बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी

दुर्गदुर्गेश्वर रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक. याच गडाच्या टकमक टोकावरून अनेक शत्रूंचा आणि गद्दारांचा कडेलोट केला जायचा. टकमक टोक हे नाव ऐकताच गुन्हेगारांची पाचावर धारण बसायची. टकमक टोकाची दहशतच तशी होती. स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवणार्‍या या टकमक टोकामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावासाठी मात्र एक संकट निर्माण केले होते. त्यासाठी फिर्याद मागायला धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकार्‍यांसह शिवाजी महाराजांना भेटायला रायगडावर जायला निघतो. पण राजेंना भेटण्यापूर्वी या सर्वांना अनेक नाट्यमय घटनांना सामोरे जावे लागते. या सर्व घटनांचा थरार पै. गणेश मानुगडे यांनी आपल्या ‘बाजिंद’ या ऐतिहासिक रहस्यकथेत शब्दबद्ध केला आहे. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांचं अद्भूत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी.

BAJIND (Marathi Edition) eBook : MANUGADE, GANESH: Amazon.in: Kindle Store
बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी (फोटो साभार – गूगल)

टकमक टोकावरून कडेलोट करण्यात येणार्‍या लोकांचा मृतदेह पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावाजवळ पडायचा. तो देह खाण्यासाठी जंगली जनावरांचा तेथे सुळसुळाट झाला होता. ज्यावेळी कोणालाही कडेलोट केले जायचे नाही तेव्हा हीच जंगली जनावरे धनगरवाडीवर हल्ले करू लागली. त्यामुळे तेथील लोकांना जगणे मुश्कील झाले होते. हीच फिर्याद शिवाजी महाराजांना सांगण्यासाठी सखाराम आपल्या तीन साथीदारांसह एके दिवशी रायगडाकडे जायला निघतो. ते वाटेत असतानाच एक जोरदार किंकाळी त्यांना ऐकू येते. त्यावरून त्यांना आज पण कुणाचा तरी कडेलोट झाला आहे हे लक्षात येते. कोणाचा कडेलोट झालाय हे पाहण्याच्या उत्सुकतेपायी ते चौघे आपला नियमित मार्ग सोडून जंगलात घुसतात.

पावसाळा असल्याने तुडुंब भरून वाहत असलेली नदी, नाले आणि घनदाट जंगल यामुळे सखाराम आणि त्याचे सवंगडी त्या घनदाट जंगलात वाट चुकतात. शिवाय जंगली प्राण्यांचा धोकाही त्यांना जाणवत असतो. अशा वेळी त्यांना नाट्यमयरीत्या तेथे एक व्यक्ती भेटते. ती व्यक्ती असते स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचा खास हेर खंडोजी. त्या चौघांची समस्या ऐकल्यावर खंडोजी त्यांना शिवाजी महाराजापर्यंत पोचवण्यासाठी मदत करायचे आश्वासन देतो. तो त्यांना आपल्यासोबत त्या घनदाट जंगलातून घेऊन चालू लागतो. तो नेत असलेली ती गुप्त पायवाट पाहून सखाराम आणि त्याचे साथीदार आश्चर्यचकित होतात. आपली उभी हयात या जंगलात शेळ्या मेंढया फिरवण्यात गेली तरीही आपल्याला ही वाट कशी माहित नाही याचेच त्यांना आश्चर्य वाटत होते. त्यांना काय माहित की अशा गुप्तवाटा या फक्त स्वराज्याच्या हेरांनाच माहित होत्या.

Takmak Tok - tourmet
टकमक टोक – रायगड (फोटो साभार – गूगल)

काही वेळाने ते एका मंदिरापर्यंत येतात पण त्याच वेळी त्यांना मार्गदर्शन करणारा खंडोजी अचानक गायब होतो. त्या रात्रीच्या वेळी खंडोजीला शोधणे शक्य नसल्याने ते त्या मंदिरात रात्री थांबण्याचा निर्णय घेतात. त्या मंदिरात त्यांना सावित्री नावाची एक स्त्री भेटते. एवढ्या घनदाट जंगलातील त्या मंदिरात एका स्त्रीला पाहून ते भांबावून जातात. सावित्रीलाही त्या चौघांना त्या मंदिरात आलेले पाहून आश्चर्य वाटते कारण त्या मंदिरापर्यंत येणारी वाट ही फक्त हेरांना माहित असते. पण आपल्याला खंडोजीने ही वाट दाखवल्याचे सांगताच ती निश्चिंत होते. सखारामला मात्र अचानक भेटलेला खंडोजी आणि सावित्री बद्दल प्रचंड कुतूहल असते म्हणून त्याच्या आग्रहावरून सावित्री त्यांना थोडे भूतकाळात घेऊन जाते. 

रायगडापासून जवळच असलेल्या यशवंतमाची या जहागिरीचे राजे येसाजीराव शिर्के यांची सावित्री हि कन्या. शिर्के हे आदिलशहाचे निष्ठावंत मनसबदार होते. शिवरायांनी रायगड जिंकल्यावर शिर्के वगळता आसपासचे सर्व सरदार स्वराज्यात सामील झाले. यशवंतमाची हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते. तेथून तळकोकणातील सर्व हालचालींवर सहज लक्ष ठेवता येत असे. येसाजीरावांची फौज शिवरायांच्या सेनेच्या तुलनेत छोटी असली तरी अत्यंत शूर व चिवट होती. तसेच घनदाट जंगलामुळेही यशवंतमाची जिंकणे तितके सोपे नव्हते. पण ही माची स्वराज्यात येणेही तितकेच गरजेचे होते कारण परकीय शत्रूंपेक्षा स्वकीयच जास्त त्रासदायक असतात याचा अनुभव शिवाजी महाराजांनी घेतला होता. म्हणूनच स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक त्यांचा खास हेर खंडोजी आणि त्याला प्रशिक्षण देणारे वस्तादकाका यांना पैलवान म्हणून यशवंतमाची मध्ये घुसवण्याची योजना आखतात. खंडोजी राजे येसाजी यांचा खास पैलवान भीमाला पराभूत करून राजांच्या तालमीत प्रवेश मिळवतो. 

यशवंतमाचीची अभ्येद्यता  भेदण्याच्या दृष्टीने तेथील महत्वाची माहिती बहिर्जींपर्यंत पोचवण्याची जबाबदारी खंडोजीला देण्यात आलेली असते. खंडोजीने दिलेल्या या माहितीच्या आधारे बहिर्जी यशवंतमाचीवर हल्याची योजना आखणार असतात. यशवंतमाचीमध्ये खंडोजीची ओळख राजे येसाजींची मुलगी सावित्रीसोबत होते आणि तो तिच्याकडे आकर्षिला जातो. येसाजीराव शिर्के यांचे पलिकडल्या डोंगरातल्या कदंबांशी पिढीजात वैर होते. या कदंबांनी एके दिवशी शिर्केंची अत्यंत कमी शिबंदी गडावर असताना यशवंतमाचीवर हल्ला केला आणि सावित्रीला पकडून घेऊन गेले. खंडोजीही सावित्रीला वाचवण्यासाठी कदंबांच्या मागे जातो. खंडोजी कदंबांच्या सेनेशी झुंजत असतानाच तेथे स्वराज्याची सेनाही येऊन पोचते. आपले कर्तव्य विसरून इतर अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतल्याने खंडोजीला पकडून आणण्यासाठी बहिर्जीनी स्वराज्याची सेना तेथे पाठवलेली असते. पण सावित्रीच्या प्रेमात पडलेला खंडोजी स्वराज्याच्या सेनेला चकवा देऊन सावित्रीसह तेथून पलायन करतो. 

