महाभारत खरोखर घडले होते का? की ते एक काल्पनिक महाकाव्य होते? श्री कृष्ण ही काल्पनिक व्यक्तिरेखा होती की प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व होते? जर श्री कृष्ण प्रत्यक्षात होते तर त्याचे अस्तित्व पौराणिक होते की ऐतिहासिक? लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा स्यमंतक मणी जादुई होता की त्या मागे काही वैज्ञानिक कारण होते? अण्वस्त्रांचा शोध प्रथम रॉबर्ट ओपेनहायमर ने लावला की महाभारतकालीन भारतामध्ये आधीच अण्वस्त्रांचा शोध लावण्यात आला होता? या विविध गूढ प्रश्नांच्या अवतीभोवती फिरणारी थरारकथा म्हणजे अश्विन सांघी यांनी लिहिलेले ‘द कृष्णा की’ हे पुस्तक. कृष्णा की हे पुस्तक भगवान कृष्णाच्या अमूल्य ठेव्याचे प्राचीन रहस्य उलगडून सांगते.
नवी दिल्ली मधील सेंट स्टीफन कॉलेज मध्ये इतिहासाचे प्राध्यापक असलेले प्राध्यापक रवी मोहन सैनी हे या कादंबरीचे मुख्य आणि मध्यवर्ती पात्र. सैनी यांचे बालमित्र व भारतातील सर्वाधिक तरूण सांकेतिक भाषा आणि लिपीतज्ञ असलेल्या अनिल वर्षने यांच्या हत्येने या कादंबरीची सुरुवात होते. वर्षने यांच्याकडे असलेल्या चार एकसारख्या दिसणार्या मुद्रांसाठी त्यांची हत्या होते. पण खुन्याला त्यांच्याजवळ केवळ एकाच मुद्रा सापडते आणि मग तो बाकी तीन मुद्रांच्या शोधात बाहेर पडतो. मुळात वर्षने यांनी उर्वरित तीन मुद्रा या आपल्या तीन जिवलग मित्रांकडे सांभाळून ठेवायला दिलेल्या असतात. ते तीन मित्र असतात – स्वत: प्राध्यापक सैनी, जोधपूर मध्ये अणुशास्त्रज्ञ असलेले राजाराम कुरकुडे आणि चंदिगड मधील जीवशास्त्राचे संशोधक देवेंद्र छेदी. या चार पैकी एक मुद्रा आता खुन्याच्या ताब्यात असते.
इकडे अनिल वर्षने यांच्या खुनाच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांची इन्स्पेक्टर राधिका सिंग रवी मोहन सैनीलाच अटक करते. कारण वर्षने यांना शेवटचा भेटणारा आणि त्यांच्यासोबत रात्री जेवण करणारी शेवटची व्यक्ती ही रवी मोहन सैनी असतात. शिवाय पोलिसांना रवी मोहन सैनी यांच्या घरातून वर्षने यांनी सांभाळून ठेवायला दिलेली दुसरी मुद्राही सापडते. आपल्या जीवलग मित्राच्या हत्येने आधीच धक्का बसलेला सैनी या अनपेक्षित संकटातून स्वत:च्या बचावासाठी आपली पीएचडी ची विद्यार्थिनी असलेल्या प्रियाचे वडील आणि प्रसिद्ध वकील संजय रतनानी यांची मदत घेतात. परिस्थितीजन्य पुरावे हे सैनीच्या विरोधात असल्याने तसेच या रहस्याचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याने सैनी आणि प्रिया रतनानी यांच्या सल्याने आणि मदतीने पोलिसांच्या तावडीतून पळून जातात आणि इथूनच सुरू होतो एक थरारक प्रवास जो रोलर कोस्टर सारखा भूतकाळ आणि वर्तमान काळात वाचकांना फिरवून आणतो.
अनिल वर्षने याची हत्या तारक वकील नावाच्या व्यक्तीने केलेली असते. हा तारक माताजी नावाच्या एका गूढ महिलेला आपला गुरु मानत असतो. या माताजीच्या आदेशानुसार तो त्या सर्व मुद्रांसाठी इतर लोकांच्या हत्या करण्यासाठी निघालेला असतो. इकडे पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या सैनी साठी आपले निर्दोषीत्व सिद्ध करण्यासाठी उर्वरित मुद्रा ज्यांच्याकडे ठेवलेल्या असतात त्यांची मदत हवी असते. एकीकडे तारक वकील या मुद्रा असलेल्या लोकांच्या हत्येसाठी त्यांच्या पाठलागावर असतो तर दुसरीकडे सैनी सुद्धा स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडेच जात असतो. या थरारक आणि खिळवणार्या पाठलागात कोण जिंकतो हे वाचताना वाचक अक्षरश: गुंगून जातात.
या चार मुद्रांमध्ये असे काय असते ज्यांच्यामुळे हत्या होत असतात? या मुद्रांबद्दल या पुस्तकात दिलेली माहिती महाभारताचे युद्ध आणि श्रीकृष्णाचा जीवनप्रवास यांचे अनेक अद्भुत पैलू आपल्यासमोर उलगडून ठेवतात. मुळात या चार मुद्रा एकत्र आल्यावर कोणते गूढ उलगडणार असते? आणि तारक वकील हा या मुद्रा आपल्याजवळ ठेवणार्या सर्व व्यक्तींची हत्या का करत असतो? आणि ही माताजी कोण असते? सर्वप्रथम पहिल्या प्रश्नाचे उत्तर पाहूया. या चार मुद्रा एकत्र जोडून ठेवल्या असता त्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले गेलेल्या ‘स्वस्तिक’ या चिन्हाकडे निर्देश करतात. या स्वस्तिकाचे आध्यात्मिक पैलू बाजूला ठेवून त्याचे भौमितिकदृष्ट्या विश्लेषण केले असता तो स्वस्तिक ‘मेरू’ पर्वताकडे इशारा करत असतो.
मेरू पर्वत ज्याला करोडो हिंदू लोक ‘कैलास’ पर्वत म्हणूनही ओळखतात. म्हणजे कृष्णाशी संबंधित एखादी अत्यंत महत्वाची अशी रहस्यमय गोष्ट कैलास पर्वतावर आहे याकडे तो स्वस्तिक इशारा करत होता का? की कैलास पर्वताकडे इशारा ही केवळ एक दिशाभूल होती आणि ती मौल्यवान वस्तू इतरत्र कुठे ठेवण्यात आली होती? कारण त्या मुद्रांचे रहस्य सोडवताना त्यातले बरेच संकेत ही गुजरात मधील प्राचीन अशा सोमनाथ मंदिराकडे सुद्धा इशारा करत होते. इतिहासात गझनीच्या महमुदाने सतरा वेळा सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले होते. एकाच मंदिरावर सतरा वेळा आक्रमण करण्यामागे त्याचा काही विशिष्ट हेतु होता का? गझनीच्या महमुद सुद्धा कृष्णाची ती मोल्यवान वस्तू शोधत होता का? मुळात ती मौल्यवान वस्तू कोणती होती?
या पुस्तकात पुढे वाचत गेल्यावर कळून येते की ती मौल्यवान वस्तू म्हणजे ‘स्यमंतक मणी‘ असतो ज्याच्या चोरीचा आळ एकेकाळी कृष्णावर घेण्यात आला होता. श्रद्धा अशी होती की हा मणी लोखंडाचे सोन्यात रूपांतर करत होता. स्यमंतक मणीच्या या गुणधर्मामुळे इतिहासातील गझनीच्या महमुदापासून ते आता माताजी पर्यंत सर्वजण कदाचित तो मणी मिळवण्याच्या मागे लागले होते. कारण खरोखर हा मणी मिळाला तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचे सोने व्हायला वेळ लागणार नव्हता. म्हणूनच कोणत्याही किमतीत माताजीला हा मणी हवा होता.
आता दुसर्या प्रश्नाकडे वळू. माताजी हे गूढ पात्र दुसरे तिसरे कोणी नसून रवी मोहन सैनी यांची पीएचडी ची विद्यार्थिनी प्रियाच असते. ती हे सर्व काही सर खान नावाच्या एका डॉनच्या सांगण्यावरून करत असते. या सर खानला स्यमंतक मणी हवा असतो. यासाठी प्रिया (उर्फ माताजी) तारक वकीलला तो लहान असतानाच हेरून त्याला योग्य ते प्रशिक्षण देण्यास सुरुवात करते. हे सर्व विनासायास करण्यासाठी ती विष्णूचा अंतिम अवतार कल्कीची मदत घेते. ती तारक वकीलचे ब्रेनवॉश करते की तो विष्णूचा अंतिम अवतार कल्की आहे आणि म्हणूनच कृष्णाचा अमूल्य असा ठेवा असलेला स्यमंतक मणी त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाच्या हाती सापडणे योग्य नव्हते.
या मुळेच तारक ती मुद्रा असलेल्या सर्व लोकांची हत्या करत असतो कारण आपण हे सर्व कृष्णाचा अमूल्य ठेवा वाचवण्यासाठी करत आहोत अशी त्याची समजूत करून देण्यात आलेली असते. शिवाय त्या चारही मुद्रा सापडल्या तर त्या मधून स्यमंतक मणीचे रहस्य आणि त्याचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी आपल्याला रवी मोहन सैनी सारख्या विद्वान अशा इतिहासतज्ञाची मदत घ्यावी लागणार आहे हे सुद्धा प्रियाला माहित असते. म्हणूनच ती रवी मोहन सैनी यांच्या प्रत्येक समस्येत त्यांना साथ देत असते.
कृष्ण...पाच हजार वर्षांपूर्वी या जादुई व्यक्तिमत्वाने पृथ्वीवर जन्म घेतला. मानवाच्या कल्याणासाठी त्याने कित्येक चमत्कार घडवून आणले. या नीलदेवाच्या मृत्यूमुळे मानवता नैराश्याच्या खाईत लोटली गेली असती, परंतु कलियुगात ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी नवीन अवतार धारण करून पृथ्वीवर पुन्हा येण्याचे वचन त्याने दिले आहे. आधुनिक काळात, श्रीमंत घरात जन्मलेला एक गरीब बिच्चारा मुलगा आपणच तो अंतिम अवतार आहोत असे मानत मोठा होतो. मात्र तो फक्त एक खुनाची मालिका घडवून आणणारा खुनी ठरतो.
आत्यंतिक क्रौयाने आणि बुद्धिमानतेने आखलेल्या कटानुसार, देवाच्या नावावर खून घडवून आणणार्या खुन्याचे आगमन होते. कृष्णाच्या अमूल्य पारंपारिक ठेव्याचे प्राचीन रहस्य उघड करण्यासाठी केल्या गेलेल्या अशुभ कटाचा इथेच प्रथम सुगावा लागतो आणि वाचकांचा श्वास रोखला जातो.
कृष्णाच्या सर्वाधिक मौल्यवान गूढ स्थळाच्या शोधार्थ, रवी मोहन सैनी यांना समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या अवशेषांपासून सोमनाथाच्या गूढ लिंगापर्यंत आणि कैलास पर्वताच्या हिमाछादित शिखरापर्यंत प्रवास करावा लागतो. मोठ्या प्रमाणातील अन्यायी कृत्ये रोखण्यासाठी कालिबंगानच्या वालुकामय अवशेषांपासून औरंगजेबाने विध्वंस केलेल्या वृंदावनातील मंदिरापर्यंत सैनीला प्राचीन काळाचा वेध घ्यावा लागतो.
रवी मोहन सैनी यांना स्यमंतक मणी मिळतो का? की माताजी व तारक वकील तो मणी सर खानासाठी मिळवण्यात यशस्वी होतात? मुळात स्यमंतक मणी प्रत्यक्षात अस्तित्वात असतो का? या सर्व प्रश्नांसाठी कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेले हे उत्कंठावर्धक पुस्तक एकदा नक्की वाचावे असे आहे.