बोर्डरूम – औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या

१८९५ साली किंग जिलेटला एकदा दाढी करताना खूप त्रास झाला, तेव्हा त्याच्या डोक्यात दाढीचे ब्लेड्स बनवण्याची कल्पना आली आणि जिलेटचे साम्राज्य उभे राहिले. 

डॉ जॉन केलॉग यांच्या निसर्गोपचार केंद्रात एके दिवशी धान्य कुटून केलेल्या लगद्याचा ट्रे रात्रभर तसाच राहिल्याने सकाळी वाळून गेला आणि त्यातूनच कॉर्नफ्लेक्सचा जन्म झाला. 

१८८६ मध्ये जॉन पेबरटन या फार्मासिस्टने कोकेन, वाइन, दक्षिण अमेरिकेत मिळणारी ‘कोका’ नावाची पाने, आफ्रिकेत मिळणारा ‘कोला’ नावाचा पदार्थ, लिंबाचा रस, व्हॅनीला व इतर अनेक पदार्थ मिसळून एक पेय तयार केले. त्यामध्ये सोडावॉटर मिसळून तो ते पेय विकू लागला. आजच्या लोकप्रिय कोकाकोला ची सुरुवात अशी झाली होती. 

या सर्व आख्यायिका नसून प्रत्यक्ष घडलेले किस्से आहेत. आज आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या असंख्य गोष्टींच्या निर्मितीमागचा इतिहास एकदम रंजक असा आहे. या कंपन्या कश्या सुरू झाल्या, कशा घडल्या, त्यांच्या यशा/अपयशामागे कोणती कारणे होती, व्यवस्थापन एखाद्या व्यवसायावर किती गाढ प्रभाव पाडू शकते, अमेरिकन व्यवस्थापन शैली सर्वोत्तम आहे की जपानी व्यवस्थापन शैली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि उद्योग व्यवस्थापन सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी अच्यूत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी लिहिलेले ‘बोर्डरूम’ हे पुस्तक वाचावे लागेल.

बोर्डरूम-Boardroom by Achyut Godbole, Atul Kahate - Rajhans Prakashan -  BookGanga.com
औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या – बोर्डरूम (फोटो साभार – google)

मोठेमोठे व्यवसाय असोत अथवा साधी घरातील कामे, व्यवस्थापनाची तत्वे कमी अधिक प्रमाणात ही सर्वत्र लागू होतात. व्यवस्थापनाच्या (Management) आज अनेक व्याख्या असल्या तरी इतिहासात खूप पूर्वीपासून व्यवस्थापनाचा वापर होत असल्याचे दिसून येते. सुमेरियन, बॅबिलोनीयन, हिब्रू, ग्रीक, रोमन अशा अनेक संस्कृतींच्या लोकांनी आपल्या नेहमीच्या जीवनपद्धतीतून व्यवस्थापनाचे अनेक सिद्धान्त आपल्याला शिकवले. इतकेच काय इजिप्त मध्ये झालेले पिरॅमिडचे बांधकामही उत्कृष्ट व्यवस्थापनाचे एक समर्पक उदाहरण आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भारतामध्येही प्राचीन काळी झालेले स्तूप, मंदिरे, लेणी, गडकिल्ले इत्यादींचे बांधकाम योग्य व्यवस्थापनाशिवाय अशक्य होते. चाणक्यांनी तर व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगून ठेवलेत. 

Pyramids Of Egypt | Facts About Pyramids | DK Find Out
बोर्डरूम - औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या
Pyramids – व्यवस्थापनाचा उत्तम नमूना (फोटो साभार – google)

अर्थात वरील सर्व उदाहरणांमधून लक्षात येते की प्राचीन काळी प्रत्येक संस्कृती आपापल्या जीवनपद्धतीत व्यवस्थापनाची विविध तत्वे वापरत असल्या तरी व्यवस्थापन हे एक शास्त्र म्हणून सर्वत्र वापरात नव्हते. ‘जो काळाची पावले ओळखून त्यानूसार वागतो आणि आपल्या योजना आखतो, तोच यशस्वी होतो. कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही’ असे पंधराव्या शतकात सांगणारा निकोलो मॅकियावेली हा इटालियन कदाचित पहिला व्यक्ती असेल ज्याने पूर्णपणे व्यवस्थापनावर आधारित ‘द प्रिन्स’ हे पुस्तक लिहिले. इथूनच व्यवस्थापनाचा एक शास्त्र बनण्याच्या दिशेने प्रवास चालू झाला. आजही मॅकियावेलीचे हे पुस्तक बेस्टसेलर आहे. 

यानंतर अनेक तज्ञांनी संशोधन करून विविध कल्पना मांडल्या आणि व्यवस्थापन शास्त्रात मोलाची भर घातली. अॅडम स्मिथ याने अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेतील व्यवस्थापन तत्वे सांगणारे ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले. कामगारांच्या कल्याणावर आधारित स्वप्नाळू समाजवाद मांडणार्‍या ‘पेर्सोंनेल मॅनेजमेंट’ची संकल्पना इंग्लंडमध्ये रॉबर्ट ओवेनने मांडली तर फ्रेडरिक टेलरने शास्त्रीय मॅनेजमेंट‘ची संकल्पना मांडली ज्यामध्ये कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये दर्जाचे निकष ठरवले जात (यालाच टेलर ‘स्टँडर्डस’ म्हणतो) आणि त्यावरून कामगारांची उत्पादनक्षमता तपासली जाई आणि त्यानूसार त्यांना पगार दिला जाई. पीटर ड्रकर, मॅक्स वेबर, चार्लस बॅजेस इत्यादी तज्ञांनी या शास्त्रात आपापल्या परीने मोलाची भर घातली. 

औद्योगिक क्रांतीनंतर विविध तज्ञांनी अनेक संकल्पनांची भर घातल्याने व्यवस्थापन हे एक शास्त्र म्हणून आकारास येत असले तरी यातील सर्व संकल्पना या मूख्यत: उत्पादन वाढीसाठीच सुचवलेल्या होत्या. कोणत्याही मालाचा चांगला दर्जा हा पण व्यवस्थापन शास्त्रातील एक महत्वाचा पैलू आहे याकडे अपवाद वगळता फारसे कुणाचे लक्ष नव्हते. मालाच्या दर्जाचे महत्व पहिल्यांदा जपानला कळले. दुसर्‍या महायुद्धानंतर जपानमध्ये बनलेला माल खूपच तकलादू असायचा आणि म्हणूनच त्याची खिल्ली उडवली जायची. जागतिक स्पर्धेत टक्कर द्यायची असेल तर मालाचा दर्जा सुधारायला हवा हे जपान्यांना उमगले. या सुमाराला जपानमध्ये एडवर्ड डेमिंग आणि जोसेफ ज्यूरान या दोन व्यक्तींचे आगमन झाले. या दोघांनीही मालाचा दर्जा (क्वालिटी) या विषयावर सखोल संशोधन केले होते. पण अमेरिकेत त्यांच्याकडे कुणीही लक्ष न दिल्याने ते जपानमध्ये आले आणि त्यांनी जपानमध्येक्वालिटी मूवमेंट‘ ची सुरुवात केली. परिणामी जपानी कंपन्या जागतिक स्पर्धेत अमेरिकेच्या कंपन्यांनाही टक्कर द्यायला सुरुवात केली.

बोर्डरूम - औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या प्रेरणादायी आणि सुरस कहाण्या
एडवर्ड डेमिंग (फोटो साभार – google)

 मूलत: व्यवस्थापन शास्त्राची बहुतांशी तत्वे ही सर्व व्यवसायात कमी अधिक प्रमाणात लागू होत असली तरी व्यवस्थापनाचे जपानी मॅनेजमेंट आणि अमेरिकन मॅनेजमेंट हे दोन प्रकार सर्वात जास्त चर्चिले गेले आहेत. यावर सखोल संशोधन करून अनेकांनी पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. मग या दोन्ही मॅनेजमेंट पद्धतींमध्ये काय फरक आहे? जपानी मॅनेजमेंटमधील महत्वाची गोष्ट म्हणजे ‘नोकरीतील स्थिरता’. जपानी माणूस एकदा एखाद्या कंपनीत नोकरीला लागला की निवृत्त होईपर्यंत तो तिथेच काम करतो. वारंवार कंपन्या बदलत नाही. तसेच त्या कंपनीत तो एकाच काम न करता वेगवेगळी कामे (job rotation) करत राहतो. त्यामुळे तो वेगवेगळ्या गोष्टी सहजपणे हाताळू शकतो. जपानी कंपन्यांमध्ये कोणताही निर्णय हा बहुमताने घेतला जातो. कंपनीतील सर्व पातळीवरील लोक चर्चासत्रात भाग घेऊन चर्चा करतात आणि मगच निर्णय घेण्यात येतो. यालाच जपानमध्येरिंगीसेडो‘ असे म्हणतात. जपानी मॅनेजमेंटचे आणखी एक महत्वाचे तत्व म्हणजे JIT (जस्ट इन टाइम). म्हणजेच आधीच सर्व कच्चा माल घेऊन ठेवण्यापेक्षा जेव्हा गरज असेल तेव्हा आणि तेवढाच कच्चा माल कारखान्यात येतो. तसेच मालाच्या दर्जालाही जपानमध्ये अत्यंत महत्व दिले जाते. पण या जपानी मॅनेजमेंट चा एक कच्चा दुवा म्हणजे व्यक्तीला जपानी कंपनीमध्ये बढती ही त्याच्या कर्तुत्वापेक्षा त्याने किती वर्षे त्या कंपनीत नोकरी केली या आधारावर दिली जाते. इथे ‘कामगिरी अथवा कर्तुत्व’ हे दुय्यम ठरते. 

याउलट अमेरिकन मॅनेजमेंट कसे आहे? अमेरिकेत दीर्घकाळ एकाच कंपनीत नोकर्‍या करण्याचा प्रघात कमी दिसून येतो. तसेच तेथे व्यवस्थापनामध्ये कोणतेही निर्णय सामूहिकपाने होत नाहीत. जे बॉस सांगेल तेच कंपनीचे धोरण ठरते. जपानी JIT कल्चर मुळे तेथील कारखान्यात शांतता, शिस्तीत काम करणारी माणसे, स्वच्छता, मालाची न होणारी नासाडी इत्यादी दृश्य दिसते. याच्या अगदी उलट परिस्थिती अमेरिकन कारखान्यात दिसते. पण अमेरिकन मॅनेजमेंटचा महत्वाचा पैलू म्हणजे तेथे कामगिरी आणि कर्तुत्वाला वाव देऊन त्याआधारावर बढती दिली जाते. 

जपानी मॅनेजमेंट चांगले की अमेरिकन? हा वाद वर्षानुवर्षे चालत आला आहे. पण प्रत्येक पद्धतीत गुण-दोष हे असतातच. अमेरिकेने जगाला अनेक बलाढ्य कंपन्या दिल्या (अॅपल, गूगल, बोइंग इत्यादी). तसेच जपाननेही जगाला अनेक उत्तम कंपन्या दिल्या (सोनी, टोयोटा इत्यादी). त्यामुळे दोन्ही व्यवस्थापन पद्धती आपापल्या जागी चांगल्याच मानल्या पाहिजेत. पण यातून एक गोष्ट ठळकपणे दिसून येते ती म्हणजे कोणतीही कंपनी स्थापन करणे सोपे असले तरी ती भरभराटीस आणावयाची असेल तर व्यवस्थापनाची तत्वे योग्य पद्धतीने राबवली पाहिजेत. चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन राबवल्यास मोठमोठ्या बलाढ्य कंपन्या कोसळायला वेळ लागत नाही. 

McDonald's Restaurants Then and Now
मॅकडोनाल्ड चे पहिले आऊटलेट (फोटो साभार – google)

व्यवस्थापनाची ही विविध तत्वे वापरून अगदी साधी सुरुवात करणार्‍या कंपन्या आज जगातील बलाढ्य साम्राज्ये बनली आहेत. जनरल मोटर्स, फोर्ड, आयबीएम, क्राइसलर, मॅकडोनाल्ड, जिलेट, केलोग कॉर्नफ्लेक्स, गुडईयर टायर, डेनीम जीन्स, कोडॅक कॅमेरा, Procter & Gamble (P & G), वॉर्नर ब्रदर्स, सिंगर शिलाई मशीन, वॉल्ट डिस्ने, सोनी, कोकाकोला, नाइके, इंटेल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, इबे, अॅमेझोन, नोकिया या आणि अशा अनेक कंपन्यांनी छोट्या स्तरावर सुरुवात करून नंतर गरूडभरारी घेतली. अनेक संकटांना, अडचणींना तोंड देत या कंपन्या भरभराटीस आल्या. या औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या सुरस तितक्याच शिकवणार्‍या, जितक्या चटकदार तितक्याच प्रेरणादायी आहेत. व्यवस्थापन शास्त्रातील मूलतत्व सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीने समजून घेत फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणार्‍या या कंपन्यांच्या अविश्वसनीय व थरारक यशोगाथा जाणून घ्यायच्या असतील तर ‘बोर्डरूम’ ही पुस्तक एकदा वाचलेच पाहिजे. या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत लेखक भारतीय कंपन्यांच्या यशोगाथाही सांगतील ही अपेक्षा !   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *