जगातील एका अज्ञात अशा ठिकाणाहून एक दहशतवादी इंटरनेट द्वारे अत्यंत जहरी प्रवचन देऊन तरुणांना दहशतवादी कृत्यासाठी चिथावत असतो. त्या व्यक्तीबद्दल अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांना काहीच माहिती नसते. त्याचे नाव, गाव, चेहरा अगदी काहीच नाही. प्रवचने देत असल्याने त्याला अमेरिकेने ‘द प्रीचर’ हे सांकेतिक नाव ठेवलेले असते आणि हे नाव अमेरिकेच्या ‘द किल लिस्ट’ मध्ये सर्वात वरच्या स्थानावर असते. ही किल लिस्ट काय असते आणि काहीच सुगावा मागे न ठेवणाऱ्या या प्रीचरचा शोध अमेरिका कशी घेते हे वाचणे अत्यंत रोमांचक आहे. हा संपूर्ण थरार फ्रेडरिक फोरसिथ यांनी आपल्या ‘द किल लिस्ट’ या पुस्तकात दिला आहे.
मार्च महिन्याच्या एका दिवशी सकाळी जेरी डरमॉट या अमेरिकन काँग्रेस सदस्याचा एक व्यक्ती गोळ्या घालून खून करते. डरमॉट यांच्या सुरक्षारक्षकाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो हल्लेखोर देखील ठार होतो. तो हल्लेखोर एक जॉर्डेनियन विद्यार्थी असतो आणि ज्यावेळी पोलीस त्याच्या खोलीची तपासणी करतात त्यावेळी त्यांना त्याच्या संगणकामध्ये एका बुरखाधारी व्यक्तीचे इंग्रजी भाषेतील प्रवचन सापडते. या प्रवचनात ती व्यक्ती जगभरातील मुस्लिमांना संदेश देत असते की प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने अमेरिकेच्या व इतर पाश्चात्य देशांच्या सरकारी सेवेत असणाऱ्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची हत्या करायची आणि नंतर स्वतः शहीद किंवा हुतात्मा बनून निरंतर जन्नत मध्ये निवास करायचा.
त्या व्यक्तीच्या अशा प्रवचनामुळे माथी भडकलेल्या अनेक हल्लेखोरांनी अमेरिका व इंग्लंडमध्येही अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची हत्या केलेली असते. त्यामुळे अमेरिका तसेच इतर पाश्चात्य देशांच्या सुरक्षा संस्थांना हा प्रीचर हवा असतो. पण त्याच्या प्रवचना व्यतिरिक्त इतर काहीच माहिती त्याच्याबद्दल नसते. पण त्याची प्रवचने आता अत्यंत खतरनाक बनल्याने अमेरिका त्याचा समावेश ‘द किल लिस्ट’ मध्ये सर्वात वर करते.
‘द किल लिस्ट’ ही जगाची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या लोकांची एक गुप्त अशी यादी असते. ही यादी अमेरिकन सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बनवलेली असते आणि त्या यादीचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी अमेरिकन अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडत असते. या लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वांना सरळ सरळ मृत्युदंड दिला जात असतो. याच लिस्टमध्ये आता द प्रीचरचा समावेश सर्वात वर करण्यात येतो. द प्रीचरचा शोध घेऊन त्याला ठार मारण्याची जबाबदारी ‘जॉईंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड‘च्या अंतर्गत असलेल्या टोसा नावाच्या गुप्त गटाकडे सोपवली जाते. टोसाचा डायरेक्टर ही जबाबदारी ‘द ट्रॅकर’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका लेफ्टनंट कर्नल वर सोपवतो.
यु एस मरीन मध्ये असलेला लेफ्टनंट कर्नल किट कार्सन हाच ट्रॅकर या नावाने टोसा मध्ये कार्यरत असतो. इतिहासातील त्याची रुची आणि अस्खलित अरबी भाषा बोलणे यामुळे कालांतराने त्याला मरीन मधून बदलून टोसामध्ये नियुक्त केले जाते. टोसा मध्ये ट्रॅकर म्हणून काम करत असताना त्याने अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडलेले असते. आता पाळी असते प्रीचरची.
द प्रीचर ऑनलाइन ही प्रवचने देत असतो. पण सायबर विश्वात तो अत्यंतिक काळजी घेत असल्याने तो ही प्रवचने कोठे रेकॉर्ड करतो आणि कोठून ती जगभरात प्रसारित केली जात असतात हे कळणे जवळपास अशक्यप्राय झालेले असते. सीआयएच्या संगणक तज्ञाने देखील यापुढे हात टेकलेले असताना ट्रॅकर आता रॉजर केंड्रीक या व्हर्जिनियामधील एका तरुण मुलाची मदत घेतो. संगणकामध्ये विलक्षण गती असलेला रॉजर प्रीचरबद्दल ट्रॅकरला पहिला क्लू देतो. प्रीचर रेकॉर्ड करत असलेली सर्व प्रवचने ही इब्राहिम समीर नावाचा एक इराकी तरुण सोमालयामधील किस्मायो या शहरातून जगभरात प्रसारित करत असतो. पण प्रीचर तेथेच राहत असतो का आणि मुख्य प्रश्न म्हणजे प्रीचर नेमका असतो हे मात्र अजूनही गुलदस्त्यात होते.
