दोन देश. एक पश्चिमेकडचा आणि एक पूर्वेकडचा! दोन्ही देशातील अति महत्त्वाच्या व्यक्ती या टार्गेट होत्या. आपापल्या या लक्षाला मारण्यासाठी दोन्ही देश गुप्तपणे कसून तयारी करत होते. हे दोन्ही देश म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरिया. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही देश. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टी तर प्रचलित आहेतच. याच उत्तर कोरियामध्ये लष्कराचा एक जनरल बंडाची योजना आखतो. यासाठी तो थेट अमेरिकेच्या अध्यक्षांकडे मदत मागतो. अमेरिकेचे अध्यक्ष सुद्धा त्याला मदत करण्यासाठी एक गुप्त योजना आखण्याचा आदेश देतात. पण दुर्दैवाने ही योजना उघडकीस येते आणि जगासमोर आपली बेअब्रू होऊ नये म्हणून मदतीचे आश्वासन दिलेल्या कोरियाच्या जनरललाच ठार मारण्याचा आदेश अमेरिकेच्या अध्यक्षांना द्यावा लागतो.
आपल्या सर्वोच्च नेत्याला मारण्याची योजना बनवणाऱ्या अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय उत्तर कोरिया घेतो. पण जगातील सर्वोत्तम सुरक्षा लाभलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांना निशाणा बनवणे अर्थातच सोपे नसते. म्हणूनच अध्यक्षांच्या कुटुंबाला लक्ष करण्याची योजना आखली जाते. त्यासाठी उत्तर कोरियाची एक खतरनाक एजंट अमेरिकेत दाखल होते.
ती यशस्वी होते का? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावे लागेल. मध्ये मध्ये पुस्तकाची कथा भरकटल्यासारखी तसेच संथ वाटते. पण शेवटी एक अनपेक्षित ट्विस्ट आपली वाट पाहत असते.
एकदा नक्की वाचावे असे पुस्तक.
पुस्तकाचे नाव – टार्गेट
मूळ लेखक – डेव्हिड बॅल्डासी
अनुवाद – डॉ चंद्रशेखर चिंगरे
पब्लिकेशन्स – श्रीराम बुक एजन्सी