भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – माझेही एक स्वप्न होते

आतापर्यंत जगातले बहुतांश महत्त्वाचे शोध हे अपघाताने लागल्याचे इतिहासात डोकावून पाहताना आपल्याला समजून येईल. पण एखादी ‘अपघाती घटना’ भारतातील दुग्ध व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून भारताला दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण बनवून त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरली असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे पूर्णपणे सत्य आहे. ग्रामीण भारताशी काहीही सोयसुतक नसलेला वर्गीस कुरियन नावाचा एक शहरी तरुण गुजरातमधील आणंद येथे दाखल होतो. स्वेच्छेने नाही तर सक्तीने! कारण कुरियन यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेत दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले असते आणि या शिष्यवृत्तीच्या करारान्वये त्यांना आणंद येथील सरकारी ‘लोणी संशोधन प्रक्रिया’ या संस्थेमध्ये नोकरीसाठी यावे लागते.

मुळात इंजिनिअर असलेल्या कुरियन यांना भौतिकशास्त्र आणि धातूशास्त्र यामध्ये रूची होती. त्यामुळे लवकरच कंटाळून त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि तत्कालीन काँग्रेस नेते आणि स्वातंत्र्य सैनिक श्री त्रिभुवनदास पटेल यांच्या आग्रहाखातर कुरियन काही काळासाठी (इथेही सुरुवातीला स्वेच्छेने नाहीच) ‘कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (जी सध्या ‘अमूल‘ या नावाने सुपरिचित आहे)’ या सहकारी संस्थेशी जोडले गेले. इथूनच सुरू झाला ‘ आणंद पॅटर्न‘ चा म्हणजेच भारतातील धवल अशा दुग्ध क्रांतीचा ऐतिहासिक प्रवास. या धवल क्रांतीचा आणि तिच्या जनकाचा विलक्षण असा प्रवास डॉ वर्गीस कुरियन यांनी त्यांच्या ‘माझेही एक स्वप्न होते’ या आत्मचरित्रात मांडला आहे. त्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे.

भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास - माझेही एक स्वप्न होते
भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – माझेही एक स्वप्न होते

केरळ मधील कलिकात येथील एका सुखवस्तू कुटुंबात वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला. महाविद्यालयात असताना कुरियन एक उत्कृष्ट खेळाडू होते आणि त्यांचा सुरुवातीला लष्करात जाण्याचा इरादा होता. पण कुरियन २२ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुरियन यांचे कुटुंब त्यांचे मामा जॉन मथाई (जे पुढे स्वतंत्र भारतामध्ये अर्थमंत्री बनले) यांच्याकडे राहायला आले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आईच्या आग्रहास्तव कुरियनटाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को)’ मध्ये नोकरीस लागले. त्यावेळी (१९४४ मध्ये) त्यांचे मामा जॉन मथाई हे टाटा उद्योग समूहामध्ये संचालक होते. पण टिस्को मध्ये कुरियन रमले नाहीत आणि लवकरच ब्रिटिश भारत सरकार कडून शिष्यवृत्ती मिळवून ते दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकीचे (Dairy इंजिनिअरिंग) शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले. मुळात भौतिकशास्त्र आणि धातूशास्त्र यामध्ये रस असतानाही कुरियन यांनी दुग्ध व्यवसाय अभियांत्रिकीकडे वळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना काहीही करून ‘टिस्को’ मधून बाहेर पडायचे होते. पण ही घटनाच पुढे भारताचे दुग्ध उत्पादनाचे भवितव्य बदलणारी ठरली.

वर्गीस कुरियन अमेरिकेतून परत येईपर्यंत भारताला (फाळणी सहित) स्वातंत्र्य मिळाले होते. नवस्वतंत्र भारतात कुरियन आणंद येथील ‘लोणी संशोधन प्रक्रिया केंद्र’ मध्ये अधीक्षक म्हणून रुजू झाले. या संस्थेच्या आवारातच १९४६ मध्ये सरदार पटेल यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ‘कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित’ या सहकारी संस्थेची स्थापना झालेली होती. ब्रिटिश काळात ‘पोल्सन‘ या खासगी डेअरी तर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणूकीला पर्याय म्हणून या संस्थेची उभारणी करण्यात आली होती. त्रिभुवनदास पटेल हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष बनले. या सहकारी संस्थेकडे त्याकाळी मोठी, बोजड आणि जुनाट यंत्रसामुग्री होती जी वारंवार बंद पडत असे. वर्गीस कुरियन इंजिनिअर असल्याने ही यंत्रे ठीक करण्यासाठी त्रिभुवनदास वरचेवर कुरियन यांचा सल्ला व मदत घेत असत. त्यानिमित्ताने कुरियन यांचा कैरा सहकारी संस्थेशी नियमित संपर्क येऊ लागला आणि त्रिभुवनदास पटेल यांनाही कुरियन यांच्या व्यावसायिक आणि व्यवस्थापन कौशल्याची जाणीव होऊ लागली.

वर्गीस कुरियन - माझेही एक स्वप्न होते
वर्गीस कुरियन – माझेही एक स्वप्न होते

त्यामुळेच आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर कुरियन यांना त्रिभुवनदास यांनी काही काळासाठी कैरा सहकारी संस्थेसाठी काम करण्याची गळ घातली. त्रिभुवनजींची ही विनंती कुरियन अव्हेरू शकले नाहीत आणि त्यांनी अजून दोन महिने आणंद मध्ये राहण्याचे मान्य केले. त्रिभुवनदासजींचा हा आग्रह आणि कुरियन यांचा हा निर्णय भविष्यातील एका मोठ्या क्रांतीची सुरुवात असणार आहे याची त्या दोघांनाही जाणीव नव्हती. त्रिभुवनदास यांची पात्रता, नेतृत्वगुण व सचोटी आणि कुरियन यांची मेहनत व व्यावसायिक कौशल्ये याच्या बळावर ‘कैरा सहकारी संस्था‘ प्रगतीच्या दिशेने वेगाने घौडदौड करू लागली. काही काळानंतर त्यांनी व्यवसाय वृद्धीच्या उद्देशाने ‘अमूल’ हे ब्रँड नाव धारण केले. कृषिप्रधान आणि विपुल पशुधन असूनही स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात भारत मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादने आयात करत असे. पण ‘अमूल‘ मधून सुरू झालेल्या या धवलक्रांतीमुळे लवकरच भारत दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण बनला. ‘आणंद पॅटर्न‘ जगभरात नावाजला गेला आणि बऱ्याच देशांनी त्याचे अनुकरण करण्यासाठी ‘आणंद‘ ला भेटीही दिल्या. 

पण त्रिभुवनदास पटेल आणि वर्गीस कुरियन यांची वाट सोपी होती का? किंबहुना या प्रवासात अडथळेच जास्त होते. हे अडथळे निर्माण करण्यामध्ये परकीयांपेक्षा स्वकीयच जास्त होते हे जळजळीत वास्तव डॉ वर्गीस कुरियन या पुस्तकातून मांडतात. जमिनीवरील वास्तवाशी फारकत झालेल्या (अपवाद वगळता) नोकरशाहीबद्दल त्यांना मनस्वी चीड होती. ‘आणंद पॅटर्न’ यशस्वी झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी अशाच प्रकारच्या सहकारी संस्थांचे जाळे देशभर पसरवण्यास कुरियन यांना सांगितले. जर गुजरात मध्ये हा पॅटर्न यशस्वी होऊ शकतो तर सुपीक जमीन आणि अमाप पशुधन असलेल्या उत्तर भारतात का नाही? हा शास्त्री यांना पडलेला मुख्य प्रश्न होता. पण जंग जंग पछाडूनही कुरियन यांना ‘आणंद पॅटर्न’ देशपातळीवर राबवण्यात अपयश आले कारण विविध राज्य सरकारच्या नोकरशाहीची अडवणूक.

भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास
भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – सुरुवात

नोकरशाहीची अशीच वागणूक ‘अमूल‘ च्या विकासाच्या प्रत्येक टप्यावर कुरियन यांना सहन करावी लागली होती. मुळात भारतीय सामान्य शेतकऱ्यांनी मिळून सहकारी तत्वावर पूर्णपणे यशस्वीपणे चालवलेली ही संस्था खरेतर कौतुकास पात्र! पण भारतीय नोकरशाहीला (पुन्हा अपवाद वगळता) याचे काहीही सोयरसूतक नव्हते. परदेशी बलाढ्य कंपन्याही (उदा. नेस्ले) अमूलच्या यशाने अस्वस्थ होत्या. भारतीय काळया लोकांमध्ये अशा प्रकारे यशस्वी उद्योजक होण्याची पात्रताच नाही असे या पाश्चात्य कंपन्यांचे ठाम मत होते. अमूलने त्यांना खोटे ठरवले आणि या कंपन्यांच्या विरोधात अमूल बाजारपेठेत ताकतीने उभी राहिली. महत प्रयास करूनही या बलाढ्य कंपन्या अमूलला रोखू शकल्या नाहीत.

या व अशा अनेक अडचणी येऊनही अमूल यशाचे नवनवे शिखर पादाक्रांत करत राहिली. कुरियन यांनी या पुस्तकात गुजरात आणि केंद्रातील सर्व सरकारांप्रती (मग ते कोणत्याही प्रकारचे सरकार असो) कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंडित नेहरू, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी , देवीलाल इत्यादी नेत्यांच्या भक्कम पाठबळामुळे कुरियन नोकरशाहीशी बिनधास्तपणे दोन हात करू शकले. मुळात हे पुस्तक कुरियन यांचे आत्मचरित्र असले तरी त्यातून सहकाराची आणि ग्रामीण भारताची ताकद सहज जाणवते.

भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास
भारताच्या दुग्धक्रांतीचा ऐतिहासिक प्रवास – लाल बहादूर शास्त्री यांची भेट

डॉ वर्गीस कुरियन यांना भारतातील कोणत्याही मोठ्या शहरात अथवा परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणे सहजशक्य होते. पण या माणसाने अट्टाहासाने कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला आणि आणंद सारख्या धूळ भरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. स्वकीय अडथळे आणि विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ ची निर्मिती केली. सामान्य भारतीय माणसांनी मनात आणले तर ते काय करू शकतात देशात धवल क्रांती घडवून जगाला दाखवून दिले. भारताचे ‘ Milkman’ म्हणून गौरविले गेलेले डॉ वर्गीस कुरियन यांचे हे आत्मचरित्र म्हणजे रंजक, उद्बोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणारी एक धवलगाथाच आहे. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी अशी धवलगाथा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *