छत्रपती शिवाजी महाराज – व्यवस्थापन गुरु आणि व्यूहरचनाकार

प्रोजेक्ट अफजलखान – १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेला अफजलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यूहरचनात्मक प्रगल्भता आणि उत्तम व्यवस्थापकीय कौशल्याचा नमुना होता. 

आग्र्याहून सुटकाछ. शिवाजी महाराजांचे आग्र्याला जाणे, औरंगजेबाच्या कैदेत राहणे आणि तिथून निसटून पुन्हा सुखरूप स्वराज्यात येणे यामध्ये जवळपास आठ महिन्यांचा कालावधी गेला. या काळात शिवराय कोठे आहेत हे कोणालाच माहित नव्हते. संपर्काचीही कोणतीही व्यवस्था नव्हती. तरीही त्यांच्या सहकाऱ्यांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ८ महिन्यात स्वराज्याची घडी विस्कटू दिली नाही. आपल्या अनुपस्थितीतही  स्वराज्याचा गाडा नेहमीप्रमाणे चालू राहावा यासाठी शिवाजी महाराजांनी कृतीशील असे सहकारी निवडले आणि घडवले होते.

प्रोजेक्ट शाहिस्तेखान – दररोज पुण्याचे लचके तोडत लाल महालात आरामात पडून असलेल्या शाहिस्तेखानावर शिवरायांनी कमीत कमी साधने वापरून अनपेक्षित असा हल्ला केला. हा हल्ला इतका अकल्पित होता कि शाहिस्तेखान प्रचंड दहशतीने हाय खाऊन पुणे सोडून पळाला. ‘Effective Project Management’ चे हे सर्वोत्तम उदाहरण.

आपल्या सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर आणि यशस्वी राजा म्हणून माहित आहेत. पण त्यांच्या या यशामागे त्यांच्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याचाही तितकाच महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या या व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल इतिहासात फार काही लिहिण्यात आलेले नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू आपल्याला समजून घ्यावा लागतो तो शिवरायांच्या कृतीतून, त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून, त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांमधून आणि त्यांनी लढलेल्या लढायांमधून. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे व्यवस्थापकीय व्यक्तिमत्व डॉ गिरीश जाखोटिया यांनी आपल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज – व्यवस्थापन गुरु आणि व्यूहरचनाकार’ या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज - व्यवस्थापन गुरु आणि व्यूहरचनाकार
छत्रपती शिवाजी महाराज – व्यवस्थापन गुरु आणि व्यूहरचनाकार

शिवरायांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचे लेखकाने खालील विविध मुद्यांवर विश्लेषण केले आहे:

१.   नियोजन व व्यवस्थापन – ई.स. १६३६ साली छोटे शिवबा मातोश्री जिजाऊंसह पुण्याला आले तेव्हा पुण्यातील एकूणच परिस्थिती हलाखीची झाली होती. रयतेचे धिंडवडे निघाले होते. शेतकरी-कामकरी-व्यापारी-स्त्रिया-अस्पृश्य इत्यादी सारेच गोंधळलेले, पिडीत व भयभीत होते. अशा वेळी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणे सोपे नव्हते. सुलतानी अत्याचाराला कंटाळलेल्या रयतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांनाही स्वराज्य उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेणे सोपे नव्हते.

म्हणूनच शिवरायांनी स्वातंत्र्य, समता, एकता आणि बंधुता या चार मूल्यांच्या आधारावर व रयतेला केंद्रस्थानी ठेवून आपली वाटचाल सुरु केली. आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कल्याणकारी राज्य उभे केले. एक असे कल्याणकारी राज्य जे स्वातंत्र्य, समता, एकता व बंधुता या चार मूल्यांवर आधारलेले होते, एक असे राज्य ज्याचा राजा हा ‘उपभोगशून्य स्वामी’ होता, एक असे राज्य ज्याच्या राज्यकर्त्यांची कर्तव्ये सुस्पष्ट होती, एक असे राज्य ज्याच्या केंद्रस्थानी सामान्य रयत होती.

२.    अध्यात्मिक अर्थशास्त्रआणि कर्मयोग – अध्यात्मिक अर्थशास्त्रामध्ये दुर्बळांना संरक्षण -प्राधान्य – आधार अभिप्रेत आहे. छ शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य याच तत्वावर उभे होते. अनेक दुर्बळ, मागास जाती यांमधून शिवरायांनी लोकांना हेरले, निवडले, घडवले आणि त्यांना स्वराज्य उभारणीच्या कार्यात सामावून घेतले. या सर्वासाठी आवश्यक असा कर्मयोग महाराजांच्या ठायी होताच. किशोरवयात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरून त्यांनी रयतेची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपले सहकारी निवडून त्यांनाही घडवले (जसे नेताजी पालकर ज्यांना प्रती शिवाजी म्हटले जायचे).

सर्व जाती धर्मातील लोकांना समान संधी देऊ केली, स्वराज्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांची त्यांनी योग्य ती काळजी घेतली. धार्मिक अवडंबर सपशेल बाजूला ठेवत त्यांनी काळानुसार बदलते तंत्रज्ञान आत्मसात व विकसित करण्यावर भर दिला. म्हणूनच पहिले भारतीय आरमार उभे करणारा पहिला भारतीय राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाने नोंद घेतली आहे. महाराजांनी गरज पडली तेव्हा धाडसी निर्णय घेतले. स्वराज्यामध्ये उत्तम प्रशासन व पारदर्शकता ठेवली. आध्यात्मिक अर्थशास्त्र व आपल्या कर्मयोगाच्या बळावर महाराजांनी कल्याणकारी असे राज्य उभे केले. 

३.     दूरदृष्टीता व विचारसरणी – आसपास इतके प्रबळ असे शत्रू असताना आणि जनतेचे मनोधैर्य पूर्णपणे रसातळाला गेले असताना स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न पाहणे धाडसाचे होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टीने एका विचारसरणीवर वाटचाल करणे क्रमप्राप्त होते. स्वराज्य निर्मितीचे भव्य स्वप्न पाहताना शिवरायांनी वास्तव परिस्थितीचे पूर्ण भान ठेवून आपल्या उणीवा/बलस्थाने/संभाव्य संधी इत्यादींचे अचूक विश्लेषण केले होते. या सर्वांचा त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला होता. यावरूनच त्यांनी अचूक व्यूहरचना रचत हळूहळू स्वराज्य निर्मितीकडे वाटचाल सुरु केली.

रयतेचे कल्याण या एकाच विचारसरणी वर आधारित स्वराज्य उभे करण्यासाठी शिवरायांनी दूरदृष्टीने विविध प्रकारच्या यंत्रणा उभ्या केल्या (जसे कि गुप्तचर यंत्रणा), समाजातील सर्व थरातील लोकांना सामावून घेतले, संसाधने जमवली, नवीन किल्ले बांधले, जुने किल्ले बळकट केले. प्रसंगी आरमार निर्मितीसाठी पोर्तुगीजांची मदत घेतली, इंग्रजांच्या वेगळ्या चलनाच्या मागणीला फेटाळून लावले. या सर्वांच्या बळावरच ध्येयाप्रत पोहोचण्याच्या वाटचालीतील अनिश्चितता माहित असूनही त्यांनी आव्हानांना सामोरे जात स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. 

छत्रपती शिवाजी महाराज
आग्र्याहून सुटका

४.     सर्वोत्तम नेतृत्व आणि उत्तम चारित्र्यछत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम नेता व उत्तम व्यवस्थापक तर होतेच पण त्यांचे चारित्र्यही तेवढेच सर्वोत्तम होते. त्यांनी आपल्या नेतृत्वातून एक उत्तम संस्थात्मक संस्कृती तयार केली ज्याच्या बळावर मराठा साम्राज्य त्यांच्या नंतरही नेहमीच बलदंड राहिले. शिस्त आणि लवचिकता हे त्यांच्या नेतृत्वाचे दोन महत्वाचे पैलू होते. त्यांचा प्रत्येक निर्णय, त्यांची प्रत्येक मोहीम हि शिस्तबद्ध असायची. स्वराज्य वाचवण्यासाठी प्रसंगी काही पावले माघार घ्यायची लवचिकताही त्यांच्या नेतृत्वात होती. मुघलांशी तह करून त्यांनी २३ किल्ले त्यांना दिले आणि स्वराज्यावर त्यावेळी आलेले गंडांतर टाळले. पण कालांतराने त्यांनी पुन्हा सर्व किल्ले मुघलांकडून जिंकून घेतले.

शिवरायांचे नेतृत्व घडवण्यात राजमाता जिजाऊ, शहाजीराजे, दादोजी कोंडदेव इत्यादींचा सिंहाचा वाटा होता. उत्तम नेतृत्वासोबतच  उत्तम चारित्र्य हे कोणत्याही समाजाचा व राष्ट्राचा आत्मा होय. शिवरायांचे वागणे, बोलणे, कृती हे सर्व काही म्हणजे स्फूर्तीदायी चारित्र्याचे उदाहरण म्हणता येईल. स्वराज्य निर्मितीची शपथ शिवरायांनी रायरेश्वरातील महादेव मंदिरात घेतली होती. स्वतः महादेव हे ‘उपभोगशून्य स्वामी’. ना त्यांचा राजवाडा आहे न अंगावर दागदागिने. छत्रपती शिवाजी महाराजही महादेवाप्रमाणेच ‘उपभोगशून्य स्वामी’ होते. म्हणूनच आजही महाराजांचे चारित्र्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज
शाहिस्तेखानावर हल्ला

छत्रपती शिवाजी महाराज इतर अनेक सरदारांप्रमाणे पुण्याची जहागिरी सांभाळत ऐशोआरामात जगू शकले असते. पण त्यांनी ‘धाडस’ केले आणि स्वकीय शत्रू तसेच पराकीयांनाही धडकी बसेल असे रयतेचे स्वराज्य उभे केले आपले उत्तम व्यवस्थापकीय कौशल्य, अजोड व्यूहरचना, प्रसंगनिष्ठ चतुराई यांच्या बळावर अनेक अवघड मोहिमा फत्ते केल्या. पुरेशी साधनसामग्री नसताना, बाकीचे मराठा सरदार पराकीयांसमोर नतमस्तक होत असताना आणि सारा समाज हतबल झालेला असताना त्यांनी स्वराज्य निर्मितीचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवळ मिरवणुका, नाचगाणे न करता शिवचरित्रातून त्यांचे वरील विविध गुण आजच्या समाजाने अंगी बनवले तर भारतातही रयतेचे कल्याणकारी स्वराज्य यायला वेळ लागणार नाही.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा — https://amzn.to/3Qe6EzF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *