पहिले काश्मीर युद्ध आणि भारतीय हवाईदल

प्रस्तावना

०५ ऑगस्ट २०१९, जम्मू-कश्मीर च्या इतिहासातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस! तसा या राज्याच्या इतिहासात असे अनेक महत्वाचे दिवस खच्चून भरले आहेत, पण या दिवसाचे महत्व खचितच वेगळे. जम्मू-काश्मीरला वेगळी ओळख देणारे भारतीय संविधांनातील कलम ३७० भारत सरकारने हटवले आणि खर्‍या अर्थाने जम्मू-कश्मीरचे भारतात एकीकरण झाले. हे कलम ३७० आहे काय?काश्मीर समस्या काय आहे? यावर बरीच पुस्तके आज उपलब्ध आहेत. १९४७ मध्ये झालेल्या काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणावरदेखील बरेच लिखाण उपलब्ध आहे. भारत आणि पाकिस्तान १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यावर एकूण तीन संस्थांनांचे विलीनीकरण प्रलंबित होते. त्यापैकी जूनागढ आणि हैदराबादचे विलीनीकरण सैनिकी कारवाई द्वारे करण्यात आले. तिसरे संस्थान होते जम्मू-काश्मीरचे. या संस्थानचे महाराज हरिसिंग यांच्या स्वतंत्र काश्मीर च्या स्वप्नांना पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून सुरुंग लावला. पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले आणि काश्मीरच्या महाराजांची तोकडी सेना हे आक्रमण रोखण्यात असमर्थ ठरली. टोळीवाल्यांच्या आक्रमणाने जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला धोका निर्माण झाला आणि त्यानंतर भयभीत झालेल्या महाराज हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर लगेच भारताने आपली सेना काश्मीरच्या रक्षणार्थ पाठवली आणि पहिल्या काश्मीर युद्धाची सुरुवात झाली. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी युद्धात उतरलेल्या भारतीय सैन्याने ३१ डिसेंबर १९४८ च्या मध्यरात्रीपासून शस्त्रसंधी लागू होईपर्यंत पाकिस्तानी लष्कर आणि टोळीवाल्यांना काश्मीर खोर्‍याबाहेर हुसकावून लावले. दुर्दैवाने जम्मू-काश्मीरचा बराच मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यातच राहिला. हाच भाग आज पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.

काश्मीरच्या या पहिल्या युद्धात भारतीय सैन्याने अतुलनीय पराक्रमाचे प्रदर्शन घडवले. पण भारतीय हवाईदलाची कामगिरी मात्र तुलनेने दुर्लक्षितच राहिली. भारताच्या स्वातंत्र्य नंतरच्या पहिल्या आणि सर्वात जास्त काळ चाललेल्या (१ वर्ष ०२ महीने ०४ दिवस) या युद्धात भारतीय हवाईदलाने बजावलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मात्र फारसे लिखाण कधी झाले नाही. काश्मीरच्या पहिल्या युद्धात भारतीय हवाईदलाने बजावलेल्या या कामगिरीचा लेखाजोगा ‘An Incredible War : IAF in Kashmir War 1947-48 (Second Edition)’ या पुस्तकरूपात उपलब्ध आहे. या पुस्तकाचे लेखक Air Marshal Bharat Kumar PVSM AVSM (Retd) यांनी अत्यंत परिश्रमाने इतिहासाचे सर्वत्र विखुरलेले तुकडे आणि दस्तऐवज एकत्र आणून ४३० पानांच्या या पुस्तकात अगदी बाल्यावस्थेत असलेल्या आणि फाळणीमुळे (भारतीय सशस्त्र सेनांची पण विभागणी भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली होती.) तुलनेने क्षमता कमी झालेल्या भारतीय हवाईदलाचा भीमपराक्रम सूत्रबद्ध केला आहे. 

सशस्त्र दलांची फाळणी

भारतीय हवाईदलाच्या प्रत्यक्ष कामगिरीला स्पर्श करण्यापूर्वी लेखकाने १९४७ सालच्या भारतातील परिस्थितीचा ऊहापोह केला आहे. १९४७ साली झालेली भारताची फाळणी ही केवळ भूभागांची विभागणी नव्हती, तर लष्कर, नौदल आणि हवाईदलाची सुद्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागणी होणार होती. लॉर्ड माऊंटबैटन यांच्या देशाच्या विभागणीच्या योजनेअंतर्गत देशाच्या सशस्त्र दलांच्या विभागणीसाठी Armed Forces Reconstitution Committee (AFRC) बनवण्यात आली. सशस्त्र दलांच्या विभागणीची ही प्रक्रिया अत्यंत कीचकट होती. नवस्वतंत्र भारत आणि पाकिस्तान आपापल्या सेनेचे वेतन, कपडेलत्ते, राशन, युद्धसाहित्य इत्यादी गोष्टी सांभाळण्यात समर्थ होत नाहीत तोपर्यंत सेनेच्या विभागणीनंतरसुद्धा दोन्ही देशांच्या सेना एकाच नेतृत्वाखाली राहतील असे ठरवण्यात आले. फील्ड मार्शल जोन औचिनलेक हे दोन्ही देशांच्या सेनांचे सुप्रीम कमांडर बनले. सशस्त्र सेनांच्या विभागणीबाबत दोन्ही देशांच्या आपापल्या मागण्या होत्या आणि त्यामुळे एकमत होण्यास विलंब लागत होता. अखेर प्रदीर्घ चर्चा आणि विश्लेषणानंतर तिन्ही सेनादलांची विभागणी करण्यात आली. हा पूर्ण घटनाक्रम, प्रमुख व्यक्तींच्या या सर्व प्रक्रियेतील भूमिका व इतर गोष्टी अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने लेखकाने पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टर मध्ये मांडल्या आहेत. त्या मूळातून वाचण्यासारख्या आहेत.   

जम्मू-काश्मीरचा भारतात विलय

१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये महाराज हरिसिंग यांचे राज्य होते. त्यांना जम्मू-काश्मीरला भारत व पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशात विलीन करायचे नव्हते. त्यांना जम्मू-काश्मीरला एक स्वतंत्र देश म्हणून राज्य करायचे होते. काश्मीरला ‘आशियाचे स्वित्झर्लंड‘ बनवायचे त्यांचे स्वप्न होते.परंतू पाकिस्तानी लष्कर आणि टोळीवाल्यांनी २२ ऑक्टोबर १९४७ रोजीऑपरेशन गुलमर्ग’ या सांकेतिक नावाने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला आणि महाराजांच्या सेनेचा पराभव करत जोरदार मुसंडी मारली. या हल्लेखोरांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या नेतृत्वाखाली टोळीवाले, मुस्लिम लीगचे सदस्य आणि निवृत्त सैनिक यांचा समावेश होता. जम्मू-काश्मीरची राजधानी ‘श्रीनगर’ वर कब्जा करण्याचे त्यांचे उद्दीष्ट होते.

त्यांनी मारलेली जोरदार मुसंडी पाहता ते १६ ऑक्टोबर पर्यंत श्रीनगर वर कब्जा करतील अशी परिस्थिती होती. हे हल्लेखोर जेव्हा श्रीनगरपासून अवघ्या ५६ किमी अंतरावर असलेल्या बारामुल्लाला पोहोचले, तेव्हा मात्र श्रीनगरला असलेला धोका दुप्पट झाला. श्रीनगर आणि पर्यायाने पूर्ण जम्मू-काश्मीरचे राज्य गमावण्याच्या भितीने महाराजा हरिसिंग यांनी भारताकडे लष्करी मदत मागितली. तांत्रिकदृष्ट्या जम्मू-काश्मीर भारताचा भाग नसल्याने सर्वप्रथम महाराजांना भारतामध्ये विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी करणे गरजेचे होते. त्यानूसार महाराज हरिसिंग यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली आणि कायदेशीरपणे जम्मू-काश्मीर भारताचा एक अविभाज्य भाग बनला. काश्मीर भारतात विलीन झाल्यावर लगेच २७ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतीय हवाईदलाच्या डकोटा विमानाने १ सिख बटालियनला घेऊन पालम विमानतळावरून श्रीनगरसाठी उड्डाण केले. 

श्रीनगरचा विजय

इकडे श्रीनगरच्या अगदी जवळ बारामुल्लाला पोहोचलेले हल्लेखोर आपले मूळ उद्देश विसरून जाळपोळ, बलात्कार, लूटपाट यात मग्न झाले होते. आता श्रीनगर आपलेच! या भ्रमात असलेल्या या हल्लेखोरांना काश्मीर भारतात विलीन झाल्याची आणि भारतीय सेना श्रीनगरला पोचल्याची सुतराम कल्पना नव्हती. हल्लेखोरांची सुसाट वाटचाल मंदावण्यास दुसरे कारण म्हणजे महाराजांच्या शाही सेनेचे प्रमुख ब्रिगेडियर राजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शाही फौजेने उरी मध्ये हल्लेखोरांना केलेला तीव्र प्रतिकार! ब्रिगेडियर राजिंदर सिंग या लढाईत शहीद झाले मात्र त्यांच्या सेनेने माघार घेताना पेरलेल्या असंख्य अडथळ्यामुळे हल्लेखोरांची श्रीनगरच्या दिशेने चालू असलेली वाटचाल कमालीची मंदावली. या दोन महत्वपूर्ण घटनांमुळे श्रीनगर आणि पर्यायाने पूर्ण काश्मीर खोरे पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून कायमचे बचावले.

‘The Airlift that saved Srinagar and Kashmir Valley (भारतीय हवाईदलाचे एक उड्डाण ज्याने श्रीनगर आणि काश्मीर खोर्‍याला वाचवले’). लेखकाने अत्यंत अचूकपणे काश्मीरला वाचवण्यात भारतीय हवाईदलाच्या योगदानाचे वर्णन केले आहे. श्रीनगर विमानतळ हल्लेखोरांच्या ताब्यात गेला आहे की नाही याबाबत स्पष्ट माहिती नसतांनासुद्धा भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांनी धोका पत्करून भारतीय लष्कराच्या एका बटालियनला श्रीनगरला पोचवले आणि हाच काश्मीरच्या युद्धाला आणि एकंदर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक प्रसंग होता. पहिल्या तीन दिवसात भारतीय हवाईदलाने ९०० पेक्षा जास्त सैनिकांना शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्यासोबत काश्मीरला पोचवले. 

भारतीय हवाईदलासमोरील आव्हाने

लेखकाने पुस्तकाच्या दुसर्‍या चॅप्टरमध्ये भारतीय हवाईदलासमोर असलेल्या आव्हानांचा ऊहापोह केला आहे. त्याकाळी श्रीनगर विमानतळाची धावपट्टी केवळ छोट्या विमानांच्या उड्डाण आणि उतरण्यासाठी बनवण्यात आली होती. विमानतळावर मूलभूत संसाधन आणि सोईसुविधांचा अभाव असल्याने लष्करी विमानांच्या मोहिमांसाठी ते योग्य नव्हते. विमानांच्या उतरण्यास मदत करणारी कोणतीही दिशादर्शक (Navigation) उपकरणे तिथे नव्हती. कोणताही अपघात झाल्यास बचावाच्या कोणत्याही सुविधा तेथे नव्हत्या. विमानात इंधन भरण्यासाठी सुद्धा कोणतीही सुविधा नव्हती. विमानतळावरील धावपट्टी ही कच्च्या रस्त्याप्रमाणे असल्याने प्रत्येक वेळी विमान उतरल्यावर धुळीचा मोठा लोट निर्माण होई ज्यामुळे तेथील दृश्यमानता धोकादायकरीत्या कमी व्हायची. तेथे विमान वाहतूक नियंत्रण कक्ष (ATC) नव्हते. त्यामुळे वैमानिकांना विमान उतरवण्यासाठी पूर्णपणे स्वत:च्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागायचे. काश्मीर खोर्‍यातले कधीही बदलणारे हवामानसुद्धा वैमानिकांसाठी एक आव्हान होते. इतकी प्रचंड आव्हाने समोर असतांनाही भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन घडवले आणि सैन्य व इतर लष्करी साहित्याचा काश्मीरला पुरवठा सुरळीत चालू ठेवला. विशेष बाब म्हणजे खासगी विमान कंपन्यांनी सुद्धा आपली डकोटा विमाने या युद्धासाठी उपलब्ध करून दिली आणि नागरी वैमानिक भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांसोबत खांद्याला खांदा लावून काश्मीरमध्ये लढले.

काश्मीर खोर्‍यातील विजय

१  सिख बटालियन लेफ्टनंट कर्नल डी आर राय यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगरला उतरली आणि ताबडतोब त्यांनी बारामुल्लाच्या दिशेने कूच केले. तेथे जवळपास ५०० हल्लेखोर उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल राय यांनी शत्रूला उखडून टाकण्यासाठी हवाईदलाची मदत मागितली. हवाईदलाच्या स्पीट्फायर लढाऊ विमानांनी अंबालातून आणि हार्वर्ड विमानांनी श्रीनगर येथून उड्डाण केले आणि बारामुल्लामधे शत्रूवर तूफानी हल्ला चढवला. लढाऊ विमानांसोबतच मालवाहू डकोटा विमानांनी शत्रूची टेहेळणी करून शत्रूची मौल्यवान माहिती लष्कराला पुरवली ज्याचा प्रत्यक्ष लढाईत प्रचंड फायदा झाला. टेहेळणीसोबतच हवाईदलाच्या मालवाहू विमानांनी जरूरीचे सर्व साहित्य हवाई मार्गाद्वारे पोचवून जमिनीवर लष्कराची लढण्याची क्षमता वाढवण्यात मोलाची मदत केली. केवळ श्रीनगरच नाही तर बडगाम आणि शालतेंगच्या लढाईतही हवाईदलाने लष्कराच्या साथीने शत्रूचा धुव्वा उडवला. उरी वर पुन्हा ताबा मिळवून भारतीय सैन्याने कश्मीर खोरे हल्लेखोरांपासून मुक्त केले. या संपूर्ण लढाईचा थरार पुस्तकाच्या दुसर्‍या चॅप्टरमध्ये वर्णन केला आहे. 

गिलगिट आणि स्कार्डूची लढाई

पुस्तकाच्या तिसर्‍या चॅप्टरमध्ये गिलगिट आणि स्कार्डूच्या लढाईचा तपशीलवार उल्लेख केला आहे. श्रीनगरच्या उत्तरेला १५० मैल अंतरावर जगातील काही उंच पर्वतराजींमधे गिलगिट वसले आहे. सामरीकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेल्या गिलगिटच्या सीमा अफगाणिस्तान, रशिया आणि चीन ला खेटून होत्या. तर स्कार्डू हे एक छोटे ठिकाण  सिंधु नदीच्या एका छोट्या खोर्‍यात वसले आहे. या युद्धाचा मुख्य केंद्रबिंदू कश्मीर खोरे असल्याने सामरीकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेल्या गिलगिट आणि स्कार्डू भागाकडे तुलनेने दुर्लक्ष झाले. भारतीय सेनेचे प्रयत्न हे मुख्यत्वे काश्मीर खोर्‍याला वाचवण्यावर केंद्रित झाल्याने गिलगिट व स्कार्डूमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले. तथापि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधे सुद्धा लेफ्टनंट कर्नल थापा यांनी तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ स्कार्डूचा किल्ला लढवला. प्रबळ अशा शत्रूंनी चहूबाजूंनी वेढले असताना, धान्य व दारूगोळा अत्यंत मर्यादित असताना आणि कोणत्याही प्रकारची मदत मिळणे दुरापास्त असताना सुद्धा लेफ्टनंट कर्नल थापा यांनी आपल्या सैनिकांचे मनोधैर्य कायम ठेवत दीर्घकाळ शत्रूला कडवी झुंज दिली. परंतू भारतीय सेनादलांचे पहिले प्राधान्य काश्मीर खोरे असल्याने स्कार्डू आणि गिलगिट भारताच्या हातातून निसटले. कदाचित या दोन्ही ठिकाणांचे सामरिक महत्व लक्षात न आल्यानेच इथल्या लढाईला अपेक्षित बळ देता आले नसावे. इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भारतीय हवाईदलाचा या लढाईत परिणामकारक वापर का करण्यात आला नाही. तसे केले असते तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती. 

लडाख मधील घमासान

लडाख हा जम्मू-काश्मीर राज्याचा एक महत्वाचा भाग. हा भाग स्कार्डू आणि कारगिलपासून ते तिबेटपर्यंत आणि हिमालयीन पर्वतरांगांपासून ते काराकोरम पर्वतरांगांपर्यंत पसरला आहे. उंच पर्वतरांगा आणि नद्यांच्या खोर्‍यांनी व्यापलेला हा प्रदेश अत्यंत दुर्गम व खडतर असून लोकवस्ती सुद्धा विरळ आहे. सामरिकदृष्ट्या हा भाग अत्यंत महत्वाचा असून कारगिल हा भाग गिलगिटला द्रास आणि झोझीला मार्गे  श्रीनगरला जोडतो. पहिल्या काश्मीर युद्धात काश्मीरसोबतच लेह-लडाखवर सुद्धा पाकिस्तानची नजर होती. ‘ऑपरेशन स्लेज” या सांकेतिक नावाने पाकिस्तानने लेहवर हल्ल्याची तयारी केली होती. पाकिस्तानने स्कार्डूवर ताबा मिळवल्याने लेह वरचा धोका वाढला होता. अशातच लेहच्या संरक्षणासाठी महाराज हरिसिंग यांच्या जम्मू-काश्मीरच्या सेनेची केवळ एक पलटण (३३ सैनिक) तैनात होती. त्यामुळे लेहला (आणि पर्यायाने लडाखला) वाचवायचे असेल तर लवकरात लवकर लेहच्या मजबूतीकरणासाठी भारतीय सैन्याला मोठ्या संख्येने तेथे तैनात करणे गरजेचे होते. लेहची समुद्रसपाटीपासूनची ऊंची १०६८० फूट (३२५६ मीटर) आहे. त्यावेळी लेहमध्ये कोणत्याही प्रकारची धावपट्टी उपलब्ध नव्हती. तसेच भारतीय हवाईदलाकडे इतक्या उंचीवरून उड्डाण करण्याची क्षमता असलेली विमानेही नव्हती. त्यामुळे श्रीनगर येथील १६१ इन्फंट्री ब्रिगेडच्या ब्रिगेडियर सेन यांनी ०२ डोग्रा रेजिमेंटच्या सैनिकांना झोझीला मार्गे लेहकडे रवाना होण्याचा आदेश दिला. ऐन थंडीच्या दिवसातील झोझीलाच्या अत्यंत प्रतिकूल हवामानाला तोंड देत ही तुकडी लेहला पोचली. या तुकडीमध्ये ‘सोनम नारबू’ नावाचा एक तरूण लडाखी इंजीनियर होता ज्याने लेहला पोचल्यावर २२०० यार्डची धावपट्टी बनवली.

१० मे १९४८ रोजी टोळीवाल्यांनी कारगिलवर कब्जा केला. कारगिलचा पाडाव झाल्याने श्रीनगरसोबत असलेले दळणवळणाचे सारे मार्ग धोक्यात आले आणि लेह बाकी राज्यापासून एकाकी पडण्याचा धोका निर्माण झाला. अशा वेळी केवळ हवाई मार्गे सैन्य लेहला पाठवण्याचा एकमेव जलद मार्ग उपलब्ध होता. परंतू हवाईमार्ग वापरणे अत्यंत आव्हानात्मक होते. लेहला बनवलेली तात्पुरती धावपट्टी ही त्याकाळी जगातले सर्वात उंच विमानतळ होते. तेथे कोणत्याही दिशादर्शक सुविधा (Navigational Instruments) उपलब्ध नव्हत्या. लेहचे हवामान अत्यंत बेभरवशाचे आणि अचानक बदलणारे होते. आसपास उंच पर्वत असल्याने वैमानिकाकडे पहिल्याच प्रयत्नात विमान उतरवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. या विमानतळाच्या ऊंचीमुळे विमानांची इंजिने पूर्ण क्षमतेने काम करायची नाहीत. त्यामुळे वैमानिकला कमी साहित्यासह उड्डाण करावे लागे (कमी साहित्य म्हणजे कमी सैनिक आणि कमी लष्करी साहित्य). त्याकाळच्या डकोटा विमानांमधे दबावयुक्त केबिन (pressurized cabin), बर्फ साफ करणे (de-icing), दिशादर्शक उपकरणे इत्यादी सुविधा आणि वैमानिकांकडे अचूक नकाशेही उपलब्ध नव्हते. सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे डकोटा (MK-III) विमानांमध्ये ऑक्सिजन पुरवण्याची कोणतीही उपकरणे नव्हती. एवढ्या उंचीवरून विना ऑक्सिजन उड्डाण करणे धोकादायक होते. विमानांची उड्डाण करण्याची क्षमता १९५०० फूट पर्यंत होती पण तिथल्या पर्वतांची ऊंची त्यापेक्षा जास्त होती. आणीबाणीच्या स्थितीत विमान उतरवण्यासाठी आसपास कोणतेही विमानतळ नव्हते.

इतकी प्रतिकूल परिस्थिती असतानाही लेहला वाचवणे गरजेचे होते.  अशा वेळी भारतीय हवाईदलाचे जांबाज नेतृत्व पुढे आले आणि एयर कोमोडोर मेहेर सिंग यांनी स्वत: २४ मे १९४८ रोजी डकोटा विमान लेहमध्ये उतरवले आणि इतिहास रचला. विशेष बाब म्हणजे त्यांच्यासोबत या उड्डानामध्ये लष्कराचे मेजर जनरल थिमय्या सुद्धा होते. या मोहिमेच्या यशाने लेहसोबत एक हवाईपूल स्थापित झाला आणि सैन्य व इतर साहित्य लेहला पोचणे सुकर झाले. श्रीनगर प्रमाणेच हवाईदलाच्या या ऐतिहासिक उड्डानामुळे लेह शत्रूच्या ताब्यात जाण्यापासून बचावले होते. पुन्हा एकदा हवाईदलाने आपल्या अतुलनीय शौर्याने काश्मीरचा इतिहास आणि भूगोल (जो आज आहे) बदलण्यापासून वाचवला होता. पुरेसे सैन्य आल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय सैन्याने हल्लेखोरांना पिटाळून लावले. एयर कोमोडोर मेहेर सिंग यांची लेहमध्ये डकोटा उतरवण्याची मोहीम लडाखच्या लढाईत निर्णायक ठरली. एकप्रकारे लडाखचे ‘रक्षणकर्ता’ ठरलेल्या एयर कोमोडोर मेहेर सिंग यांचा पुतळा १९७० पासून लेहमध्ये दिमाखात उभा आहे. लेह-लडाखची थरारक लढाई लेखकाने पुस्तकाच्या चौथ्या चॅप्टर मध्ये सांगितली आहे. 

जम्मूची आघाडी

काश्मिर खोरे आणि लेह-लडाखसोबतच राज्याच्या पश्चिम आघाडीवरही युद्ध जोरात चालू होते. जम्मूच्या जवळ आंतरराष्ट्रीय सीमेवरील मीरपूर, कोटली, पूंछ, झांगर, नौशेरा, भिंबर आणि राजौरी या शहरांना सुद्धा हल्लेखोरांपासून धोका निर्माण झाला होता. या सर्व ठिकाणी महाराजांची शाही सेना तैनात होती. पण शत्रू त्यांच्यापेक्षा प्रबळ होता. याआधी सांगितल्याप्रमाणे भारतीय सेनेचे या आघाडीकडेही सुरूवातीला दुर्लक्ष झाले (कारण काश्मिर खोरे वाचवणे हे पहिले प्राधान्य होते). त्यामुळे शाही सेनेला स्वबळावरच लढावे लागले. भारतीय हवाईदलासाठी सुद्धा या क्षेत्रात कोणतीही मोहिम आखणे आव्हानात्मक होते. कारण आंतरराष्ट्रीय सीमा जवळ असल्याने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा भंग होण्याची दाट शक्यता होती. या सर्व शहरांना अन्न, शस्त्रे, दारूगोळा, वैद्यकीय उपकरणे इत्यादी रसद पुरवण्याची निकडीची गरज होती. हवाईदलाने या बाबतीत उत्तम कामगिरी बजावली आणि सुरुवातीच्या काळात शाही सेनेला लढण्यासाठी बळ पुरवले. हवाईदलाच्या मालवाहू विमानांसोबतच लढाऊ विमानांनी सुद्धा या सर्व ठिकाणी शत्रूचा धुव्वा उडवला. सुरूवातीला शत्रूने काही शहरांवर कब्जा केला असला तरी नंतर मात्र लष्कर आणि हवाईदलाच्या संयुक्त मोहिमांनी या शहरांना पुन्हा मुक्त केले.

एकूण जम्मूच्या या युद्धामध्ये अनेक मोहिमा जम्मूचा धोका कमी करण्यासाठी निर्णायक ठरल्या. मुख्यत्वाने उल्लेख करायचा झाल्यास नौशेराची लढाई, पूंछची लढाई यांचा करता येईल. नौशेराच्या लढाईमध्ये सर्वप्रथम भारतीय हवाईदलाने शत्रूंच्या ठिकाणांवर हल्ले करून त्यांना कमजोर केले आणि त्यानंतर लष्कराने उर्वरित मोहीम फत्ते केली. या लढाईत डकोटा मालवाहू विमानांनी  जवळपास ६११० किलोंची रसद पोचवून अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे पूंछमध्ये तब्बल ४०,००० हिंदू आणि शिख निर्वासित असल्याने तेथली परिस्थिती खूप नाजूक होती. हल्लेखोरांनी पूंछच्या दक्षिणेस असलेले मेंढर हे महत्वाचे ठिकाण जिंकून पूंछकडे कूच केले आणि पूंछला सर्वबाजूंनी वेढा घातला. पूंछचा बाकी जगाशी असलेला संपर्क तुटला आणि असलेला दारूगोळा व अन्य रसद अपूरी पडू लागली. हल्लेखोरांना तोंड देण्यासाठी पूंछला रसद पुरवठा करणे गरजेचे होते आणि त्यासाठी हवाईमार्ग हाच एकमेव उपाय होता.

सुरूवातीला हवाईदलाने तेथील सैन्य आणि निर्वासितांसाठी हवेतून पॅराशूट द्वारे रसद पुरवण्याचा प्रयत्न केला. परंतू तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे त्याला मर्यादित यश मिळाले. आता पूंछ मध्ये उतरण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. अखेर तेथील सेनेने निर्वासितांच्या मदतीने अवघ्या सहा दिवसात डकोटा विमानांना उतरता येईल अशी ६०० यार्ड ची तात्पुरती धावपट्टी बनवली. दिवसाला १० उड्डाणे हाताळण्याची या धावपट्टीची क्षमता होती. हल्लेखोर आसपासच्या टेकड्यांवर दबा धरून बसल्याने पूंछ मध्ये उतरणार्‍या विमानांना या हल्लेखोरांपासून गोळीबार होण्याचा धोका होता. परंतू पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये भारतीय वैमानिकांनी आपली कामगिरी उंचावली आणि धोक्यांना निडरपणे तोंड देत अहोरात्र पूंछला रसद पुरवली. पूर्ण पश्चिम आघाडीवर भारतीय हवाईदलाने शत्रूला मुक्तरान मिळणार नाही याची काळजी घेतली. पूंछ शत्रूच्या ताब्यात गेले असते तर लष्करी आणि राजकीयदृष्ट्या भयावह परिणाम झाले असते. पण हवाईदलाच्या शूर आणि निश्चयी जवानांनी  पूंछला भारताच्या हातातून निसटू दिले नाही. हा रोमांचकारी घटनाप्रसंग पुस्तकाच्या पाचव्या चॅप्टर मध्ये लेखकाने शब्दबद्ध केला आहे. 

युद्धाचे विश्लेषण

पुस्तकाच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये लेखकाने जम्मू-काश्मीरच्या पहिल्या युद्धाचे विश्लेषण केले आहे. भारतीय हवाईदलाने बजावलेल्या भूमिकेवर विशेषकरून प्रकाश टाकण्यात आला आहे. भारताला पाकिस्तानच्या या योजनेची पूर्वकल्पना मिळाली होती का? मिळाली असल्यास काय पावले उचलण्यात आली? युद्धाच्या दरम्यान कोणकोणते निर्णय घेण्यात आले? किती खासगी डकोटा विमाने या युद्धात वापरण्यात आली? काश्मिर युद्धात तैनात केलेल्या विमानांची संख्या पुरेशी होती का? की अजून विमाने तैनात करण्याची गरज होती? या युद्धात भारताची नेमकी योजना आणि व्यूहरचना काय होती? युद्धातले भारताचे प्राधान्यक्रम काय होते (काश्मिर खोरे, जम्मू की लडाख)? गिलगिटवरून लडाखला जाण्याचे प्रवेशद्वार असे सामरिक महत्व असलेल्या स्कार्डूला जरूरी रसद पुरवण्यासाठी भारतीय लष्कराने हवाईदलाकडे सातत्याने पाठपुरावा का नाही केला? पाकिस्तानी हवाईदलाची या पूर्ण युद्धात काय स्थिती होती? या आणि अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह इथे करण्यात आलाय. काश्मिरचे हे पहिले युद्ध हे लष्कर आणि हवाईदल याच्यातील समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. हवाईदलाने या युद्धात टेहेळणी मोहिमा, लष्कराला थेट मदत, मालवाहतूक, व्यूहरचनात्मक मोहिमा, शत्रूची दळणवळणाची साधने उध्वस्त करणे इत्यादी अनेक भूमिकांमधे भारतीय लष्कराला सहाय्य केले.

भारतीय हवाईदलाने या युद्धात १००० पाऊंडचे एकूण २४४ बॉम्ब, ५०० पाऊंडचे एकूण ११०० बॉम्ब, ५३३४ रॉकेट्स आणि २०एमएम च्या एकूण ४,५८,३१९ काडतूसांचा वापर केला. जानेवारी ते एप्रिल १९४८ या चार महिन्यात डकोटा विमानांनी वेगवेगळ्या ठिकाणी १.५ दशलक्ष किलोचा रसद पुरवठा केला. पूंछमधून १०,००० निर्वासित आणि १००० जखमी लोकांची सुटका केली. युद्ध संपेपर्यंत हेच प्रमाण दुपटीवर गेल्याचा अंदाज आहे. ‘ऑपरेशन गुलमर्ग’ (ज्याद्वारे पाकिस्तानने काश्मिरवर हल्ला केला) चा शिल्पकार पाकिस्तानी लष्कराच्या मेजर जनरल अकबर खान ने सुद्धा भारतीय हवाईदलाची प्रशंसा करताना म्हटले, ‘शत्रूची (भारतीय हवाईदलाची) विमाने सातत्याने आमच्यावर उडत होती. त्यांनी गाड्या, सैनिक, युद्धासाहित्य इत्यादी कोणालाही सोडले नाही. भारतीय लष्कराला हवाईदलाने उत्तम सहकार्य केले.’ खुद्द शत्रूलाही भारतीय हवाईदलाच्या पराक्रमाने अचंबित केले. या युद्धामध्ये हवाईदलाच्या चार वैमानिकांना महावीरचक्र, २९ जवानांना वीरचक्र आणि एकाला कीर्तीचक्र मिळाले. नवस्वातंत्र्य भारतीय हवाईदलाने या युद्धात एयर वाइस मार्शल मुखर्जी आणि एयर कोमोडोर मेहेर सिंग यांच्या कुशल नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. पहिले काश्मिर युद्ध हे म्हणूनच भारतीय हवाईदलाच्या इतिहासातील एक देदीप्यमान अध्याय आहे. हे सर्व तपशीलवार वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचलेच पाहिजे.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *