माओ-त्से-तुंग – चीनी साम्यवादी क्रांतीचे रोमहर्षक चित्र आणि चरित्र

१९९०-९१ मध्ये सोविएत रशिया कोसळल्यानंतर जगभरामध्ये साम्यवादाचा फोलपणा सर्वांच्या समोर आला. मूळात याची सुरुवात १९५६ मध्येच झाली होती ज्यावेळी सोविएत रशियाचा तत्कालीन अध्यक्ष निकिता कृश्चेवने साम्यवादी पक्षाच्या २०व्या अधिवेशनात स्टॅलिनच्या अमानुष कृत्यांचा पाढा जाहीरपणे वाचला. जवळपास तब्बल २५ वर्षे जागतिक साम्यवादी चळवळीचे नेतृत्व केलेल्या स्टॅलिनच्या विरोधातील कृश्चेवचे हे भाषण साम्यवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. सोविएत मध्ये कालांतराने अयशस्वी झालेला साम्यवाद भारताचा शेजारी चीन मध्ये अजूनही यशस्वीपणे आपली पाळेमुळे घट्टपणे रोवून आहे. हे कसे घडले? माओ-त्से-तुंग च्या नेतृत्वाखाली १९४९ मध्ये चीनमध्ये झालेली साम्यवादी क्रांती १९२२ मध्ये रशियामध्ये झालेल्या साम्यवादी क्रांती सारखीच होती का? तसे असेल तर अजूनही चीन मध्ये मजबूतीने ती कशी उभी आहे? आणि याचे उत्तर नाही असेल तर चीन मध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीचे वेगळेपण काय होते? या क्रांतीचे आणि माओचे चित्र आणि चरित्र जाणून घेण्यासोबतच क्रांतीच्या आधीच्या शतकभरात चीन मध्ये काय काय घडले हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. या सर्वांची माहिती वि.ग. कानिटकर यांनी आपल्या ‘क्रांतीचे चित्र आणि चरित्र – माओ’ या पुस्तकात दिली आहे. 

माओ-त्से-तुंग - चीनी साम्यवादी क्रांतीचे चित्र आणि चरित्र
माओ-त्से-तुंग – चीनी साम्यवादी क्रांतीचे चित्र आणि चरित्र (फोटो साभार – गूगल)

चीन मध्ये ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात कन्फ्युशियस नावाचा एक मोठा विचारवंत होऊन गेला. त्याने राज्यकारभाराबाबत मोलाचा उपदेश करताना जनतेला राजाशी नेहमी एकनिष्ठ राहण्याचा उपदेश केला. कन्युशियसची तत्वे चीनी जनतेच्या नसानसात भिनलेली असल्याने चीनच्या पाच हजार वर्षांच्या ज्ञात इतिहासात आलेल्या आणि गेलेल्या अनेक साम्राज्यांशी चीनी जनता एकनिष्ठ राहिली. मग या राजवटी कशाही असोत. १३६८ मध्ये मांचू घराणे चीन मध्ये सत्तेवर आले आणि अखेरपर्यंत सत्तेवर राहिले. इतका प्रदीर्घ काल राज्य केले असले तरी हे मांचू घराणे चीन साठी परकेच होते (जसे भारतासाठी मुघल होते).

माओ-त्से-तुंग
कन्फ्युशियस (फोटो साभार – गूगल)

या मांचू घराण्याने १७व्या शतकात इंग्लंडच्या राजाने दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची मागणी फेटाळली आणि मग इंग्लंड तसेच इतर पाश्चात्य राष्ट्रांची नजर चीन कडे वळली. तसेही १८व्या शतकापर्यंत युरोपियनांनी अवघे जग पादांक्रांत केलेलेच होते. अपवाद फक्त चीनचा. इंग्रजांनी अफू भारतामधून चीनमध्ये पोचवली आणि त्याचे व्यसन चीनी माणसाला लावले. या अफूच्या व्यापारातूनच संघर्ष होऊ लागले आणि १८४० मध्ये ब्रिटिशांचे मांचू राजाशी यूद्ध झाले. मांचू राजा पराभूत झाला आणि तहाच्या रूपाने ब्रिटिशांनी चीन मध्ये प्रवेश केला. अशाच प्रकारे इतर पाश्चात्य राष्ट्रांनीही चीन मध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. 

पाश्चात्य राष्ट्रांकडून चीनची अशा प्रकारे पिळवणूक सुरू असताना मांचू राजघराणे मात्र स्वस्थ बसले होते. त्यांना केवळ आपले साम्राज्य टिकवण्यात रस होता. चीन मध्ये सर्व थरात लाचखाऊ वृत्ती बोकाळलेली होती आणि मांचू राजवटीविरूद्ध असंतोष आणि द्वेष प्रतिदिन वाढत होता. याविरूद्ध सर्वात पहिले बंड दक्षिण चीन मधील क्वांगडुंग प्रांतामध्ये हुंग नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी केले. असेच बंड चीनच्या वायव्येस शेन्सीकनसू प्रांतातील मुसलमानांनी याकूब बेगच्या नेतृत्वाखाली केले. पण ही दोन्ही बंडे अपयशी ठरली. पण यामुळे मांचू राजघराणे अजूनच दुबळे झाले. दुसरीकडे चीनच्या अधिपत्याखाली असलेल्या काही देशांवर परकीय देशांनी कब्जा केला. जसा अन्नाम (आजचा व्हिएतनाम) वर फ्रांसने आणि कोरियामांचूरियावर जपानने. यामुळे मांचू राजवटीविरूद्ध चीनी क्रांतिकारक एकवटू लागले ज्यांचे नेतृत्व केले डॉ सन यत सेन यांनी.

माओ-त्से-तुंग - चीनी साम्यवादी क्रांतीचे चित्र आणि चरित्र
डॉ सन यत सेन (फोटो साभार – गूगल)

०१ जानेवारी १९१२ रोजी सन यत सेन यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक चीनचे पहिले सरकार नानकिंग येथे स्थापन करण्यात आले. १२ फेब्रुवारी १९१२ रोजी चीनी सम्राटाने राजत्याग केला आणि चीन मधील राजेशाही संपुष्टात आली. १९१२ पासून ते १९४९ मध्ये साम्यवादी क्रांती होईपर्यंत चीन मध्ये कोणतेही सरकार स्थिरपणे जास्त काळ टिकले नाही. जनतेलाही राजेशाही संपून लोकशाही आल्याचा काही फायदा झाला नाही. पूर्वी सम्राटाचे सैन्य जुलूम करायचे आणि आता लष्करी उमरावांचे सैन्य जुलूम करू लागले. डॉ सन यत सेन यांच्या निधनांनंतर कोमिंटांग पक्षाचे आणि पर्यायाने चीनचे नेतृत्व चेंग कै शेक याच्याकडे आले. त्याने १९४९ पर्यंत चीनचे (आणि त्यानंतर १९७५ मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत तैवानचे) नेतृत्व केले असले तरी हा संपूर्ण काळ अराजकता, सततची युद्धे. जुलूम यांनी भरलेला होता. 

याच काळात माओ मोठा होत होता. जुलमी मांचू राजघराण्याविरोधात तो क्रांतीसेनेत दाखल झाला. मांचू राजवट संपल्यावर देशातील गोंधळाचे वातावरण पाहून त्याचे विचार सशस्त्र क्रांतीकडे झुकू लागले. पेकिंग (आताचे बीजिंग) मध्ये माओची गाठ लि-ता-चाओ (हा पुढे चीनी कम्यूनिस्ट पक्षाचा संस्थापक झाला) बरोबर झाली. चाओ हा त्यावेळी रशियातील कम्यूनिस्ट क्रांतीचा चीनमधील एकमेव अभ्यासक होता आणि त्यानेच माओला मार्क्सवादाची यथासांग दीक्षा दिली. १९२१ साली चीनी कम्यूनिस्ट पक्षाची स्थापना झाली. यासाठी मॉस्कोमधून मार्गदर्शन करण्यात आलेले होते. स्टॅलिनच्या निर्देशानूसार चीनी कम्यूनिस्ट पक्षाला चेंग-कै-शेक च्या कोमिंटांग पक्षाशी सहकार्य करण्यास सांगण्यात आलेले होते. त्यानूसार बरेच कम्यूनिस्ट (ज्यामध्ये स्वत: माओ देखील होता) कोमिंटांग पक्षात कार्यरत होते. ‘चीनी लष्करी उमरावांचा नि:पात’ आणि ‘साम्राज्यवादी शक्तींशी लढा’ या दोन उद्देशांसाठी कम्यूनिस्ट आणि कोमिंटांग पक्षात सहकार्य झाले होते. 

माओ-त्से-तुंग
चेंग-कै-शेक (फोटो साभार – गूगल)

यानूसार लष्करी उमरावांचा नि:पात करण्यात चेंग कै शेक ला बर्‍यापैकी यश मिळाले असले तरी साम्राज्यवादी शक्तींशी लढण्याऐवजी चेंग ने कम्यूनिस्ट लोकांचा नि:पात करण्यास सुरुवात केली. यामुळे बिथरलेल्या माओने चेंग-कै-शेक शी फारकत घेऊन आपले कम्यूनिस्ट राज्य स्थापन करण्यासाठी सशस्त्र क्रांतीची तयारी सुरू केली. एकीकडे जपान चीनी प्रदेशांचे लचके तोडत असताना चेंग-कै-शेक मात्र जपान ऐवजी माओच्या लाल सेनेशी लढण्यात गुंतला होता. माओचे ‘सोविएत’ शेतकरी, कामकरी यांच्या कल्याणासाठी काम करत होते. माओने त्याची ही क्रांती खेड्यांमधून सुरू केली होती. शेतकर्‍यांना पिळवणुकीपासून संरक्षण देत होती. म्हणूनच माओची लोकप्रियता शिगेला पोहोचली. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर चीनमध्ये यादवी झाली आणि अखेर चेंग-कै-शेक ला पराभूत करून माओने चीन मध्ये कम्यूनिस्ट शासन स्थापित केले. 

माओच्या क्रांतीचे स्वरूप कसे होते? लोकांच्या आचार, विचारांवर बंधने लादूनही चीनी समाजाने साम्यवादाचा स्वीकार का केला? माओने वर्षानुवर्षे जुलूमांनी पिचलेल्या चीनी समाजाची सुप्त शक्ती प्रज्वलित केली. आपण कोणा पक्षासाठी नाही तर स्वत:साठी, आपल्या देशासाठी लढत आहोत ही भावना समाजामध्ये माओने जागृत केली. कम्यूनिस्ट क्रांतीपूर्वी ज्या छोट्या प्रदेशात माओने आपले ‘सोविएट’ स्थापन केले होते तेथील लोकांच्या जीवनमानात झालेल्या सुधारणा समाजाने अनुभवल्या होत्या. माओने लाल सेनेला सुद्धा नैतिक मूल्यांच्या पायावर उभे केले होते. त्यामुळे लाल सेना कधीही समाजाला त्रास देत नसे. अशा प्रकारचे सैन्य चीनी जनता प्रथमच पाहत होती. अन्यथा आजपर्यंत कोणाचेही सैन्य येवो (सरकारी सैन्य अथवा बंडखोर), जनतेवर जुलूम, अत्याचार ठरलेलेच असायचे.

मांचू राजवट आणि त्यानंतरच्या चेंग-कै-शेकच्या राष्ट्रवादी सरकारच्या लाचलुचपत आणि काळा बाजार यासारख्या यासारख्या रोगांनी लडबडलेल्या भ्रष्ट राजवटी अनुभवलेल्या चीनी जनतेने म्हणूनच मार्क्सवादाला कवटाळले आणि आपलेसे केले. अर्थात याची किंमतही त्यांनी मोजली. जनतेच्या व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यावर बंधने लादण्यात आली. कम्यूनिस्ट लेखक पाचीन म्हणतो त्याप्रमाणे इतर देशांमध्ये, धर्मांमध्ये बरेच संत होऊन गेले ज्यांनी समाजाला सुधारणेचे उपदेश दिले. पण त्यामुळे ते समाज पूर्णपणे सुधारले का? नाही. पण कम्यूनिस्ट राजवटीमध्ये मात्र समाज एकदम सरळ आणि प्रामाणिक झाला आहे. अर्थात करकचून बंधने लादलेल्या समाजाला तसेही विरोध प्रदर्शनाचा अधिकार असतोच कुठे? म्हणूनच चीनचे कम्यूनिस्ट शासन यशस्वी झाल्याचा गवगवा माओने सुरू केला. 

माओ-त्से-तुंग
माओ-त्से-तुंग (फोटो साभार – गूगल)

शेजारी असूनही अजूनही आपल्याला बर्‍यापैकी अनोळखी असलेल्या चीन देशाची ओळख हे पुस्तक करून देते. कम्यूनिस्ट क्रांतीपूर्वी व नंतर चीन मध्ये काय घडले, कसे घडले व का घडले हे सविस्तरपणे या पुस्तकात सांगण्यात आले आहे. या पुस्तकामुळे शतकभराचे चित्र डोळ्यासमोर उभे राहून चीन बद्दल असलेल्या आपल्या समजूती, गैरसमजूती आणि अपूरी माहिती दूर होण्यास मदत होईल तसेच चीन बद्दल बरेचसे अजून कळेल.

एकदा आवर्जून वाचावे असे पुस्तक.   

‘          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *