ऑपरेशन पेनिसिलीन काय होते? जेव्हा कोणत्याही देशाला त्याच्या आसपास शत्रू राष्ट्रांनी घेरलेले असेल त्यावेळी आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्या राष्ट्राला नेहमी दक्ष रहावे लागते. अशीच अवस्था इस्रायलची होती. त्याच्या आसपासची अरब राष्ट्रे इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आकाशपाताळ एक करत होती. अशा वेळी अरब राष्ट्रांमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर मोसाद बारकाईने नजर ठेवून होती. अशातच सोविएत संघाने विकसित केलेले मिग-२१ हे लढाऊ विमान इराक सह इतर अरब राष्ट्रांच्या हवाई दलात दाखल झाल्याचे कळताच इस्रायली सरकार आणि इस्रायली हवाई दलात खळबळ उडाली.
त्याला कारणही तसेच होते. मिग-२१ हे त्या काळातील सर्वात आधुनिक लढाऊ विमानांपैकी एक होते. पण त्याच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल सोविएत संघाने कडक गुप्तता बाळगली होती. जर शत्रू दलाच्या महत्वाच्या हत्याराविषयी माहितीच नसेल तर त्या विरुद्ध उपाययोजना तरी कशा करणार? त्यामुळे मोसादने अरब राष्ट्रांमधून चक्क एक मिग-२१ लढाऊ विमानच पळवून आणण्याची योजना आखली आणि ती तडीसही नेली. त्याच ‘ऑपरेशन पेनिसिलीन ’ ची माहिती आज आपण पाहणार आहोत.
मिग-२१ हे विमान सोविएत संघाने विकसित केले होते. पण पोलादी पडद्याआड दडलेल्या सोविएत संघामध्ये घुसून मिग-२१ ची माहिती मिळवणे अशक्यप्राय होते. म्हणून मोसादने अरब राष्ट्रांवर आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने इजिप्तवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी मोसादने इजिप्तमधील आपल्या हेरगिरी जाळ्याला कार्यान्वित केले. १९५८ पासून मोसादचे हेरगिरी जाळे जॅक टॉमस याच्या नेतृत्वात कार्यरत होते. टॉमसला मोसादकडून इजिप्तचे मिग-२१ पळवण्याच्या योजनेवर काम करायचा आदेश दिला.
टॉमसने इजिप्तशियन वायूदलातील एक पायलट हना कार्लोस याला दहा लाख अमेरिकन डॉलर्स देण्याच्या बदल्यात मिग-२१ पळवून आणण्यास राजी केले. पण अचानक काय झाले कुणास ठावूक, पण कार्लोस रातोरात पलटला. त्याने हि बातमी आपली वरिष्ठांना दिली. त्यांनी ती बातमी इजिप्तशियन गुप्तचर विभागाला दिली. टॉमस पकडला गेला आणि त्याला फासावर लटकवण्यात आले. मिग-२१ पळवून आणण्याचा मोसादचा पहिला प्रयत्न फसला होता.
पण हार न मानता मोसादने आपले प्रयत्न चालूच ठेवले होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा इजिप्तशियन वायूदलातील एक पायलट कॅप्टन अब्बास हिलामी याला आपल्या बाजूला वळवले. हिलामी काही कारणाने नासेर सरकारवर नाराज होता आणि म्हणूनच तो इस्रायलला मदत करण्यास तयार झाला. पण कॅप्टन हिलामी याने मिग-२१ न पळवता त्याजागी दुसरेच एक विमान पळवून इस्रायलला नेले. मिग-२१ ची वात पाहणाऱ्या इस्रायली अधिकाऱ्यांची निराशा झाली. मोसादचा दुसरा प्रयत्नही फसला होता.
सलग दोन अपयशांमुळे मोसादाचा अरब राष्ट्रांमधील दबदबा थोडा कमी झाला होता. तसेच अरब राष्ट्रांमधील कोणताही पायलट आता मिग-२१ विमान पळवून इस्रायलला नेण्यास धजावणार नव्हता. पण हार मानेल ती मोसाद कसली! प्रयत्न चालूच होते. अशातच इस्रायलच्या पॅरिस मधील दूतावासात एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने मिग-२१ पळवण्याच्या संदर्भात दूतावासाला यूसुफ नावाच्या एक इराकी ज्यूचा फोन नंबर दिला व त्याच्याशी संपर्क करायला सांगितले. पॅरिस दूतावासाने याचा सविस्तर अहवाल ताबडतोब तेल अवीवला पाठवला. मोसादचे संचालक मीर एमीत वगळता सर्वांचा त्या अनोळखी व्यक्तीवर संशय होता. इराकच्या गुप्तचर खात्यानेच हा सापळा रचला आहे अशी इतरांची खात्री होती. पण मीर एमीत यांनी धोका पत्करत ही मोहीम पुढे न्यायचे ठरवले.
त्यानुसार इस्रायली सैन्यात Paratrooper म्हणून काम केलेल्या जोसेफ मन्सूर नावाच्या हेराला या कामासाठी नेमण्यात आले. मोसादचे लक्ष आता इजिप्त वरून इराक वर केंद्रित झाले होते. मन्सूर हॉस्पिटल्स ना लागणाऱ्या X-रे मशीनचा ब्रिटिश व्यापारी म्हणून इराकची राजधानी बगदादला गेला. यासाठी मन्सूरने निरनिराळी X-रे मशीन व त्यांची कार्यपद्धती याचे रीतसर प्रशिक्षणही घेतले. बगदादला आल्यावर मन्सूरने लगेचच युसुफला फोन न करता सुरुवातीला निरनिराळ्या हॉस्पिटल्सना भेट देऊन आपल्या कंपनीच्या x-रे मशीनची माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच त्याने इराक सरकारच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली.
आपले ब्रिटिश व्यापारी म्हणून इराक मध्ये व्यवस्थित बस्तान बसले आहे याची खात्री झाल्यावर मन्सूरने युसुफशी संपर्क साधला. युसुफची आणि त्याची दुसऱ्या दिवशी भेट झाली. युसुफ हा एक गरीब इराकी ज्यू होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला बगदादमधील एका श्रीमंत ख्रिश्चन कुटुंबात नोकर म्हणून काम करायला ठेवले होते. आयुष्यभर प्रामाणिकपणे त्या कुटुंबाची सेवा करता करता तो सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग झाला होता. त्या कुटुंबाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा सर्वात मोठा मुलगा मुनीर रद्फा हा इराकी वायूदलात Deputy Squadron Leader या पदावर कार्यरत होता. मुनीर ख्रिश्चन असला तरी एक देशभक्त इराकी होता.
याच सुमाराला इराक सरकारने अल्पसंख्य असलेल्या ख्रिश्चन समाजाला दडपायला सुरुवात केली होती. मुनीरचे कुटुंब श्रीमंत व प्रतिष्ठित असल्याने सुरुवातीला या दडपशाहीची झळ त्याच्या कुटुंबाला पोचली नव्हती. पण आज ना उद्या आपल्यावरही ही वेळ येणार हे मुनीर जाणून होता. इराकमध्ये आपल्याला भवितव्य नाही हे त्याला कळून चुकले होते. याच वेळी युसुफ इस्रायलला मदत करण्याविषयी मुनीरचे मन वळवायचा प्रयत्न करत होता. पण तरीही मिग-२१ विमान पळवण्यासारखे धाडस करण्याच्या मनस्थितीत मुनीर अजून तरी नव्हता.
मोसादने यावेळी बगदादमध्ये मोसादसाठी काम करणाऱ्या एका अमेरिकन महिला एजंटची मदत घेतली. त्या सुंदर आणि बुद्धिमान एजंटने मुनीरची ओळख करून घेतली आणि अल्पावधीतच मुनीर सुद्धा तिच्याकडे आकर्षित झाला. मित्रत्वाच्या नात्याने मुनीर तिच्याशी विविध विषयांवर सल्लामसलत करू लागला. काही दिवसांनी त्या महिला एजंटने मुनीरला युरोपच्या सहलीवर नेले आणि तेथे इस्रायलसाठी काम करण्यासाठी मुनीरचे मन अखेर वळवले. पैशासोबतच आपल्या भल्यामोठ्या कुटुंबाला सुखरूप इराकबाहेर काढावे ही त्याची प्रमुख मागणी होती. पण त्याच बरोबर मोसादला हे जमेल का अशी शंकाही त्याला होती.
आपल्या कार्यक्षमतेवर मुनीरचा विश्वास बसावा यासाठी मोसादने त्याला वेशभूषा बदलून इस्रायलला नेले. तेथे विमानतळावर स्वतः मोसादचे संचालक मीर एमीत आणि इस्रायली वायूसेनेचे प्रमुख त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मुनीर यामुळे भारावून गेला. त्याला मोसादला माहित असलेली इराकी वायूसेनेची सर्व माहिती दाखवण्यात आली. तसेच मुनीरच्या सर्व कुटुंबाला सुखरूप इराक बाहेर काढण्यात येईल याची खात्री देण्यात आली. या सर्वांमुळे मुनीर चांगलाच प्रभावित झाला. त्याचवेळी इराकमधून मिग-२१ कसे पळवून आणायचे यावरही प्राथमिक चर्चा झाली.
ही योजना तडीस नेण्यासाठी मुनीरला स्वतःची बदली बगदाद विमानतळावर करून घ्यायची होती. कारण मिग-२१ विमाने ही फक्त बगदाद विमानतळावरच तैनात होती. काही दिवसांनी मुनीरने आपली बदली बगदाद विमानतळावर झाल्याची बातमी देताच मोसादने ‘ऑपरेशन पेनिसिलीन ’च्या कामाला वेग दिला. मोसादचा हेर मन्सूरला मदत करणे, मुनीरच्या कुटुंबाला सुरक्षितपणे इराकबाहेर काढणे आणि एकूणच ‘ऑपरेशन पेनिसिलीन ’च्या यशासाठी मोसादने पाच टास्क फोर्सेसची स्थापना केली.
सोविएत संघ अरबांना मदत करत असला तरी त्याचे इस्रायलशी सुद्धा राजकीय संबंध होते. हे संबंध खराब करण्याची इस्रायलची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे मिग-२१ विमान पळवून आणण्यामध्ये इस्रायल तसेच मोसादचा हात उघड होऊ नये म्हणून मोसादने मुनीरने हे काम वैयक्तिक कारणामुळे केले आहे अशा आशयाचे मुनीरच्या बनावट सहीचे पत्र इंग्रजी साप्ताहिकांना पुरवण्याची तयारे केली. मोसादने अत्यंत बारकाईने या मोहिमेची आखणी केली होती हे खरेच !
१५ ऑगस्ट १९६६……सकाळी ७ वाजून तीस मिनिटांनी मुनीरने बगदादमधील विमानतळावरून मिग-२१ विमान घेऊन उड्डाण केले….परत कधीच न येण्यासाठी. बरोबर २० मिनिटांनी म्हणजेच ७ वाजून ५५ मिनिटांनी मुनीरचे मिग-२१ विमान इस्रायलमधील हझोर विमानतळावर सुखरूप उतरले. ‘ऑपरेशन पेनिसिलीन ’ यशस्वी झाले होते.
इस्रायली तंत्रज्ञांनी या विमानाचा एकदम कसून अभ्यास केला आणि या विमानाची इत्यंभूत वैशिष्ट्ये जाणून घेतली. या बळावरच इस्रायलने पुढे १९६७ मध्ये Six-Day War मध्ये अरबांची दाणादाण उडवली.
पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा