छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाने पवित्र झालेल्या महाराष्ट्राच्या भूमी साठी सह्याद्री एकप्रकारे वरदानच आहे. याच सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभे असलेल्या असंख्य गड किल्ल्यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असे हिंदवी स्वराज्य उभे केले. पण या गड किल्ल्यांसोबतच महत्त्वाच्या होत्या त्या म्हणजे सह्याद्री मधील अनेक घाट वाटा. प्राचीन काळापासून महत्व लाभलेल्या या घाट वाटा घाटमाथ्याला कोकणाशी जोडत. व्यापार, सैन्य तसेच सर्वसामान्य लोकांच्या ये जा करण्यासाठी आणि युद्धाचे डावपेच राबवण्यासाठी सुद्धा या घाट वाटांचा वापर केला जायचा. म्हणूनच सह्याद्री मधील बहुतांश किल्ल्यांची निर्मिती या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच करण्यात आली होती. यातील बऱ्याच घाट वाटा शिवरायांच्या अनेक मोहिमांच्या साक्षीदार आहेत. १७व्या शतकात अशा प्रकारच्या जवळपास २६० इतक्या घाट वाटा वापरात होत्या. पण आता यातील बऱ्याच वाटा काळाच्या ओघात दडून गेल्या आहेत. अशा अनेक घाट वाटांची माहिती श्री सुशील दुधाणे यांनी त्यांच्या ‘घाट वाटा’ या पुस्तकात दिली आहे. विविध घाट वाटा, त्याचा पूर्ण मार्ग, तेथे प्रवास करताना घ्यायची काळजी इत्यादी महत्वपूर्ण माहिती लेखकाने पुस्तकात दिली आहे. गिर्यारोहकांना आणि डोंगरात भटकणाऱ्या लोकांसाठी एक चांगले मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे.