डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ‘माझी आत्मकथा’

घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या बाबासाहेबांनी ‘माझी आत्मकथा’ या पुस्तकाद्वारे आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे.

अस्पृश्य समाजातील असल्याची हेटाळणी लहानपणापासून भोगणारे बाबासाहेब जिद्दीने शिकले. सुरुवातीला अध्यापन क्षेत्रात काम केल्यावर ते राजकारणात शिरले. कारण अस्पृश्य समाजासाठी काही करायचे असेल तर हाती सत्ता हवी हे त्यांनी जाणले होते. अस्पृश्य समाजाच्या विकासाच्या बाबतीत ते गांधीजींचे कठोर टीकाकार होते. काँग्रेस आणि गांधीजी यांनी अस्पृश्यांचे नाव ‘हरिजन’ करण्याव्यतिरिक्त त्यांच्यासाठी काही केलेले नाही असेही त्यांनी परखडपणे सांगितले होते. मुसलमान व इतर अल्पसंख्य समाजाला राजकीय सवलती देण्याच्या बाजूचे असलेले गांधीजी अस्पृश्यांना मात्र अशा सवलती देण्याच्या विरोधात का असा प्रश्न आंबेडकर उपस्थित करत त्यावेळी कोणाकडेही याचे समाधानकारक उत्तर नसे. यामुळे त्यांना नेहमी टीकेचा सामना करावा लागला.

आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी मंदिर सत्याग्रह केला. पण केवळ मंदिरात प्रवेश मिळाला म्हणून तुमची उन्नती होणार नाही असेही त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितले. प्रगतीसाठी तुम्ही सातत्याने संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे असेही ते आपल्या समाजाला सांगतात. लोकशाहीचे कट्टर समर्थक असलेले आंबेडकर लोकशाही सदृढ करण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पहिली आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब करा. दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाहीत व्यक्तीपूजेला अजिबात स्थान असता कामा नये आणि तिसरी म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारलेली सामाजिक लोकशाही हे लोकशाहीचे अंतिम ध्येय असले पाहिजे.

हजारो वर्षांपासूनच्या रुढीप्रिय समाजाला बदलणे आणि बहुसंख्याकांच्या धर्मातील चुका दाखवणे हे सोपे अजिबात नाही. पण आंबेडकरांनी हे धाडस केले. त्यांच्या या कार्याचा आढावा घेणारी त्यांची ही आत्मकथा नक्की वाचावी अशी.

पुस्तकाचे नाव – ‘माझी आत्मकथा’

लेखक – डॉ बाबासाहेब आंबेडकर

पब्लिकेशन्स – साकेत प्रकाशन .

डॉ बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *