पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान

पुतिन….

चांगला राजकारणी संधीची वाट पाहत नाही……ती स्वत: तयार करतो.

३१ ऑगस्ट १९९९ रोजी मॉस्को मधील एक मॉल मध्ये हादरवून टाकणार एक स्फोट झाला.. (एकाचा मृत्यू)

याच्या काही दिवसांनंतर चेचन्या पासून जवळ असलेल्या बुयांस्क गावात लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या इमारतीत बॉम्बस्फोट झाला..(६४ जणांचा मृत्यू)

यानंतर चार दिवसांनी (८सप्टेंबर १९९९) मॉस्कोच्या मध्यवर्ती भागातील निवासी संकुलात प्रचंड मोठा स्फोट झाला…(१००जणांचा मृत्यू)

अजून पाच दिवसांनी मॉस्कोच्याच अजून एका निवासी संकुलात बॉम्बस्फोट झाला… (१२० जणांचा मृत्यू) 

या सर्व स्फोटांमागे संशयित म्हणून रशियातील चेचेन बंडखोरांचे नाव घेण्यात येऊ लागले. 

अशातच रशियातील २३ राज्यांच्या गवर्नरनी अवघ्या महिन्याभरापूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या व्लादिमिर पुतिन यांच्याकडे चेचेन बंडखोरी विरोधात कारवाईचे सर्वाधिकार द्यावेत अशी जोरदार मागणी रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्याकडे केली.

पुतिन यांनी सुद्धा ताबडतोब चेचेन बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरु केली. चेचेन बंडखोरांना ठार मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. 

सोविएत रशियाच्या पतनानंतर विविध समस्यांनी गांजलेल्या रशियन जनतेला पुतिन यांचा हा रोखठोकपणा आवडला. रशियाला अशाच मर्दानी नेत्याची गरज आहे असे बहुसंख्य रशियन जनतेला वाटू लागले. 

काही महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी पुतिन यांना अशा प्रतिमा निर्मितीची अत्यंत गरज होतीच.

पुतिन यांनी स्वत: संधी तयार केली होती.

व्लादिमिर पुतीन
पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान

सोविएत रशियाचे पतन झाल्यावर रशियाचे अध्यक्ष बनलेले बोरिस येल्त्सिन यांना साम्यवादाचा अत्यंत तिटकारा होता. रशियातून साम्यवादाच्या खाणाखुणा मिटवून टाकण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मात्र रशियासाठी फलदायी ठरले नाहीत. रशियात जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या, बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढली, रशियाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न निम्याने घटले, अर्थव्यवस्था ढासळू लागली. जनतेत येल्त्सिन यांच्याबद्दल नाराजी वाढू लागली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले.

यातून मार्ग काढण्यासाठी येल्त्सिन यांनी जो निर्णय घेतला तो एका नव्या युगाची नांदी ठरणार होता. बोरिस येल्त्सिन यांनी अगदी नवख्या, गरीब भासणाऱ्या व अत्यंत अननुभवी अशा व्लादिमिर पुतीन यांना पंतप्रधान नेमले. हेतू एकच. पुतिन आपल्या कह्यात राहतील आणि आपल्या विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार नाहीत. पण झाले वेगळेच. पुतिन एकदम महाबेरकी निघाले. कसे ते आपण सुरुवातीला पहिले आहेच.

व्लादिमिर पुतीन
व्लादिमिर पुतीन (फोटो साभार – गूगल)

सोविएत संघाची गुप्तचर संघटना असलेल्या KGB चे माजी अधिकारी असलेल्या पुतिन यांच्याबद्दल रशियातील एका स्थानिक पत्रकाराने लिहून ठेवले आहे, ‘पुतिन यांना स्वतःच असं काही निर्माण करता येत नाही. पण जे काही आहे, त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे, व्यवस्था आपल्या कह्यात कशी ठेवायची, हे मात्र त्यांना बरोबर समजते.’ अर्थात हे बरोबर कि चूक हा वेगळा चर्चेचा विषय असला तरी पुतिन रशियात खुद्द एक व्यवस्थाच बनले. त्यालाच पुतिनिझम म्हटले पाहिजे. काय होता हा पुतिनीझम ज्याने रशियाला भारून टाकले? 

अध्यक्ष बनल्यानंतर पुतिन यांनी विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा झपाटा लावला. कररचनेतील सुधारणा, लघु व मध्यम उद्योगधंद्यांना उत्तेजन (त्यावेळी रशियाला केवळ प्रचंड आकाराचे व प्रचंड भांडवलाचे उद्योगच माहित होते. लघु व मध्यम उद्योगातून भरपूर रोजगार निर्मिती होऊ शकते याकडे कधी लक्षच देण्यात आले नव्हते), उद्योगांचे परवाने, नोंदणीकरण, प्रमाणीकरण यात सुटसुटीतपणा, शेतजमिनींचे खाजगीकरण, भ्रष्टाचार विरोधी कारवाया, लष्कराचे आधुनिकीकरण व मजबूतीकरण आणि या सर्वांच्या जोडीला राष्ट्रवाद.

व्लादिमिर पुतिन
KGB लोगो (फोटो साभार – गूगल)

सोविएतच्या पतनानंतर महासत्ता हे बिरूद गमावलेल्या रशियाला त्या नाजूक अवस्थेतून बाहेर काढत पुतिन यांनी पुन्हा एकदा महासत्ता बनण्याच्या दिशेने नेले यात काहीच शंका नाही. महासत्ता नसला तरी आज रशिया जगातील एक प्रबळ देश आहे याचे श्रेय नि:संशय पुतिन यांनाच जाते. पण मग त्यांचे मूल्यमापन एकदम टोकाचे का केले जाते. त्यांना खंबीर राज्यकर्ता म्हणायचे कि क्रूर हुकुमशहा? त्यांच्यावर हुकुमशहा असण्याचे आरोप होण्यात कदाचित त्यांचे काही निर्णयच कारणीभूत असतील.

पुतिन यांच्या मते राज्यव्यवस्था हि ‘अत्यंत सामर्थ्यवान केंद्र आणि आसपास छोट्या छोट्या आज्ञाधारक देशांची (राज्यांची) पिलावळ’ अशी असावी. सोविएत युनियन असेच होते. म्हणूनच ‘सोविएत रशियाचे विघटन हि या शतकातील सर्वात मोठी भूराजकीय हाहाकार घडवणारी घटना आहे’ असं त्याचं मत आहे. म्हणूनच आजचा रशिया हा सोविएत काळाइतकाच मजबूत, दरारा निर्माण करणारा असायला हवा अशी त्यांची धडपड चालू आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेद इत्यादी कोणत्याही पर्यायाचे त्यांना वावडे नाही.

त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होत असली तरी सर्वसामान्य रशियन लोकांना मात्र त्यांची ही भूमिका आवडते. तसेच पुतिन यांच्या अनेक स्वभाव वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुतिन यांनी ज्याला कोणाला आपल मानल, त्याला त्यांनी कधीही दगा दिला नाही. आपल्या मित्र देशांच्या पाठी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. सध्याची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अगदी उलट असे हे पुतिन यांचे वर्तन.

पुतिन
पुतिन वेगळ्या अंदाजात (फोटो साभार – गूगल)

पण या सर्वांसोबत अजून काही महत्वाच्या गोष्टी:

पुतिन यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना विरोध करणारे लोक एकतर गूढरित्या मरण पावले किंवा कायमचे रशिया सोडून गेले. 

एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी रशियन संविधानात सुधारणा करून २०३९ पर्यंत आपणच अध्यक्षपदी राहू अशी तजवीज केली.

पुतिन यांच्या मते, ‘सत्ता उभी असायला हवी, आडवी नको. कारण आडवी सत्ता अनेकांना अधिकार देते. उभ्या सत्तेत अधिकार हे काही ठराविक लोकांकडे केंद्रित होतात.’

पुतिन एकदा असेही म्हणाले होते, ‘मला निवडणूकीचा तिटकारा आहे. मला मत द्या, असे मला लोकांना सांगताच येत नाही.

प्रश्न पुन्हा तोच. मग पुतिन कोण आहेत? एक यशस्वी, खंबीर राज्यकर्ता कि एक हुकुमशहा?

वाचकांनी स्वतःच ठरवायचे आहे. कोणतेही उत्तर चूक किंवा बरोबर नाही.

कारण हाच पुतिनीझमचा प्रभाव आहे आणि युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर यात काही शंका नाही कि हे पुतिन पर्व अजूनतरी चालू राहणारच आहे.              

आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्वाची त्याच्या असंख्य भल्या बुऱ्या कंगोऱ्यासह पुतिन यांची गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान’ या पुस्तकातून ओळख करून दिली आहे जी आवर्जून वाचावी अशी.   

पुस्तक येथून खरेदी करा:

https://amzn.to/3CGhED3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *