‘आज जेवण काय बनवायचं?’
हा जवळपास प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा प्रश्न.
आज विविध पदार्थ बनवण्याची कृती आणि त्याची साधने यांची विपुल उपलब्धता असतानाही आजच्या जमान्यात रोज वरील प्रश्न पडत असेल तर मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळात काय परिस्थिती असेल? जिथे सुरुवातीला भटके जीवन जगत शिकार करत आपले पोट भरणाऱ्या माणसाला विश्वातील बहुतांश गोष्टी अज्ञात असताना ‘जेवण’ काय असते हे त्याला माहीत असणे सर्वथा अशक्य. पण आज जगातील जवळपास प्रत्येक देशाची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आहे आणि अन्न बनवण्याची कृती आता ‘पाककले’ मध्ये परावर्तित झालेली असताना अन्नाचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला याचा रोमांचक आढावा अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी आपल्या ‘अन्न’ या पुस्तकात घेतला आहे.
सुरुवातीला माणूस शिकार करत भटके जीवन जगत होता. त्यावेळी पुरुष मंडळी शिकारीसाठी गेल्यावर स्त्रिया कंदमुळे आणि निसर्गत: उपलब्ध असलेले धान्य गोळा करायच्या. यातूनच त्यांना कळले की धान्याची बीजे जमिनीत रुजून पुन्हा तेच धान्य उगवते. इथेच माणसाला शेतीचा शोध लागला आणि भटके जीवन जगणारा माणूस एका जागी स्थिर जीवन जगू लागला. यातून कुटुबव्यवस्था, गावे, शहरे उदयास आली. शेतीसोबतच माणसाने पशुपालन सुरू केले आणि त्यातून दूध, मांस, अंडी इत्यादी माणसाला मिळू लागले. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा शोध ही लावण्यात आला.
गेल्या जवळपास १० हजार वर्षांचा अन्नाचा हा रोमांचक प्रवास वाचताना अक्षरशः गुंगून जायला होते. दूध, मध, बिअर,वाइन, चीज, ब्रेड, तेल, तूप, मीठ, मसाले, साखर, चहा, कॉफी, चॉकलेट इत्यादी पदार्थांचा उगम, जगभरात त्यांचा झालेला प्रसार आणि देशांच्या अर्थ आणि समाज व्यवस्थेवर यांचे झालेले सखोल परिणाम वाचताना स्तिमित व्हायला होते.
या पदार्थांसाठी युद्धे झाली, गुलामगिरीची अनिष्ट प्रथा चालू झाली. तसेच या पदार्थांच्या उत्पादनावर वर्चस्व मिळवण्याच्या युरोपियन देशांच्या लालसेमुळे पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी झाली. मसाल्याच्या व्यापारावरील अरबांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी युरोपियन लोकांना भारतात येण्यासाठी जलमार्ग शोधावा लागला आणि त्यामुळेच पुढे जाऊन भारत देश प्रदीर्घ काळाच्या गुलामगिरीत लोटला गेला. यासोबतच अपघाताने माणसाला लागलेल्या अनेक पदार्थांचा शोध वाचताना थक्क व्हायला होते. अशा अनेक रोमांचक गोष्टींनी हे पुस्तक खचाखच भरले आहे. वाचताना खाली ठेवावेसे वाटणारच नाही.
लेखकांनी अत्यंत परिश्रमाने या अनोख्या विषयावर एक वाचनीय आणि सुंदर पुस्तक लिहिले आहे. अन्नाभोवती फिरणारा माणसाचा संक्षिप्त इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचावे असे.
पुस्तकाचे नाव – अन्न
लेखक – अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे
पब्लिकेशन्स – मधुश्री पब्लिकेशन्स.