कोणत्याही लढाई मध्ये डावपेच हे फार महत्त्वाचे असतात. डावपेच योग्य असतील तर कमी सैन्य वापरूनही बलाढ्य शत्रूला धूळ चारता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध सैन्य मोहिमांमध्ये नेहमीच हे दाखवून दिले. पण हे डावपेच रचण्यासाठी चालून येणाऱ्या शत्रुची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक असते. यामुळेच शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मजबूत आणि कार्यक्षम असे गुप्तहेर खाते निर्माण केले आणि तितक्याच कार्यक्षम व्यक्तीला स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बनवले. ते म्हणजे – बहिर्जी नाईक. इतिहासात उपलब्ध असलेल्या त्रोटक माहितीच्या आधारावर प्रेम धांडे यांनी ‘शिवनेत्र बहिर्जी’ ही बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित कादंबरी लिहिली आहे.
बहिर्जी नाईक म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता, धैर्य, आत्मविश्वास याचे मूर्तिमंत उदाहरण. वेषांतर करण्यात इतके पारंगत आरशात पहिले तर स्वतःलाच ओळखणार नाहीत. त्यांनी स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा इतकी कार्यक्षम पणे बनवली होती की आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, मुघल इत्यादी शत्रूच्या गोटात होत असलेली प्रत्येक हालचाल छत्रपती शिवाजी राजेंपर्यंत पोहचत असे. गुप्तता इतकी की कित्येक वर्षे बहिर्जी नावाचा कोणी हेर स्वराज्यात आहे याची शत्रूलाच काय स्वकियांनाही माहिती नव्हती. शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत रणांगणावर मर्दुमकी गाजवणाऱ्या प्रत्येक मावळ्यासोबतच या मोहिमेची आखणी करण्यात कळीची भूमिका बजावणारे बहिर्जी आणि त्यांचे हेर सुद्धा तितकेच महत्त्वाचे. अशा या बहिर्जी यांच्या कार्याचा वेध घेणारी कादंबरी एकदा नक्की वाचावी अशी.