ज्यूंचा कसाई आईकमानला पकडण्याचा थरार – ‘ऑपरेशन अत्तीला’

ती एक व्यक्ती दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंचे शिरकाण करण्याचे नियोजन करत होती. ज्यूंना डांबण्यासाठी पूर्ण नाझी व्याप्त प्रदेशात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या छळ छावण्या आणि त्यांचे व्यवस्थापन याची देखरेख ही एकटी व्यक्ती करायची…..म्हणूनच याला ज्यूंचा कसाई म्हणून ओळखले जायचे.  ती व्यक्ती म्हणजे नाझी सरकारच्या यहुदी विभागाचा प्रमुख असलेला अडोल्फ आईकमान. आईकमान हा गेस्टापोचा म्हणजेच नाझी गुप्त पोलीस दलाचा अधिकारी होता. नाझी व्याप्त प्रदेशातून लाखो ज्यू लोकांना पकडणे, त्यांना छळ छावणीत डांबणे, त्यांचे शिरकाण करणे इत्यादी सर्व गोष्टींवर स्वतः आईकमान देखरेख करत असे.

हा अडोल्फ आईकमान दुसरे महायुद्ध संपल्यावर मित्र राष्ट्रांच्या तावडीत न सापडता सहीसलामत जर्मनीतून निसटला आणि दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना या देशात ओळख बदलून राहू लागला. इकडे महायुद्धानंतर १९४८ मध्ये ज्यूंचे स्वतःचे असे इस्त्राईल हे राष्ट्र स्थापन झाले. या चिमुकल्या राष्ट्राने सुरुवातीपासूनच ज्यूंवर अत्याचार करणाऱ्या आणि युद्धानंतर सहीसलामत निसटलेल्या नाझी लोकांना पकडून शासन करण्याची मोहीमच हाती घेतली. यामध्ये अडोल्फ आईकमान हा तर मोसादच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा होता. मोसादला आईकमान हा अर्जेंटिनात राहत असल्याचे कसे कळाले? त्यांनी आईकमानची ओळख कशी पटवली? अडोल्फ आईकमानला गुपचूप पकडून अर्जेंटिना मधून इस्त्राईलमध्ये कसे आणण्यात आले? हे सर्व समजून घेणे अत्यंत थरारक आहे. अडोल्फ आईकमानला पकडण्यासाठी मोसादने आखलेल्या ‘ऑपरेशन अत्तीला’ बाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

नोव्हेंबर १९५७ मध्ये मोसादचे संचालक इसर हेरेल यांना ‘गोपनीय’ असा शिक्का असलेले पत्र मिळाले. जर्मनीतील इस्त्राईलच्या दूतावासाने पाठवलेले ते पत्र जर्मन सरकारी वकील फ्रित्झ बॉयर यांनी हेरेल यांना लिहिले होते. हे बॉयर कडवे नाझी विरोधक होते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीतून पळून गेलेल्या नाझी युद्ध गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम ते राबवत होते. त्यामुळेच त्यांनी लिहिलेल्या पत्रात अत्यंत महत्त्वाची खबर असणार हे निश्चित होते. पण बॉयर यांनी त्या पत्रात कोणतीही महत्त्वाची माहिती उघड केली नव्हती. पण त्या पत्राचे महत्व माहीत असल्याने हेरेल यांनी मोसादचा एक हेर ताबडतोब बॉयर यांची भेट घेण्यासाठी जर्मनीला पाठवला.

अडोल्फ आईकमान - ज्यूंचा कसाई आईकमानला पकडण्याचा थरार - 'ऑपरेशन अत्तीला'
अडोल्फ आईकमान (फोटो साभार – गूगल)

जर्मनी मध्ये त्या हेराला बॉयर यांनी आपल्याला अडोल्फ आईकमानचा पत्ता कळाल्याचे सांगितले.  पण याबाबत आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नसून आपल्याला ही बातमी लोथर हेरमान नावाच्या अर्जेंटिनात राहणाऱ्या एका आंधळ्या व्यक्तीने सांगितल्याचे त्यांनी सांगितले. मोसादसाठी हे अनपेक्षित होते. कारण युद्धानंतर बरीच वर्षे कसून शोध घेऊनही अडोल्फ आईकमान सापडला नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल आता मिळत असलेला हा धागा अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणूनच संदिग्धता असूनही मोसादने मिळालेल्या या माहितीची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार मोसादचा एक हेर अर्जेंटिनात पोहोचला आणि त्याने लोथर हेरमानाची भेट घेतली. पूर्वी जर्मन पोलीस खात्यात अधिकारी राहिलेला पण आता आंधळा असलेल्या हेरमानला अडोल्फ आईकमानचा पत्ता कसा कळला याबद्दल मोसादच्या त्या हेराला उत्सुकता होती. हेरामानने त्याला सांगितले की त्याच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा निकोलस आईकमान नावाचा एक मित्र आहे. निकोलसच्या आइकमान या आडनावामुळे हेरमानला संशय आला होता, कारण महायुद्धानंतर अडोल्फ आईकमान जर्मनीतून सुखरूप पळून गेल्याचे त्याला माहिती होते. अजून माहिती घेतली असता हेरमानला कळाले की निकोलसचे वडील पूर्वी जर्मन हेर खात्यात मोठे अधिकारी होते. त्यामुळे निकोलस हा अडोल्फ आईकमानचा मुलगा असल्याचा हेरमानचा संशय बळावला आणि त्यांने जर्मनी मध्ये बॉयरना हे सर्व कळवले.

मोसादच्या त्या हेराने तात्काळ ही माहिती इस्रायलला कळवली आणि तेथून अजून एक हेर त्याच्या मदतीला अर्जेंटिनाला पाठवायची विनंती केली. या दोन्ही हेरांनी निकोलसचा पाठलाग करून त्याचे घर शोधून काढले. तो अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनोस आयर्सच्या एका उपनगरामध्ये गॅरिबाल्डी स्ट्रीटवर राहत होता. काही दिवसांनी त्या दोघां हेरांपैकी एक हेर सेल्समन बनून अडोल्फ आईकमानच्या घरी गेला आणि सुटकेसमध्ये लपवलेल्या छोट्या कॅमेरा द्वारे त्याने आईकमानचे फोटो काढले आणि ते फोटो इस्रायलला पाठवून दिले. इस्त्राईलमध्ये तज्ञांद्वारे युद्धानंतर अठरा-एकोणीस वर्षानंतर अडोल्फ आईकमान कसा दिसत असेल त्याची रेखाचित्रे काढण्यात आली होती अर्जेंटिना मधून मोसादच्या हेराने पाठवलेल्या फोटोशी तंतोतंत जुळत होते. एवढे असूनही अजून खात्री करणे गरजेचे होते कारण अर्जेंटिनामध्ये अडोल्फ आईकमान हा रेकॉर्डो क्लेमेंट म्हणून राहत होता (जे त्या हेरांना त्या घराच्या वीजबिलावरून कळाले होते).

गॅरिबाल्डी स्ट्रीटवर आईकमान राहत असलेले घर - ज्यूंचा कसाई
गॅरिबाल्डी स्ट्रीटवर आईकमान राहत असलेले घर (फोटो साभार – गूगल)

तसेच इतर नाझी युद्ध गुन्हेगार प्रचंड संपत्ती घेऊन जर्मनीतून पळाले होते आणि ऐशो आरामात जगत होते. पण त्याच्याबरोबर उलट हा आईकमान मात्र एका मोटारीच्या कारखान्यात एक साधीशी नोकरी करत होता. त्यामुळे मोसाद बुचकळ्यात पडली होती. तसेच त्याकाळी इस्त्राईलचे अर्जेंटिनाशी कोणतेही राजकीय संबंध नव्हते. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी ती व्यक्ती अडोल्फ आईकमान असल्याची शंभर टक्के खात्री करून घेणे गरजेचे होते. त्यामुळे मोसादचे संचालक इसर हेरेल यांनी अडोल्फ आईकमानची जी माहिती मोसादपाशी उपलब्ध होती ती बारकाईने अभ्यासण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अडोल्फ आईकमानच लग्न वेरोनिका या ऑस्ट्रियन मुलीशी २१ मार्च १९३५ ला झाल्याची नोंद होती. ही वेरोनिका आणि तिची दोन्ही मुले काही वर्षानंतर अचानक गायब झाली होती.

या लग्न तारखेनुसार अडोल्फ आईकमानच्या लग्नाला २१ मार्च १९६० रोजी २५ वर्षे पूर्ण होणार होती. कोणाच्याही दांपत्य जीवनात पंचवीस वर्षे पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे ती व्यक्ती (रेकॉर्डो क्लेमेंट) जर खरोखरच अडोल्फ आईकमान असेल तर २१ मार्च १९६० या दिवशी आपल्या लग्नाचा २५वा वाढदिवस ती मोठ्याने साजरा करेल हे स्पष्ट होतं. २१ मार्च १९६० या दिवशी मोसादचे हेर अडोल्फ आईकमानच्या घरापाशी वेशांतर करून त्याची वाट पाहत होते. नेहमीप्रमाणे तो कामावरून परत आला त्यावेळी त्याच्या हातात फुलांचा गुच्छ होता, तो खुश दिसत होता तसेच त्याच्या घरात रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.  रेकॉर्डो क्लेमेंट हाच अडोल्फ आईकमान असल्याचे सिद्ध झाले होते.

अडोल्फ आईकमानची ओळख पटतात मोसादने ताबडतोब इस्त्राईलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांच्याशी चर्चा केली. आईकमानला तिथल्या तिथे गोळ्या घालण्याची गुरियन यांची इच्छा होती पण त्यांनी त्याला जिवंत पकडून इस्त्राईलमध्ये आणण्याचा आदेश दिला. अडोल्फ आईकमानच्या तोंडूनच त्यांने केलेली पापे बदलून घ्यायचा त्यांचा मनोदय होता. आईकमानला परक्या देशात जिवंतपणे पकडून तिथून इस्त्राईलमध्ये आणणे मोसादसाठी आव्हानात्मक होते. कारण अर्जेंटिना हा देश फार लांब होता. दोन्ही देशांमध्ये कोणतेही राजकीय संबंध नव्हते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुद्धा नव्हती.

डेव्हिड बेन गुरीयन
डेव्हिड बेन गुरीयन (फोटो साभार – गूगल)

त्याचे अपहरण करून समुद्रामार्गे आणण्यास फार वेळ गेला असता. तसेच त्यामध्ये पकडले जाण्याचा धोका सुद्धा होता. असे झाले असते तर इस्त्राईलची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असती. त्यामुळे ही मोहीम म्हणावी त्या वेगाने पुढे सरकत नव्हती. पण अनपेक्षित पणे अर्जेंटिनाच्या सरकारमुळेच ही समस्या सुटण्यास मदत झाली. २१ मे १९६० रोजी अर्जेंटिनाला स्वातंत्र्य मिळून १५० वर्षे पूर्ण होत होती. त्यासाठी तेथे एक भव्य स्वातंत्र्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी इस्रायललाही आमंत्रित करण्यात आले होते.

त्या सोहळ्यासाठी जाणाऱ्या इस्रायलच्या प्रतिनिधी मंडळासाठी एक विशेष विमान पाठवायचे ठरले आणि याच विमानातून अडोल्फ आईकमानला इस्त्रायला आणण्याची योजना आखण्यात आली. ही योजना तडीस नेण्यासाठी स्वतः मोसादचे संचालक इसर हेरेल हे अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स मध्ये बनावट नावाने दाखल झाले. योजनेनुसार मोसादचे हेर आईकमानला तो कामावरून रात्री परतताच त्याच्या घराजवळच अपहरण करून एका सुरक्षित घरात ठेवणार होते. त्यासाठी सुरुवातीपासूनच अर्जेंटिनात असलेल्या हेरांनी एक सुरक्षित घर आणि दोन कार भाड्याने घेऊन ठेवल्या होत्या. १९ मे १९६० ला इस्रायलचे विशेष विमान अर्जेंटिनात पोहोचणार होते.  त्यामुळे आईकमानचे ११ मे १९६० रोजी मोसादच्या हेरांनी त्याच्या घराजवळून अपहरण केले आणि त्याला सुरक्षित घरात आणून ठेवले.

२० मे १९६० रोजी इस्त्राईलचे विमान परत जाणार होते त्यामुळे त्याला विमानापर्यंत विनाअडथळा पोहोचवण्यासाठी मोसादने तयारी चालू केली. त्यांनी अडोल्फ आईकमानला वैमानिकाचा पोशाख चढवला आणि त्याला मादक द्रव्याचे एक इंजेक्शन दिले. त्यामुळे आईकमानची अवस्था नशेत असल्यासारखी झाली. त्याला त्याच अवस्थेत कारमध्ये बसवून ती कार विमानतळाकडे धावू लागली. विमानतळावरील फाटकाजवळ पहारेकरांनी चौकशी केली असता आईकमानने भरपूर दारू पिल्याची थाप ठोकण्यात आली. समारंभाचे वातावरण असल्याने ती थाप खपून गेली आणि त्यांची कार विमानाकडे सोडण्यात आली. लवकरच अडोल्फ आईकमानला घेऊन इस्त्राईलच्या विमानाने उड्डाण केले आणि ‘ऑपरेशन अत्तीला’ यशस्वी झाले. इस्त्राईलमध्ये अडोल्फ आईकमानवर खटला चालवण्यात आला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

आईकमान वार इस्रायलमध्ये चालू असलेला खटला
आईकमान वार इस्रायलमध्ये चालू असलेला खटला (फोटो साभार – गूगल)

संदर्भ –  पंकज कालू वाला यांनी लिहिलेले ‘इस्त्राईलची मोसाद’ हे पुस्तक. ‘ऑपरेशन अत्तीला’ची संपूर्ण कहाणी वाचण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *