विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम

महाभारत युद्धानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर कौरवांची माता गांधारीच्या शापाचा परिणाम दिसू लागला. सर्व यादव वंशीय आपापसात लढू लागले आणि परिणामी भगवान श्रीकृष्ण निर्वंश झाले. श्रीकृष्णाची लाडकी नगरी द्वारावती म्हणजे द्वारकेतही अराजक माजले. द्वारकेजवळील समुद्राची लक्षणेही ठीक दिसत नव्हती आणि तो द्वारकेला गिळंकृत करणार हे स्पष्ट दिसू लागले. श्रीकृष्णाचा पृथ्वीतलावरील मानव अवतार संपण्याचे दिवसही जवळ येऊ लागले. म्हणूनच कृष्णाला द्वारकेच्या अपार वैभवाची काळजी वाटू लागली. द्वारकेची सर्व संपत्ती सुरक्षित रहावी म्हणून श्रीकृष्णाने तो सारा खजाना जवळपास ८० गलबतांमध्ये भरला आणि शूर्पारक बंदराकडे (आजचे नालासोपारा) रवाना केला. तसेच या संपत्तीची जपणूक करण्यासाठी आणि ती योग्य वारसदाराकडे जाणे सुनिश्चित करण्यासाठी कृष्णाने ‘उद्धवनारायण’ संप्रदायाची स्थापना केली.

दुर्दैवाने संपत्तीने भरलेली ती सारी गलबते शूर्पारक बंदरात पोचण्यापूर्वीच वाटेत सुनामी आणि वादळात सापडली आणि बहुतांश गलबतांनी आपला मोर्चा खंबातच्या आखाताकडे वळवला. जबरदस्त अशा वादळामुळे ती सारी गलबते समुद्रात बुडाली. केवळ तीन-चार गलबते कशीबशी शूर्पारक बंदरात पोचली आणि त्यावरील सारी संपत्ती तिथून नाशिक जवळच्या दूर्गभांडार किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आली. त्यासोबतच या संपत्तीबद्दल आणि त्याचा योग्य वारसदार कसा असावा याबद्दल माहिती देणारे कृष्णाचे काही श्लोकही एका मुद्रेवर लिहून ती मुद्राही तिथेच दुर्गभांडार वर पुरण्यात आली. या (काल्पनिक) अशा  पौराणिक कथेला केंद्रस्थानी ठेवून श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम सांगणारी रहस्यमय कादंबरी म्हणजे श्री वसंत वसंत लिमये यांनी लिहिलेली ‘विश्वस्त’.  

विश्वस्त - श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम
विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम

पुण्याच्या एका कॉफी शॉप मध्ये जमणाऱ्या JFK म्हणजेच Just For Kick नावाच्या एका ग्रुपला ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे आणि ऐतिहासिक रहस्याचा मागोवा घेण्याचे वेड असते. अनिरुद्ध, प्रसाद, मकरंद, शब्बीर हे आणि भारतात Phd करायला आलेली स्कॉटिश तरुणी जोॲन हे या ग्रुप चे सदस्य असतात. यापैकी कोणाला ट्रेकिंग चे वेड असते तर कोणी रॉक क्लाइंबर. कोणाला ऐतिहासिक कागदपत्रे, वास्तू, लेणी यांची माहिती गोळा करायचा नाद. अशा या कलंदर ग्रुपच्या पहिल्या दोन मोहिमा अपयशी ठरतात. पहिली मोहीम असते विजयदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात असलेले भिंतीसारखे रहस्यमय बांधकाम ज्यामुळे किल्यावर हल्ला करायला येणारी जहाजे फुटत असतं. त्यांची दुसरी मोहीम होती मुंबई मधील प्राचीन अशी भुयारे आणि तळघरे शोधण्याची.

या दोन्ही मोहिमांमधून फारसे काही हाती न लागल्याने आलेली निराशा दूर करण्यासाठी हा ग्रुप नाशिक जवळील दुर्ग भांडार या किल्यावर ट्रेकिंग साठी जायचे ठरवतो. रात्री त्या गडावर थांबणे धोकादायक आहे या गावकऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ते दुर्गभांडार किल्यावर रात्रीचा मुक्काम करतात. या मुक्कामादरम्यान त्यांना किल्यावर एक ताम्रपट सापडतो. या ताम्रपटामध्ये ब्राम्ही  लिपीमध्ये काही श्लोक कोरलेले असतात. ब्राम्ही लिपीमुळे ते ताम्रपट इसवी सनपूर्व असावेत असे स्पष्ट होत होते. इतका प्राचीन आणि अद्भूत खजिना सापडल्यामुळे JFKची टीम हरखून गेली. आधीच्या दोन मोहिमांना आलेले अपयश मागे टाकून ते या नव्या रहस्याचा शोध घेण्यास सज्ज होतात आणि श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम सुरू करतात. 

विश्वस्त - श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम - दुर्गभांडार किल्ला
विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम – दुर्गभांडार किल्ला

या ताम्रपटावरील श्लोकांचा मागोवा घेण्यासाठी ते विविध क्षेत्रातील लोकांची मदत घ्यायला सुरुवात करतात. त्यातून त्यांना फार महत्वाची माहिती मिळते. त्या श्लोकांमधून तीन महत्वाचे संदर्भ समोर येतात – कृष्णाची नगरी द्वारकेचे वैभव, गुजरात मधील सोमनाथ मंदिर आणि एक विशिष्ट मुहूर्त. त्या सोबतच त्यांना त्या श्लोकांमध्ये आचार्य चाणक्य  यांचा सुद्धा उल्लेख आढळतो. ताम्रपट सापडल्यापासून JFK ग्रुप एकदम झपाटल्यासारखे त्या शोधाच्या मागे लागले होते. त्यांनी या प्रकल्पाचे नाव ‘ऑपरेशन गोल्डन गेट‘ असे ठेवले होते.

ताम्रपटावर उल्लेखलेल्या गोष्टी आणि त्याच्याशी संबंधित इतर बाबींविषयी माहिती गोला करणे चालू झाले. द्वारकेचा उल्लेख असल्याने ओघानेच महाभारताचा अभ्यास करणेही आलेच. महाभारत हे एक काल्पनिक महाकाव्य की खरोखरची ऐतिहासिक घटना हा प्रश्न मनात ठेवून त्यांचे संशोधन चालू झाले. या श्लोकात संदर्भ आलेल्या व त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणांना JFK ने प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा केली. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची भेट घेऊन ते या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. 

या सर्व अथक संशोधन आणि प्रयत्नांनंतर या ताम्रपटावरील एक ठळक गोष्ट समोर येऊ लागते ती म्हणजे श्रीकृष्णाने द्वारकेचा नाश होण्यापूर्वी द्वारकेचे सर्व वैभव गलबतांमध्ये भरून प्राचीन शूर्पारक (आजचे नालासोपारा) बंदराकडे पाठवले. वाटेत त्सुनामी आणि वादळामुळे तीन-चार गलबते वगळता बाकी सर्व गलबते त्यावरील सर्व खजान्यासह खंबातच्या आखातात बुडाले. या खजिन्याविषयी सोमनाथ मंदिरामध्ये एका विशिष्ट मुहूर्तावर माहिती मिळेल असेही श्रीकृष्णाने त्या श्लोकात सांगून ठेवले होते. त्या अनुषंगानेच लेखक गझनीच्या महामूदाच्या सोमनाथ मंदिरावरील आक्रमणाकडे पाहतो आणि सांगतो श्रीकृष्णाने आपला निर्वंश होण्यापूर्वी काही यादवांना उत्तर आणि वायव्य भारताकडे (आजचा अफगाणिस्तान) पाठवले होते. गझनीचा महमूद याच यादवाचा वंशज होता आणि तो श्रीकृष्णाच्या खजिन्याचा शोध घेण्यासाठीच वारंवार सोमनाथ मंदिरावर आक्रमण करत होता. तो स्वत:ला या खजिन्याचा वंशज मानत होता. पण वारंवार प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने अखेर निराश होऊन त्याने त्याच्या अखेरच्या स्वारीमध्ये त्याने सोमनाथ मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली. 

विश्वस्त - श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम - सोमनाथ मंदिर
विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम – सोमनाथ मंदिर

आर्य चाणक्यांचा श्लोकांमधील उल्लेखही JFK ला बुचकळ्यात टाकत होता कारण श्रीकृष्णाचा काळ आणि आर्य चाणक्यांचा काळ यात बरेच अंतर होते. तसेच मगधच्या बलाढ्य अशा धनानंद राजाशी लढण्याइतपत आर्थिक बळ चाणक्यांकडे कुठून आले हाही प्रश्न JFK ला सतावत होता. पण आपल्या संशोधनाअंती त्यांनी निष्कर्ष काढला की जी तीन चार गलबते सुखरूप शूर्पारकला पोचली होती त्यातील खजाना नाशिकजवळच्या दूर्गभांडार किल्ल्यावर ठेवण्यात आला होता. तोच खजिना चाणक्यांना सापडला असावा आणि त्यामुळेच धनानंद विरूद्ध लढण्यासाठी त्यांना भक्कम असे आर्थिक पाठबळ मिळाले असावे. 

जर खंबातच्या आखातात श्रीकृष्णाचा हा बुडालेला खजिना सापडला असता तर ती एक इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली असती. त्यामुळे महाभारत हे काल्पनिक महाकाव्य नसून एक खरोखर घडलेली ऐतिहासिक घटना आहे हे सिद्ध झाले असते. तसेच पाश्चात्य लोकांनी वारंवार नाकारलेले प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि इतर पौराणिक ग्रंथाचे प्रत्यक्ष अस्तित्व सिद्ध झाले असते.     

पण हे शोधून काढणे JFK साठी खरच इतके सोपे होते का? कारण यासाठी मोठ्या यंत्रसामग्रीची गरज पडणार होती. तसेच या एकूण शोधमोहिमेत एक बलाढ्य असा आंतरराष्ट्रीय शत्रू त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. ‘फॉक्स‘ नावाची बलाढ्य अशी आंतरराष्ट्रीय तेल कंपनी खंबातच्या आखातात तेल उत्खनन करत होती. या आखातात प्रचंड मोठ्या प्रमाणात तेलसाठे असल्याचे संकेत मिळाले होते. पण JFKच्या खांबातच्या आखातातील संशोधनाबाबत ‘फॉक्स’ला माहिती मिळते आणि कंपनीला आपल्या उत्खननाला धोका जाणवू लागतो. त्यामुळे जमेल त्या मार्गाने फॉक्स JFK ला धमकावण्याचा प्रयत्न करते, त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. त्याहूनही पुढे जाऊन JFKच्या दोन सदस्यांची हत्या होते आणि त्यामध्ये फॉक्सचा हात असल्याचे पुरावेही मिळतात. 

विश्वस्त - श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम - चाणक्य
विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम – चाणक्य

अशा बलाढ्य शत्रूसोबत लढण्यासाठी अनपेक्षितपणे JFK ला राजकीय साथ मिळते. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार व सध्याचे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले आरजेपी (बीजेपी??) चे वासुदेव (नरेंद्र मोदी??) JFKला मदतीचा हात पुढे करतात. आपल्या उमेदीच्या काळात वासुदेव यांनीही या रहस्याचा पाठपुरावा केलेला असतो पण जास्त खोलात जाणे त्यांना जमलेले नसते. त्यांना कृष्णाच्या त्या खजिन्याचा वापर राष्ट्रहितासाठी करायचा असतो. म्हणूनच ते JFK ला खंबातच्या आखातात संशोधनासाठी लागणारी सर्वप्रकारची मदत आणि फॉक्स पासून संरक्षण देऊ करतात. 

वासुदेव यांनी देऊ केलेल्या मदतीमुळे JFK खंबातच्या आखातात संशोधन चालू करते आणि लवकरच त्यांना खजिन्याच्या समुद्रातील अस्तित्वाविषयी सकारात्मक संकेत मिळू लागतात. पण JFK वासुदेवजींबद्दल साशंक असते. म्हणून ते काही महत्वाची माहिती गोपनीय ठेवून बाकी सर्व माहिती वासुदेवजींना सांगतात. खजिन्याच्या अस्तित्वाबद्दल मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे उत्साहित झालेले वासुदेवजी निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायच्या आधी एक सभा घेऊन यासंबंधी घोषणा करायची असे ठरवतात. द्वारकेच्या वैभवाबद्दल घोषणा करायची जबाबदारी ते JFK चा सदस्य अनिरूद्ध वर सोपवतात. पण ऐनवेळी सभेमध्ये अनिरूद्ध केवळ द्वारकेच्या अस्तित्वाविषयी मिळालेल्या संकेताबद्दल बोलतो. खजिन्याबद्दल आधी ठरल्याप्रमाणे काहीही न बोलण्यामुळे वासुदेवजी JFK वर प्रचंड नाराज होतात. पण त्यांची कशीबशी समजूत काढून JFK एका महिन्याच्या सुट्टीसाठी परदेशी रवाना होते. 

विश्वस्त - श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम - खंबातचे आखात
विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम – खंबातचे आखात

JFK ने द्वारकेच्या वैभवाबद्दल जाहीरपणे घोषणा करणे का टाळले? त्यांना वासुदेवजींवर विश्वास नव्हता की अन्य काही कारण होते? या वैभवाच्या संरक्षणासाठी बनवलेल्या उद्धवनारायण संप्रदायाकडे एक महत्वाची जबाबदारी होती ती म्हणजे या खजिन्यासाठी एक निर्मोही आणि सत्पात्र वारसदार शोधण्याची. वासुदेव असे वारसदार होते का? या प्रश्नापाशी आणून लेखकाने ही कादंबरी संपवली आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचे संदर्भ लाभलेली, अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आट्यापाट्या खेळणारी, नाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी ही श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम एकदा नक्कीच वाचावी अशी आहे.   

1 Comment

  1. नमस्कार,
    आपण लिहिलेली पुस्तकाची कथा छान आहे.
    श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम एकदा नक्कीच वाचावी अशीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *