गोल्डा मायर – आयुष्यभर इस्राएलच्या कल्याणासाठी झटणारे एक अशांत वादळ

६ ऑक्टोबर १९७३ रोजी इजिप्तच्या नेतृत्वाखाली अरब राष्ट्रांनी इस्राएलवर हल्ला केला. ‘योम किप्पुर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात पहिले दोन दिवस अरबांनी चांगलीच मुसंडी मारत इस्राएलला मागे रेटले. अशा बिकट परिस्थितीत इस्राएलचे संरक्षणमंत्री व माजी सेनानी मोशे दायानही खचून गेले आणि त्यांनी राजीनामा देऊ केला. इस्राएल अशा संकटात असताना आणि दायान सारख्या निधड्या सेनानीनेही हार मानली असताना ‘तिने’ हार मानली नाही. आपल्या ताठ, गंभीर स्वभावाच्या आणि परिस्थितीवर मात करण्याच्या वृत्तीने ‘तिने’ स्वतःला सावरले. जिथे एक सेनानी ढेपाळला होता, तिथे ती उभी राहिली आणि तिने इस्राएलला एका जोरदार विजयाच्या दिशेने नेले. ती व्यक्ती म्हणजे इस्राएलची तत्कालीन पंतप्रधान ‘गोल्डा मायर‘. आपले वैयक्तिक आयुष्य पणाला लावून असंख्य वादळांना तोंड देत आयुष्यभर इस्राएल आणि जगातील समस्त ज्यू लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या गोल्डा मायर यांचे चरित्र लेखन वीणा गवाणकर यांनी त्यांच्या ‘गोल्डा – एक अशांत वादळ‘ या पुस्तकात केले आहे.

गोल्डा  -  एक अशांत वादळ
गोल्डा – एक अशांत वादळ

गोल्डा ही युक्रेनियन ज्यू. तिचे वडील सुतारकाम करायचे पण त्यांना त्यात म्हणावे तसे यश मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या काळी जगात असलेल्या परिपाठाप्रमाणे आपले नशीब आजमावण्यासाठी अमेरिकेचा रस्ता धरला. इकडे त्यांचे कुटुंब मात्र युक्रेन (रशिया) मध्येच राहिले. गोल्डाची मोठी बहिण शेयना झायानवादी चळवळीत सामील झाली. (मातृभूमीत म्हणजेच पॅलेस्टाइनमध्ये परत जाऊन तिथे वसाहती करण्याचे जगभरातील ज्यूंचे स्वप्न होते. जेरुसलेम मध्ये झायान नावाची टेकडी आहे. त्यावरून याला झायानवादी चळवळ असे नाव पडले). या चळवळीतील लोकांच्या बैठका बर्‍याचदा गोल्डाच्या घरात होत. तसेच झार विरोधी असल्याने ही चळवळ सतत पोलिसांच्या रडार वर असायची. या सर्व घडामोडींमुळे गोल्डाही आपसूकच या चळवळीकडे ओढली गेली. 

गोल्डाचे पूर्ण कुटुंब अमेरिकेत स्थलांतर झाल्यावर तेथील मोकळे आणि स्वतंत्र वातावरण पाहून ती भारावून गेली. शिक्षणासोबतच ती झायानवादी चळवळीत भाग घेऊ लागली, त्यांच्या बैठकींमध्ये आपली मते मांडू लागली. ज्यूंना स्वत:ची राष्ट्रभूमी हवी जिथे ज्यू स्वतंत्र, सुरक्षित आणि सार्वभौम असतील असे तिचे ठाम मत होऊ लागले. पॅलेस्टाइन मध्ये ज्यू राष्ट्र उभारणीच्या कार्यात अमेरिकन झायानवादी श्रमिक संघटना सक्रिय होती. संघटनेतर्फे व्याख्यान आयोजन, बैठका-चर्चा घडवून आणणे इत्यादी कामे केली जात. पहिल्या महायुद्धात जेव्हा पोलंडमध्ये ज्यू विरोधाने गंभीर रूप घेतले तेव्हा त्याचा विरोध करण्यासाठी मोर्च्याचे आयोजन करण्यात गोल्डाने पुढाकार घेतला होता. पण लवकरच तिच्या लक्षात आले की जर ज्यूंसाठी स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर अमेरिकेत काहीही करून फायदा नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष पॅलेस्टाइनलाच जावे लागेल. त्यानूसार गोल्डा आपला पती मॉरिससह १४ जुलै १९२१ रोजी तेल अविवला पोचली. 

पॅलेस्टाइन मध्ये त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते. त्यांनी दिलेल्या काही ठिकाणी ज्यू लोक वसाहती करून राहत होते. तसेच बरेच सधन ज्यू तेथील अरबांच्या जमिनी विकत घेऊन तेथेही ज्यूंच्या वसाहती वसवत होते. त्याकाळी ज्यूंचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तिथला निसर्ग. शेकडो वर्षे दुर्लक्षित, उपेक्षित, धूप झालेली जमीन, रखरखाट, दलदल, अनारोग्य, अस्वछता इत्यादी प्रचंड अशा समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या होत्या. हे सर्व बदलण्यासाठी तेथील ज्यू झपाटल्यासारखे काम करत होते. १९१७ मधील बाल्फोर जाहिरनाम्याद्वारे ब्रिटिश सरकारने ‘ज्यू लोकांची राष्ट्रभूमी पॅलेस्टाइनमध्ये असावी’ याला मान्यता दिली होती. त्यामुळे पॅलेस्टाइनमधील ज्यू लोक उत्साहित होते. 

Balfour Declaration - Wikipedia
बाल्फोऱ जाहिरनामा – १९१७

गोल्डा पॅलेस्टाइनमध्ये प्रथम मेरहावी नावाच्या वसाहतीत राहू लागली. या वसाहतीमधले जीवन फारसे सुखकर नव्हतेच. पण गोल्डाने आपल्या अंगभूत नेतृत्व गुणांमुळे तेथील व्यवस्थेत बरीच सुधारणा घडवून आणली. त्यामुळे ती तेथे बरीच लोकप्रिय झाली आणि लवकरच अशा वसाहतींसाठी धोरण ठरवणार्‍या मध्यवर्ती सुकाणू समितीवर तिची निवड झाली. गोल्डाची बोलण्याची धाटणी, प्रश्नांना भिडण्याची पद्धत, तरतरीत वृत्ती इत्यादी गुणांमुळे ती लवकरच झायानवादी आणि श्रमिक चळवळीत अत्यंत महत्वाची व्यक्ती बनली. 

गोल्डा इस्राइल निर्मितीसाठी झपाटलेली होती. ज्यू लोकांच्या स्वतंत्र भूमीसाठी त्यावेळी पॅलेस्टाइनमध्ये सर्व स्तरांवर प्रयत्न चालू होते. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यापासून ते मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पापर्यंत सर्व ठिकाणी ज्यू लोक स्वत: राबत होते. या सर्वांसाठी निधीची गरज होती. अशा वेळी गोल्डा पुढे आली. अमेरिकेत राहिल्यामुळे तेथील परिस्थितीची चांगली जाण असणारी गोल्डा अमेरिकेला गेली आणि केवळ नऊ महिन्यात प्रचंड असा निधी गोळा करूनच परतली. तिच्या या कामगिरीमुळे पॅलेस्टाइनमधील स्थानिक राजकारणात ती मजबूतीने प्रस्थापित झाली. पक्षाने सोपवलेली कोणतीही कामगिरी ती एकदम निष्ठेने आणि मेहनतीने पार पाडत असे. तिथल्या कामगार संघटना ‘हिस्ताद्रुत’ची सचिव असताना तिने पर्यटन, कामगार स्वास्थ सुविधा, कामगारांना निधी, बेरोजगारांना मदत, कामकारी मातांच्या संघटना इत्यादी अनेक सुधारणा घडवून आणल्या. दुसर्‍या महायुद्धावेळी हिटलरच्या अत्याचारामुळे स्थलांतर करून पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या ज्यू निर्वासितांच्या पुनर्वसनासाठीही ती दिवसरात्र झटत होती. 

बाल्फोर जाहीरनाम्याद्वारे  स्वतंत्र ज्यू राष्ट्र निर्मितीला मान्यता देणार्‍या ब्रिटिशांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान ज्यू स्थलांतरितांच्या संख्येवर आणि ज्यूंसाठी परदेशातून येणार्‍या निधीवर निर्बंध लादले. तसेच युद्धानंतर ब्रिटनमध्ये सत्तेवर आलेल्या अॅटली सरकारमधील परराष्ट्र सचिव अर्नेस्ट बेवीन इस्त्राईल निर्मितीसाठी अनुकूल नव्हते. अशा वेळी ब्रिटिशांविरोधात गोल्डाने ‘आता पर्याय नाही’ असे म्हणत रणशिंग फुंकले. महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन तिने ब्रिटिशांविरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. एकीकडे गोल्डा राजकीय मार्गाने इस्त्राईल निर्मितीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे काही ज्यू संघटना हिंसक मार्गाचा अवलंब करत होत्या. ब्रिटिशांनी गोल्डा व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख ज्यू नेत्यांना तुरुंगात टाकलेले असताना गोल्डा एकट्याने ब्रिटिश विरोधी चळवळीचे नेतृत्व करत होती. अखेर १४ मे १९४८ रोजी जगाच्या नकाशावर ‘इस्त्राईल’ या देशाचा जन्म झाला. इस्त्राईलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणार्‍या लोकांमध्ये गोल्डा मायर हि एकमेव स्त्री होती. 

History of the Israel Defense Forces - Wikiwand
इस्राइलचा जन्म

इस्त्राईलच्या निर्मितीनंतर जगभरातून निधी उभारण्याच्या बाबतीत गोल्डाने मोलाचे योगदान दिले. नवनिर्मित इस्त्राईलला मजबूतीने उभे राहण्यासाठी पैंशांची गरज होती. कारण शेजारची सर्व अरब राष्ट्रे या चिमुकल्या राष्ट्राचा घास घेण्यासाठी टपून बसली होती. स्वातंत्र्यानंतर गोल्डाने ‘श्रम व रोजगार’ मंत्रालय सांभाळताना रस्तेबांधणी, रुग्णालय उभारणी, वृक्षारोपण, गृहउभारणी इत्यादी क्षेत्रात भरपूर सुधारणा केल्या. श्रममंत्री म्हणून तिने एकूणच इस्त्राईलच्या कामगार, स्त्रिया, वृद्ध आणि अनाथांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. परराष्ट्रमंत्री म्हणून तिने इस्त्राईलची बाजू सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मजबूतपणे मांडली. पक्षाची प्रमुख म्हणून तिला जेष्ठ आणि तरूण यांच्यातील सुप्त युद्धालाही तोंड द्यावे लागले.पण तिने नेहमीच पक्ष आणि राष्ट्राच्या हितासाठी योग्य ते निर्णय घेतले. 

नोव्हेंबर १९६९ मध्ये गोल्डा इस्त्राईलची पंतप्रधान झाली. सिरिमाओ बंदरनायके (श्रीलंका) आणि इंदिरा गांधी (भारत) यांच्यानंतरची ती जगातील तिसरी महिला पंतप्रधान होती. इस्त्राईलच्या सीमा सुरक्षित राहाव्यात जेणेकरून ज्यूद्वेषापासून ज्यू लोक सुरक्षित राहावेत म्हणून इस्त्राईलची भूमी स्वतंत्र राखणे या प्रमुख उद्देशाने तिने सर्व बळ एकवटून पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. पंतप्रधान म्हणून तिने अनेक आव्हानात्मक प्रसंगामध्ये आपल्या खंबीरपणाचा परिचय दिला. १९६७च्या सहा दिवसांच्या युद्धातील जिंकलेल्या भूभागाबद्दल वाटाघाटी करणे, ज्यू स्थलांतरितांच्या समस्या, देशामधील अस्वस्थता आणि निदर्शने, पॅलेस्टाइन तर्फे होत असलेल्या अतिरेकी कारवाया, म्युनिक ऑलिंपिक मध्ये दहशतवाद्यांनी केलेली इस्त्राईलच्या खेळाडूंची हत्या आणि अखेर १९७३ मधील योम किप्पुरचे यूद्ध. प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तिच्यातील खंबीरपणा, चिकाटी इत्यादी गुण आणखी ठळकपणे समोर आले. 

Womens Day 2020: इजरायल की आयरण लेडी गोल्डा मेयर, जो 70 साल की उम्र में आज  ही के दिन बनी थीं देश की PM, जानें पूरा मामला
गोल्डा- एक अशांत वादळ

गोल्डा मायरने कधीही स्वत:ला ‘स्त्रीवादी’ म्हटले नाही. पण समस्त स्त्रीवाद्यांसाठी ती रोल मॉडेल होती. आसपास अरब शत्रू राष्ट्रांनी वेढलेला आणि वितभर असलेल्या इस्त्राईलला एक मजबूत आणि प्रगत राष्ट्र म्हणून जगात प्रस्थापित करण्यात गोल्डाने महत्वाची भूमिका बजावली. राष्ट्रप्रेमाने नित्य धगधगत असलेले गोल्डा मायर नावाचे हे अशांत वादळ ८ डिसेंबर १९७८ रोजी कायमचे शांत झाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *