“मला जो धोका पत्करावा लागणार आहे, याची मला जाणीव आहे. टी टी कृष्णम्माचारी हे एकदा मला म्हणाले होते की ‘दिल्लीच्या रस्त्यांवर वाघ दबा धरुन बसलेले असतात’. मला संभाव्य धोक्याची कल्पना आहे, पण भारताच्या कल्याणासाठी मी तो धोका पत्करण्यास तयार आहे.”
स्वतःला अपघाताने झालेला पंतप्रधान मानणाऱ्या डॉ मनमोहन सिंग यांचे हे आत्मविश्वासाने भरलेले उद्गार २००६ मधील आहेत. भारत – अमेरिका दरम्यान अणुकरार संबंधी ते १७ ऑगस्ट २००६ रोजी राज्यसभेत बोलत होते.
२२ मे २००४ रोजी अगदी अनपेक्षितपणे डॉ मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांनतर आपण ही भूमिका पार पाडण्यासाठी मनाने तयार नव्हतो अशी कबुली त्यांनी त्यांचे त्यावेळचे माध्यम सचिव संजय बारू यांच्याकडे दिली. याच संजय बारु यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकात मांडली आहे.
पण मनमोहन सिंग हेच सत्तेचे केंद्र होते का? त्याकाळी सोनिया गांधी यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सरकारला सल्ला देण्यासाठी ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’ हे ‘समांतर सरकार’ स्थापन केल्याचा आक्षेप घेतला जाई. स्वतः मनमोहन सिंग यांनी हा आरोप फेटाळला असला तरी हे पुस्तक हा आक्षेप खरा असल्याकडे इशारा करते.
हीच गोष्ट श्रेयवादाबद्दल! मनमोहन सरकार मधील ग्राम विकास मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांना मनरेगा योजनेचे श्रेय दिले गेले पाहिजे कारण या कामासाठी त्यांनी प्रचंड काम केले होते. पण याचे श्रेय गांधी परिवाराला देण्यात आले. मनमोहन सिंग काहीच बोलले नाहीत. तीच गोष्ट २००९ च्या लोकसभा निवडणुकांची. यामध्ये UPA ने दणदणीत विजय मिळवला. निःसंशय याचे श्रेय पंतप्रधान या नात्याने डॉ मनमोहन सिंग यांचे. पण याचे श्रेय चक्क राहुल गांधी यांना देण्यात आले. तरीही मनमोहन गप्प राहिले.
या पुस्तकात लेखकाने सरकारी कारभार, प्रसारमाध्यमांचा करण्यात येणार उपयोग, राजकारण्यांच्या चाली, राजधानी दिल्ली मधील अनेक छोट्या मोठ्या रंजक घडामोडी तसेच मनमोहन यांनी घेतलेल्या विविध महत्त्वाच्या निर्णयांचा पट वाचकांसमोर उलगडला आहे.
राष्ट्रीय सल्लागार समितीचा सरकारी कारभारात प्रचंड हस्तक्षेप असूनही अमेरिकेसोबत अणुकरार करतेवेळी मनमोहन यांनी खंबीर भूमिका घेतली. प्रसंगी आपले सरकार पणाला लावले. पण देशाच्या कल्याणासाठी हा करार पूर्णत्वाला नेऊन आपणच ‘सिंग इज किंग’ असल्याचे दाखवून दिले. मात्र स्वतः निष्कलंक असूनही आपल्या सहकारी मंत्र्यांवर वचक न ठेवल्याने मनमोहन सिंग यांची पहिल्या कार्यकाळातील चांगली प्रतिमा दुसऱ्या कार्यकाळात मात्र प्रचंड काळवंडली. हे सर्व पुस्तकात वाचणे रोमांचक आहे.
या पुस्तकावर आधारित आलेला चित्रपट अत्यंत रटाळवाना असला तरी हे उत्कंठावर्धक पुस्तक मात्र आवर्जून वाचावे असे.
पुस्तकाचे नाव – द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर
मूळ लेखक – संजय बारू
अनुवाद – लीना सोहनी
पब्लिकेशन्स – मेहता पब्लिशिंग हाऊस.