रॉबिन कूक यांची ‘क्युअर’ कादंबरी – एक वैद्यकीय थरारकथा

न्यूयॉर्क मधल्या सबवे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर एका जपानी माणसाचा गुढ मृत्यू होतो. प्रथमदर्शनी तरी हा एक नैसर्गिक मृत्यूच वाटत असतो. किंबहुना त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत राहणे हे काही लोकांच्या भल्याचे असते. पण न्यूयॉर्कच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरीला मात्र त्या जपानी माणसाच्या मृत्यूमध्ये काहीतरी काळेबोरे वाटत असते. पण तिला तसे सिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी एक भयानक कट आकारास येत असतो. कोण असते ही जपानी व्यक्ती? त्याचा मृत्यू नैसर्गिक असतो की त्याचा खून केला गेला असतो? आणि डॉक्टर लॉरी त्याचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे सिद्ध करू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत रॉबिन कूक यांनी लिहिलेल्या ‘क्युअर’ या पुस्तकामध्ये.

रॉबिन कूक
‘क्युअर’

सातोशी माचीता हा जपानी शास्त्रज्ञ क्योटो युनिव्हर्सिटी मध्ये जैव तंत्रज्ञानातील प्लुरीपोटंट स्टेमसेल्स वर संशोधन करत असतो. या स्टेम सेल्सद्वारे अनेक असाध्य अशा रोगावर प्रभावी उपाय करणे शक्य होणार असते. त्यामुळे या स्टेमसेल्स तयार करून त्याचे व्यापारीकरण करून अब्जावधी रुपये कमावण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या प्रयत्नशील असतात. सातोशीने अशाच स्टेमसेल्स प्रयोग शाळेत स्वतः तयार करून त्यासंबंधीची माहिती आपल्या वह्यांमध्ये लिहून ठेवलेली असते आणि  या सर्व वह्या क्योटो युनिव्हर्सिटी मध्ये ठेवलेले असतात.

जपान मधील कडक शिस्तीच्या वातावरणाला कंटाळलेला आणि प्रचंड पैसा कमावण्यासाठी सातोशीला जपानच्या बाहेर पडायचे असते. उघडपणे तसे करणे त्याला शक्य नसते. अशा वेळी आयपीएस युएसए या स्टेमसेल्स निर्मितीमध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीचा मालक बेन कोरी हा सातोशीला जपानमधून पळून जाऊन अमेरिकेत बेकायदा प्रवेश करायला मदत करतो. सातोशीच्या वह्या मिळवण्यासाठी बेन स्वतः जीवावर उदार होऊन बेकायदेशीरपणे क्योटो युनिव्हर्सिटी मध्ये शिरतो आणि त्या वह्या आपल्या ताब्यात घेतो. या स्टेम सेल्सचे पेटंट घेऊन अब्जाधीश बनण्याचे स्वप्न सातोशी आणि बेन हे दोघे पाहत असतात.

पण सातोशीच्या पलायनाची खबर जपानी सरकारला समजते आणि जपान मधील संघटित गुन्हेगारी टोळीच्या मदतीने सातोशीचा काटा काढून त्या वह्या ताब्यात घ्यायची योजना आखली जाते. आता न्यूयॉर्कच्या सबवे स्टेशनवर गूढ मृत्यू झालेला तो जपानी माणूस म्हणजे हा सातोशीच असतो. त्याला एका विशिष्ट प्रकारचे विष टोचण्यात येते ज्याचा शरीरात काहीही मागमूस राहत नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने एखाद्या डॉक्टरने शवविच्छेदन केल्याशिवाय सातोशीचा मृत्यू हा नैसर्गिकच वाटला असता आणि कोणालाही कसलीही शंका आली नसती. त्या जपानी टोळीने सातोशीचा खून केलेला असतो त्यांचे अमेरिकन गुन्हेगारी टोळीशी अवैध व्यापारी संबंध असतात. त्यामुळे सातोशीचा मृत्यू अखेरपर्यंत नैसर्गिक वाटणे हेच त्यांच्याही हिताचे असते.

रॉबिन कूक
क्योटो युनिव्हर्सिटी

सातोशीचे हे प्रेत अनोळखी व्यक्तीचे प्रेत म्हणून OCME म्हणजेच ‘ऑफिस ऑफ द चीफ मेडिकल एक्झामिनर’ या न्यूयॉर्कमधल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा सरकारी संस्थेत आणले जाते. OCME मध्ये मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात असते. डॉक्टर जॅक स्टेपलटन आणि डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरी हे जोडपे OCME मध्येच काम करत असते. लॉरी २० महिन्यांच्या बाळंतपणाच्या दीर्घ रजेनंतर आपल्या कामावर रुजू झालेली असते. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर कामावर परतल्याने तिला त्या दिवशी तुलनेने सोपी वाटणारी सातोशीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची केस सोपवली जाते.

तशी ही केस वरकरणी साधी सोपी वाटत असते – एका माणसाचा आकड्या सदृश्य झटके येऊन आलेला नैसर्गिक मृत्यू. पण दीर्घ सुट्टी नंतरची आपली ही पहिलीच केस असल्याने लॉरीला सर्व त्या चाचण्या करून हा मृत्यू नैसर्गिकच असल्याची खात्री करून घ्यायची असते. दुसरे म्हणजे या आशियाई व्यक्तीची अजूनही ओळख पटलेली नसते. त्याच्याबद्दल काही कळाले का याची सातत्याने विचारणा लॉरी न्यूयॉर्क पोलीस दलाकडे करत असते. पहिल्या केसच्या उत्कंठेपायी आणि पोलीस दलाकडून काहीच माहिती न कळाल्याने लॉरी स्वतः त्या सबवे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून मिळवते आणि रात्री घरी जाऊन ते फुटेज तपासते.

त्या मृतदेहाच्या बाकी सर्व चाचण्या नॉर्मल आल्याने त्या सीसीटीव्ही फुटेज मधून या माणसाविषयी काही माहिती मिळेल अशी तिला आशा असते. रात्री घरी जाऊन ते फुटेज पाहिल्यावर तिला कळते की सातोशीच्या पाठलागावर दोन जपानी माणसे असतात. त्याच्यापासून पळत पळत सातोशी सबवे स्टेशनवर जातो आणि तेथेच त्याचा गूढ मृत्यू होतो. त्यामुळे या दोन जपानी माणसांनीच सातोशीची हत्या केल्याचा दाट संशय तिला येतो. पण ही नैसर्गिक वाटावी अशा प्रकारे हत्या कशी होऊ शकते याचा शोध घेता घेता तिला टेड्रोडोटॉक्सिन नावाच्या एका जहाल विषाची माहिती कळते. या विषाचा प्रयोग केल्यास त्याचा कोणताच सुगावा व्यक्तीच्या शरीरात राहत नाही. त्यामुळे सातोशीचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची लॉरीला खात्री पटते.

रॉबिन कूक
OCME

इकडे सातोशीच्या हत्येत जपानी टोळीला मदत करणाऱ्या अमेरिकन टोळीचा बॉस बरीच वर्षे जेलमध्ये असतो. त्याच्या अनुपस्थितीत टोळी चालवणाऱ्या व्यक्तीला हा बॉस सातोशीची केस डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरीकडे जाऊ देऊ नका अशी तंबी देतो. लॉरी अत्यंत हुशार असून ती सातोशीच्या मृत्यू मागचे खरे कारण शोधून काढेल याची त्यांना भीती असते. पण सातोशीच्या केस वर डॉक्टर लॉरीच काम करत असल्याचे समजताच ही अमेरिकन टोळी तिने या केस वरून बाजूला व्हावे यासाठी तिच्या मुलाचे अपहरण करण्यात येईल अशी धमकी देणारे पत्र गुपचूपपणे तिच्या ऑफिसमध्ये ठेवते. लॉरीला हे पत्र मिळते पण हि आपल्या नवऱ्याने – जॅकने केलेली गंमत आहे असे वाटल्याने ती याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते.

सातोशीचा खून ज्या विषाने झाल्याचा संशय असतो त्या अनुषंगाने प्रयोगशाळेत काही चाचण्या केल्या असता लॉरीचा संशय खरा ठरतो. सातोशीच्या शरीरात टेड्रोडोटॉक्सिनचे अवशेष मिळून येतात. मात्र एक अत्यंत जटिल केस सोडवण्याच्या लॉरीच्या आनंदावर तिच्या मुलाच्या झालेल्या अपहरणाच्या बातमीने पाणी पडते. ती अमेरिकन गुन्हेगारी टोळी खरोखरच लॉरीच्या मुलाचे अपहरण करून एका अज्ञात ठिकाणी लपवून ठेवते आणि इथूनच एक थरारक शोध मोहीम सुरू होते.

लॉरीच्या मुलाला सोडवण्यात पोलिसांना यश येते का? सातोशीच्या केसचे अंतिमत: काय होते? या सर्वांचा अमेरिकनजपानी गुन्हेगारी जगतावर काय परिणाम होतो? आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आकारास येणारे हे थरारनाट्य एकदा वाचलेच पाहिजे.

1 Comment

  1. This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *