“माझी हत्या करण्यात आली तर तुम्ही मुशर्रफ यांचं नाव मारेकरी म्हणून घेऊ शकता”. आपल्या मृत्यूच्या काही आठवडे आधीच बेनझीर एका पत्रकाराला हे सांगत होत्या.
२७ डिसेंबर २००७ रोजी संध्याकाळी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची रावळपिंडी या पाकिस्तानच्या लष्करी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात हत्या करण्यात आली. हत्येनंतर केवळ ४८ तासात मुशर्रफ यांनी ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’चा अमीर म्हणजेच कमांडर बैतुल्ला मेहसूद या हत्येमागचा सूत्रधार असल्याचे जाहीर केले पण बैतुल्लाने मात्र हे नाकारले. २००८ मध्ये पाकिस्तान मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बेनझीर पाकिस्तान मध्ये परतल्या होत्या. त्यावेळी मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटी विरुद्ध सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष होता. तसेच बेनझीर यांच्या आगमनामुळे पाकिस्तानातील मूलतत्ववादी अस्वस्थ होते. पण मग या लोकांनीच बेनझीर यांची हत्या केली का याची उत्तरे मात्र आजपर्यंत नेमकी मिळालेली नाहीयेत. पाकिस्तानी पोलिसांनी केलेल्या तपासातून ठोस असे काहीच बाहेर आले नाही. इतकेच नाही तर संयुक्त राष्ट्र संघाने नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीला सुद्धा यातील नेमके सत्य शोधून काढता आले नाही.
‘आपली हत्या झालीच तर त्याला मुशर्रफ यांना जबाबदार धरा’ असे ज्या पत्रकाराला बेनझीर म्हणाल्या होत्या ते म्हणजे आमीर मीर यांनी बेनझीर यांच्या हत्येवर आधारित ‘हत्या बेनझीर भुत्तोंची का आणि कशी?’ हे एक पुस्तक लिहिले आहे ज्याचा मराठी अनुवाद मिलिंद कोकजे आणि सुजाता देशमुख यांनी केले आहे.
बेनझीर यांच्या हत्येशी संबंधित अनेक प्रश्न आणि इतर ज्ञात अज्ञात गोष्टी जाणून घेण्यासाठी एकदा हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
पुस्तकाचे नाव – ‘हत्या बेनझीर भुत्तोंची का आणि कशी?
मूळ लेखक – आमीर मीर
अनुवाद – मिलिंद कोकजे/ सुजाता देशमुख
पब्लिकेशन्स – मेनका प्रकाशन