मोसाद चे ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’- इजिप्तचा शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्प बंद पाडण्याची कहाणी

दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने अग्निबाण निर्मितीच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली होती. या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला असला तरी जर्मनीच्या v-२ अग्निबाणांनी तर एक वेळ मित्र राष्ट्रांच्या तोंडचे पाणी  पळवले होते. महायुद्धानंतर या कुशल जर्मन शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना अमेरिका आणि सोविएत रशियाने आपापल्या देशात नेले आणि त्यांच्या मदतीने अग्निबाण व क्षेपणास्त्र बनवायला सुरुवात केली. इस्रायलचा कट्टर शत्रू असलेल्या इजिप्तनेही जर्मनीच्या अपार बुद्धीवैभवाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि धोकादायक अशा  अग्निबाणांची गुप्तपणे निर्मिती करायला सुरुवात केली. इस्रायलच्या अस्तित्वावर असे संकट आले असताना मोसादही शांत राहणे शक्यच नव्हते आणि त्यांनीही ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’ राबवून इजिप्तचा प्रयत्न हाणून पाडला. याच ऑपरेशन बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. 

लष्करात काम केलेले गमाल अब्दुल नासर १९५६ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बनले. १९४८-४९ मध्ये इस्रायलकडून झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे इस्रायलला धडा शिकवण्याच्या हेतूने त्यांनी सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयकरण केले आणि त्यामधून इस्रायलच्या जहाजांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली. या बंदीमुळे इस्रायलची व्यापारी आणि लष्करी कोंडी सुरू झाली. ही कोंडी फोडण्यासाठी इस्रायलकडे युद्ध हाच एकमेव पर्याय होता. इस्रायलने इजिप्तचा जोरदार पराभव करत सुवेझ कालव्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. इजिप्तचा पुन्हा  एकदा पराभव झाल्याचे नासेर यांच्या आणखी जिव्हारी लागले. भविष्यात पुन्हा असा पराभव स्वीकारावा लागू नये यासाठी नासेर ने १९५९ साली ‘ब्यूरो फॉर स्पेशल मिलिटरी प्रोग्राम्स’ची स्थापना केली. या ब्यूरोला इजिप्तसाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने, अग्निबाण, क्षेपणास्त्रे यासोबतच रासायनिक व किरणोत्सर्गी शस्त्रास्त्रांची निर्मिती सुद्धा करायची होती. 

मोसाद
गमाल अब्दुल नासर (फोटो साभार – गुगल)

पण यासाठी ब्यूरोकडे सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे या शस्त्रांच्या निर्मितीसाठी आवश्यक अशा कुशल मनुष्यबळाचा अभाव. या प्रकल्पासाठी आवश्यक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ इजिप्तकडे नव्हते. म्हणूनच या ब्यूरोचा प्रमुख जनरल खलीलने महायुद्धानंतर पूर्ण युरोप मध्ये पांगलेल्या पूर्वसूरीच्या नाझी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना शोधून त्यांना इजिप्तसाठी काम करण्यासाठी राजी केले. ही सर्व शस्त्रे इजिप्त ज्यू लोकांविरोधात वापरणार असल्याने हे नाझी शास्त्रज्ञ सुद्धा यासाठी आनंदाने तयार झाले. त्यानुसार या सर्व शास्त्रज्ञांना गुप्तपणे इजिप्त मध्ये नेण्यात आले आणि लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. गुप्तता कायम राखण्यासाठी या सर्व प्रकल्पांना नावाऐवजी केवळ नंबर देण्यात आले होते. यापैकी इस्रायलच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा प्रकल्प होता ‘फॅक्टरी ३३’ ज्या ठिकाणी मध्यम पल्याच्या क्षेपणास्त्रे बनवण्याचे काम सुरू होते. 

हे सर्व इतक्या गुप्ततेत चालू होते की जगाला सुरुवातीला याबाबत काहीच कळले नाही. पण  १९६२ मध्ये एका लष्करी परेडच्या वेळी इजिप्तने आपले ‘अल काहिरा’ नावाचे क्षेपणास्त्र प्रदर्शित केले आणि जगभरात विशेषत: इस्रायलमध्ये खळबळ माजली. मोसादचे संचालक हेरेल यांनी इजिप्त मधील मोसाद ची गुप्तहेर यंत्रणा कार्यान्वित केली आणि अवघ्या महिनाभरात मोसादच्या हेरांनी इजिप्त मध्ये सुरू असलेल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती हेरेल यांच्याकडे पाठवली. त्याचा सविस्तर अहवाल हेरेल यांनी इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरीयन यांना सोपवला आणि त्यांना या प्रकल्पात सामील असलेल्या जर्मन वैज्ञानिकांवर दबाव आणून त्यांना परत बोलावण्यासाठी प. जर्मनीच्या चान्सेलर बरोबर बोलण्याची विनंती केली. पण गुरियन यांनी त्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे मोसादने स्वतःच यासाठी पावले उचलली आणि ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’ची आखणी केली. 

मोसाद चे ‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स'
डेव्हिड बेन गुरीयन (फोटो साभार – गुगल)

इजिप्त मधला हा क्षेपणास्त्र कार्यक्रम बंद पाडण्यासाठी मोसादने जर्मन शास्त्रज्ञ आणि त्यांच्या कुटुंबाना लक्ष करायचे ठरवले. अर्थात त्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात काहीही हानी न पोचवता त्यांच्याद्वारे जर्मन शास्त्रज्ञांवर मानसिक दबाव टाकण्याची योजना आखली होती. त्यानुसार मोसादने सर्वप्रथम लक्ष्य केले डॉ हेस क्रुग यांना. इजिप्तच्या क्षेपणास्त्र प्रकल्पासाठी साहित्य व सुटे भाग मिळवण्यासाठी काही बोगस कंपन्या स्थापण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका कंपनीचे डॉ क्रुग हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. ११ सप्टेंबर १९६२ मध्ये डॉ क्रुग यांच्या जर्मनीच्या म्युनिच मधील ऑफिसमध्ये अरबांसारखा दिसणारा एक माणूस भेटायला आला. तासभर चर्चा केल्यावर ते दोघे बाहेर पडले आणि त्यानंतर डॉ क्रुग ऑफिस मध्ये परत कधी आलेच नाहीत. पोलिसांना डॉ क्रुग यांची कार सापडली पण त्यामध्ये डॉ क्रुग नव्हते. आजपर्यंत डॉ क्रुग यांचेसोबत नेमके काय झाले हे कोणालाही माहित नाही. 

२७ नोव्हेंबर १९६२ या दिवशी इजिप्त मधील ‘फॅक्टरी ३३’ मध्ये एक पार्सल बॉम्बचा स्फोट झाला ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली. त्यानंतर फॅक्टरी ३३ मध्ये बॉम्ब स्फोटांची मालिकाच चालू झाली. ही सर्व बॉम्ब जास्त तीव्रतेचे नसले तरी तिथल्या जर्मन शास्त्रज्ञ आणि त्यांच्या कुटुंबियांना  घाबरवण्यास पुरेसे होते. त्यातच ही स्फोट मोसादनेच घडवून याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती. पण इजिप्तच्या पोलिसांना मोसाद च्या सहभागाबद्दल कोणताच पुरावा न सापडल्याने जर्मन शास्त्रज्ञांच्या भीतीत अजूनच भर पडली. 

सुवेझ कालवा (फोटो साभार – गुगल)

या सर्वांचा परिणाम म्हणजे इजिप्तने या सर्व जर्मन वैज्ञानिकांची सुरक्षा व्यवस्था एकदम कडक केली. त्यामुळे मोसादच्या कारवाया थोड्या थंडावल्या. यावर उपाय म्हणून मोसादचे संचालक हेरेल यांनी दूसरा मार्ग अवलंबण्याचे ठरवले. त्यांनी युरोपातील मोसादचा एक सर्वोत्तम हेर राफी इतान याला जर्मन शास्त्रज्ञांचे टपाल तपासण्याची जबाबदारी दिली. राफी इतानने अमेरिकेतल्या एक ज्यू उद्योगपतीच्या मदतीने एक इलेक्ट्रॉनिक उपकरण मिळवले आणि इजिप्तच्या दूतावासात घुसखोरी करून जर्मन शास्त्रज्ञांचे टपाल तपासायला सुरुवात केली.

त्यातून त्यांना डॉ ऑटो जोकलिक  यांची माहिती मिळाली जे इजिप्तला कमीत कमी वेळेत अण्वस्त्रे बनवून देणार होते. तसेच फॅक्टरी ३३ मध्ये तयार होणाऱ्या क्षेपणास्त्रांवर हि अण्वस्त्रे बसवण्याचे कामही डॉ जोकलिक यांचेच होते. अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राचा इस्रायलला असलेला धोका फार मोठा होता. त्यामुळे मोसादने डॉ जोकलिक यांना शोधण्यावर आपले प्रयत्न केंद्रित केले. पण आश्चर्य म्हणजे हे डॉ जोकलिक स्वतःच मोसादला शरण आले. कदाचित डॉ क्रुग यांच्यासोबत जे झाले ते आपल्यासोबतही होऊ नये या भीतीनेच ते मोसादला शरण आले असावेत. 

डॉ जोकलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार अण्वस्त्रे आणि त्यासोबतच रासायनिक व किरणोत्सर्गी हत्यारे तयार करण्याची इजिप्तची खतरनाक योजना मोसादला कळाली. याची गंभीरता लक्षात घेता हेरेल यांनी ही गोष्ट तातडीने इस्रायलची परराष्ट्रमंत्री गोल्डा मायर यांना कळवली. गोल्डा यांनी ही गोष्ट अमेरिकेला सांगून यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पण अमेरिकेने यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे पुन्हा एकदा मोसादनेच स्वबळावर ही मोहीम तडीस नेण्याचे ठरवले. 

गोल्डा मायर (फोटो साभार – गुगल)

इजिप्तच्या क्षेपणास्त्र दिशानिर्देशन प्रणालीवर काम करणाऱ्या डॉ क्लेनवाश्तर यांना ठार मारण्याचा मोसादचा एक प्रयत्न अपयशी ठरला होता. त्यामुळे मोसादने पुढील वेळी मानसिक दबावतंत्र वापरायचे ठरवले. डॉ क्लेनवाश्तर यांच्याप्रमाणे क्षेपणास्त्र दिशानिर्देशन प्रणालीवर काम करणाऱ्या डॉ पॉल गोर्की यांच्या स्वित्झर्लंड मध्ये राहणाऱ्या मुलीला मोसाद ने संपर्क केला आणि त्यांना एक हॉटेल मध्ये येऊन भेटायला सांगितले. पण सर्व काही मोसादच्या योजनेनुसार घडले नाही.

डॉ गोर्की यांच्या मुलीने आपल्या वडिलांनी दिलेल्या सूचनेनुसार एच मान या व्यक्तीशी संपर्क साधला. हा एच मान पूर्वाश्रमीचा नाझी अधिकारी होता आणि इजिप्त मध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांच्या नातेवाईकांचा सुरक्षा प्रमुख म्हणून काम करत होता. त्याने जर्मन पोलिस आणि स्वीस पोलिस यांच्या मदतीने सापळा रचला आणि डॉ गोर्की यांच्या मुलीला हॉटेल मध्ये भेटायला आलेल्या मोसादच्या हेरांना स्वीस पोलिसांनी पकडले.

मोसादचे बोधचिन्ह (फोटो साभार – गुगल)

आपल्या हेरांना सोडवण्यासाठी मोसादने प्रसार माध्यमांच्या मदतीने जोरदार प्रयत्न केले. पण तरीही त्यांना दोन महिन्याची शिक्षा झाली. पण या खटल्याच्या निमित्ताने एच मान हा मोसादच्या नजरेत आला. इजिप्तच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाची आणि तिथे काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची संपूर्ण माहिती एच मान कडून मिळण्याची शक्यता होती. मोसादने त्याची माहिती खोदून काढली असता त्यांना कळाले कि मान हा दुसऱ्या महायुद्धात एस एस अधिकारी होता आणि जर्मन लष्करी अधिकारी कर्नल स्क्वार्झोनी याच्या नेतृत्वात काम केले होते.

मोसादने या कर्नल स्क्वार्झोनीलाच आपल्याकडे वळवले आणि त्याद्वारे एच मान कडून माहितीचा प्रचंड खजाना मोसादला मिळू लागला. जर्मन शास्त्रज्ञांच्या नावाची यादी, त्यांचे पत्ते, त्यांच्या योजना, क्षेपणास्त्रांच्या ब्लुप्रिंट्स इत्यादि महत्वाची माहिती मोसाद ला मिळू लागली. या सर्व माहितीच्या आधारे मोसादने जर्मन शास्त्रज्ञ व त्यांच्या कुटुंबियांवर मानसिक दबाव आणायला सुरुवात केली. परिणामी इजिप्तच्या क्षेपणास्त्र प्रकल्पांवर काम करणारे जर्मन शास्त्रज्ञ हळूहळू तिथून काढता पाय घेऊ लागले आणि इजिप्तचा आधुनिक शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्प कायमचा बंद पडला. 

‘ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स’ यशस्वी झाले आणि इस्रायलवरचा एक मोठा धोका कायमचा टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *