कोण होते सिंधू लोक?
सिंधू लोकं कोण होते? सिंधू लोकं हेच आर्य होते का? १९२०-२१ दरम्यान हडप्पा आणि मोहोंजोदारो यांच्या उत्खननातून सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यापासून या वरील प्रश्नांचे नेमके उत्तर आजपर्यंत सापडलेले नाही. सिंधू संस्कृती वैभवशाली आणि अत्यंत प्रगत होती यात शंकाच नाही. पण मग तिचा नाश का व कसा झाला? त्याला आर्य जबाबदार होते का? जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ पद्मश्री डॉ ढवळीकर यांनी ‘कोण होते सिंधू लोक?’ या आपल्या पुस्तकात सिंधू लोकांशी संबंधित विविध प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताला फार प्राचीन इतिहास नाही आणि अलेक्झांडरच्या स्वारीच्या पूर्वीचा इतिहास म्हणजे केवळ दंतकथा आणि बाजार गप्पा आहे अशी समजूत पसरवणाऱ्या ब्रिटिशांना सिंधू संस्कृतीच्या शोधाने उघडे पाडले. सिंधू लिपी आजपर्यंत कुणालाही वाचता आलेली नसली तरी उत्खननातून जे पुरावे समोर आले त्यानुसार सिंधू संस्कृतीचा समाज, संस्कृती, शासन व्यवस्था इत्यादीवर बऱ्यापैकी प्रकाश पडतो. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास चालू झाला त्यावेळी हेच सिंधू लोक देशभरात विविध ठिकाणी विखुरले गेले. आर्य लोक सुद्धा त्यांच्या मागोमाग त्याच ठिकाणी गेले आणि याचे पुरावे आर्यांनी रचलेल्या वैदिक साहित्यामध्ये मिळतात. मग जिथे जिथे सिंधू लोक गेले तिथेच आर्य पण गेले हा केवळ योगायोगच होता की सिंधू लोक हेच आर्य होते?
इसवी सन पूर्व तिसरे सहस्त्रक ते इसवी सन पूर्व पहिले सहस्त्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉक्टर ढवळीकर या पुस्तकात मागवा घेतात एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा
कोण होते सिंधू लोक?
एक आवर्जून वाचावे असे पुस्तक.