अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

ही कहाणी आहे दोन देशांमध्ये झालेल्या अंतराळ स्पर्धेची. सर्व प्रथम अंतराळात कोण आपले रॉकेट पाठवेल, कोण सर्वप्रथम अंतराळात माणूस पाठवेल इथून चालू असलेली ही स्पर्धा कोण सर्व प्रथम चंद्रावर माणूस उतरवेल इथपर्यंत येऊन पोचली. २० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ मधून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यावर ही स्पर्धा अमेरिकेने जिंकली असली तरी सोव्हिएत रशियानेही या स्पर्धेत अनेक नेत्रदीपक कामगिरी बजावली होती. लायका नावाची कुत्री, युरी गागारीन या माणसाला आणि व्हॅलेंतीना तेरेश्कोवा या महिलेला सर्वप्रथम सोव्हिएतनेच अंतराळात पाठवले. अलेक्सी लिओनोव्ह या रशियन माणसानेच सर्वप्रथम स्पेसवॉक केला. अपोलो ११च्या ऐतिहासिक कामगिरीने खरा विजय हा माणसाचा आणि विज्ञानाचा झाला होता. अपोलो ११ च्या यशाने खरेतर ही अंतराळ स्पर्धा कायमची संपली. पण या यशामागे वेदनादायक इतिहास होता, अनेक अपयशांची मालिका होती.

अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

हिटलरच्या नाझी आणि एसएस संघटनांचा सदस्य आणि जर्मन लष्करासाठी संहारक रॉकेट्स बनवणारा व्हर्नर फॉन ब्राऊन हा अमेरिकेच्या या यशामागचा खरा हिरो. दुसरे महायुध्द संपत आले असता हजारो मौल्यवान कागदपत्रे आणि सहकारी यांच्यासोबत ब्राऊन अमेरिकेला आले. पण सुरुवातीची बरीच वर्षे त्यांना आपल्या नाझी पक्षाच्या सदस्यत्वामुळे अमेरिकेत भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागले. एकेकाळी ‘टाईम’ मासिकाने ब्राऊन यांची ‘याला अंतराळयुगाचा कोलंबस बनायचं आहे‘ या शब्दात खिल्ली उडविली होती. पण अंतराळ स्पर्धेत सोव्हिएतच्या पुढे जाण्याच्या ओढीने ब्राऊनला महत्त्व मिळाले आणि पुढे त्याच्यामुळेच अमेरिकेला या यशाची चव चाखता आली.

तर सर्गई कोरेलियोव्ह हा सोव्हिएत रशियाच्या अंतराळ कार्यक्रमाचा सूत्रधार होता. एकेकाळी कोरेलियोव्ह याला देशद्रोहाच्या आरोपाखाली स्टॅलिनने छळ छावणीत टाकले होते. तिथे अतोनात छळ सोसत मरणपंथाला लागलेल्या कोरेलियोव्हला सुद्धा अमेरिकेला अंतराळ कार्यक्रमात पछाडता यावे या स्टॅलिनच्या महत्वाकांक्षेने जीवदान मिळाले आणि त्याची सुटका करून त्याला यासाठी जुंपण्यात आले.

ब्राऊन आणि कोरेलियोव्ह या दोघांनाही सर्वप्रथम लष्करासाठी रॉकेट विकसित करायचे होते. पण दोघांनाही सुरुवातीपासून अंतराळाचे वेध होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. पण दोन्ही देशांच्या लष्करी आणि मुलकी प्रशासनाने त्यांना वेड्यात काढले. पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग या दोघांनीही कधी सोडला नाही. उच्चपदस्थ लोकांनी निर्माण केलेल्या अडचणी, राजकारण, अपुरा निधी, विनाकारण निर्माण करण्यात आलेले प्रतिस्पर्धी, कामावर घेतल्या जाणाऱ्या शंका, वारंवार येणारे अपयश असा कर्मकठीण प्रवास करत या दोघांनी चिकाटी न सोडता प्रयत्न चालूच ठेवले आणि इतिहास रचला.

अमेरिका कधीच आपल्या अंतराळ कार्यक्रमाचा सूत्रधार फॉन ब्राऊन याला सार्वजनिक करण्यात कचरली नाही. त्यामुळे तो संपूर्ण जगाला माहित होता आणि अमेरिकेसाठी तर तो हिरो होता. पण सोव्हिएत रशियाने कधीच कोरेलियोव्हचे नाव उघड केले नाही. त्यामुळे त्याच्याविषयी जग काय तर खुद्द सोव्हिएत मध्येही कोणाला माहित नव्हते. त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्या योगदानाची माहिती सोव्हिएतने सर्व जगाला दिली आणि त्यानंतर त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लाखो रशियन जमा झाले.

अत्यंत विलक्षण अशी ही अंतराळ स्पर्धा वाचा अतुल कहाते यांनी लिहिलेल्या ‘अंतराळ स्पर्धा’ या पुस्तकात.

पुस्तकाचे नाव – अंतराळ स्पर्धा

लेखक – अतुल कहाते

पब्लिकेशन्स – मेहता पब्लिशिंग हाउस.

अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *