‘जय जवान जय किसान’ ची घोषणा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता करार करण्यासाठी ते तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद येथे गेले होते. सात दिवस अखंड चाललेल्या वाटाघाटी नंतर अखेर १० जानेवारी रोजी ताश्कंद करारावर भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधीनी स्वाक्षऱ्या केल्या. ‘ युद्धात जिंकले तहात गमावले’ या उक्तीनुसार या युद्धात प्रचंड असा विजय मिळवूनही ताश्कंद करारा नुसार भारताला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असा जिंकलेला प्रदेश पाकिस्तानला परत द्यावा लागला. तरीही या एकूण शांतता करारावर शास्त्री जी समाधानी होते.
त्या संध्याकाळी सोव्हिएत युनियनच्या सरकारने दिलेल्या मेजवानी नंतर शास्त्रीजी आपल्या निवासस्थानी परतले. रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी दूध घेतले आणि झोपायला गेले. मृत्यू तेथेच दबा धरून बसलाय याची त्यांना जाणीवच नव्हती. काही वेळाने शास्त्रीजींना त्रास होऊ लागला. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची लक्षणे दिसत होती. त्यांचे डॉक्टर डॉ चुघ यांनी शास्त्रीजीना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. काही वेळाने शास्त्री यांची शुध्द हरपली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यांची हत्या झाली होती हे रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही. किंबहुना स्वतंत्र भारतातले नेताजी बोस यांच्यानंतरचे हे दुसरे मोठे रहस्य आहे. शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याची भारत सरकारची अधिकृत भूमिका असली तरी या मृत्यूवर अनेकांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यांचे पूर्णपणे शंका निरसन कोणत्याही सरकारला आजपर्यत करता आलेले नाही. तसेच या मृत्यूचे गूढ शोधायचा प्रामाणिक प्रयत्नही आजपर्यंत कोणत्याही सरकारने केलेला नाही. हीच उणीव आपल्या संशोधनाद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न लेखक अनुज धर यांनी केला आहे. हे सर्व संशोधन लेखक अनुज धर यांनी आपल्या ‘Your Prime Minister is Dead’ या पुस्तकाद्वारे जगासमोर आणले आहे.
मृत्यू झाला त्या दिवसभर शास्त्रीजी तणाव रहित होते तसेच त्यांनी तब्येतीची कोणतीही तक्रार केली नव्हती. यामुळे त्यांचा आकस्मिक मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक आणि अविश्वसनीय होता. हळूहळू या अविश्वासाची जागा संशयाने घ्यायला सुरुवात केली. भारतामध्ये तर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. शास्त्री राहत असलेल्या खोलीत फोन का नव्हता? त्या खोलीत ऑक्सिजन ची व्यवस्था होती का? पंतप्रधानांचे राहायचे ठिकाण ऐनवेळी का बदलले गेले? त्यांना झोपण्यापूर्वी दूध कोणी दिले? प्रश्नांची ही यादी संपत नव्हती. अशा प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करण्यात येऊ लागली. पण सरकार कडून मात्र समाधानकारक उत्तरे देण्यात येत नव्हती.
लाल बहादुर शास्त्री यांच्या पत्नी ललिता शास्त्री यांनी आपल्या पतीचे पार्थिव भारतात आणल्यावर पहिले तेव्हा त्यांच्या मृत्यूला केवळ काही तासच झाले आहेत, हे खरेच वाटत नव्हते. त्यांचा चेहरा निळाशार पडला होता आणि सुजला होता. शरीर फुगले होते आणि त्यावर विचित्र छेद घेतलेले होते. पलंगपोस, उशा आणि कपडे सगळेच रक्तात भिजले होते. कुटुंबीयांनी शंका व्यक्त केल्यावर लाल बहादुर शास्त्री यांच्या चेहऱ्यावर लगेचच चंदनाचा लेप लावण्यात आला. हा सर्व प्रकार कोणाच्याही मनात संशय निर्माण करण्यास पुरेसा होता. ही परिस्थिती शास्त्री यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे या सरकारच्या अधिकृत निवेदनाला छेद देत होती. यामुळेच शास्त्रींच्या मृत्यूवर विचारण्यात येणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी खालील प्रश्न वारंवार विचारले जाऊ लागले:
१. कोणत्याही संशयास्पद मृत्यूच्या संबंधात मृत्यूचे खरे कारण शोधून काढण्यासाठी मृतदेहाची शवचिकित्सा कारणे ही एक सामान्य बाब आहे. पण इथे देशाच्या पंतप्रधानाचा परदेशी आकस्मिक मृत्यू झाला असतानाही शास्त्रींच्या मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सोव्हिएत युनियन ने शवचिकित्सा करण्याची तयारी दाखवूनही भारत सरकारने त्याला संमती दिली नाही. इतकेच नाही तर भारतात आल्यावरही त्यांच्या देहाची शवचिकित्सा करण्यात आली नाही. हे सर्व आश्चर्यकारक होते.
२. शास्त्रींच्या मृत्यूनंतर काही तासांनंतर सोव्हिएत युनियनची गुप्तहेर संस्था KGB ने विषबाधेच्या आरोपाखाली काही लोकांना अटक केली होती. याचा अर्थ सोव्हिएत युनियनला कदाचित शास्त्रींच्या मृत्युमध्ये काहीतरी काळेबोरे असल्याचे वाटले असणार. पण भारत सरकारने याचा पुढे गंभीरपणे पाठपुरावा केलाच नाही. शास्त्री यांच्या विरोधात विषबाधा झाली असेल या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला नाही.
३. भारतामध्ये वारंवार मागणी करण्यात येऊन सुद्धा शास्त्री यांच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी तत्कालीन सरकारांनी कधीच मान्य केली नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित मृत्यूच्या रहस्याचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या तपास आयोगाचे गठण करण्यात आले. पण ते भाग्य भारताच्या पंतप्रधान पदी राहिलेल्या लाल बहादुर शास्त्री यांच्या वाट्याला आले नाही. शास्त्री हे हृदयाचे रुग्ण होते. त्यांना १९६६ आधीही दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे भारत सरकारच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा मृत्यू नैसर्गिक असण्याची शक्यता सुद्धा होती. पण लोकांच्या मनात असलेला संशय दूर करण्यासाठी निदान एकदा तरी या घटनेचा व्यवस्थित तपास करणे गरजेचे होते. सोव्हिएत युनियन तसेच इतर संबंधित देशांकडून या संबंधी माहिती मिळवून सत्याचा छडा लावणे गरजेचे होते. पण सरकारने असे काहीच न केल्याने सरकार काहीतरी लपवत आहे असा संशय बळावू लागला होता.
वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कधी मिळालीच नाहीत. सोव्हिएत युनियन सोबतचे संबंध बिघडतील या लंगड्या सबबीखाली भारत सरकार कोणत्याही प्रकारची चौकशी टाळत राहिले. त्यामुळेच की काय, श्री अनुज धर यांनी स्वतः या प्रकरणाचा जमेल तेवढा तपास २००९ मध्ये सुरू केला. शास्त्री यांच्या मृत्यूला तोपर्यंत ४३ वर्षे झाल्याने हे प्रकरण अनेकांच्या विस्मृतीत गेले होते. माहिती अधिकाराचा वापर करूनही त्यांना पुरेशी माहिती मिळण्यात अडचणी आल्या. पण निराश न होता चिकाटीने अनुज धर यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी लाल बहादुर शास्त्री यांच्या आकस्मिक मृत्यूशी संबंधित अनेक बाबी समोर आणल्या. शास्त्री यांच्या मृत्यूशी संबंधित तेव्हा अनेक कट-कारस्थानांचे सिद्धांत चर्चिले जायचे. त्यावर ही अनुज धर यांनी आपल्या पुस्तकात भाष्य केले आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे सिद्धांत खाली दिले आहेत:
१. शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA ने केली असा एक मजबूत मतप्रवाह त्या काळी होता. ६०च्या दशकात भारत सोव्हिएत युनियनच्या मदतीने अणुबॉम्बची निर्मिती करत असल्याचा संशय असल्याने ते थांबवण्यासाठी CIA ने शास्त्री यांची हत्या केली अशी चर्चा होती. पण कालांतराने अमेरिकेने उघड केलेल्या गोपनीय कागदपत्रांच्या अभ्यासावरुन असा निष्कर्ष निघाला की अमेरिकेला शास्त्रींच्या बाबतीत आत्मीयता होती आणि ते अण्वस्त्र निर्माण करतील असे अमेरिकेला वाटत नव्हते. तसेच अमेरिकेने ताश्कंद कराराचे स्वागत केले होते. त्यामुळे अनुज धर शास्त्रींच्या मृत्युमागे CIA चा हात असल्याचा सिद्धांत नाकारतात.
२. त्याकाळी भारतातील काही लोकांना शास्त्री यांच्या मृत्युमागे सोव्हिएत युनियनचा हात असल्याचा संशय होता. १९६५च्या युद्धानंतर अमेरिका आणि ब्रिटन यांचे प्रयत्न अपयशी ठरले असताना सोव्हिएत युनियनचे प्रमुख नेते कोसिजिन यांनी तहासाठी भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यात यश मिळवले होते. त्यामुळे कोसिजीन यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणात वजन आणि प्रतिष्ठा वाढली होती. दुसरीकडे देशांतर्गत दबावामुळे शास्त्री भारतात परतल्यावर करारापासून घुमजाव करतील अशी शक्यता पण व्यक्त होत होती. असे झाले असते तर सोव्हिएत युनियन आणि कोसिजिन यांचे हसू झाले असते. त्यामुळेच सोव्हिएत युनियननेच शास्त्री यांची हत्या केली असाही एक सिध्दांत त्याकाळी मांडला गेला. पण आपल्या देशात बोलावून एका यशस्वी तह परिषदेनंतर पाहुण्या देशाच्या प्रमुखाची हत्या केली जाईल ही शक्यताच असंभव वाटते. तसेच सोव्हिएत युनियन ने शास्त्री यांच्या शव चिकित्सेची तयारी दाखवली होती. सोव्हिएत युनियन ने शास्त्री यांची हत्या केली असती तर त्यांनी शवाचिकित्सा करण्याची तयारी दाखवली नसती. तसेच KGB ने विषबाधेच्या संशयाखाली काही लोकांना अटक ही केली होती. त्यामुळे सोव्हिएत युनियनचा हात शास्त्री यांच्या मृत्यू मागे असण्याची शक्यता अनुज धर नाकारतात.
३. डिसेंबर १९७० मध्ये एका संसद सदस्याने राज्यसभेत चर्चेदरम्यान शास्त्री यांच्या मृत्यू मागे इंदिरा गांधी यांचा हात असल्याचा थेट आरोप केला. शास्त्री यांच्यामुळे इंदिरा गांधींना पंतप्रधान होता येत नव्हते. त्यामुळे त्यांनीच शास्त्री यांची हत्या करवली असा आरोप पण केला गेला. पण मुळात ठिसूळ पायावर उभ्या असलेल्या या सिद्धांतांमध्ये इतक्या त्रुटी होत्या की इंदिरा गांधी यांच्यावर असे आरोप करणे म्हणजे त्यांच्या स्मृतींचा अपमान केल्यासारखे होईल असे स्पष्ट मत अनुज धर आपल्या पुस्तकात मांडतात.
शास्त्री यांच्या मृत्यू नंतर त्याचा संबंध नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडण्याचा प्रयत्नही काही लोकांनी केला. पण नेताजी यांचे रहस्य पूर्णपणे उलगडले नसल्याने १९६६ मध्ये नेताजी जिवंत होते का? आणि होते तर ते त्या वेळी ताश्कंद मध्ये उपस्थित होते का? हे सांगणे अवघड आहे.
लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यू चे प्रकरण तत्कालीन सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळले हे स्पष्ट आहे. पण भारतातील सर्वात विवादास्पद प्रकरणापैकी एक असलेले शास्त्री यांचे मृत्यू प्रकरण आज ५५ वर्षांनी देखील सुटण्याची आशा अनुज धर बाळगतात. त्यासाठी ते पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्याची शिफारस आपल्या पुस्तकात करतात. ही समिती शास्त्री यांच्या मृत्यू ची सर्वंकष चौकशी करेल. असे खरेच होईल तो सुदिन! अशी चौकशी होऊन त्यातून सत्य बाहेर आल्यास ती लाल बहादुर शास्त्री यांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. एकदा वाचलेच पाहिजे असे श्री अनुज धर यांचे पुस्तक.