‘ऑपरेशन थीफ’- मोसादने उधळला सिरियाचा शस्त्रसज्ज होण्याचा डाव

२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाइनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. अजून अधिकृतरित्या इस्रायलची स्थापना झालेली नसली तरी पॅलेस्टाइनच्या फाळणीमुळे अरब राष्ट्रे संतापली होती. आज ना उद्या इस्रायलची स्थापना झाल्यास शेजारची सर्व अरब राष्ट्रे मिळून इस्रायलवर हल्ला करणार याबद्दल ज्यू नेत्यांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. त्याकाळी पॅलेस्टाईन मध्ये राहत असलेल्या ज्यू लोकांकडे अरबांच्या तोडीस तोड शस्त्रास्त्रे नव्हती. त्यामुळे अरबांना तोंड देणे जवळपास अशक्य होते. अशा वेळी जर ज्यू लोकांचा लष्करी पराभव झाला तर स्वतंत्र ज्यू राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार नाहीच पण मध्यपूर्वेतील ज्यू प्रजेचे समूळ शिरकाण होणार ही सुद्धा काळया दगडावरची रेघ होती. त्यामुळेच इस्रायलची अधिकृत स्थापना होण्याआधी पुरेसा शस्त्रसाठा जमा करणे आवश्यक होते. ज्यू नेते डेव्हिड बेन गूरियन (जे स्वतंत्र इस्रायलचे पहिले पंतप्रधान बनले) यांनी शस्त्रास्त्रे जमवण्याची जबाबदारी त्यांचा एक विश्वासू सहकारी एहूद एवरियल याच्यावर सोपवली. त्याला युरोपात जाऊन शस्त्रास्त्रे खरेदी करून आणायची होती. 

'ऑपरेशन थीफ'- मोसादने उधळला सिरियाचा शस्त्रसज्ज होण्याचा डाव 
United Nations Partition Plan for Palestine - Wikipedia
ऑपरेशन थीफ’ – पॅलेस्टाइनची फाळणी (फोटो साभार – गूगल)

एवरियल त्यानुसार पॅरिसला येऊन पोचला. पण तो तिथे एकटाच पोचला नव्हता. ज्या विमानातून तो पॅरिसला पोचला, त्याच विमानात इस्रायलचा कट्टर शत्रू असलेल्या शेजारी देश सिरियाचा एक लष्करी अधिकारी कॅप्टन अब्दुल अझीझ हा पण होता. तोसुद्धा सिरियासाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी युरोपात चालला होता. या दोघांचे लक्ष्य एकच होते – झेकोस्लोवाकियाची राजधानी प्राग

कॅप्टन अझीझ पॅरिस मध्ये न उतरता थेट प्रागला निघून गेला. एवरीयल मात्र पॅरिसमधील एका हॉटेल मध्ये बनावट नावाने उतरला. तेथे त्याला पॅरिस मधील एक ज्यू उद्योगपती क्लिंगर भेटायला आला. त्याचे प्रागमधील एका मोठ्या शस्त्रास्त्र निर्मिती कंपनीतील उच्चपदस्थ लोकांशी लागेबांधे असतात. त्याद्वारे इस्रायलला हवी ती शस्त्रे मिळवून देण्याबाबत त्याला विश्वास असतो. पण अडचण एकच असते. ही कंपनी कुणाही व्यक्तिगत ग्राहकाला किंवा दलालाला शस्त्रे विकत नसते. ती केवळ सार्वभौम राष्ट्रांना थेट शस्त्रे विकत असे. सार्वभौम राष्ट्र म्हणून इस्रायलला अजून मान्यता मिळायची होती. त्यामुळे ही कंपनी थेट इस्रायलच्या नावाने शस्त्रे विकणे शक्य नव्हते.

त्यामुळे क्लिंगरने एक शक्कल लढवली. त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने एवरियलला आफ्रिकेतील इथियोपिया या देशाचा प्रतिनिधी म्हणून ओळख मिळवून दिली. या बनावट ओळखीनेच एवरियल प्रागला पोचला. इकडे सिरियाचा कॅप्टन अझीझने प्रागमधील या कंपनीत जाऊन सिरियासाठी शस्त्रांची मागणी नोंदवली आणि ती शस्त्रे सिरीयाला पाठवण्याच्या तयारीला लागला. इथिओपियाचा प्रतिनिधी बनून आलेला एवरियलनेही त्याच कंपनीत जाऊन शस्त्रास्त्रांचा खरेदी व्यवहार पार पाडला. क्लिंगरने बनवलेली कागदपत्रे इतकी अस्सल जमून आली होती की त्या कंपनीला एवरियलच्या मूळ हेतूचा काहीच थांगपत्ता लागला नाही. 

ऑपरेशन थीफ- एहूद एवरियल
Ehud Avriel - Wikipedia
ऑपरेशन थीफ- एहूद एवरियल (फोटो साभार – गूगल)

 एवरियल ही सर्व शस्त्रे युगोस्लावियामार्गे इस्रायलला पोचवणार होता. त्यासाठी त्याने ‘नोरा’ नावाचे जहाज भाड्याने घेतले आणि पुढील काही दिवस माल जहाजात भरला जाईपर्यंत तो रोज बंदरात येऊन थांबू लागला. असाच एके दिवशी तो बंदरातील कार्यालयात थांबला असताना तेथील एका कर्मचार्‍याने एवरियलच्या कानात येऊन सांगितले की आम्ही तुमच्यासाठी ‘लिनो’ नावाचे जहाज मिळवले असून त्यामध्ये तुमचा नंतर येणारा माल चढवला जाईल. मूळात एवरियलने खरेदी केलेली सर्व शस्त्रे याआधीच बंदरावर येऊन पोचलेली असल्याने हा ‘नंतर’ येणारा माल ‘कोणता’? आणि ‘कोणाचा’? हे प्रश्न त्याच्या मनात रूंजी घालू लागले. एवरियलने त्यानंतर जो तपास केला त्यातून सिरियाच्या शस्त्र खरेदीचे पितळ उघडे पडले. हि सर्व शस्त्रे सिरिया इस्रायलच्या विरूद्ध वापरणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य होते. त्यामुळे सिरियाची शस्त्रे घेऊन जाणारी नाव ‘लिनो’ समुद्रात बुडवण्याचे ठरवण्यात आले. या मोहिमेचे सांकेतिक नाव ठेवण्यात आले ‘ऑपरेशन थीफ’.

या मोहिमेची जबाबदारी इस्रायलची गुप्तहेर संस्था ‘शाई’चे (मोसादचे जुने नाव. मोसाद नावाने हि संस्था १९४८ मध्ये अस्तित्वात आली) प्रमुख शोउल एविगुर यांनी घेतली. ‘लिनो’ ही बोट कशी बुडवायची यावर ‘शाई’ मध्ये भरपूर विचारमंथन झाले. शेवटी या बोटीवर समुद्रात असताना हवाई हल्ला करावा असे ठरले. त्यानूसार शाईच्या हेरांनी इटलीमधून मालवाहतूक,पर्यटन व सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने तीन सी-४६ ही विमाने तीन दिवसांसाठी भाड्याने घेतली. पण खराब हवामानामुळे हवाई हल्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण यामुळे नाउमेद न होता एविगुरनी पेट्रोल बोटींतून ‘लिनो’चा पाठलाग करून त्यावर भर समुद्रात कमांडो हल्ला करायचे ठरवले. पण प्रत्यक्ष हल्ल्यासाठी निघायच्या आधी त्यांना संदेश मिळाला की इंजिन बिघडल्यामुळे ‘लिनो’ इटलीच्या मोल्फेता बंदरात आली असून दुरूस्ती होईपर्यंत ती तेथेच थांबेल.

ऑपरेशन थीफ - सी ४६ विमाने
कर्टिस सी-46 कमांडो इतिहास देखें अर्थ और सामग्री - hmoob.in
ऑपरेशन थीफ – सी ४६ विमाने (फोटो साभार – गूगल)

अशावेळी शाईने हे जहाज मोल्फेता बंदरात असतानाच स्फोटकांनी उडवून द्यायचे ठरवले. त्यानूसार शाई चे हेर आवश्यक त्या सर्व साहित्यासह बंदराजवळील लॉज मध्ये येऊन थांबले. ‘लिनो’ जास्तीत जास्त वेळ बंदरात थांबून राहावी यासाठी शाईने इटलीतील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत साम्यवाद्यांनी ‘लिनो’तून शस्त्रे मागवल्याची आवई उठवली. त्यामुळे इटालियन पोलिसांनी लिनोच्या चालकदलाला ताब्यात घेऊन जहाजाची चौकशी सुरू केली. पण याचवेळी अनपेक्षितपणे ब्रिटिश सरकार ‘लिनो’च्या सुटकेसाठी इटालियन सरकारवर दबाव टाकू लागले आणि त्यासाठी त्यांनी नौदलाची एक विनाशिका मोल्फेता बंदरात लिनोच्या शेजारी आणून उभी केली. या विनाशिकेमुळे ‘शाई’च्या गुप्तहेरांना आता प्रचंड सतर्कता बाळगत आपली मोहिम फत्ते करायची होती. शाईच्या हेरांनी ब्रिटिश विनाशिकेला चकवत लिनोच्या तळाशी टाइम बॉम्ब लावले. काही वेळातच लिनो वर प्रचंड स्फोट झाला आणि शस्त्रांनी भरलेले ते जहाज समुद्राच्या तळाशी जाऊन विसावले. 

‘ऑपरेशन थीफ’ इथेच संपले का?

नाही.

‘लिनो’ सोबत झालेल्या घातपाताने सिरियन सरकार हादरून गेले. पण सिरियन सैन्याच्या एका अधिकार्‍याने – कर्नल फाऊदने – लिनो सोबत बुडालेली शस्त्रे बाहेर काढण्यासाठी सिरियन सरकारकडे परवानगी मागितली. सिरियाच्या सरकारने इटलीच्या सरकारला सर्व वस्तुस्थिती सांगून त्या बुडालेल्या शस्त्रांवरचा सिरियाचा हक्क निश्चित केला. कर्नल फाऊद मोल्फेता बंदरात पोचला आणि त्याने त्या बुडालेल्या जहाजातून जवळपास ६००० रायफली एकदम सुस्थितीत बाहेर काढल्या. याचदरम्यान १५ मे १९४८ रोजी इस्रायलची स्थापना झाली आणि त्याचबरोबर सुरू झाले पहिले अरब-इस्रायल यूद्ध. सिरिया सुद्धा या युद्धात सामील असल्याने या ६००० रायफलींची त्यांना आत्यंतिक गरज होती. त्यामुळे कर्नल फाऊदलाही कोणत्याही परिस्थितीत या रायफली सिरियाला पोचवायच्या होत्या. पण काही केल्या त्याला यासाठी कोणतेही मालवाहू जहाज भाड्याने मिळेना.

ऑपरेशन थीफ - अरब-इस्रायल यूद्ध १९४८
Arab-Israeli wars | History, Conflict, Causes, Summary, & Facts | Britannica
ऑपरेशन थीफ – अरब-इस्रायल यूद्ध १९४८ (फोटो साभार – गूगल)

या सर्व परिस्थितीवर शाईच्या गुप्तहेरांची नजर होती. शाईने एक बनावट शिपिंग कंपनी स्थापून ‘आर्गीरो’ नावाचे एक निरुपयोगी व जराजर्जर जहाज कर्नल फाऊदला भाड्याने दिले. या जहाजावर शाईने कर्मचार्‍यांच्या रूपात आपले दोन हेरही ‘आर्गीरो’ जहाजावर चढवले होते. जहाजाला इटलीच्या किनार्‍यावरून सिरियाकडे रवाना करून कर्नल फाऊद विमानाने सिरियाकडे जायला निघाला. जहाज भर समुद्रात पोचल्यावर अचानक त्याची इंजिने बंद पडली. त्याचवेळी शाईचे आणखी दोन हेर छुपेपणाने बराच मोठा शस्त्रसाठा घेऊन इटालियन सरकारचे प्रतिनिधी बनून त्या जहाजावर चढले. काही वेळाने इस्रायलच्या दोन लढाऊ नौकांनी जहाजाला घेरले. जहाजावरील खलाशी आणि रायफली यांना दोन भागात विभागून इस्रायलला नेण्यात आले आणि ‘आर्गीरो’ जहाज स्फोटांनी उडवण्यात आले. 

ऑपरेशन थीफ यशस्वी झाले नसते तर पहिल्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायलचा पराभव निश्चित होता. पण इस्रायलच्या हेरांनी आपल्या जीवावर उदार होऊन हि मोहिम फत्ते केली आणि आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले.            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *