सोविएत रशियाची KGB

प्राचीन काळातील साम्राज्ये आणि आजच्या काळातील विविध देशांपुढे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते ते म्हणजे आपले अस्तित्व टिकवून प्रगती करत राहणे. आता अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इतर राज्ये आणि देशांसोबत संघर्ष करणे हे ओघाने आलेच. प्रत्येक देश अशा प्रकारच्या संघर्षात वरचढ राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. पण यासाठी गरज असते शत्रूला पूर्णपणे जाणण्याची. Sun Tzu ने सुद्धा म्हटले आहे ,’If you know the enemy and know yourself, you need not fear the result of hundred battles.‘ यासाठीच अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत प्रत्येक राज्याने आपली गुप्तचर यंत्रणा विकसित करण्याची काळजी घेतली. अशाच एका गुप्तचर संघटनेची माहिती श्री पंकज कालूवाला आपल्या एका पुस्तकात देत आहेत. ती म्हणजे सोव्हिएत रशियाची गुप्तचर संघटना KGB.

सोव्हिएत रशिया म्हणजे भारताचा मित्र देश आणि अमेरिकेनंतरची त्या काळातील दुसरी महासत्ता. १९१७ मध्ये रशियामध्ये झालेली साम्यवादी क्रांती, या साम्यवादी शासनाला टिकून राहण्यासाठी असलेली आव्हाने, दुसरे महायुध्द, त्यानंतर दीर्घकाळ चालले शीतयुद्ध इत्यादी अनेक प्रसंगी रशियाच्या अस्तित्वावर संकट आले. पण प्रत्येक वेळी KGB ने अतुलनीय कामगिरी बजावली. अनाक्रमणाचा करार करूनही जर्मनीने १९४१ मध्ये रशियावर केलेले आक्रमण आणि १९८९-९० मध्ये झालेले सोव्हिएत युनियनचे पतन यामध्ये KGB पेक्षा राजकीय अपयशाचा भाग मोठा होता. कोणतेही आमिष किंवा धाक न दाखवता केवळ साम्यवादी विचारसरणीने भारावलेल्या लोकांमधून KGB ने उत्तमोत्तम हेर निर्माण केले. परकीय गुप्तहेर संस्थांमध्ये (खासकरून CIA आणि ब्रिटिश गुप्तहेर संस्था) KGB ने बेमालूमपणे केलेली घुसखोरी बद्दल वाचून अक्षरशः थक्क व्हायला होते.

हेरगिरीच्या रोमांचक पण तितक्याच धोकादायक दुनियेची सफर करायची असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.

पुस्तकाचे नाव – सोव्हिएत रशियाची केजीबी

लेखक – पंकज कालूवाला

पब्लिकेशन्स – परम मित्र पब्लिकेशन

सोविएत रशियाची KGB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *