ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असलेल्या इस्रायलचे आपल्या शेजारी अरब राष्ट्रांशी कट्टर वैर होते. सर्व अरब राष्ट्रे एकत्र येऊनही इस्रायलचा पराभव करू शकले नव्हते. अशा परिस्थितीत एखादे अरब राष्ट्र अण्वस्त्रसज्ज होणे इस्रायलला अजिबात परवडणारे नव्हते. इस्रायल आकारमानाने इतके छोटे राष्ट्र होते की केवळ एक अणुबॉम्ब सुद्धा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता. त्यामुळेच इराकने ज्यावेळी अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या त्यावेळी इस्रायलने ‘ऑपरेशन ऑपेरा’ राबवून इराकची अणुभट्टीच उध्वस्त केली. याच ‘ऑपरेशन ऑपेरा’ची माहिती आज आपण घ्यायची आहे.
या एकूणच प्रकरणात मुख्य देश म्हणजे इराक, इस्रायल आणि फ्रान्स. इस्रायलच्या निर्मितीपासूनच त्याचे फ्रान्सशी चांगले संबंध होते. इस्रायलच्या शस्त्रास्त्रांची बहुतांशी गरज फ्रान्सच भागवत होता. याच फ्रेंच शस्त्रांच्या बळावर इस्रायलने १९६७ मध्ये अरबांचा ‘सहा दिवसांच्या’ युद्धात पराभव केला आणि नेमके त्यामुळेच इस्रायल आणि फ्रान्सचे बिनसले. इस्रायलला शस्त्र पुरवठा करताना फ्रान्सने ही शस्त्रे ‘अरबांविरुद्ध वापरू नका’ असा आदेश वजा सल्ला इस्रायलला दिला होता. पण इस्रायलने तो न मानल्यामुळे फ्रान्सने इस्रायलला होणारा शस्त्रपुरवठा पूर्णपणे थांबवला. यामध्ये लढाऊ विमाने, मिसाईल बोटी इत्यादींचा समावेश होता. यापैकी मिसाईल बोटी मोसादने ‘ऑपरेशन नोहाज आर्क’ राबवत फ्रान्समधून कशा पळवल्या हे आपण याआधी पाहिलेच आहे.
यादरम्यान १९७१-७२ मध्ये अरब राष्ट्रांनी पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन जाणीवपूर्वक घटवले. त्यामुळे जगभरात खनिज तेलांचे दर वाढले आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होऊ लागले. अशातच फ्रान्सची ऊर्जेची गरज ही मुख्यत्वे करून अणुऊर्जा आणि पेट्रोलियम पदार्थांवरच भागवली जायची. त्यामुळे अरब राष्ट्रांनी घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका फ्रान्सला बसू लागला. यातून मार्ग काढण्यासाठी फ्रेंच सरकारचे एक शिष्टमंडळ तेल संपन्न इराकच्या भेटीवर आले.
यादरम्यान झालेल्या वाटाघाटींमध्ये स्वस्त दरात इराककडून खनिज तेल मिळवण्याच्या बदल्यात फ्रान्सने इराक मध्ये एक अणुभट्टी बांधून देण्याचे आश्वासन दिले. जागतिक दबाव झुगारून फ्रान्सने इराक मध्ये अणुभट्टीच्या उभारणीच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. या अणुभट्टीतून इराकला तीन ते चार अणुबॉम्ब तयार करता येणे सहज शक्य होते.
इस्रायलसाठी नक्कीच ही धोक्याची घंटा होती. जागतिक पातळीवर इस्रायलच्या या चिंतेकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने आता मोसादने स्वतःच ही समस्या सोडवण्याचे ठरवले. मोसादने या दृष्टीने फ्रान्समधील आपले हेरगिरीचे जाळे कार्यान्वित केले. मोसादच्या हेरांनी बातमी आणली की ‘स्निम’ नावाची फ्रेंच कंपनी अणुभट्टीच्या मुख्य भागांची निर्मिती फ्रान्समध्येच करत आहे आणि हे सर्व सुटे भाग फ्रान्समधील तुलोन नावाच्या बंदरावरील एका गोदामात साठवून ठेवण्यात आले आहेत.
लवकरच मोसादचे तीन हेर तुलोन शहरात पोहोचले. तिथे त्यांनी त्या गोदामाची रेकी केली असता त्यांना तिथे फार विशेष सुरक्षा नसल्याचे दिसले. त्याचा फायदा उचलत त्यांनी तिथे आरडीएक्स ने बनवलेला बॉम्ब पेरला आणि दुसऱ्याच दिवशी ते गोदाम शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरले. या स्फोटामुळे अणुभट्टी निर्मितीची प्रक्रिया काही वर्षे लांबली असली तरी ती थांबली नव्हती. मोसादच्या या कृत्याने सतर्क झालेल्या फ्रेंच सरकारने अत्यंत गुप्तता बाळगत या अणुभट्टीचे सर्व सुटे भाग इराक मध्ये पोहोचवले आणि इराकची राजधानी बगदाद जवळ ‘ओसिराक’ अणुभट्टीची निर्मिती सुरू झाली.
इस्रायलची या सर्वांवर नजर होतीच. आता ओसिराक ही अणुभट्टीच नष्ट करण्याचे इस्रायलने ठरवले. पण त्यासाठी ओसिराक अणुभट्टी पर्यंत पोचून सुखरूप परतण्यास आवश्यक असा लांब पल्ला गाठण्यास सक्षम विमाने इस्त्रायली हवाई दलाजवळ नव्हती. पण हार न मानता उपलब्ध अशा F-४ फँटम विमानाद्वारे इस्त्रायलने सरावाला सुरुवात केली. यासाठी बगदाद मधील मोसादचे हेर सर्व माहिती इस्रायलला पाठवत होते. अशातच १९८० मध्ये इराक-इराण युद्ध सुरू झाल्याने ओसिराक अणुभट्टीचे काम तात्पुरते थांबले आणि इस्रायलचा हल्ल्याचा प्लॅन पुढे ढकलण्यात आला.
खरे तर हा हल्ला पुढे ढकलणे इस्रायलसाठी फायदेशीर ठरले. कारण १९८१ मध्ये अमेरिकेकडून आधुनिक अशी F-१६ लढाऊ विमाने इस्रायलला मिळाली होती. ही विमाने लांब पल्ला गाठून लक्ष उध्वस्त करण्यात सक्षम होती. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आता इस्रायली वायुदलाने पुन्हा सराव सुरू केला. इकडे ओसिराकचेही निर्माण पुन्हा सुरू झाले होते.
इस्रायलवरून बगदादला पोहोचण्यासाठी जॉर्डनला पार करावे लागणार होते. जॉर्डन इस्रायलचे शत्रू राष्ट्र असल्याने तो या बाबतीत इराकला सावध करण्याची शक्यता होती. ज्यामुळे इराकला इस्रायलच्या अशा हल्याची माहिती होऊन ते सतर्क व्हायची शक्यता होती. त्यामुळे इस्रायली विमानांनी जॉर्डनला टाळून त्याच्या दक्षिणेकडून सौदी अरेबिया वरून जाणारा लांब पल्ल्याचा मार्ग निवडला. एक तर सौदीकडे स्वतःचे असे सैन्य नव्हतेच. तसेच आता लांब पल्ल्याची F-१६ विमाने इस्रायलकडे होती. त्यामुळे सौदी अरेबियाला इस्त्रायली विमानांची ही घुसखोरी कळणे शक्यच नव्हते.
यानुसार ०७ जून १९८१ रोजी संध्याकाळी ३ वाजून ५५ मिनिटांनी इस्त्रायली विमानांनी उड्डाण केले आणि सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत संध्याकाळी जवळपास साडेपाच वाजता ही विमाने ओसिराक अणुभट्टीवर घोंगावू लागली. यानंतर अजिबात वेळ न दवडता त्यांनी अणुभट्टी वर हल्ला करून ओसिराकला पूर्णपणे उध्वस्त केले आणि सुखरूप ही सर्व विमाने इस्रायलला परत आली.
‘ऑपरेशन ऑपेरा’च्या यशाने सद्दाम हुसेनचे इराकला अण्वस्त्र संपन्न बनवण्याचे स्वप्न कायमचे भंगले.
पुस्तक विकत घेण्यासाठी इथे click करा: