अजमल कसाब ला फाशी देण्याची मोहीम -‘ऑपरेशन X’

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई सह पूर्ण भारत देश हादरला. दहशतीचे हे थैमान सलग चार दिवस सुरू होते. हा हल्ला करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवादी मारले गेले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी अजमल अमीर कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले पण यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

कसाबच्या चौकशीतून या हल्याबद्दल सविस्तर माहिती भारतीय सुरक्षा संस्थांना मिळाली. या हल्याची आखणी, त्यासाठी निवडक दहा दहशतवाद्यांना निवडून त्यांना देण्यात आलेले प्रशिक्षण, मुंबईतील स्थळांची करण्यात आलेली रेकी, प्रत्यक्ष हल्यादरम्यान पाकिस्तान मधून मिळणारे दिशानिर्देश इत्यादी अनेक बाबींची माहिती कसाबच्या चौकशीतून मिळाली. याद्वारे यामागचा पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करणे भारताला शक्य झाले.

सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करत कसाब वर न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला आणि कसाबला फाशी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याबाबत पूर्ण गुप्तता बाळगण्यात आलेली होती. या मोहिमेला ‘ऑपरेशन X’ हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. अखेर २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली आणि हे गुप्त ऑपरेशन पूर्णत्वास गेले. याची सविस्तर माहिती प्रज्ञा जांभेकर – चव्हाण यांनी आपल्या ‘ऑपरेशन X’ या पुस्तकात दिली आहे.

लेखिकेने कसाब सोबतच २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्याचा आरोपी अफजल गुरु याच्या फाशीबद्दलही माहिती दिली आहे. या एकूण प्रकरणाच्या पडद्यामागील घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक आवर्जून वाचावे.

पुस्तकाचे नाव -‘ऑपरेशन X’

लेखक – प्रज्ञा जांभेकर – चव्हाण

पब्लिकेशन्स – राजहंस प्रकाशन.

अजमल कसाब
ऑपरेशन X

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *