अश्विन सांघी यांनी लिहिलेले ‘चाणक्याचा मंत्र’

ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला यामध्ये काहीच रस नसल्याने चाणक्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही.

याच धनानंदने चाणक्यचे वडील चणक यांची हत्या केलेली असते आणि त्यामुळे चाणक्यला मगध मधून पळून जावे लागते. आपल्या वैयक्तिक सूड तसेच एकत्रित भारताच्या महत्त्वाकांक्षेमुळे चाणक्य आपले डावपेच खेळू लागतो. तो चंद्रगुप्तला लहानपणीच हेरतो, त्याला प्रशिक्षण देतो. मगधचा पाडाव करण्यासाठी इतर राजांशी संधान साधतो. योग्य/अयोग्य असे सर्व डावपेच खेळून तो धनानंदला मगधच्या सत्तेवरून खाली खेचतो आणि चंद्रगुप्त सम्राट बनतो.

'चाणक्याचा मंत्र'

वर्तमानकाळात कानपूर मधील पंडित गंगासागर मिश्रा राजकारणाचे असेच डावपेच खेळत असतात. आपली शिष्या चांदणीला भारताचा पंतप्रधान बनविणे हे त्यांचे ध्येय असते. त्यासाठी ते सुद्धा योग्य/अयोग्य असे सर्व प्रकारचे मार्ग चोखाळतात आणि चांदणीला पंतप्रधान बनवण्यात यश मिळवतात. स्वतः राजकारणातले कोणतेही पद धारण न करता ते सर्वांना आपल्या तालावर नाचवत राहतात.

चाणक्य यांच्या काळातला भारत आणि गंगासागर यांच्या काळातला भारत यामध्ये फारसा फरक नाही. दोन्ही काळांमध्ये भारतात भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, संकुचित मनोवृत्ती, जातीभेद इत्यादी प्रचंड प्रमाणावर असतात. पण चाणक्य आणि गंगासागर याच वाईट गोष्टींचा वापर करून सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न पाहतात. दोघांच्याही मते अंतिम ध्येय महत्त्वाचे मग त्यासाठी कोणताही मार्ग निवडावा लागला तरी चालेल.

चाणक्य यशस्वी झाले. गंगासागर पण यशस्वी होतील का? हे जाणण्यासाठी अश्विन सांघी यांनी लिहिलेले ‘चाणक्याचा मंत्र’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.

पुस्तकाचे नाव – ‘चाणक्याचा मंत्र’

लेखक – अश्विन सांघी

मराठी अनुवाद – उमा पत्की

पब्लिकेशन्स – साकेत प्रकाशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *