नवी दिल्ली जवळील नोएडा मधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोड वर CISF च्या Addl Inspector General (AIG) च्या गाडीचा एका ट्रक सोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या AIG नी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘ट्यूपॅक II’ ला प्रारंभ केलाय आणि ही गोष्ट तत्काळ CISF च्या DG ना सांगायला सांगितली. गोंधळलेल्या त्यांच्या पत्नीने त्यांना ‘ट्यूपॅक II‘ विषयी अजून विचारले असता ते सांगण्याआधीच AIG चा मृत्यू झाला. काय होते हे ‘ट्यूपॅक II‘? एक सुगावा, धागादोरा, आरोप की नुसतीच असंबंद्ध बडबड? CISFचा एक उच्च अधिकारी मृत्यूपूर्वी काहीही विनाकारण बडबड तर नक्कीच करणार नाही. पण मग ते भारतात भविष्यात होणार्या एका दहशतवादी हल्याकडे इशारा करत होते का? आणि मग त्यांना या कटाची माहिती कशी मिळाली? मृत्यूपूर्वी उच्चारलेल्या या शब्दांवरून आयबी अधिकारी सिद्दार्थ राणा हे गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि मग समोर येतो दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट. ‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चे गूढ काय असते ज्याद्वारे दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला आहे एक भयानक कट. सत्य आणि कल्पना यांची बेमालूम गुंफण असलेला आणि देश-विदेशाच्या सीमा ओलांडणारा हा चित्तथरारक प्रवास ‘रेझोनान्स’ नावाची कादंबरी तुमच्यासमोर मांडते तेव्हा अगदी पहिल्यापासूनच ती वाचकांच्या मनाची पकड घेते. हि पकड पुस्तक वाचून झाल्यावरच संपते.
मुंबई वर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्याच्या वर्णनाने या कादंबरीची सुरुवात होते. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या ‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ च्या अंतर्गत ‘प्रोजेक्ट कराची‘ नुसार करण्यात आला होता. भारताचा विनाश करण्यासाठी आयएसआय च्या माध्यमातून हेरगिरी करून घातपाती कारवाया घडवून आणणे, भारत–नेपाळ, भारत–बांग्लादेश यांच्या सीमारेषांमधील कच्चे दुवे शोधून तिथे आपले तळ स्थापन करायचे आणि तिथून भारतविरोधी कारवाया करत राहायचे हा ‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चा मूळ उद्देश होता. त्यानूसारच भारतातील एक धरण उडवण्याची योजना आखण्यात आलेली असते. ते धरण उडवल्यामुळे प्रचंड हाहाकार होणार होता. लाखो लोक मृत्यूमुखी पडणार होते. मैलोगणती सुपीक जमीन कदाचित कायमची उजाड होणार होती. भारत सरकारला यातून सावरायला अब्जावधी डॉलर्स खर्च येण्याची शक्यता होती. एवढे करूनही सर्व काही पहिल्यासारखे व्यवस्थित होईल याची खात्री नव्हती. म्हणूनच पाकिस्तानला हे ऑपरेशन अत्यंत गुप्तपणे पुढे न्यायचे होते आणि यामध्ये त्यांना अल-कायदाचीही साथ मिळत होती.
‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ ची रंगीत तालीम घ्यायच्या उद्देशाने मुंबईवर हल्ला करण्यात आला होता. ‘ट्यूपॅक II’ च्या उभारणीत मोलाचा वाटा असणार्या आयएसआयच्या निवृत्त प्रमुख इम्रान शाह मलिकांना मात्र मुंबईवरचा हा हल्ला पसंत नव्हता. या हल्ल्यामुळे ‘ट्यूपॅक II‘च्या अमलबजावणीवरून आपले लक्ष्य भरकटेल आणि आपण जगाच्या नजरेत येऊ अशी त्यांना भीती होती. पण लष्कर-ए-तोएबा समोर त्यांचे काही एक चालले नाही. याच इम्रान शाह मलिक यांच्यावर काही दिवसांनी भरदिवसा गोळीबार करण्यात येतो पण त्यातून ते कसेबसे निसटून गायब होतात.
मुंबई वर हल्ला चालू असताना इकडे दिल्ली मध्ये एक मीटिंग चालू होती. त्यामध्ये CBI चे प्रमुख सुंदरम अय्यर, CISF चे ‘ते’ AIG, शस्त्रास्त्रांचा एक दलाल पराग नंदा आणि एक भारतीय इंजीनियर सोमशेखर राव हे शामील होते. हे सर्व पाकिस्तानला ‘ट्यूपॅक II’ च्या अमलबजावणीत गुप्तपणे मदत करत होते. देशाशी गद्दारी करणारे हे सर्व ‘ट्यूपॅक II’ ची अमलबजावणी कशी करावी यावर चर्चा करत होते. याच मीटिग मध्ये CISF च्या AIG नी जास्त पैशांची मागणी केली अन्यथा ‘माझ्यावर विसंबून राहू नका’ अशी धमकी दिली. त्यामुळेच काही दिवसांनी त्यांना नोएडा मधील गोल्फ रोड वर ठार मारण्यात आले.
मुंबईवरील हल्ल्यादरम्यान इम्रान शाह मलिकांचा मुलगा अबान त्याच्या मैत्रिणीला जुहीला फोन लावतो जी त्यावेळी ताज हॉटेल मध्ये अडकलेली असते. पाकिस्तानमधील लाहोर मधून आलेल्या या फोन मुळे मुंबई हल्याचा तपास करणार्या आयबी अधिकारी सिद्धार्थ राणाचे लक्ष वेधले जाते. तपासाअंती त्यांना अबान हा इम्रान शाह मलिकांचा मुलगा असल्याचे समजते. तसेच CISF च्या AIG नी मृत्यूपूर्वी उच्चारलेले ‘ट्यूपॅक II’ ही शब्दही सिद्दार्थ च्या मनात रुंजी घालत असतात. म्हणूनच इम्रान शाह मलिक आणि ‘ट्यूपॅक II’ चा काही ना काही संबंध असल्याचा त्याचा संशय बळावतो. अशातच इम्रान शाह मलिकांवर सतत पाळत ठेवणार्या IB च्या एका टीम ला एक अत्यंत महत्वाची माहिती मिळते. इम्रान शाह मलिकांवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा गायब होण्यापूर्वी ते आपल्या फोन वरून अबानला फोन लावतात आणि आपल्या लॅपटॉप मध्ये असलेल्या डाटा चा बॅकअप घेऊन अबानला अमेरिकेला जायला सांगतात. यावरून अबानकडे ‘ट्यूपॅक II‘शी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती आहे याची सिद्धार्थ राणाला जाणीव होते आणि मग त्याच्या विनंतीवरून FBI अमेरिकेत पोचताच अबानला अटक करते.
अबानला अटक केल्यावर त्याच्या लॅपटॉप मध्ये असलेल्या इम्रान शाह मलिकांच्या डाटा मधून एक महत्वाची फाइल मिळते. पण आयबी ची टीम प्रयत्नांची शर्थ करूनही ती फाइल उघडू शकत नाही. त्या फाइल मधील महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी अबानचे भारताला प्रत्यर्पण करण्यात येते पण पुरेशा पुराव्याअभावी भारतातील न्यायालयाकडून अबानला निर्दोष सोडले जाते आणि मग तो पाकिस्तानला परततो. हे सर्व IB ने अबान सोबत आखलेल्या योजनेनुसार होत असते. सर्वप्रथम आयबी त्याला सर्व सत्य सांगून त्याला मदत करायला राजी करते आणि त्याच्या मदतीने दहशतवाद्यांच्या कटासंबंधी माहिती मिळवण्याची योजना आखली जाते. कारण मुळात अबानलाही त्या फाइलला कसे उघडायचे हे माहित नसते. या योजनेनुसार अबान पाकिस्तानला परतल्यावर भारताला जाहीरपणे दूषणे द्यायला सुरुवात करतो. तसेच आपण जिहादसाठी काहिही करायला तयार असल्याचे घोषित करतो. त्याच्या या भूमिकेकडे लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आकर्षित होतो आणि त्याला भेटायला बोलावून घेतो. अबान इंजीनियर असल्याने हाफिज सईद त्याला ‘ट्यूपॅक II’ च्या कटाची पूर्ण माहिती न देता एखादे धरण उडवण्यासंबंधीच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करायला सांगतो. यावरूनच IB ला भारतात कोणतेतरी धरण उडवून द्यायची दहशतवाद्यांची योजना असल्याचे कळते पण पूर्ण तपशील त्यांना अजूनही माहित नसतो.
मूळात ही योजना काय असते? लाहोर मध्ये झालेल्या हल्ल्यामधून कसेबसे वाचल्यावर इम्रान शाह मलिक आपली प्लास्टिक सर्जरी करून घेतात आणि शालिम अमीर खान या नव्या नावाने ‘ट्यूपॅक II’ ची सूत्रे हाती घेतात. धरणाच्या जलाशयात खोलवर ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ आणि कोणताही आकार धारण करण्याची क्षमता असलेले सेम्प्टेक्स नावाचे विस्फोटक पॅलेस्टाईन वरून मिळवले जाते. हे विस्फोटक खोल पाण्यात पुरण्यासाठी प्रशिक्षित असे डायवर्स शोधले जातात तसेच त्यासाठी रशिया मधून खास अशा पाणबुड्या बनवून घेतल्या जातात. भारतातील उत्तराखंड राज्यातील टेहरी धरण हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. हे सर्व विनासायास घडून यावे यासाठी इम्रान शाह मलिकांनी जो चेहरा प्लास्टीक सर्जरीद्वारे धारण केलेला असतो तो टेहरी धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात CISF च्या मुख्य अधिकार्याचा असतो. त्याच्या सोबत सात जिहादी असतात ज्यांना हिंदू धर्म, हिंदू धर्मग्रंथ, हिंदू संस्कृती इत्यादींची इत्यंभूत माहिती देऊन तात्पुरते हिंदू बनवण्यात आलेले असते.
इम्रान शाह मलिक आणि त्याचे साथीदार धरणावर ताबा मिळवतात आणि आपल्या योजनेला मूर्त रूप द्यायला सुरुवात करतात. या सर्व योजनेसाठी अर्थपुरवठा करणार्या अल-कायदाच्या मनात मात्र एक वेगळाच बेत शिजत असतो. टेहरी धरणाच्या विध्वंसाने भारताचे अपरिमित नुकसान तर होणारच असते पण त्यासोबतच याच मुद्द्यावरून भारत-पाकिस्तान मध्ये अण्वस्त्र युद्ध भडकावून पाकिस्तानवर ताबा मिळवण्याचा अल-कायदाचा डाव असतो. त्यासाठी ते पाकिस्तानी हवाई-दल प्रमुखांना लाच देऊन आपल्या बाजूने करतात. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याची खोटी चित्रफीत बनवून ती माध्यमांच्या सहाय्याने प्रसारित करण्याची योजना बनवण्यात आलेली असते जेणेकरून पाकिस्तानी जनतेच्या दबावाखाली पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देईल आणि मग दोन्ही देशांमध्ये अणुयुद्धाचा भडका उडेल. अल-कायदाच्या या योजनेचा सुरूवातीला पाकिस्तानी सरकार, पाक लष्कर आणि आयएसआय यापैकी कोणालाही पत्ता नसतो.
भारतातील कोणत्या धरणावर आणि कधी हल्ला होणार आहे हे IB शोधून काढण्यात यशस्वी होते का? धरणाचा विध्वंस थांबवण्यात IB व इतर यंत्रणा यशस्वी होतात का? पाकिस्तानवर ताबा मिळवण्याचा अल-कायदाचा बेत तडीस जातो का?
निव्वळ अंधारात चाचपडायला लावणारे धागेदोरे घेऊन IB अधिकारी सिद्धार्थला एक लढा लढायचा आहे. भारताविरूद्ध एक भयंकर कट रचणार्या दहशतवाद्यांना प्रतिबंध घालण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. तो यात यशस्वी होतो का? हे जाणण्यासाठी हे पुस्तक एकदा नक्की वाचले पाहिजे.