ही कहाणी आहे महाभारतातील एका रहस्यमय अशा शस्त्राची ज्याला कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या मगधाच्या राजाने पांडवांविरुद्ध वापरण्यासाठी बनवले होते. पण हे शस्त्र वापरण्याची वेळच आली नाही. हे रहस्य इतके स्फोटक होते की सम्राट अशोकानेही हे रहस्यमय शस्त्र कधीच जगासमोर येऊ नये याचा काटेकोर बंदोबस्त केला. पण आता वर्तमानकाळात एक पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबा हे रहस्यमय शस्त्र मिळवण्यासाठी आकाश पातळ एक करत होती. नेमके काय होते हे महाभारताचे रहस्य? सम्राट अशोकाने हे रहस्य गुप्त ठेवण्यासाठी कोणती योजना आखली होती? आणि लष्कर-ए-तोएबाला या रहस्याची माहिती कशी मिळाली? या सर्वांचा शेवट कसा होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे क्रिस्टोफर सी डायल यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचे रहस्य’ या पुस्तकातून मिळतात.
सर्वात प्रथम इतिहासात डोकावून पाहू. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महाभारताचे युद्ध लढले गेले. या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या मगधच्या राजाने एका रहस्यमय शस्त्राची निर्मिती केली होती. हे शस्त्र म्हणजे एक विमान होते. मगधचा राजा या ज्या विमानांची बांधणी करत होता ती हवेतून अदृश्यावस्थेत रणांगणावर हल्ला चढवू शकत होती. वैमानिकरहित असलेली हि विमाने आजच्या काळातल्या ड्रोन सारखी होती. या विमानांद्वारे हल्ला करून पांडवांच्या सैन्याची पूर्ण दाणादाण उडवून ते कौरवांचा विजय घडवून आणणार होते. वस्तू अदृश्य करण्याचे अतिप्रगत तंत्रज्ञान मगधच्या राजाने विकसित केले होते. पण महाभारताचे युद्ध अचानकच थांबल्याने या शस्त्राचा वापर पांडवांविरुद्ध करण्याची संधी कौरवांना मिळाली नाही.
पूर्वीच्या काळी महाभारत हे मौखिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केले गेले, जपले गेले. ज्यावेळी भारतात लिखाणाचा उगम झाला, त्यावेळी महाभारत सुद्धा लिखित स्वरूपात उपलब्ध केले गेले. यामध्ये मौखिक परंपरेद्वारे आलेल्या महाभारतातील सर्व संहिता लिहून काढण्यात आल्या. यामध्ये एक महत्वाची संहिता होती ‘विमान पर्व’. या महत्वाच्या ग्रंथामध्ये विमानांच्या बांधणीविषयी अत्यंत महत्वाची माहिती देण्यात आली होती. तसेच मगधच्या राजाने तयार केलेली ती भयंकर अशी अदृश्य होणारी विमाने व अशा इतर अनेक शस्त्रांचा विस्तृत आराखडा या संहितेमध्ये देण्यात आला होता. हे ‘विमान पर्व’ पुस्तक चुकीच्या लोकांच्या हातात पडले असते तर जगाचा विनाश निश्चित होता.
म्हणूनच सम्राट अशोकला या रहस्याविषयी माहिती समजताच त्याचे गांभीर्यही कळाले. म्हणून त्याने हे रहस्य जगासमोर कधीही उजेडात येऊ नये म्हणून आपल्या ९ सरदारांचा एक गुप्त गट स्थापन केला. महाभारताच्या या रहस्याची गुप्तता कायम राखणे हे या गटाचे मुख्य उद्देश होते. अशोकाने ‘विमान पर्व’ या पुस्तकाच्या सर्व प्रती पूर्णपणे नष्ट करण्याचा आदेश दिला जेणेकरून असा कोणता ग्रंथ महाभारतामध्ये अस्तित्वात होता हे जगाला कधीच कळू नये.
पण त्याचबरोबर या ग्रंथाचे अस्तित्व केवळ त्या ९ जणांच्या गटापुरतेच मर्यादित ठेवण्याचे आदेश त्याने दिले. त्यासाठी विमान पर्व या ग्रंथातील महत्वाची माहिती शिलालेखाच्या स्वरूपाने जतन करण्यास अशोकाने सांगितले. तसेच ज्या गुहेमध्ये हे रहस्यमय शस्त्र ठेवण्यात आले होते त्यासंबंधी अशोकाने विविध संकेत निर्माण केले. पण सर्व ९ जणांचे संकेत एकत्र आल्याशिवाय या रहस्याचा ठावठिकाणा काळाने अशक्य होते. या ९ जणांच्या गटाने आपापले संकेत पुढील पिढीला हस्तांतरित करायचे होते.
ई.स. पाचव्या शतकात गुप्त साम्राज्याचा ऱ्हास झाल्यावर राजस्थानमध्ये राजवीरगड येथे एका व्यक्तीने आपले राज्य स्थापन केले. त्याला सम्राट अशोकाच्या ९ जणांच्या गुप्त गटाबद्दल माहित होते. कालांतराने आपल्याच दरबारातील खगोलशास्त्रज्ञ हा त्या ९ जणांच्या गटामधीलच एक आहे हे त्या राजाला समजले. राजाला ते जुने रहस्य काहीही करून मिळवायचे होते. पण त्या खगोलशास्त्रज्ञाला पकडण्यापूर्वीच तो तिथून नाहीसा झाला. महाभारताच्या रहस्याबद्दल त्याच्याकडे असलेली एक धातूची तबकडी व काही भूर्जपत्रे घेऊन तो अफगानिस्तानमधील बामियान येथे आला (तेच बामियान जेथील भव्य बुद्धमूर्तींचा तालिबानने विध्वंस केला होता).
त्याच्या पाठलागावर काही लुटारू होते. त्यांना चकवा देण्यासाठी तो वृद्ध खगोलशास्त्रज्ञ बामियान येथील बुद्धांच्या भव्य पुतळ्याच्या मागे असलेल्या गुहेत शिरला. पण त्या लुटारूंनी त्याला शोधून काढले आणि ठार मारले. पण त्या लुटारूंना ती तबकडी आणि भूर्जपत्रे निरुपयोगी वाटल्याने त्यांनी ती तेथेच गुहेत त्या मृतदेहाशेजारी सोडून दिली. अशा प्रकारे त्या रहस्याविषयी महत्वाची माहिती त्या गुहेत गडप होऊन गेली.
मार्च २००१ मध्ये अफगानिस्तानवर राज्य करत असलेल्या तालिबानने बामियान येथील बुद्धांचे पुतळे उद्ध्वस्त केले. त्यावेळी तालिबानच्या एका अधिकाऱ्याला त्या पुतळ्यामागील गुहेत एका मानवी हाडाच्या सापळ्यासोबत ती धातूची तबकडी व प्राचीन भूर्जपत्रे सापडली. अफगानिस्तानमधील कोरड्या हवामानामुळे ती भूर्जपत्रे अजूनही सुस्थितीत होती. पण त्या अडाणी तालिबानी व्यक्तीला त्या गोष्टींचे महत्व कळणे शक्यच नव्हते. चोरबाजारात या प्राचीन वस्तू विकून चांगला नफा मिळेल या आशेने तो त्या वस्तू आपल्या घरी घेऊन जातो. कालांतराने त्याने त्या वस्तू त्याने फारूक नावाच्या एका पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञाला दिल्या जो लष्कर-ए-तोएबा साठी काम करत होता.
जागतिक पातळीवर सुद्धा या महाभारतकालीन रहस्याच्या भरवशावर एक मोठा कट आकारास येत होता. महाभारतकालीन ते अदृश्य होणारे विमान वापरून G-२० परिषदेसाठी उपस्थित राहणाऱ्या २० बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांवर हल्ला करायचा, त्यांची सरकारे पाडायची आणि त्या जागी आपल्या मर्जीतील सरकारे आणायची योजना आखली जात होती. ही योजना आखण्यामागे मोठमोठे उद्योजक, राजकारणी लोक, आता केवळ नाममात्र उरलेले राजे-महाराजे इत्यादींचा समावेश होता. भारतामध्ये राजवीरगडचे सध्याचे राजे आणि राजकारणात सक्रीय असलेले भीमसिंगही होते. या सर्वांनी लष्कर-ए-तोएबाच्या फारूकला ते महाभारतकालीन शस्त्र मिळवण्याची जबाबदारी सोपवली होती. फारूक ते शस्त्र कसे मिळवणार होता?
यासाठी आता वर्तमानकाळात यावे लागेल आणि पुस्तकाची सुरुवात जिथून झाली ती घटना पहावी लागेल. भारतातील एक अणुशास्त्रज्ञ असलेले विक्रम सिंग हे अशोकाच्या त्या ९ जणांच्या गटातील वर्तमानातील अखेरचे सदस्य होते. तालिबानी अधिकाऱ्याकडून मिळालेली ती तबकडी आणि भूर्जपत्रे घेऊन फारूक विक्रम सिंगना भेटतो आणि त्या रहस्याविषयी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ९ जणांच्या गटातील ८ जणांचा खून झालेला असल्याने विक्रम सिंगना आपल्या जीवाला असलेला धोका जाणवू लागतो.
तसेच वारंवार त्या रहस्याविषयी खोदून खोदून विचारणाऱ्या फारूकचाही त्यांना संशय येतो. यदाकदाचित मृत्यू आलाच तर त्याआधी महाभारताच्या त्या रहस्याची माहिती कोण्या विश्वासू व्यक्तीला देणे गरजेचे असते. यासाठी विक्रम सिंग अमेरिकेत असलेला त्यांचा पुतण्या विजय सिंगला निवडतात. एके दिवशी खरोखरच विक्रम सिंग यांचा खून होतो पण त्याआधीच ते आपला पुतण्या विजयला पाच सांकेतिक भाषेतील ई-मेल पाठवतात. त्या मेल मध्ये अशोकाने जगापासून दडवून ठेवलेल्या त्या रहस्याचा ठावठिकाणा सांगणारे संकेत दडलेले असतात.
काकांच्या मृत्यूची बातमी वाचून हादरलेला विजय भारतात परततो आणि काकांनी त्याला पाठवलेल्या मेलच्या सहाय्याने महाभारताच्या रहस्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. या सर्व मोहिमेमध्ये लष्कर-ए-तोएबाचा अतिरेकी फारूकही त्याच्या मागावर असतो. जगाचा विनाश करण्याची ताकत असलेल्या एका प्राचीन व भयावह रहस्याला सम्राट अशोकाने २३०० वर्षांपूर्वी जगापासून लपवून ठेवले. पण आता वर्तमान काळात विजय व त्याचे मित्र त्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील रहस्ये व वर्तमानातील कारस्थाने यांच्या कचाट्यात सापडतात. शब्दात न मांडता येण्याजोग्या भयानक दहशतीचा पगडा जगावर बसण्याआधी ‘ते’ गूढ ते उकलू शकतील का? आणि पुढे त्या रहस्याला लष्कर-ए-तोएबाच्या ताब्यात जाण्यापासून वाचवू शकतील का?
उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
छान कादंबरी आहे, सध्या वाचन सुरु आहे. विषय काल्पनिक असला तरीही पौराणिक, ऐतिहासिक, काही सत्यघटना आणि वर्तमान काळ यांची सांगड यात घातली आहे.