‘कॅलिस्टो’ – विलक्षण गुंतागुंत आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले पुस्तक

कधी कधी मनात एक साधी सरळ योजना आखून त्याप्रमाणे एखादी व्यक्ती वाटचाल करत असताना एखादी साधी घटना त्या व्यक्तीचे आयुष्य अनपेक्षित घटनांनी भरून जाते. या घटना इतक्या भराभर होतात की सावरायला वेळच मिळत नाही. अशाच ओडेल डिफस या अमेरिकन व्यक्तीची कहाणी टोरस्टन क्रोल यांनी लिहिलेल्या ‘कॅलिस्टो’ या पुस्तकात दिली आहे.

बावीस वर्षांचा ओडेल अमेरिकन सैन्यात भरती होण्यासाठी कॅलिस्टो या शहरात जात असतो. त्यावेळी अमेरिकेचे इराक सोबत युद्ध सुरू झालेले असते आणि सैन्यात भरती होण्यासाठी अमेरिकन तरुणांना आवाहन करण्यात आलेले असते. पण वाटेत ओडेलची गाडी खराब होते. ऐन दुपारच्या त्या वेळेला तहानेने कासावीस झालेला ओडेल तिथेच जवळ असलेल्या एका घरात पाणी मागण्यासाठी जातो. त्या घरातील डीन लोरी नावाच्या तरुणाशी त्याची ओळख होते. डीन तेथे त्याची मावशी ब्री सोबत राहत असतो आणि तो सांगतो की आता त्याची मावशी फ्लोरिडाला गेली आहे. डीन ओडेलची गाडी ठीक करायचा अयशस्वी प्रयत्न करतो आणि शेवटी दुसऱ्या दिवशी ती गाडी भंगारात विकायचा ते निर्णय घेतात.

डीन त्याला काही दिवस त्याच्या घरात राहायची परवानगी देतो. पण ओडेलच्या हातून अपघाताने डीनचा खून होतो. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याच्या विचारात असताना त्याला घरातील तळघरात फ्रीझर मध्ये ब्रीचा पण मृतदेह सापडतो. दोन खुणांनी हादरून गेलेला ओडेल सावरायच्या आतच डीनची बहीण अचानक त्या घरी येते. ती पोलीस दलात असते. काही काळ तिच्याशी खोटे बोलल्यावर ओडेल तिला ब्रीच्या खुनाची माहिती सांगतो आणि डीन आपल्या अज्ञात मित्रांबरोबर निघून गेल्याचे सांगतो.

ब्रीच्या खुनाचा तपास करायला आलेल्या पोलिसांना तो डीन इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचे सांगतो. त्यामुळे या कथेत दहशतवादाचा प्रवेश होतो. मुळात डीन आणि त्याची बहीण लोरेन हे अवैध ड्रग्सचा धंदा करत असतात आणि ओडेल सुध्दा हळूहळू यात ओढला जातो. हे सर्व मीडिया मध्ये आल्याने ओडेल, डीन आणि त्याची बहीण लोरेन सर्व प्रसिद्ध झालेले असतात. पण डीनच्या मृत्यूची बातमी अजून ओडेल वगळता कोणाला माहित नसते. सर्वांना वाटते की डीन एक दहशतवादी असून आता फरार झालाय. पण पोलिसांना ओडेलवरच संशय असतो आणि ओडेल मात्र डीनची बहीण लोरेनच्या प्रेमात पडलेला असतो.

अखेर याचा शेवट काय होतो? डीनच्या खुनाबद्दल पोलीस शोधून काढतात का? ओडेल वरचा संशय मिटतो का? एक विलक्षण गुंतागुंतीची आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले हे पुस्तक आवर्जून वाचावे असे.

पुस्तकाचे नाव – ‘कॅलिस्टो’

लेखक – टोरस्टन क्रोल

अनुवाद – उज्वला गोखले

पब्लिकेशन्स – मेहता पब्लिशिंग हाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *