छत्रपती शिवाजी महाराज – जगातले एक ग्रेट इंजीनियर

प्रस्तावना

भारतीय राजकारणामध्ये सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग बर्‍याच वेळा केला जातो. काही नेत्यांना या प्रयोगाद्वारे अभूतपूर्व यश मिळाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. पण जवळपास ३९२ वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रांमध्ये सोशल इंजिनीयरिंगचे यशस्वी प्रयोग केले होते आणि त्यातूनच पुढे सामान्य रयतेच्या सहभागाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. चुकीच्या रूढी-परंपरांना नष्ट करत विविध सण साजरे करणे, विविध किल्यांचे बांधकाम-डागडुजी, प्रशासन, सैन्य इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग करून त्यांनी आपण जगातले एक ग्रेट इंजीनियर असल्याचे दाखवून दिले. शिवरायांच्या या सोशल इंजिनीयरिंग बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी प्रा नामदेवराव जाधव यांनी लिहिलेले ‘शिवाजी-द ग्रेट इंजीनियर’ हे पुस्तक वाचावे लागेल. 

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज (फोटो साभार – गूगल)

दसर्‍यातील सीमोल्लंघन

दसर्‍याच्या दिवशी आपण सीमोल्लंघन करतो. मूळात याची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली. त्याकाळी लोकांना आपल्या गावाच्या बाहेर जायची परवानगी नसायची. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे लोकांना कळू नये आणि ते नेहमी आपल्या वर्चस्वाखाली राहावेत हा हेतू त्यामागे असायचा. कोणी गावाबाहेर गेलाच तर त्याला वाळीत टाकले जायचे. पण लोक गावाबाहेरच नाही पडले तर स्वराज्य निर्माण होणार कसे? म्हणून महाराजांनी दसर्‍याच्या दिवशी सीमोल्लंघनाची सुरुवात केली. घरी आपापल्या शस्त्रांची पूजा करून गावाच्या वेशीबाहेर जायचे आणि आपट्याच्या पानांना सोने म्हणून एकमेकांना वाटायचे. राजेंनी यातून एक महत्वाचा संदेश समाजाला दिला की चुकीच्या प्रथा परंपरांचा त्याग करा आणि दसर्‍याच्या दिवशी हत्यारांसोबतच आपल्या विचारांना सुद्धा धार द्या.

दिवाळी

असेच सोशल इंजिनीयरिंग शिवरायांनी दिवाळीच्या बाबतीतही केले. दिवाळी अमावस्येच्या रात्री असते आणि अमावस्येच्या दिवशी/रात्री घराबाहेर पडणे किंवा कोणतेही काम करणे अगदी आजही टाळले जाते. दिवाळीच्या दिवशी यश व समृद्धी मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. हाच धागा पकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी साधा व सरळ संदेश समाजाला दिला. अंधाराला न घाबरता आणि अमावस्येला न जुमानता जो पराक्रम करण्यासाठी बाहेर पडतो त्यालाच प्रचंड यश आणि समृद्धी मिळते. महाराजांनी आपल्या कृतीने अमावस्येच्या या अंधश्रद्धेचे निर्मूलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बर्‍याच मोहिमा या अमावस्येच्या अंधार्‍या रात्रीच केलेल्या आढळतील.

पुण्यामध्ये चालवला सोन्याचा नांगर

वयाच्या बाराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज बंगलोर वरून पुण्याला आले. त्यावेळी पुण्यामध्ये प्रचंड गरिबी होती कारण तिथल्या शापित भूमीवर नांगर चालवल्यास नांगर चालवणार्‍याचा वंश बुडतो असे म्हटले जाई. पण या अंधश्रद्धेला भीक न घालता जिजाऊंनी त्याच शापित भूमीवर सोन्याचा नांगर चालवून समाजाला चुकीच्या परंपरांच्या जोखडातून बाहेर यायला प्रोत्साहित केले. याच सोशल इंजिनीयरिंगची आठवण म्हणून आज बैलपोळा किंवा बेंदूर साजरा केला जातो. 

छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यामध्ये सोन्याचा नांगर (फोटो साभार – गूगल)

स्वराज्य स्थापनेची शपथ

शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत महाशिवरात्रीच्या रात्री रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. यामध्ये त्यांचा सोशल इंजिनीयरिंगचा एक मोठा हेतू होता. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो लोक शंकराच्या मंदिरात किमान एक पेला दूध घेऊन जातात. रिकाम्या हाती कोणीही जात नाही. महाशिवरात्रीच्या रात्री स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन महाराजांनी स्पष्ट संदेश दिला की स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात प्रत्येकाने पुढे येऊन काही ना काही योगदान द्यावे लागेल. पुढे खरोखरच हजारो मावळ्यांच्या योगदान आणि बलिदानामुळेच स्वराज्य उभे राहिले. 

रायरेश्वर मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज
रायरेश्वर मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज (फोटो साभार – गूगल)

होळी

होळी या सणाचा वापर देखील महाराजांनी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी केला. होलिका दहनात टाकण्यात येणार्‍या पुरणपोळीद्वारे (कारण त्याकाळी पुरणपोळी बनवणे फार जिकिरीचे काम होते. त्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध नसायचे) त्यांनी समाजाला संदेश दिला की व्यक्तिगत स्वार्थाची होळी केल्याशिवाय स्वराज्य निर्माण होणार नाही. तसेच होलिका दहनामध्ये टाकण्यात येणारा नारळ काढायचे तरूणांना आव्हान दिले जाई. त्यातून त्यांनी धाडसी मावळ्यांची सेना उभी केली. 

शिवरायांची सेना

शिवरायांच्या सेनेत सामील होणारा कोणताही सैनिक त्याच्या नावाने नाही तर त्याच्या कर्तुत्व आणि पराक्रमानुसार दिल्या जाणार्‍या पदांनूसार ओळखले जात. तसेच सर्व जाती धर्माच्या सैनिकांची एक छावणी, एक फलटण आणि एकच चूल असायची. यातून महाराजांनी स्पृश्य-अस्पृश्य हा भेदच नष्ट करून एकसंध आणि मजबूत असे सैन्य उभे केले. महाराजांनी माणसांचेही सोशल इंजिनीयरिंग करताना लोकांना आपले कर्तुत्व दाखवायची संधी दिली. अशा व्यक्तींना त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर नियुक्त केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली महाराजांची अत्यंत कार्यक्षम अशी गुप्तहेर संघटना आणि स्वराज्याचे मजबूत असे आरमार.

बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक (फोटो साभार – गूगल)

किल्ल्यांचे बांधकाम

विविध सणांमध्ये सोशल इंजिनीयरिंग करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम शिवरायांनी केलेच पण विविध किल्ल्यांच्या बांधकाम आणि डागडुजीतही त्यांनी आपल्या इंजिनीयरिंग कौशल्याचा पुरेपूर परिचय दिला. त्यांनी जमीनीच्या आत असलेले पाणी शोधण्याची बरीच तंत्रे शोधून काढली ज्याचा उपयोग शेतीसाठी आणि किल्ल्यांच्या बांधकामावेळी केला गेला. किल्ल्यांचे बांधकाम , त्यावर पाण्यासाठी तलाव, टाके खोदणे यासाठी खडक फोडणे गरजेचे होते. त्यासाठी महाराजांनी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून पर्यावरण पूरक पद्धतीने खडक फोडण्याच्या बर्‍याच पद्धती शोधून काढल्या. अशाच अनेक पर्यावरण पूरक पद्धती त्यांनी किल्ल्यांच्या बांधकामाशी निगडीत इतर कामांसाठीही विकसित केल्या. जशा की हत्यारांना धार लावणे, पाणी स्वच्छ करणे, तलवारी व इतर हत्यारांना पाणी देणे, बांधकामासाठी माती निवडणे, बांधकामासाठी चुना बनवणे, बांधकामासाठी लाकूड निवडणे इत्यादी.

महाराजांनी आपल्या अचूक नजरेने आणि दूरदृष्टीने अनेक नवीन किल्ले बांधण्यासाठी अचूक अशा जागा शोधल्या (उदा राजगड, रायगड इत्यादी). तसेच महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत बांधलेल्या १११ किल्ल्यांपैकी प्रत्येकाच्या बांधकामात वेगळेपणा आहे. जसे की एका वेळी एकाच व्यक्तीला जाता येईल अशा खडकात फोडून बनवलेल्या अरूंद पायर्‍या असलेला ठाण्यातील अशेरी किल्ला, नाशिक मधील हरीहर किल्ला, एकाच वेळी समुद्रातील आणि जमीनीवरील मानला जाणारा कुलाबा किल्ला, चुना, गूळ, उडीद पावडर, मेथी, अंबाडी, तांदळाचे पीठ वापरून बांधलेला पद्मदुर्ग किल्ला, शत्रूंच्या तोफांना चकवण्यासाठी मुख्य दरवाजा दिसणार नाही अशा प्रकारे केलेले किल्ल्यांचे बांधकाम, हत्तीसारख्या प्राण्यांना जाणे अशक्य होईल अशा प्रकारे किल्ल्याकडे जाण्यासाठी बांधलेले अरूंद रस्ते…………….. बरीच मोठी यादी आहे. जितके लिहावे तितके कमीच.

हरीहर किल्ला -  छत्रपती शिवाजी महाराज
हरीहर किल्ला (फोटो साभार – गूगल)

समारोप 

छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एक उत्कृष्ट इंजिनियर होते. परंतू त्यांनी फक्त किल्लेच बांधले असे नाही. त्यांनी वयाच्या १५व्या वर्षी स्वत: राजगड किल्याचे आरेखन केले आणि आपल्या हयातीत १११ नवीन किल्ले बांधले. म्हणजे दरवर्षी ०३ नवीन किल्ले. पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांनी केलेले सोशल इंजिनीयरिंग. अंधश्रद्धा, जाचक रूढी, खुळचट परंपरा यांना मोडीत काढून सामान्यांना प्रगतीकडे नेणारा दृष्टिकोन देणार्‍या परंपरा सुरू केल्या. सामाजिक विकासाच्या आड येणार्‍या चौकटी मोडत व्यक्ती आणि समाजाला समान संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे अत्यंत महत्वाचे आहेत. विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणत आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आगळया वेगळ्या सोशल इंजिनीयरिंग पूर्णपणे जाणून घेण्यासाठी एकदा हे पूस्तक आवर्जून वाचले पाहिजे.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *