०१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीच्या पोलंड वरील हल्याने दुसरे महायुद्ध सुरू झाले. २२ जून १९४१ रोजी नाझी जर्मनीने ‘ऑपरेशन बार्बारोसा’च्या नावाखाली सोवियत रशियावर हल्ला केला. सुरुवातीच्या काळात जर्मन सैन्याने रशियन सेनेचा पराभव करत चांगलीच मुसंडी मारली. इकडे युरोपमध्येही ब्रिटन वगळता जवळपास संपूर्ण युरोप जर्मनीच्या ताब्यात गेला होता. अशावेळी रशियाला जर्मनी सोबत लढण्यासाठी विमाने, इंधन, दारूगोळा इत्यादी युद्ध साहित्य पोहोचवण्याचा निर्णय मित्र राष्ट्रांनी घेतला. हे सर्व युद्ध साहित्य घेऊन जाणाऱ्या जहाजांच्या ताफ्यांना ‘एचएमएस युलिसिस’ या ब्रिटिश क्रुझर जातीच्या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाची जहाजे संरक्षण देणार असतात. कोणत्याही परिस्थितीत हे सर्व युद्ध साहित्य रशियाला पोहोचवणे गरजेचे असते. या थरारक मोहिमेचे वर्णन अलिस्टर मॅकलीन यांनी त्यांच्या ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत केले आहे.
युद्ध साहित्य घेऊन जाणारा हा ताफा युलिसिसला सुरक्षितपणे रशियाच्या मुरमान्स्क पर्यंत पोहोचवायचा असतो. युलिसिस हि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आणि त्या काळातील जगातील अतिशय वेगवान युद्धनौकांपैकी एक होती. रशियाला जाणारा हा संपूर्ण समुद्री मार्ग ग्रीनलँड जवळून आर्क्टिक समुद्रातून जाणारा असतो. पण प्रवासाच्या सुरुवातीच्या काही दिवसातच युलिसिस वर एक छोटेसे बंड घडून येते. मुळात या समुद्री मार्गावर युलिसिस गेली कित्येक महिने सतत मोहिमेवरच असते. त्यामुळे त्या जहाजावरील प्रत्येक नौसैनिक आणि अधिकारी हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय थकलेले असतात. पण तरीही ब्रिटनचे नौदल मुख्यालय या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना या मोहिमेवर जाण्याचा आदेश देते. युलिसिस आपला प्रवास सुरू करते तेच मुळी अशा पार्श्वभूमीवर. पण नौदलाची कडक शिस्त तसेच युलिसिसचा कप्तान कॅप्टन व्हॅलरी वरील प्रेमामुळे ही बंडाची धग लवकरच शांत होते.
खरे तर या मार्गावर या ताफ्याला सर्वात मोठा धोका होता तो म्हणजे जर्मन यू बोटींचा. या जर्मन यू बोटींनी दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या तोंडचे अक्षरशः पाणी पळवले होते. यु बोटींनी महायुद्धादरम्यान दीर्घकाळ निर्विवादपणे समुद्रावर वर्चस्व गाजवलले होते. शत्रूचा धोका केवळ समुद्रातूनच नव्हता तर आकाशातून जर्मन हवाई दलाची विमाने (लुप्तवाफ) आपल्या शत्रूचा घास घेण्यासाठी सज्ज होते. ब्रिटिश नौदलाच्या जहाजांनी या जर्मन धोक्याला एक वेळ तोंड दिलेही असते पण त्याहीपेक्षा प्रबळ असा शत्रू युलिसिस समोर आ वासून उभा होता ज्याला तोंड देणे युलिसिसच्या आवाक्याबाहेरचे होते.
हा शत्रू होता तिथला निसर्ग. खवळलेला समुद्र, महाकाय लाटा, सतत कोसळणारे बर्फ, शून्याच्या खाली असणारे तापमान आणि त्यामुळे असलेली भयंकर थंडी, प्रचंड वादळे या सर्वांना तोंड देणे अत्यंत अवघड होते. यासोबतच सातत्याने युद्धाच्या छायेत राहिल्याने चिडलेले आणि निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव इत्यादी अनेक संकटांशी झुंज देत युलिसिसचा प्रवास सुरू होता. एक प्रकारे युलिसिस वरचे नौसैनिक निसर्गाशी झुंज देत कसेबसे टिकून राहण्यासाठी धडपडत होते. (अशीच अवस्था भारतीय सैन्याची १९६२च्या चीन विरूद्धच्या युद्धावेळी होती).
अशा परिस्थितीमध्ये एचएमएस युलिसिस वरील नौसैनिकांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे तसेच भविष्यात येणाऱ्या संकटासाठी त्यांना मानसिक दृष्ट्या तयारीत ठेवणे हे युलिसिसचा कप्तान व्हॅलरीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच आव्हानात्मक होते. ते करण्यात व्हॅलरी यशस्वी झाले असे म्हटल्यास चुकीचे नाही. स्वतः अतिशय गंभीर आजारी असतानाही त्याने नौसैनिकांचे मनोधैर्य टिकवून ठेवले. निसर्गामुळे आणि जर्मन यु बोटी आणि विमानांच्या हल्ल्यामुळे युलिसिसचे खूप नुकसान झाले होते. बरेच नौसैनिक मृत्युमुखी पडले होते.
ताफ्यातील बऱ्याच जहाजांना जलसमाधी मिळाली होती. निसर्ग तर रागावलेलाच होता. अशा स्थितीतही व्हॅलरी जहाजाच्या प्रत्येक भागात जाऊन तिथल्या नौसैनिकांशी संवाद साधायचा. आपला कॅप्टन स्वतः आपल्याला भेटायला आला आहे म्हटल्यावर प्रचंड निराश आणि थकलेले ते नौसेनिक उत्साहित व्हायचे. त्यामुळे बलाढ्य अशा अनेक जर्मन यू बोटी आणि अनेक जर्मन हवाई दलाची विमाने युलिसिस व ताफ्यातील इतर ब्रिटिश जहाजांनी पाडली.
कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवते की युलिसिस व त्याच्या संपूर्ण ताफ्याला ब्रिटिश नौदल मुख्यालय आणि ब्रिटिश सरकारने पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिले होते. सर्वोत्तम अशा इतर जहाजांचा ताफा मुख्य ब्रिटिश भूमीचे रक्षण करण्यासाठी ठेवल्याने वारंवार मदतीची मागणी करूनही युलिसिसला कोणतीही मदत पुरवण्यात आली नाही. असे म्हणतात की सैन्य व सरकार ज्यावेळी हातात हात घेऊन एकत्र समन्वयाने चालतात त्यावेळी त्या सैन्याचा कधीच पराभव होत नाही. इथे युलिसिसला मात्र स्वबळावर झुंज द्यावी लागली.
निसर्ग आणि शत्रूच्या हल्ल्यापुढे अनेक जहाजे बुडाली, कित्येक लोक प्राणास मुकले, युलिसिसचे ही प्रचंड नुकसान झाले, स्वतः कॅप्टन व्हॅलरी ही प्राणास मुकले. पण सर्व आव्हानांना युलिसिस वरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक यांनी असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड दिले. शेवटी रशिया पर्यंत मदत पोहोचते की नाही हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. जर्मनी आणि रशिया यांच्यातील लढ्याचे थरारक चित्रण करणारी दुसऱ्या महायुद्धा वरील महान कादंबऱ्यांपैकी एक आवर्जून वाचावी अशी ही एक अजोड साहित्य कृती.