प्रीचरबाबत ट्रॅकरला दुसरा क्लू महमूद गुल नावाचा एक वृद्ध तालिबानी नेता देतो. महमूद गुल सततच्या युद्धाला कंटाळला होता आणि आता त्याला उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबासोबत शांतपणे घालवायचे होते. असा हा महमूद इतर तीन तालिबानी लोकांसोबत अफगाणिस्तानातील एक महत्त्वाचा प्रांत असलेल्या गजनी प्रांतात सरकारी अधिकारी व नाटोचे प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाला भेटतो. हे शिष्टमंडळ हिंसा सोडण्यास तयार असलेल्या तालिबानींना पुनर्वसनासाठी मदत करत असते. त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी एक पश्तून मौलवी त्या दिवशी या चौघांना द प्रीचर चे प्रवचन टीव्हीवर ऐकवतो आणि ते कसे खोटे आहे हे समजावून सांगतो.
या प्रीचरचा आवाज महमूद गुल अचूक ओळखतो आणि तिथून ही माहिती ताबडतोब टोसाकडे पाठवली जाते. ट्रॅकर तातडीने गझनीला महमूद गुलला भेटायला येतो आणि प्रीचरबद्दल अजून माहिती विचारतो. गुल त्याला सांगतो की तो एकदा क्वेट्टामध्ये मुल्ला ओमर सोबत एका बैठकीत असताना तेथे एक पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळ मुल्ला ओमरला भेटण्यासाठी तेथे येते. त्या प्रतिनिधी मंडळातील पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना केवळ उर्दू येत होती तर मुल्ला ओमरला केवळ पुश्तू भाषा. त्यामुळे त्या शिष्टमंडळात एक पाकिस्तानी अधिकारी आपल्या पुश्तू बोलणाऱ्या मुलाला घेऊन आला होता. आज प्रीचर म्हणून जगाला अज्ञात असणाऱ्या व्यक्तीचा आवाज त्या पुश्तू बोलणाऱ्या मुलाचाच आहे असे गुलने ठामपणे सांगितले.
आता ट्रॅकरला तीन महत्त्वाच्या कामगिऱ्या पार पाडायच्या असतात:
१. पाकिस्तानात जाऊन प्रीचरच्या कुटुंबाचा शोध घेऊन तिथून शक्य झाल्यास त्याची माहिती आणि त्याचा फोटो मिळवणे.
२. प्रीचरचा सोमालिया मधील ठावठिकाना शोधून तिथे आपला एखादा हेर घुसवणे.
३. प्रीचरला त्याच्या सुरक्षित ठिकाणावरून बाहेर येण्यास भाग पाडणे जेणेकरून इतर निष्पाप लोकांना इजा न पोहोचवता त्याला लक्ष करता येईल.
ट्रॅकर सर्वप्रथम पाकिस्तानात पोहोचतो. तेथे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय मध्ये काम करणारा सीआयएचा एक माणूस प्रीचरच्या लष्करातून निवृत्त झालेल्या वडिलांचा पत्ता ट्रॅकरला देतो. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला चकवत ट्रॅकर त्या निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलण्याच्या ओघात त्यांच्या मुलाबद्दल म्हणजेच प्रीचरबद्दल माहिती काढायचा प्रयत्न करतो. पण प्रीचर हा चुकीच्या कारवायात गुंतल्यामुळे त्याच्या घरच्यांनी फार पूर्वीच त्याच्याशी संबंध तोडलेले असतात आणि त्यामुळे तो कुठे आहे याचा त्यांना पत्ता नसतो.
खूप प्रयत्न करूनही ट्रॅकरला प्रीचरचा फोटो देण्यास तो निवृत्त अधिकारी नकार देतो. अखेर दुसऱ्या दिवशी तो अधिकारी नमाजसाठी मशिदीत केल्याचे पाहून ट्रॅकर पुन्हा त्याच्या घरी जातो आणि त्याच्या पत्नीकडून अलगदपणे प्रीचरचा एक फोटो मिळवतो. त्या फोटोमध्ये प्रीचर सोबत त्याचा एक मित्र पण असतो – मुस्तफा दरदारी – कराची मधील ‘मसाला पिकल्स‘ या कंपनीचा मालक.
प्रीचरची सगळी प्रवचने इब्राहिम समीर हा सोमालियाच्या किस्मयो शहरातील एका गोडाऊन वजा जागेतून जगभरात ऑनलाइन प्रसारित करत असतो. पण तिथे प्रीचरसुद्धा उपस्थित असतो का याबाबत संशय असतो. अजून अडचणीची गोष्ट म्हणजे अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांचा कोणताही हेर किस्मायो मध्ये नसतो. अखेर मोसादचा एक हेर तिथे असल्याची बातमी अमेरिकेला कळते आणि त्यांच्या विनंतीवरून मोसादचा तो हेर त्या गोडाऊन वर नजर ठेवू लागतो. ते गोडाऊन कराचीतल्या ‘मसाला पिकल्स‘ कंपनीच्या मालकीचे असते. तिथून बाहेर पडणाऱ्या गाड्यांचा पाठलाग करताना मोसादच्या हेराला सोमालियाच्या आणखी एका शहराच्या – मर्कामधील एका घराचा पत्ता कळतो.
पण तिथे प्रीचर राहतो की नाही याची खात्री करून घेण्यासाठी मोसादचा तो हेर पुढील वेळी किस्मायो वरून मर्काला जात असलेल्या इब्राहिम समीरला ठार मारतो आणि त्याचा तो ट्रक घेऊन सरळ मर्काच्या त्या घरी पोहोचतो. तिथे त्याची कसून तपासणी होते आणि अखेर त्याची भेट प्रीचरशी घडवून आणली जाते. प्रीचरला एका सेक्रेटरीची गरज असते आणि मोसादचा तो हेर प्रीचरचा सेक्रेटरी बनतो. काही काळासाठी घराबाहेर येऊन तो हेर उगाचच डोक्यावर एक बेसबॉलची कॅप घालतो. बाकी कुणाला त्याची ही कृती कळाली नसली त्या घरावरून उंच आकाशात उडणाऱ्या एका ड्रोनने बेसबॉल कॅप घातलेल्या त्या हिराला अचूक टिपले आणि तात्काळ प्रीचर त्याच घरात असल्याचा संदेश ट्रॅकर कडे पोचवण्यात आला.
आता ट्रॅकरला प्रीचरला तिथून बाहेर काढायचे होते. कारण त्या घरावर थेट क्षेपणास्त्र हल्ला करायला आसपास असणाऱ्या वस्तीमुळे अमेरिकेचे अध्यक्ष नकार देतात. अशावेळी सोमाली चाच्यांनी एका जहाजाचे केलेले अपहरण ट्रॅकरच्या मदतीला येते. हॅरी अँडरशोन हा एका स्वीडीश जहाज कंपनीचा करोडपती मालक असतो. त्याच्या कंपनीचे एक मालवाहू जहाज ‘मॅलमो ‘ हे सोमाली चाच्यांनी पळवलेले असते. त्या जहाजावर हॅरी अँडरशोनचा मुलगा ओख कार्लशोन हा सुद्धा असतो. अर्थात ही गोष्ट केवळ त्या जहाजाच्या कॅप्टनलाच माहीत असते आणि जर ही गोष्ट सोमाली चाच्यांना कळाली तर ते कार्लशोनला ओलीस ठेवून प्रचंड खंडणी उकळतील याची कॅप्टनला जाणीव असते.
पण ही गोष्ट ट्रॅकरला कळते आणि याच कार्लशोनचा वापर करून प्रीचरला बाहेर काढायचे ट्रॅकर ठरवतो. त्यासाठी तो ब्रिटिश गुप्तहेर संघटनेच्या मदतीने प्रीचरचा दहशतवादी कारवायांमधील साथीदार, मित्र आणि मसाला पिकल्सचा मालक मुस्तफा दरदारीचे तो लंडनला आला असता अपहरण करतो. यावेळी रॉजर हा दरदारीच्या संगणकात घुसून तिथून प्रीचरला नियमितपणे संदेश पाठवत असतो. त्यामुळे हे संदेश दरदारीच पाठवत आहे असेच सर्वांना वाटत असते. ट्रॅकर या संदेशाद्वारे प्रीचरला ओख कार्लशोनला सोमाली चाचांकडून विकत घ्यायला सांगतो आणि नंतर त्याचा कॅमेरासमोर शिरच्छेद करून ते चित्रण जगभरात प्रसारित करायला सांगतो.
यातून प्रीचरची दहशत प्रचंड वाढणार असते. त्यामुळे प्रीचरसुद्धा यासाठी तयार होतो आणि तो कार्लशोनला ताब्यात घेण्यासाठी मर्का मधून बाहेर पडतो आणि सोमाली चाच्यांशी बातचीत मध्ये ठरल्याप्रमाणे सोमालियाच्या वाळवंटा मधील एका खेड्यात येऊन रात्रीचा मुक्काम करतो. अमेरिकन ड्रोन वरून त्याचा सातत्याने पाठलाग करत असतात आणि त्यानुसार एक धाडसी कमांडो कारवाईची योजना सुद्धा आखली जात असते.
ही कमांडो कारवाई यशस्वी होते का? प्रीचर मारला जातो का? दरदारी सोबत नेमके काय होते? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे रोमांचक पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
हे पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा: