गांधीजी आणि जिन्ना हे जवळपास ४० वर्षे भारतीय राजकारणात होते. या दरम्यान ते हजारो लोकांच्या संपर्कात आले. याच हजारो लोकांच्या साक्षी आणि आठवणींमधून प्रामुख्याने या दोघांचे जीवन चरित्र उलगडत जाते. गांधीजींचे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी चांगले संबंध असल्याने आज गांधीजींविषयी बरीच माहिती आणि लिखाण उपलब्ध आहे. जिन्ना मात्र थोडे आत्ममग्न स्वभावाचे असल्याने त्यांचे फारसे मित्र व सहकारी नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आज उपलब्ध नाही. जिन्ना यांच्याविषयी चांगले बोलणारे त्यांना ‘उत्कृष्ट वक्ता’, ‘उत्कृष्ट वादविवाद करणारे‘, ‘प्रभावशाली‘ मानायचे. तर त्यांचे टीकाकार त्यांना ‘स्वत:ला श्रेष्ठ मानणारा’, ‘भावनाशून्य’, ‘संकुचित दृष्टीकोण असणारा’, ‘अहंकारी’, संशयी’, ‘क्वचित हसणारे’ इत्यादी मानायचे. जिन्ना यांना भेटलेल्या बर्याच लोकांनी ते ‘एकाकी’ असल्याचे नमूद करून ठेवले आहे. गांधी VS जिन्ना च्या अंतिम भागात वाचा दोघांच्याही संपूर्ण राजकीय आयुष्याचे चरित्र विश्लेषण.
वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात बरेच चढ उतार येऊनही गांधीजींचा मृदु स्वभाव बदलला नाही. समाजातील सर्व थरातील लोकांसोबत ते ज्या सहजतेने मिसळायचे ते अद्भुत होते. गांधीजींच्या याच क्षमतेमुळे कॉंग्रेसचे ‘मध्यंवर्गीयांचा पक्ष’ हे स्वरूप बदलून तो जनसामान्यांचा पक्ष बनला आणि भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. गांधीजींवर टीका करणारे हे प्रामुख्याने त्यांच्यातील सातत्याच्या अभावावर टीका करतात. काही लोकांच्या मते कोणत्याही धोरणाच्या बाबतीत गांधीजींचा स्वभाव धरसोड प्रवृत्तीचा होता. कोणत्याही यशस्वी राजकीय वाटाघाटी करण्याची गांधीजींची क्षमता कमी आहे असे सुभाषचंद्र बोस यांचे मत होते.
असहकार आंदोलनाच्या स्वरूपावरून रवींद्रनाथ टागोर यांनी ‘Anarchy of mere emptiness’ म्हणून गांधीजींवर टीका केली होती. तसेच त्यांनी गांधीजींना ‘a dangerous form of egotism’ असेही म्हटले होते. ब्रिटिशही गांधीजींना व्यवस्थित समजून घेण्यास कमी पडले. ते गांधीजींना कधी ‘बोल्शेविक’ तर कधी ‘फॅसिस्ट’ समजायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे गांधीजींनी भारतात जनआंदोलनाची सुरुवात केली. त्यांनी ब्रिटिशांविरोधात संपूर्ण जनमानस ढवळून काढले. ते नेहमीच संवादाचे माध्यम खुले ठेवीत. आपल्या टीकाकारांसोबत सुद्धा ते चांगले वैयक्तिक संबंध ठेवीत. त्यामुळेच गांधीजींनी आपल्या सकारात्मकतेचा ठसा पूर्ण जगावर उमटवला आहे.
जिन्ना यांच्यावर इंग्रजी भाषेत फार कमी पुस्तके उपलब्ध आहेत. कारण परदेशी लेखकांना पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये कदाचित फारसे स्वारस्य नव्हते. परदेशी लेखकांच्या काही पुस्तकात जिन्ना यांच्या बाबतीत परखड आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणाचा अभाव दिसतो. काहींनी तर विनाकारण जिन्ना यांची स्तुतीपारायणे केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेता माजी परराष्ट्रमंत्री श्री जसवंत सिंग यांना तर पक्षातून काढून टाकण्यात आले होते कारण त्यांनी आपल्या एका पुस्तकात जिन्ना यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतली होती. जिन्ना यांच्या इस्लामी चरित्राविषयी अधिक अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानात ‘Jinnah Studies’ नावाचे साहित्य निर्माण करण्यात आले. परंतू तरीही जिन्ना यांच्या नेमक्या राजकीय आणि धार्मिक चारित्र्याविषयी संदिग्धता कायम राहिली.
चरित्रलेखन आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी गांधी हाच लेखकांचा आवडता विषय होता आणि आहे. त्यामुळे गांधीजींच्यावर हजारो पुस्तके उपलब्ध आहेत आणि ती सर्व त्यांच्याविषयी सकारात्मक पैलू समोर आणतात. गरीबी निर्मूलन, खेड्यांचा विकास, स्वच्छता, अस्पृश्यता निवारण इत्यादींचा समावेश असलेली गांधीजींची सामाजिक विकासाची भावना केवळ भारतच नाही तर जागतिक पातळीवर मान्य होणारी होती. प्रेम, शांतता, सद्भाव इत्यादी त्यांच्या तत्वांना कोठेही विरोध होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे गांधीजी खर्या अर्थाने जागतिक नेता म्हणून मान्यता पावले.
जिन्ना एक महत्वाकांक्षी नेते आणि यशस्वी वकील होते. त्यांनी एखादे सरकारी पद धारण केले असते तर नक्कीच ते ब्रिटिशांचे निष्ठावंत म्हणून नावारूपाला आले असते. तसेच त्यांना मुस्लिम समाजात मानाचे स्थान मिळवायचे असते तर त्यांनी एखाद्या प्रांतिक मुस्लिम पक्षाशी आघाडी केली असती. परंतू त्यांनी आपली बरीच वर्षे मुस्लिमांना राष्ट्रीय पातळीवर योग्य राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची घातली. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जिन्ना यांचे पहिले प्राधान्य हे नेहमी मुस्लिम समाजाची सुरक्षितता आणि प्रगती हेच राहिले. म्हणून ‘हिंदू कॉंग्रेस’ मुस्लिम समाजासाठी काही करणार नाही असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस कायमची सोडली.
जिन्ना यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला तीन टप्प्यांमध्ये विभागून पाहता येते. १९१३-१९३७ या पहिल्या टप्यात जिन्ना यांनी ब्रिटिशांविरोधात कॉंग्रेस सोबत मिळून आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘हिंदू-मुस्लिम’ एकतेचा पुरस्कार केला पण त्यामागे मुख्य कारण होते भारतातील हिंदू कॉंग्रेस नेत्यांना मुस्लिमांना समान अधिकार देण्यास भाग पाडणे. १९३७ नंतरच्या दुसर्या टप्यात कॉंग्रेस कडून भ्रमनिरास झालेल्या जिन्नांनी ब्रिटिशांना आपली निष्ठा आणि सहकार्य देऊ केले. त्यामागे ब्रिटिशांकडून मुस्लिम समाजासाठी चांगले काहीतरी मिळावे असा त्यांचा उद्देश होता. तर १९४७-४८ च्या तिसर्या टप्यात त्यांनी नवनिर्मित पाकिस्तानच्या भावी योजनांवर काम केले.
गांधीजींचा सामना करण्यासाठी ब्रिटिशांकडे कोणताही प्रभावी उपाय नव्हता. उच्च नैतिकता आणि प्रचंड असे जनतेचे पाठबळ लाभलेल्या गांधीजींना नामोहरम करण्याबाबत ब्रिटिश नेहमीच संभ्रमात राहिले. परंतू गांधीजींच्या राजकीय आंदोलनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहिले. ही आंदोलने गांधीजींच्या राजकीय उद्देशांच्या अनुरूप होती की अचानक ऐनवेळी ठरवलेले एखादे आंदोलन होते असेही विचारले जाऊ लागले. तसेच आपल्या अहिंसक आंदोलनावेळी झालेल्या हिंसेची जबाबदारी घेणे गांधीजी टाळत असत. एकप्रकारे ते अडचणींच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करायचे.
भारताच्या फाळणीचा संदर्भ न लावता गांधी आणि जिन्ना यांच्याविषयी लिहिणे अशक्य आहे. खरे तर भारताची झालेली फाळणी हे या दोघांचे राजकीय अपयश आहे. गांधीजींना कोणत्याही परिस्थितीत देशाची फाळणी नको होती. ती रोखण्यात ते अपयशी ठरले. तर जिन्नांनी ज्या मोठ्या पाकिस्तानची मागणी नेहमी केली होती, तो मिळवण्यात त्यांना अपयश आले. एक छोटासा देश पाकिस्तान म्हणून त्यांना स्वीकारावा लागला. गांधी आणि जिन्ना हे दोघेही आपापल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून नावाजले गेले.
जिन्ना यांच्याशिवाय पाकिस्तान प्रत्यक्षात येणे अशक्य होते कारण इतर प्रांतिक मुस्लिम नेत्यांना आपापल्या प्रांतातच रस होता. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राविषयी त्यांना काडीचाही रस नव्हता. त्याचप्रकारे भारताची स्वातंत्र्याची मागणी वास्तविकतेमध्ये उतरवण्यासाठी गांधीजींनी महत्वाचे योगदान दिले होते. ते दोघेही गुजराती व्यापारी परिवारातून आले होते, दोघेही लंडन मध्ये शिकून वकील झाले होते आणि दोघेही राष्ट्रवादी होते. पण दोघांचीही विचारसरणी एकमेकांपासून भिन्न होती. परंतू मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे दोघेही भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अत्यंत प्रभावशाली व्यक्ती होत्या हे नि: संशय!