ऑपरेशन नोहाज आर्क – मोसादने फ्रान्समधून पळवल्या मिसाईल बोटी

कोणताही देश आपली सशस्त्र दले सुसज्ज ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लष्करी उपकरणे विकसित करण्याकडे लक्ष देतो. गरज पडल्यास अशा उपकरणांसाठी दुसऱ्या देशांसोबत करार सुद्धा केला जातो. असाच एक करार इस्रायल आणि फ्रान्समध्ये झाला होता. मिसाईल बोटींचा. पण फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांनी अचानक हा करार मोडला आणि इस्रायलला मिसाईल बोटी देण्यास नकार दिला. इस्रायलसाठी हा एक फार मोठा धक्का होता पण हार मानेल तो इस्रायल कसला ? मोसादने एक योजना आखून फ्रेंचांच्या नाकाखालून या मिसाईल बोटी पळवून इस्रायलला आणल्या. आज मोसादच्या त्याच मोहिमेची म्हणजेच ‘ऑपरेशन नोहाज आर्क’ याची माहिती आपण घ्यायची आहे.

ऑपरेशन नोहाज आर्क
मोसादचे बोधचिन्ह

आसपास अरब राष्ट्रांनी घेरलेला इस्रायल संरक्षणासाठी मुख्यता भूदल आणि हवाई दलावर जास्त अवलंबून होता. समुद्रमार्गे फारसा धोका नसल्याने नौदलाकडे तुलनेने दुर्लक्ष करण्यात येत होते. पण साठच्या दशकात इस्रायलकडे असलेली युद्ध सामग्री दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्याने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे होते. त्यामुळे नौदलाच्याही आधुनिकीकरणाच्या चर्चेने जोर पकडायला सुरुवात केली. सुरुवातीला क्षेपणास्त्र डागू शकणाऱ्या छोट्या बोटींचा विचार करायला इस्रायलच्या नौदलाने सुरुवात केली. पण त्यातली अव्यवहार्यता लक्षात आल्यावर इस्रायलने स्वतःच वेगळ्या बांधणीची व योग्य रचना असलेल्या नौकेचे आरेखन (Design) तयार केले. पण त्यानुसार या युद्धनौका बांधण्याची तांत्रिक क्षमता त्यावेळी इस्रायलपाशी नव्हती. अशा प्रकारच्या नौका बांधण्याची क्षमता त्यावेळी पश्चिम जर्मनीपाशी होती.

इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी याबाबत बोलणी करण्यासाठी आपल्या उपसंरक्षण मंत्र्यांना पश्चिम जर्मनीला पाठवले. हिटलरद्वारे ज्यूंच्यावर केल्या गेलेल्या अत्याचाराचे प्रायश्चित म्हणून पश्चिम जर्मनीने इस्रायलला मदत करण्याचे धोरण ठेवले होते. या धोरणानुसार पश्चिम जर्मनी मध्ये मिसाईल बोटींची बांधणी सुरू झाली. अरब राष्ट्रे नाराज होऊ नयेत म्हणून ही बाब मात्र गुप्त ठेवण्यात आली.

चार्ल्स द गॉल

१९६४ मध्ये तीन बोटी बांधून इस्रायलला पोहोचवण्यात पण आल्या. पण त्यानंतर मात्र माशी शिंकली. पश्चिम जर्मनीच्या एका  मंत्र्याने (जो नाझी पक्षाबाबत सहानुभूती बाळगणारा होता) न्यूयॉर्क टाइम्सला याबाबत माहिती दिली आणि पूर्ण जगाला याची माहिती मिळाली. पश्चिम जर्मनीला अरबांच्या संतापामुळे जहाजांची ही बांधणी थांबवावी लागली. पण या बोटींच्या बांधकामांची ब्ल्यू प्रिंट गुप्तपणे पश्चिम जर्मनीने फ्रान्सला दिली जेणेकरून इस्रायलच्या उर्वरित बोटींची बांधणी विनासायास चालू राहावी.

त्या अनुषंगाने इस्रायल आणि फ्रांस यांच्यामध्ये एक गुप्त करार पण करण्यात आला आणि त्यानुसार या बोटींची बांधणी आता फ्रान्समध्ये सुरू झाली. या प्रकल्पात फ्रेंचांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इस्रायली तंत्रज्ञ फ्रान्सच्या शेर्बुर्ग बंदरात दाखल झाले. हे सर्व तंत्रज्ञ फ्रेंचांच्या अंमलाखाली असलेल्या अल्जेरिया, ट्यूनिशिया इत्यादी देशात एकेकाळी राहिलेले ज्यू लोकच होते. त्यांना फ्रेंच भाषा आणि फ्रेंच संस्कृती यांची चांगली जाण होती. त्यामुळे ते फ्रान्समध्ये सहज मिसळून गेले आणि हा प्रकल्प गुप्तपणे तेथे चालू राहिला. या कामावर देखरेख करण्याचे काम इस्रायली नौदलाचे ब्रिगेडियर जनरल मोर्देशाही लिमोन करत होते.

फ्रान्स मधून दोन बोटी बनवून इस्रायलला पाठवण्यात आल्या. आता अजून सात बोटींची बांधणी व पुरवठा करणे बाकी होते. पण पुन्हा एकदा यामध्ये विघ्न आले. २६ डिसेंबर १९६८ रोजी इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनच्या बेरूत विमानतळावर कमांडो हल्ला करून तिथल्या १३ विमानांना नष्ट केले. खरे तर यामध्ये फ्रान्सचा दूरान्वयेही संबंध नव्हता. पण या घटनेचे निमित्त बनवून फ्रान्सचे अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांनी इस्रायलला शस्त्र पुरवठा करण्यावर निर्बंध आणले. यामध्ये नौदलाच्या या सात बोटींचा पण समावेश होता.

ऑपरेशन नोहाज आर्क
शेर्बुर्ग बंदरातील इस्रायलच्या मिसाईल बोटी

या सात बोटींवर इस्रायल पाणी सोडणे शक्यच नव्हते. या सर्वांमध्ये एकच दिलासादायक गोष्ट म्हणजे या निर्बंधानंतरही या बोटींची बांधणी चालूच होती आणि इस्रायली तंत्रज्ञही तिथेच होते. या बोटी फ्रान्समधून कशा मिळवायच्या यावर इस्रायलमध्ये बऱ्याच पर्यायांवर चर्चा झाली आणि अखेर तिथून गुपचूपपणे या बोटी आणण्याचे निश्चित करण्यात आले. याच मोहिमेला ‘ऑपरेशन नोहाज आर्क’ असे सांकेतिक नाव देण्यात आले. यानुसार इस्रायलची सर्वात मोठी शिपिंग कंपनी असलेल्या ‘मेरीटाइम फ्रुट’ कंपनीने लंडन येथे ‘स्टार बोट’ नावाची एक बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीवर नॉर्वेचे शिपिंग व्यवसायातील मोठे प्रस्थ असलेले ओले मार्टी सिल्म यांना संचालक म्हणून घेण्यात आले. सिल्म हे एक मोठे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्याने स्टार बोट कंपनीच्या बनावट असण्याविषयी कोणालाही शंका येणे अशक्य होते.

बोटींचा हा करार मोडल्यामुळे कायद्यानुसार फ्रांसला इस्रायलला नुकसान भरपाई द्यायची होती. ब्रिगेडियर लिमोन इस्रायलतर्फे फ्रेंच अधिकाऱ्यांसोबत याच नुकसान भरपाईबद्दल वाटाघाटी करत होते. ते जाणून बुजून यामध्ये दिरंगाईचे धोरण अवलंबत होते. एके दिवशी फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे नुकसान भरपाईचा एक खूप चांगला प्रस्ताव ठेवला असता लिमोन हे काही कारण सांगून तिथून पॅरिसला गेले. तेथे ते ओले मार्टी सिल्म यांना भेटले आणि त्यांना याची संपूर्ण माहिती दिली.

त्यानंतर ओले सिल्म तिथून निघून तडक फ्रेंच सरकारचे अधिकृत शस्त्र विक्रेते असलेले जनरल लुई बोंते यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपल्या स्टार बोट कंपनीसाठी काही तेलशोधक ड्रिलिंग बोटींची गरज असल्याचे सांगितले. खरे तर फ्रेंच सरकारला इस्रायलच्या उरलेल्या मिसाईल बोटी विकण्यासाठी एक तगडे गिऱ्हाईक हवेत होते. त्या बोटी विकून त्यातून मिळालेल्या पैशातूनच इस्रायलला नुकसान भरपाई देण्याचा फ्रेंच सरकारचा इरादा होता. फ्रेंच सरकारने ओले सिल्म यांच्यासोबत हा करार केला आणि १९६९च्या ख्रिसमसच्या काळात या बोटी शेर्बुर्ग बंदरातून बाहेर काढण्याचे निश्चित करण्यात आले.

या बोटी फ्रान्सने लंडनच्या स्टार बोट कंपनीला विकल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या शेर्बुर्ग बंदरातून इस्रायलच्या हायफा बंदरात जाणार होत्या. हा पल्ला लांबचा असल्याने या बोटी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित खलाशी लागणार होते. एवढे खलाशी एकदम फ्रान्समध्ये आले तर फ्रेंच गुप्तहेर संघटना सतर्क व्हायची शक्यता होती. त्यामुळे मोसादने या खलाशांना गटागटामध्ये पर्यटक म्हणून फ्रान्समध्ये घुसवण्याची योजना आखली. त्यानुसार सारे खलाशी पर्यटकांच्या वेशात हळूहळू शेर्बुर्ग मध्ये पोहोचले.

ऑपरेशन नोहाज आर्क
हायफा बंदर – ऑपरेशन नोहाज आर्क (फोटो साभार – गूगल)

इकडे मोसादने शेर्बुर्ग मध्ये आधीपासूनच असलेल्या इस्रायली तंत्रज्ञांच्या मदतीने या बोटींची नियमितपणे चाचणी घ्यायला सुरुवात केली. या चाचणीच्या निमित्ताने या बोटी रोज बंदराबाहेर नेल्या जात आणि पुन्हा व्यवस्थित बंदरात आणून उभ्या केल्या जात. ‘ऑपरेशन नोहाज आर्क’ नुसार या बोटी रात्री बंदरातून बाहेर काढायच्या असल्याने कालांतराने या बोटी रात्री देखील चाचणीच्या निमित्ताने बाहेर काढल्या जाऊ लागल्या. या गोष्टीची शेर्बुर्ग बंदरांच्या अधिकाऱ्यांना एकदम सवय झाली. त्यामुळे नंतर नंतर त्यांनी याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. तसेच रात्रीच्या वेळी बोटी सुरू केल्यानंतर होणाऱ्या इंजिनाच्या मोठ्या आवाजाची आसपासच्या नागरिकांनाही सवय झाली. त्यामुळे प्रत्यक्ष मोहिमेच्या दिवशी ज्यावेळी खरोखर या बोटी बंदरातून बाहेर काढल्या गेल्या त्यावेळी कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही.

एवढ्या लांबच्या प्रवासासाठी आवश्यक असे इंधन, खाण्यापिण्याचे पदार्थ इत्यादींची हळूहळू कोणालाही शंका येणार नाही अशा प्रकारे जमवाजमव करण्यात आली. भर समुद्रात इंधन भरता यावे याचीही तजवीज मोसादने केली. तसेच समुद्रात संरक्षणासाठी म्हणून इस्रायली नौदल तयार होते. मोसादने या मोहिमेची इतक्या बारकाईने आखणी केली होती की या प्रवासादरम्यान हवामानाचा अडथळा होऊ नये म्हणून हवामानाचा आगाऊ अंदाज वर्तवण्यासाठी चक्क एक हवामान तज्ञही शेर्बुर्गला पाठवण्यात आला होता.

इतकी सविस्तर आखणी केल्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेचा दिवस – २५ डिसेंबर उजाडला. शेर्बुर्ग मध्ये सर्व ख्रिसमसच्या जल्लोषात मग्न होते. सुरुवातीला थोड्या वादळी पावसाने अडथळा आणला असला तरी मध्यरात्री हवामान सामान्य झाले आणि या बोटींनी शेर्बुर्ग बंदर सोडले. बोटींच्या इंजिनाचा मोठा आवाज रात्रीच्या त्या शांततेला चिरत गेला. पण या आवाजाची आणि या बोटींच्या नियमित चाचण्यांची सर्वांना इतकी सवय झाली होती की कुणीही याकडे लक्षच दिले नाही. आपल्या नाकाखालून इस्रायलने या बोटी पळवल्याचा फ्रेंचांना पत्ताच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी बीबीसीचा एक वार्ताहर ज्यावेळी बंदरावर आला त्यावेळी त्याला तिथे या बोटी दिसल्या नाहीत. या वार्ताहरनेच फ्रेंच अधिकाऱ्यांना तसे सांगितले आणि त्याच वेळी त्यांना या घटनेचा पत्ता लागला. पण हताश होण्याशिवाय फ्रेंच काही करू शकले नाहीत.

०१ जानेवारी १९७० रोजी या सर्व बोटी इस्रायलच्या हायफा बंदरात सुखरूप पोहोचल्या आणि ‘ऑपरेशन नोहाज आर्क’ यशस्वीपणे पूर्णत्वास गेले.

संदर्भ – पंकज कालुवाला यांनी लिहिलेले ‘इस्रायलची मोसाद’ हे पुस्तक. हे पुस्तक विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *