कालचक्राचे रक्षक – श्वास रोखून ठेवायला लावणारी कादंबरी

जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या अचानकपणे हत्या होत असतात. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरू अत्यंत सराईतपणे कोणताही मागमूस न ठेवता या नेत्यांच्या हत्या करत असतो. मुळात एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरी त्या नेत्यांपर्यंत पोहोचतोच कसा? हेच जगभरातल्या तपास संस्थांना समजत नसते. या सर्व हत्यांचा थेट संबंध भारतातील उत्तराखंड राज्यातल्या एक मिलेशियन लॅब नावाच्या एका कंपनीशी असतो. अतिशय कडक अशी सुरक्षा व्यवस्था भेदून कोणताही सुगावा मागे न ठेवणारे हत्येचे असे कोणते तंत्र मिलेशियन लॅबला माहित असते? आणि यामागचा त्यांचा नेमका हेतू काय असतो? या सर्वांचा बुद्ध साहित्यात वर्णन केलेल्या कालचक्राशी काय संबंध असते? या अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे अश्विन संघी यांच्या ‘कालचक्राचे रक्षक’ या खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकातून मिळतात.

कालचक्राचे रक्षक
कालचक्राचे रक्षक (फोटो साभार – गूगल)

कॅनडाचे पंतप्रधान जिन बेलांजर व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकन अध्यक्षांना भेटायला आले असताना अचानकच त्यांची तब्येत बिघडते. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना तातडीने इस्पितळात उपचारासाठी दाखल केले जाते. व्हाईट हाऊस मधील अत्यंत कडक अशी सुरक्षा व्यवस्था भेदून मारेकरी त्यांच्यावर हल्ला करण्यात यशस्वी होतो. कसे ते मात्र कोणालाच कळत नाही. बेलांजर यांची तब्येत बिघडण्याचा थेट संबंध विजय सुंदरम या आयआयटी दिल्लीच्या तरुण प्राध्यापकाशी असतो. विजय अनाथ असतो आणि त्याने आयआयटीमध्ये ‘क्वांटम बिहेवियर बियॉन्ड द क्वांटम’ नावाचा एक प्रबंध लिहिलेला असतो. याच क्षेत्रात काम करणाऱ्या ‘मिलेशियन लॅब’ नावाच्या एका कंपनीतर्फे त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. या कंपनीच्या काम करण्याविषयीच्या कडक अटींविषयी जाणल्यानंतर विजय सुरुवातीला तिथे काम करण्यास तयार नसतो. पण त्याला हे काम करण्यासाठी ‘आयजी – ४’ हा ग्रुप भाग पाडतो. काय असतो हा ‘आयजी – ४’ ग्रुप?

‘आयजी – ४’ या ग्रुप मध्ये अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयए, भारताची रॉ, चीनची गुप्तहेर संघटना एम एस एस आणि रशियाची गुप्तहेर संघटना एस व्ही आर यांचे प्रतिनिधी असतात. जगभरातील विविध ठिकाणी यांच्या गुप्त बैठका होत असतात. जगभरातील अनेक नेत्यांच्या होत असलेल्या गूढ मृत्यूविषयी तपासाचे काम अनौपचारिकरित्या हा ग्रुप करत असतो. ज्या नेत्यांचे मृत्यू झालेले असतात त्यांच्यातील समान धागा म्हणजे ते सर्व उदारमतवादी विचारांचे असतात आणि या हत्यामागे ‘मिनर्वा’ नावाच्या एका संस्थेचा हात असल्याचे संकेत त्यांना मिळतात. ही संस्था भारतातील उत्तराखंड येथे ‘मिलेशियन लॅब’ नावाची कंपनी चालवत असते. ‘प्युअर सायन्स’ मध्ये संशोधन करून त्यांचे पेटंट मिळवून पैसा कमावण्याचा उद्योग मिलेशियन लॅब करत असते.

कडक सुरक्षा व्यवस्था भेदून मिनर्वाने या नेत्यांच्या हत्या कशा केल्या हे जाणून घेण्यासाठी मिलेशियन लॅब मध्ये प्रवेश करणे गरजेचे असते. पण या लॅबचा एकूण अभेद्य असा परिसर आणि तिथली अत्यंत कडक अशी सुरक्षा व्यवस्था पाहता कोणत्याही व्यक्तीला तिथे हेर म्हणून घुसवणे ‘आयजी – ४’ साठी जवळपास अशक्य असते. म्हणूनच ते विजयला मिलेशियन लॅबमध्ये नोकरी करण्यासाठी भाग पाडतात. ते विजयच्या शरीरात एक चीप बसवतात ज्यामुळे त्याच्याविषयी ‘आयजी – ४’ला नेहमी माहिती मिळत राहील. तसेच मिलेशियन लॅबच्या तज्ञांना चुकवून ‘आयजी – ४’ शी सुरक्षित संपर्क कसा साधायचा हे पण त्याला शिकवण्यात येते.

कालचक्राचे रक्षक
क्वांटम फिजिक्स (फोटो साभार – गूगल)

विजय त्याच्या क्वांटम फिजिक्सचे संशोधन करण्यासाठी मिलेशियन लॅब मध्ये दाखल होतो. तेथे भरपूर सोयीसुविधा आणि कामाचे स्वातंत्र्य असले तरी सर्व शास्त्रज्ञांच्या वर नेहमी पाळत ठेवली जात असे. विजय शिवाय तेथे अजून नऊ शास्त्रज्ञ विविध विषयांवर संशोधन करत असतात. त्यापैकी मिखैलोव्ह नावाच्या रशियन शास्त्रज्ञाशी विजयची खास ओळख होते. मिखैलोव्ह रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा स्लीपर सेल म्हणून काम करत असतो. शास्त्रज्ञ असण्यासोबतच मिखैलोव्हने वेदांताचे शिक्षण घेतलेले असते. तसेच तो बौद्ध धर्मात सांगितलेल्या कालचक्राचाही अभ्यासक असतो.

मिखैलोव्ह हा ब्रम्हानंद नावाच्या एका गूढ साधूचा उपासक असतो. हे ब्रह्मानंद नेमके कोण? कुठून आले? कुठे राहतात? त्यांचे वय किती? इत्यादी बाबी कोणालाही माहीत नसतात. या ब्रह्मानंदांनीच मिखैलोव्हला कालचक्राची माहिती दिलेली असते. कालचक्राचे ज्ञान मिळवणारी व्यक्ती बोधिसत्व बनते. बोधिसत्व म्हणजेच स्वेच्छेने निर्वाण म्हणजेच पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळवण्याची शक्ती असलेली व्यक्ती. तसेच या कालचक्राच्या अभ्यासाने व्यक्तीचे अतिन्द्रीय ज्ञान वाढते. क्वांटम फिजिक्सच्या नियमानुसार या जगातील प्रत्येक गोष्टीचा परस्परांशी संबंध असतो. त्या एकमेकींच्या अविभाज्य भाग असतात. मग त्या एकमेकांपासून कितीही दूर का असेनात. हाच परस्पर संबंध जोडण्यासाठी कालचक्राच्या अभ्यासातून मिळालेले अतिद्रीय ज्ञान उपयोगी पडते.

खरे तर आधुनिक काळातील क्वांटम फिजिक्स मध्ये सांगण्यात आलेला हा परस्पर संबंध भारतीय ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच मांडलेला आहे. या अशा ज्ञानाचा वापर करूनच मिलेशियन लॅब मध्ये एक असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम चालू असते ज्याद्वारे जगभरातील व्यक्तींचे यमज शोधले जातील. वस्तूंप्रमाणेच क्वांटम फिजिक्स नुसार व्यक्तीसुद्धा परस्परांशी या अतिन्द्रीय ज्ञानाने जोडलेल्या असतात. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचा एक यमज असतोच. या यमजाला जर काही इजा केली तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीवरही होत असतात. याच यमजांना ठार मारून मिनर्वा जगभरातील महत्त्वांच्या नेत्यांची तिथे प्रत्यक्ष उपस्थित न राहता हत्या करत असते. या तंत्रज्ञानामुळे कोणतीही कडक सुरक्षा व्यवस्था भेदून कोणताही मागमूस न ठेवता अशा प्रकारे हत्या करणे मिनर्वाला शक्य होत असते.

कालचक्राचे रक्षक
व्हाईट हाऊस (फोटो साभार – गूगल)

विजय हा कॅनडाचे पंतप्रधान बेलांजर यांचा यमज असतो आणि म्हणूनच नोकरीच्या बहाण्याने विजयला मिलेशियन लॅब मध्ये बोलावण्यात आलेले असते. यातून त्याच्याद्वारे बेलांजर यांची हत्या करणे तसेच त्याच्या क्वांटम फिजिक्सच्या संशोधनाची लाभ घेणे हे दोन मुख्य हेतू मिलेशियन लॅबचे असतात. कालांतराने मिखैलोव्हच्या सांगण्यानुसार मिलेशियन लॅबच्या प्रमुखाच्या ऑफिसमध्ये घुसखोरी केल्यामुळे विजयला पकडून त्याच्यावर विषप्रयोग केला जातो. त्यामुळे विजयची तब्येत तर ढासळतेच पण त्याचबरोबर तिकडे दूर व्हाईट हाऊस मध्ये कॅनडाचे पंतप्रधान बेलांजर यांचीही तब्येत ढासळते. म्हणजेच प्रत्यक्ष व्हाईट हाऊस मध्ये उपस्थित न राहता मिनर्वा बेलांजर यांच्यावर विष प्रयोग करण्यात यशस्वी होते.

या सर्व उदारमतवादी लोकांना ठार करून मिनर्वाला जगभरात पुराणमतवादी लोकांचे वर्चस्व वाढवायचे असते. जेणेकरून जगात संघर्ष वाढेल. त्यामुळे इस्लाम जगातून नामशेष होईल (कारण याच दरम्यान जगभरात आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया पण वाढलेल्या असतात).

पण मिलेशियन लॅब कडे अजून असे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झालेले नसताना ते या सर्व नेत्यांच्या यमजाचा शोध कसा घेत असतात? त्यासाठी ते ब्रम्हानंद स्वामी यांची मदत घेत असतात. ब्रम्हानंद यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून जतन केलेले मौलिक साहित्य धार्मिक मूलतत्ववादामुळे नष्ट होते. त्यामुळेच कट्टर मुस्लिमवाद जगातून कमी करण्यासाठी जे काही शक्य आहे ते सर्व करण्याची ब्रह्मानंद यांनी प्रतिज्ञा केलेली असते. म्हणूनच आपल्या योग साधनेच्या बळावर ते मिलेशियन लॅबला या सर्व उदारमतवादी नेत्यांचे यमज शोधून काढायला मदत करत असतात.

या चित्तथरारक कादंबरीमध्ये धर्माच्या स्वतःवरच उलटण्याऱ्या संघर्षात परस्परांशी लढायला उभा ठाकलेल्या लोकांचे चित्रण केले आहे. रामाच्या लंकाप्रवेशापासून ते बौद्ध धर्माच्या जन्मापर्यंत; वहाबवादाच्या उगमापासून ते नालंदाच्या अंधारलेल्या अवशेषांपर्यंत ; कालचक्राच्या रक्षकाचा हा वेडावाकड्या वळणाचा प्रवास श्वास रोखून ठेवायला लावतो. विजय विषबाधेतून वाचतो का? ब्रम्हानंद नेमके असतात तरी कोण? IG-४ आपल्या उद्देशात यशस्वी होते का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासोबतच एक अनपेक्षित असा शेवट पाहण्यासाठी ही कादंबरी आवर्जून वाचलीच पाहिजे.

पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *