयशे येऊ देत खचून न जाता प्रयत्न करत राहणे अमेरिकन आणि रशियन शास्त्रज्ञांनी कधीही सोडले नाही. यामध्ये त्यांना त्यांच्या राज्यकर्त्यांची सुद्धा खंबीर साथ मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी आणि सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष निकिता कृश्चेव यांनी नेहमीच आपल्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले.

स्पुतनिक उपग्रह अपोलो ११
स्पुतनिक उपग्रह (फोटो साभार – गूगल)

१ ऑक्टोबर १९५८ ला नासाची स्थापना झाली आणि अमेरिकेचे अंतराळ संशोधन आणि मोहिमांमध्ये सुसूत्रता आली. तिकडे स्पुटनिकच्या यशानंतर रशियाला आता मानवाला अंतराळात पाठवण्याचे वेध लागले होते. त्याचीच चाचपणी म्हणून सर्वप्रथम स्पुटनिक-२ उपग्रहातून लायका नावाच्या एका मादी कुत्र्याला अंतराळात पाठवण्यात आले. यामध्ये लायका मृत झाली असली तरी अशा प्रकारे प्राण्यांना अंतराळात पाठवण्याचा मोहिमा दोन्ही देशांकडून सुरू झाल्या.

भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सजीव प्राण्यांवर अंतराळात जाऊन आल्यावर काय परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी या मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. एप्रिल १९६१ मध्ये रशियाने यूरी गागारीन याला व्होस्टोक-१ या अवकाश यानाद्वारे अंतराळात पाठवून कोणत्याही माणसाला यशस्वीपणे अंतराळात पाठवून परत पृथ्वीवर आणण्याचा मान पटकावला. युरी गागारीन हा जगातील पहिला अंतराळवीर बनला.

युरी गागारीन - जगातील पहिला अंतराळवीर
युरी गागारीन – जगातील पहिला अंतराळवीर (फोटो साभार – गूगल)

 रशियाच्या या यशाचे अमेरिकेने स्वागत केले. पण अमेरिका सुद्धा स्वस्थ बसली नव्हती. अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी २१ मे १९६१ मध्ये अमेरिकन संसदेला संबोधित करताना ‘अमेरिका पुढील १० वर्षात चंद्रावर माणूस पाठवेल आणि त्याला सुरक्षितपणे परत आणेल’ अशी घोषणा केली. यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ सुद्धा केनेडी यांनी उपलब्ध करून दिले. केनेडी यांच्या घोषणेनंतर नासा झटून कामाला लागली.

अपोलो ११ या मिशन द्वारे अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे निश्चित झाले. पण त्याआधी पृथ्वीच्या वरील अवकाशाचा अभ्यास, पृथ्वी ते चंद्रापर्यंत जाण्याचा मार्ग, चंद्रावरचे वातावरण, चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा, चंद्रापर्यंतच्या प्रवासासाठी योग्य असे अवकाश यान आणि यानाला अवकाशात नेण्यासाठी योग्य असा अग्निबाण इत्यादी अनेक गोष्टींच्या अभ्यासासाठी नासाने नियोजनबद्ध पद्धतीने अनेक मोहिमा राबवल्या. तिकडे रशियाचीही याचसाठी धडपड सुरू होती. पण काही मोहिमांमध्ये अपयश आल्याने रशिया या स्पर्धेत तूर्तास मागे पडल्याचे जाणवत होते. 

अखेर सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर अपोलो ११ ला चंद्रावर पाठवायची तयारी सुरू झाली. नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांची या मोहिमेसाठी अंतिम निवड करण्यात आली. १६ जुलै १९६९ रोजी अपोलो ११ ने उड्डाण केले आणि २० जुलै रोजी यशस्वीपणे ते चंद्रावर उतरले. मानवाने दिवसा पाहिलेल्या एका स्वप्नाची पूर्तता झाली होती.

अपोलो ११चे अंतराळवीर- नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स
अपोलो ११चे अंतराळवीर- नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स (फोटो साभार – गूगल)

यादरम्यान रशियानेही आपले ल्यूना-१५ नावाचे एक मानवरहित यान चंद्रावर पाठवले. चंद्रावर उतरून तेथली माती, दगड इत्यादींचे नमुने अपोलो ११च्या आधी पृथ्वीवर आणण्याचा रशियाचा मनसुबा होता. अशा प्रकारे चंद्रावर सर्वप्रथम उतरून तिथले नमुने आणण्याचा मान रशियाला मिळवायचा होता. पण दुर्दैवाने ल्यूना – १५ यानाचे पुढे काय झाले हे जगाला कधीच कळाले नाही. पण तरीही रशियाने खुल्या मनाने अमेरिकेच्या अपोलो ११च्या यशाचे कौतुक केले.

अपोलो ११च्या यशानंतर अवकाशाचे अनंत जग, तिथले असंख्य ग्रह, तारे यांच्याविषयी माहिती मिळवण्याचा आणि प्रसंगी तेथे जाण्याचा मार्ग खुला झाला.या मोहिमेनंतर अमेरिका व रशियामध्ये अंतराळातील स्पर्धा सुद्धा थंडावली. 

अपोलो ११ ची यशस्वी चांद्रमोहीम
अपोलो ११ ची यशस्वी चांद्रमोहीम (फोटो साभार – गूगल)

आता एक महत्त्वाचा प्रश्न!

या स्पर्धेत जिंकले कोण? अमेरिका की रशिया?

उत्तर – या स्पर्धेत माणूस जिंकला.

अपोलो ११ ची मोहीम सहजासहजी यशस्वी झालेली नाही. या मोहिमेमुळे माणसाची विश्वाला गवसणी घालण्याची विजिगीषू वृत्ती दिसली. हा अंतराळातील रोमांचक सफर अनुभवण्यासाठी सुधीर फाकटकर यांचे हे पुस्तक आवर्जून वाचा.

अपोलो ११ - मानवाचे चंद्रावरचे प्रथम पाऊल
अपोलो ११ – मानवाचे चंद्रावरचे प्रथम पाऊल (फोटो साभार – गूगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *