‘हे म्हणजे जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मेक्सिको मध्ये घुसखोरी केल्यासारखे आहे’. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये इराक वर हल्ल्याचा निर्णय घेतला तेव्हा एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने वरील शब्दात याला विरोध केला होता.
खरेच बोलला तो. अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकली. कालांतराने सद्दामला पकडून फाशी देण्यात आली. पण एवढे सर्व करून अमेरिकेने दहशतवाद विरोधी युद्ध जिंकले का? सद्दामचा पाडाव झाल्यावर इराक मध्ये अंदाधुंदी माजली. अमेरिकेने इराकी लष्कर बरखास्त केल्याने जवळपास पाच लाख प्रशिक्षित सैनिक बेकार झाले आणि यातूनच ‘आयसिस’ चा भस्मासूर उदयाला आला. या भस्मासुराने आज जगासमोर अल कायदा पेक्षा ही मोठे संकट निर्माण केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
१ जुलै २०१४ या दिवशी ‘इस्लामिक स्टेट’ उर्फ ‘आयसिस’ चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने एका ध्वनिमुद्रित संदेशाद्वारे एका नव्या प्रदेशाची निर्मिती करत असल्याची घोषणा करून आपण या प्रदेशाचे ‘खलिफ’ म्हणजेच प्रमुख असल्याचं जाहीर केलं.
इतिहास साक्षी आहे की अमेरिकेने याआधीही आपल्या स्वार्थासाठी जगभरात अनेक ठिकाणी अशांतता निर्माण केली. अमेरिकेने बिन लादेनला प्रशिक्षित केले आणि त्याने ९/११ चा हल्ला करून त्याची परतफेड केली. पण नंतर बिन लादेन आणि आता अल जवाहिरीच्या हत्येनंतर अल कायदा कमजोर झाली असताना आयसिसने मात्र जगभरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे.
आयसिस ही संघटना आली कुठून? तिची वाढ कशी झाली? तिची पार्श्वभूमी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी अतुल कहाते यांनी लिहिलेले ‘संकट आयसिसचे’ हे पुस्तक आवर्जून वाचा.
पुस्तकाचे नाव -‘संकट आयसिसचे’
लेखक – अतुल कहाते
पब्लिकेशन्स – मनोविकास प्रकाशन.