१९१६ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान इंग्लंडला ‘ॲसिटोन’ नावाच्या रसायनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत होती. बंदुकीच्या गोळ्या तसेच इतर दारुगोळ्यामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. फ्रान्स विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी इंग्लंडला ३०००० टन ॲसिटोन ची गरज होती. त्यावेळी ब्रिटिश लष्कराशी संबंधित विभागात काम करणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांनी ही गोष्ट रसायनशास्त्रज्ञ आणि झियोनिस्ट विचारसरणी (ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असावे ही विचारसरणी) चे कट्टर समर्थक हाईम वाईझमन यांना सांगितली. वाईझमन यांनी ॲसिटोन तयार करण्याची एक सोपी पद्धत शोधून काढली. त्यामुळे ब्रिटिशांच्या मनात वाईझमन यांच्याविषयी अनुकूल मत निर्माण झाले. याच घटनेचा वापर करून घेऊन वाईझमन यांनी ज्यू राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले.
ब्रिटिशांनी सुद्धा ज्यू लोकांच्या चळवळीला फारसा कडवा विरोध न करता अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या निर्मितीसाठी हातभार लावला. पण त्यातूनच इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घ अशा रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली. त्याचाच लेखाजोगा श्री अतुल कहाते यांनी ‘पॅलेस्टाइन इस्रायल एका अस्तित्वाचा संघर्ष’ या पुस्तकात मांडला आहे.
अरब आणि ज्यू लोकांच्या इतिहासाचा लेखकाने या पुस्तकात सविस्तर आढावा घेतला आहे. इ.स १९०० नंतर ज्यू लोक पॅलेस्टाईन मध्ये येऊन राहू लागले. तेथील अरबांकडून जमिनी विकत घेऊ लागले. जसजशी ज्यू लोकांची संख्या वाढू लागले, अरबांमध्ये अस्वस्थता वाढू लागली. त्यातून संघर्ष होऊ लागले. ब्रिटिश सरकारने याबाबतीत फारसे काही केले नाही. परिणामी पुढे इस्रायलची स्थापना झाली असली तरी पॅलेस्टाईन आणि इतर अरब देशांशी संघर्ष ही त्यांची एक डोकेदुखी बनून गेली. संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार सुरुवातीला इस्त्राईलला पॅलेस्टाईनचा ५६% भूभाग मिळाला होता पण आज इस्रायलच्या ताब्यात जवळपास ८०% पेक्षा जास्त पॅलेस्टाईनचा भाग आहे.
अर्थात ज्यू लोकांनी सुद्धा इस्रायलच्या उभारणीत प्रचंड कष्ट घेतले हे ही तितकेच खरे. इस्रायलच्या आक्रमकतेमुळे आज पॅलेस्टाईन एकदम आकुंचन पावला आहे. पण याचा दोष केवळ एकट्या इस्रायलला देणे कितपत योग्य? कारण अखेर अस्तित्वाचा संघर्ष पॅलेस्टाईन सोबतच इस्रायलसाठी सुद्धा आहेच.
एकदा आवर्जून वाचावे असे पुस्तक.
पुस्तकाचे नाव – पॅलेस्टाइन इस्रायल एका अस्तित्वाचा संघर्ष
लेखक – अतुल कहाते
पब्लिकेशन्स – मनोविकास प्रकाशन.