गडकोट हेच राज्य…
गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ…
गडकोट म्हणजे खजिना…
गडकोट म्हणजे सैन्याचे बल…
गडकोट म्हणजे राजलक्ष्मी…
गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थाने…
गडकोट म्हणजे सुखनिद्रागार…
किंबहुना……
गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक…
अगदी प्राचीन काळापासून कोणत्याही राज्यामध्ये गडकिल्ले अत्यंत महत्त्वाचे स्थान राखून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याच गडकिल्यांच्या मदतीने बलाढ्य अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याच किल्यांचा अगदी महाभारत, वैदिक काळापासूनचा इतिहास, किल्यांचे विविध प्रकार, त्यांची बांधणी, किल्यांवर येणार खर्च, दुर्गांसंबंधी विविध पत्रे आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हावार विविध किल्यांची सविस्तर माहिती श्री सतीश अक्कलकोट यांनी आपल्या ‘दुर्ग’ या पुस्तकात दिली आहे.
गड किल्ल्यांच्या इतिहासात रस असलेल्यांना तसेच डोंगर भटक्यांना हे पुस्तक प्रचंड उपयोगी आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक फार जुने असल्याने लेखकाने प्रत्येक गडावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांबाबत माहिती दिली आहे (कारण अर्थातच त्या काळी स्वतःचे वाहन असणे अत्यंत दुर्मिळ होते). तसेच या पुस्तकात दिलेली किल्ल्यांची सर्व छायाचित्रे शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी काढलेली आहेत. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.
(हे पुस्तक मला आमच्या शहरातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात सापडले. खरेदी करण्यासाठी ऑनलाईन मात्र हे पुस्तक कुठे उपलब्ध दिसले नाही. खरेदी साठी पुस्तक कुठे उपलब्ध असेल याबाबत कोणाला माहिती असल्यास नक्की कळवा).
पुस्तकाचे नाव – दुर्ग
लेखक – सतीश अक्कलकोट
पब्लिकेशन्स – सह्याद्री दुर्गभ्रमण मंडळ.