बहिर्जी नाईक (फोटो साभार – गूगल)

दोघे तेथून एका घनदाट जंगलात पोचतात. तिथे त्यांना भेटतो ‘बाजिंद‘. या बाजिंदची दहशत संपूर्ण पंचक्रोशीत पसरलेली असते. जंगलातील सर्व प्राणी, किडया मुंग्या, पक्षी इत्यादींशी त्यांच्याच भाषेत बोलण्याचे दुर्मिळ ज्ञान बाजिंदकडे असते. याद्वारे तो पूर्ण प्राणीमात्रांवर नियंत्रण ठेवून असतो. सावित्रीनेही बाजिंद विषयी तिच्या लहानपणी ऐकलेली असते. प्रत्यक्षात काय कथा असते या बाजिंदची? हा बाजिंद कोणी भूत नसून (जसे त्याच्याबद्दल आख्यायिका असते) एक हाडामासाची व्यक्ती असते. बर्‍याच वर्षांपूर्वी चंद्रगड नावाच्या एका संस्थानात सरदेसाई नावाची एक महापराक्रमी व्यक्ती राज्य करत असते. त्यांचा पुत्र बाजीराव सरदेसाई याला सर्व पक्षी आणि प्राण्यांच्या भाषा अवगत असतात. जंगलातील सर्व प्राणी त्याचे मित्र असतात. आपले हे ज्ञान बाजीरावने एका वहीत लिहून जपून ठेवलेले असते. बाजीरावला त्याच्या या ज्ञानामुळे बाजिंद म्हणून ओळखले जात असते.

या ज्ञानाच्या बळावरच तो चंद्रगडवर चालून आलेल्या मुघल सेनेची दाणादाण उडवतो. पण विश्वासघाताने मुघल सरदार हुसेनखान चंद्रगड बेचिराख करतो. या लढाईत बाजीराव आणि त्याचे वडील वीरगतीस प्राप्त होतात. पण बाजीराव मृत्यूपूर्वी त्या लढाईतून वाचलेल्या आपल्या चुलत भावाला ती वही सोपवतो. या वहीच्या मदतीने बाजीरावचा चुलत भाऊ ते ज्ञान आत्मसात करतो. त्यानंतर हेच ज्ञान पुढे जो कोणी बाजिंद म्हणून निवडला जाई त्याला हस्तांतरित केले जाऊ लागले. या ज्ञानाच्या बळावर आणि आपली सेना तयार करून प्रत्येक ‘बाजिंद’ने चंद्रगड आणि त्याच्या आसपासच्या जंगलाच्या रक्षणाचे काम हाती घेतले. बाजिंद पूर्ण महाराष्ट्रभर फिरून परकीय सत्तेद्वारे होत असलेले अन्याय, अत्याचार पाहत होता. ज्यावेळी अनेक मातब्बर घराणी परकीय सत्तेची चाकरी करण्यात धन्यता मानत होती अशा वेळी शिवाजी नावाचा एक युवक हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलत असलेले बाजिंदने पाहिलेले असते. म्हणूनच बाजिंद आपल्याजवळील गूढ ज्ञान स्वराज्याच्या कामी यावे यासाठी ती वही बहिर्जींना देण्यासाठी खंडोजीकडे सोपवतो.

खंडोजी आणि सावित्री यशवंतमाचीमध्ये राजे येसाजींकडे परत येतात. या सर्व घटनाक्रमात सावित्रीने शिवाजी महाराजांच्या प्रती खंडोजी आणि बहिर्जीची असलेली निष्ठा अगदी जवळून अनुभवलेली होती. स्वराज्य आणि शिवरायांसाठी आपले वैयक्तिक आयुष्य आणि इतर सुखसुविधा सोडून जीव देण्यासाठी तयार असलेले हे मावळे पाहून तिला शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्य किती थोर आहे याची जाणीव होते. त्यामुळेच ती आपल्या पोकळ स्वार्थाला कवटाळून शिवाजी महाराजांशी वैर घेणार्‍या आपल्या वडिलांना स्वराज्यात सामील होण्यासाठी समजावण्याचे ठरवते. राजे येसाजी देखील तिच्याशी सहमत होऊन स्वराज्यात सामील व्हायचा निर्णय घेतात. पण त्याआधीच मराठ्यांची फौज यशवंतमाचीवर हल्ला करते. काही काळापूर्वी स्वराज्यात सामील होण्याचा निर्णय घेतलेल्या राजे येसाजींना याचा धक्का बसतो पण त्यांच्या तालमीतले मल्ल खंडोजीच्या प्रेरणेने मराठ्यांशी लढून त्यांना माघार घ्यायला लावतात. खंडोजीच्या या गद्दारीमुळे भडकलेले बहिर्जी त्याला पकडून टकमक टोकावरून त्याचा कडेलोट करण्याची शिक्षा फर्मावतात. खंडोजीचा कडेलोट करण्यात येतो.

बाजिंद  - युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी
दुर्गदुर्गेश्वर रायगड (फोटो साभार – गूगल)

सावित्री आणि खंडोजीने सांगितलेली ही कथा सखाराम आणि त्याच्या साथीदारांना स्तब्ध करते. स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून सुरक्षित केले. पण त्यामागे शिवरायांचा जणू तिसरा डोळा असणार्‍या बहिर्जी नाईक यांचे चातुर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठा याचा मोलाचा वाटा होता हे त्यांना कळून चुकले. खंडोजी सखाराम आणि त्याच्या साथीदारांना वस्तादकाकांकडे जायच्या वाटेवर पोचवतो आणि तिथून निघून जातो. वस्तादकाका त्यांना रायगडावर शिवाजी महाराजांकडे घेऊन जातात. सखारामची समस्या ऐकल्यावर शिवाजी महाराज टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश देतात. तसेच सखारामच्या गावाला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचे आदेशही देतात. शिवरायांच्या दर्शनाने धन्य झालेला सखाराम रायगडावरून उतरताना वाटेतल्या एका चौकीवर खंडोजीने त्याला दिलेली एक चांदीची पेटी दाखवतो. ती पेटी पाहिल्यावर वस्तादकाकांना धक्का बसतो. ती पेटी आपल्याला खंडोजीने दिले या सखारामच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण त्यांच्या लेखी त्यांनीच खंडोजीला बहिर्जींच्या आदेशावरून टकमक टोकावरून खाली ढकललेले असते.

खंडोजी जीवंत असतो आणि सखारामला खूद्द बहिर्जी नाईक यांनी रायगडावर पोचवलेले असते. मुळात बहिर्जीनी ही सर्व योजना आखलेली असते. त्यानूसार मराठ्यांची सेना यशवंतमाचीवर हल्ला करण्याआधी येसाजीराजे, सावित्री आणि त्यांची नेकजात फौज सुरक्षितपणे बाजिंदच्या जंगलात पोचवली जाते. इकडे येसाजींचा शाही पैलवान भीमा यशवंतमाचीच्या गुप्त खबरा कदंबांना देत असतो. त्यामुळे भीमाचा निपात करणेही गरजेचे असते. त्यानूसार मराठ्यांनी केलेल्या हल्यात भीमाला पकडले जाते आणि खंडोजी म्हणून भीमाचाच कडेलोट केला जातो. 

बहिर्जीच्या या योजनेमुळे यशवंतमाची आपल्या नेकजात फौजेसह स्वराज्यात सामील होते. आपली गूढ विद्या स्वराज्याला देण्याची इच्छा बाळगणार्‍या बाजिंदलाही स्वराज्यात सामील करून घेतले जाते. स्वकीयांकडून धोका असल्यानेच ही योजना अत्यंत गुप्तपणे अंमलात आणली जाते. 

छत्रपति शिवाजी महाराज इमेज - शिवाजी महाराज फोटो नवीन डाउनलोड - Shivaji  Maharaj HD Images & Wallpapers Download
छत्रपति शिवाजी महाराज (फोटो साभार – गूगल)

वयाच्या चौदाव्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांनी घोडा आणि तलवार हीच कुलदैवते मानली. सतत हिंदवी स्वराज्याचा ध्यास उरात बाळगून हिदुस्थानातील पाच पातशाहींना रणांगणात चारीमुंड्या चीत केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी इत्यादी असंख्य मावळ्यांनी त्यांना साथ दिली. अनेक थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी आणि वळणांनी ‘बाजिंद’ ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणे घेत रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईक यांच्या बुद्धीचातुर्याची साक्ष देते आणि शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सुराज्यही होते याचेही दर्शन घडवते.       

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *