महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे थोडक्यात जीवनचरित्र

‘लोकांनी घातलेला बहिष्कार अण्णांनी स्थितप्रज्ञ वृत्तीने सहन केला. बंदुकीची गोळी कापसाच्या गठडीवर मारली, तर तिची तीव्रता कमी होते. अण्णा त्यावेळी कापूस झाले होते’

‘एक व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त जे करू शकेल त्याहून अधिक कार्य कर्वे यांनी केले आहे.’

‘भारताच्या पंतप्रधानांसमोर संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करून अण्णांनी आपल्या १०० वर्षांच्या जीवन मंदिरावर सुवर्ण कळसच चढवला आहे.’

‘ध्येयनिष्ठा, चिकाटी, साधेपणा, निर्दोष चारित्र्य, निःस्वार्थीपणा यामुळेच त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य घडले.’

‘हे जीवनचरित्र हा गेल्या दोन शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातला एक मोलाचा व तेजस्वी अध्याय आहे.’

‘त्यांच्या नियमितपणामुळे घड्याळ झिजली आणि वेळापत्रकही फाटली.’

आणि आचार्य अत्रे यांच्या शब्दात

‘सेवा हीच त्यांची प्रतिभा, सेवा हेच त्यांचे काव्य आणि सेवा हेच त्यांचे साहित्य.’

वरील सर्व वर्णन आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे. १८५८ साली जन्मलेले आणि १०४ वर्षांचे प्रदीर्घ आणि समृद्ध असे आयुष्य लाभलेल्या महर्षी कर्वे यांचे थोडक्यात जीवनचरित्र संध्या रानडे यांनी ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’ या पुस्तकात मांडले आहे.

स्त्री शिक्षण आणि विधवा स्त्रियांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याच्या क्षेत्रात महर्षी कर्वे यांनी आयुष्यभर झपाटून काम केले. कोकणातील एका गरीब कुटुंबातून आलेल्या महर्षी कर्वे यांनी महिलांना सक्षम करणाऱ्या अनेक संस्था मोठ्या कष्टाने उभारल्या ज्या आजही उत्तमपणे काम करीत आहेत. समाजसुधारणेचे व्रत स्वीकारलेल्या कर्वे यांनी तत्कालीन समाजाच्या विरोधाला संयमाने तोंड देत समाजसुधारणा घडवून आणल्या. महिलांना आपल्या पायावर उभारण्यासाठी आवश्यक असे शिक्षण दिले. प्रसंगी आपल्या पदरचे पैसे घालून हा वसा चालू ठेवला.

एकीकडे बहुतांश नेते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना कर्वे मात्र स्वतंत्र भारताचा समाज आणि विशेषतः स्त्रिया सक्षम असाव्यात म्हणून संघर्ष करत होते.

एक छोटेसे पण आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *