‘मोसाद’ – भल्याभल्यांनाही पुरून उरणारी मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था

प्रस्तावना

सप्टेंबर १९२९ मध्ये अरबांना आपल्या एकतेची ताकद दाखवून देण्यासाठी ज्यू लोक जेरुसलेम मधील प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी जमा झाले. दुपारच्या वेळी त्यांनी त्यांची शेमा नावाची विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण काही वेळातच त्यांच्यावर अरबांनी दगडे, फुटक्या बाटल्या आणि दगडे भरलेल्या डब्यांनी जोरदार हल्ला केला. या अनपेक्षित अशा हल्ल्यात कोणीही दगावले नसले तरी अनेक ज्यू जखमी झाले. इतके नियोजपूर्वक आणि व्यवस्थित आयोजन करूनही हा प्रकार झाल्याने ज्यू नेते अस्वस्थ झाले.

अरबांच्या गोटातून या हल्याची आगाऊ माहिती न काढता आल्याचे ज्यू नेत्यांच्या जिव्हारी लागले होते. पण यातूनच धडा घेत ज्यू लोकांनी शत्रूची वित्तंबातमी मिळवणारी संस्था उभारायचा निश्चय केला आणि त्यानंतर जन्माला आली इस्राइलची प्रसिद्ध गुप्तहेर संघटना मोसाद’. पंकज कालूवाला आपल्या इस्रायलची मोसाद’ या पुस्तकातून ज्यावेळी इस्रायलची निर्मिती, मोसादची स्थापना आणि मोसादच्या कारवायांचा पट वाचकांसमोर मांडतात त्यावेळी अंगावर रोमांच उभारल्याशिवाय राहत नाहीत.

मोसाद
जेरूसलेम (फोटो साभार – गूगल)

इतिहास

आजच्या इस्रायलला प्राचीन काळी ‘कनान’चा प्रदेश म्हणून ओळखले जाई. या प्रदेशातच ज्यू लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. पण दुष्काळ आणि नंतर परकीय आक्रमणामुळे त्यांना आपला प्रदेश सोडावा लागला आणि ते पूर्ण जगभर विखुरले. भारत वगळता हे ज्यू जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये राहिले, तेथे त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली. त्यांचा छळ करण्यात आला. यावर कळस झाला दुसऱ्या महायुद्धावेळी ज्यामध्ये हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी सरकारने ज्यूंचे शिरकाण करायला सुरुवात केली.

अशा वेळी ज्यूंना सुरक्षित राहायचे असेल तर आपला स्वतःचा देश हवा या भावनेतून जगभरातून ज्यू लोक आपल्या प्राचीन भूमीकडे म्हणजे त्यावेळच्या पॅलेस्टाईन मध्ये येऊन राहू लागले. त्यावेळी पॅलेस्टाईनवर ब्रिटिशांचे राज्य होते.या ज्यू लोकांनी तेथील अरबांकडून जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. हळूहळू पॅलेस्टाईन मध्ये स्थलांतरित होणाऱ्या ज्यू लोकांची संख्या वाढू लागली. लोकसंख्येत होणाऱ्या या बदलामुळे अरब लोक संतप्त होते. त्यामूळे तेथे अरब आणि ज्यू लोकांमध्ये वारंवार संघर्ष होऊ लागला.

ज्यू लोकांना सुरुवातीला ब्रिटन कडून आपल्याला स्वतंत्र ज्यू राष्ट्र मिळेल अशी आशा होती. कारण तत्कालीन ब्रिटिश परराष्ट्रमंत्री बाल्फोर यांनी ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्राला मान्यता देणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यालाच ‘बाल्फोर जाहिरनामा’ म्हणतात. तसेच अमेरिका आणि ब्रिटन तर्फे पॅलेस्टाईनची फाळणी करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात आणण्यात येणार होता. पण त्यानंतर ब्रिटिशांनीनरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली. तसेच त्या काळात अरब राष्ट्रांनी ब्रिटनला आणि अमेरिकेला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती. त्यामूळे संयुक्त राष्ट्रसंघात येणाऱ्या पॅलेस्टाईनच्या फाळणीचा निर्णय बदलण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि ब्रिटनने हालचाल सुरु केली.  

इस्रायलची स्थापना

पॅलेस्टाईन मधील ज्यूंसाठी हा अटीतटीचा काळ होता. संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाइनची फाळणी रद्द झाली असती तर ज्यूंसाठी स्वतंत्र राष्ट्र मिळवण्याची अखेरची संधी हातची जाण्याचा धोका होता. त्यामूळे ज्यूंचे नेते डेव्हिड बेन गुरियन यांनी कणखर निर्णय घेत संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाइनचे विभाजन रद्द होण्याच्या आधीच १४ मे १९४८ रोजी इस्रायलच्या स्थापनेची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने इस्रायलला मान्यता दिली. त्यानंतरच संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायलला मान्यता मिळण्याची केवळ औपचारिकता उरली. 

मोसाद
इस्रायलची स्थापना (फोटो साभार – गूगल)

इस्रायलच्या स्थापनेमुळे आसपासची अरब राष्ट्रे चवताळली होती. त्यांनी इस्रायलवर तत्काळ हल्ला चढवला. इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, इराक, सौदी अरेबिया या सर्वांची ताकत नक्कीच इस्रायल पेक्षा जास्त होती. तसेच इस्रायल जवळ पुरेशी शस्त्रास्त्रे ही नव्हती. पण याची जागा इस्रायलच्या विजिगिषू वृत्ती, असामान्य लढाऊ बाणा असणाऱ्या नागरिकांनी आणि तत्कालीन ज्यू नेत्यांच्या निर्णयक्षमतेने भरून काढली. याच्या बळावरच त्यांनी अरबांच्या एकत्रित सेनेचा पराभव केला.

मोसादची स्थापना

पण अरब शांत बसणार नाहीत आणि युद्धाची हि तलवार सदैव आपल्यावर लटकत राहील याची इस्रायलच्या राज्यकर्त्यांना जाणीव होती. त्यामुळेच परराष्ट्रात ( खासकरून अरब राष्ट्रांमध्ये) हेरगिरी करून त्यांची वित्तंबातमी मिळवण्याच्या उद्देशाने १३ डिसेंबर १९४९ रोजी मोसादची स्थापना करण्यात आली. हेरगिरी सोबतच जगभरातील ज्यू लोकांना सुरक्षितपणे इस्रायल मध्ये आणणे आणि दुसऱ्या महायुध्दात ज्यूंवर अत्याचार करणाऱ्या नाझी लोकांना पकडून शासन करणे ही सुद्धा मोसादची महत्त्वाची ध्येय होती. जगभरात (विशेषतः शत्रूराष्ट्रात) होणाऱ्या विविध घटनांवर मोसादची करडी नजर असते. इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती वा संघटनेविरोधात मोसादने नेहमी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळेच शत्रू राष्ट्रांनी घेरलेले असूनही इस्रायल आजही भक्कमपणे उभे आहे.

मोसादचे बोधचिन्ह
मोसादचे बोधचिन्ह (फोटो साभार – गूगल)

मोसादच्या काही निवडक कारवाया

इस्रायलच्या स्थापनेपासून मोसादने आजपर्यंत ज्या ज्या कारवाया केल्या त्या वाचताच अक्षरशः थक्क व्हायला होते. त्यापैकी काही महत्त्वाच्या कारवायांचा खाली घेतलेला संक्षिप्त आढावा:

१.  ऑपरेशन थीफइस्रायलच्या अधिकृत स्थापनेपूर्वीच मोसादने इस्रायलचा शेजारी आणि कट्टर शत्रू सिरियाच्या शस्त्रखरेदीचा डाव उधळून लावला. युरोपवरून सिरियाला शस्त्रे घेऊन जात असलेल्या जहाजावर मोसादच्या हेरांनी भर समुद्रात धाडसी कमांडो हल्ला करून ते जहाज बुडवून टाकले आणि इस्रायलवरील एक मोठे संकट दूर केले. 

२. सोविएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर अध्यक्ष बनलेल्या निकिता कृश्चेवने आपल्या एका भाषणात स्टॅलिनचे आणि एकंदरीत साम्यवादाचे वाभाडे काढले. त्याचे हे भाषण साम्यवादाच्या जगभरातील चळवळीला हानी पोचवणारे होते. म्हणूनच कृश्चेवचे हे भाषण जगात कुणाला कळणारच नाही याची कडेकोट व्यवस्था सोविएत युनियनने केली. पण तरीही कृश्चेवच्या या भाषणाची प्रत मोसादने मिळवली आणि CIAच्या मदतीने ती जगभरात प्रसारित केली. जे CIAला जमले नाही ते मोसादने करून दाखवले. 

३.  ऑपरेशन अत्तीलादुसर्‍या महायुद्धावेळी लाखो ज्यूंच्या शिरकाणास कारणीभूत असलेल्या आणि युद्धानंतर लपून राहणार्‍या अडॉल्फ आईशमन या नाझी अधिकार्‍यास मोसादने अर्जेंटिना मधून गुप्तपणे पकडून इस्रायलला आणले आणि त्यानंतर इस्रायलमध्ये रीतसर खटला चालवून त्याला मृत्युदंड देण्यात आला.

४.  ऑपरेशन पेनिसिलीनइस्रायलचे शत्रू असलेल्या अरब राष्ट्रांना १९५९-६० मध्ये सोविएत युनियन कडून अत्याधुनिक अशी मिग-२१ ही लढाऊ विमाने मिळाल्याने इस्रायलमध्ये खळबळ माजली. पण डगमगून न जाता मोसादने धाडसी योजना आखत एक मिग २१ विमान इराकमधून पळवून आणले. याच विमानाचा इस्रायलने कसून अभ्यास केला आणि याचा फायदा त्यांना अरबांच्या सोबत झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात झाला. 

याशिवाय फ्रांस मधून मिसाइल बोटींचे साहसी हरण करणारे ऑपरेशन नोहाज आर्क, अतिरेक्यांच्या तावडीतून अपहृत विमानातील प्रवाशांची सुटका करणारे ऑपरेशन आयसोटोप, म्युनिक ऑलिंपिक मध्ये इस्रायलच्या खेळाडूंच्या हत्या करणार्‍या सर्व अतिरेक्यांना वेचून वेचून घातलेले कंठस्नान, इराकच्या अणुभट्टीचा नाश करणारे ऑपरेशन ओपेरा इत्यादी मोसादने आखलेल्या अनेक मोहिमांची सविस्तर माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. 

समारोप

मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था हे ‘मोसाद‘चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगदव्यापी, भल्याभल्यांनाही पुरून उरणार्‍या. आजूबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्रे, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला तारले आहे. तिच्या या कारवायांचा मागोवा घ्यायचा असेल तर हे पुस्तक एकदा वाचलेच पाहिजे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *