हडप्पा संस्कृती चे वर्षानुवर्षे जपलेले एक रहस्य – रक्तधारेचा अभिशाप

राग, लोभ, इर्ष्या, मत्सर हे मानवी स्वभावाचे महत्वाचे पैलू आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात हे गुण असतातच. पण चांगल्या गुणांपेक्षा ज्यावेळी अवगुण हे जास्त प्रभावी होऊ लागतात त्यावेळी कोणताही मनुष्य सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो आणि मग त्याचे आणि त्या समाजाचे अध:पतन निश्चित असते. ई.स पूर्व १७००च्या सुमारास त्याकाळी भारतातील (आणि कदाचित जगातील काही मोजक्या संस्कृतींपैकी एक) प्रगत, सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध अशी हडप्पा संस्कृतीही याला अपवाद ठरली नाही. हडप्पा संस्कृतीला मध्यवर्ती ठेवून इतिहास, पौराणिक कथा, धर्म आणि अपराध यावर आधारित सत्य आणि कल्पना यांचे बेमालूम मिश्रण करून लेखक विनीत बाजपयी यांनी ‘हडप्पा- रक्तधारेचा अभिशाप‘ ही एक अत्यंत उकंठावर्धक कादंबरी लिहिली आहे. मूळ इंग्रजीतील या कादंबरीचा मराठी अनुवाद श्री सौरभ उमेशचंद्र भुंजे यांनी केला आहे. हडप्पा संस्कृतीचे वर्षानुवर्षे जपलेले एक रहस्य लेखक उलगडून सांगत आहे.  

हडप्पा
वर्षानुवर्षे जपलेले हडप्पा संस्कृतीचे एक रहस्य

विद्युत नावाचा एक तरूण उद्योजक नवी दिल्ली मध्ये एक कॉर्पोरेट सेक्युरिटी कंपनी चालवत असतो. त्याला एके दिवशी वाराणसीतील देव-राक्षस मठाचे प्रमुख द्वारका शास्त्री (जे त्याचे पणजोबा असतात) यांच्याकडून बोलावणे येते. द्वारकाशास्त्री वयोमानानुसार थकलेले असतात आणि हे जग सोडून जाण्यापूर्वी पिढ्यान-पिढ्या उराशी बाळगलेले एक रहस्य त्यांना विद्युतला सांगायचे असते. द्वारकाशास्त्रींच्या मते हे रहस्य आजपर्यंतच्या अनेक प्रस्थापित समजूती आणि इतिहासाला धक्का देणारे ठरणार होते. विद्युत वाराणसीला त्यांच्या मठात पोचल्यावर द्वारका शास्त्री त्याला सर्वप्रथम ‘हडप्पा‘ बद्दल सांगतात. आतापर्यंत शाळेत शिकवलेल्या व सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या ‘हडप्पा‘विषयी माहितीच्या एकदम विरूद्ध माहिती द्वारका शास्त्री सांगू लागतात तेव्हा विद्यूत एकदम स्तिमित होऊन जातो. 

द्वारका शास्त्रीयांनी सांगितल्यानूसार हडप्पा हे लोकशाही शासन व्यवस्था असलेले एक प्रगत आणि सुसंस्कृत राज्य होते. तेथे विवास्वन नावाचा एक शूर, ज्ञानी आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेला एक पुजारी राहत होता. त्याला प्राचीन शास्त्र, मंत्र, श्लोक, वेद, निसर्गविज्ञान आणि अध्यात्माचे सखोल असे ज्ञान होते. आपल्या पराक्रम आणि बुद्धीच्या बळावर त्याने अनेक वेळा हडप्पाला अनेक संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढले होते. म्हणूनच त्याला हडप्पामध्ये पृथ्वीवर जन्मलेली शेवटची देवता असे मानले जायचे. अशा या विवास्वनला हडप्पामधील सर्वोच्च अशी याजक परिषद हडप्पाचा मुख्य याजक म्हणून निवडते. (हडप्पाचा मुख्य याजक म्हणजे कदाचित आजच्या आजच्या काळातला राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान असे आपण मानू शकतो.) पण त्याच वेळी दुसरीकडे त्याचा मेहुणा आणि हडप्पामधील (विवास्वन नंतरची) दुसरी सर्वात प्रभावशाली व्यक्ती चंद्रधरची पत्नी प्रियंवदा मात्र विवास्वनचा मत्सर करत असते. ही प्रियंवदा मोहोंजदारोची राजकन्या असते आणि म्हणूनच आपण हडप्पाचीही महाराणी बनावे अशी तिची महत्वाकांक्षा असते. पण हडप्पा मध्ये लोकशाही शासनव्यवस्था असल्याने आणि विवास्वन जिवंत असेपर्यंत आपली ही महत्वाकांक्षा कदापिही पूर्ण होणार नाही याचीही तिला जाणीव असते.

हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती

म्हणून प्रियंवदा विवास्वनला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी मेसोपोटेमिया मधून (आजचा इराक) तीन काळी जादू करणार्‍या तांत्रिकना बोलावते आणि विवास्वन विरूद्ध कारस्थान रचते. त्यानूसार हडप्पामधील सर्वात सुंदर नर्तिका असलेल्या नयनताराच्या खुनाच्या खोट्या आरोपाखाली विवास्वनला अडकवण्यात येते. पण विवास्वनचा प्रभाव पाहता एवढेच पुरेसे नसल्याने प्रियंवदा त्या तीन मांत्रिकांकरवी हडप्पामधील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित करते. यामुळे सर्व हडप्पावासीय भ्रमित होऊन जातात. त्यांच्यातील सद्गुणांची जागा अवगुण घेतात आणि एकेकाळी अत्यंत सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध असलेल्या हडप्पामध्ये सर्वत्र अराजक माजते. आपल्या पत्नीचे हे कट-कारस्थान कळल्यानंतरही चंद्रधर काही करू शकत नाही कारण बाहेर तो कितीही शूर, पराक्रमी आणि बुद्धिमान असला तरी त्याचे आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम असते. त्यामुळे विवास्वनचा अत्यंत घनिष्ट मित्र आणि नातेवाईक असूनही चंद्रधर मूकपणे पत्नीच्या कारस्थानात सामील होतो. विवास्वनला नयनताराच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करून त्याच्यावर खटला चालवला जातो. ज्यादिवशी विवास्वनला हडप्पाचा मुख्य याजक म्हणून शपथ घ्यायची असते त्याच दिवशी तो गुन्हेगार म्हणून न्यायालयात उभा असतो. अखेर त्याला त्याच्या या कथित गुन्ह्यासाठी शिक्षा होते. त्याचा पूत्र मनू मात्र एक रहस्य उराशी बाळगून लपून राहतो.  

ही सर्व कथा सांगताना द्वारकाशास्त्री विद्यूतला सांगतात की ते आणि विद्यूत हे विवास्वनचेच वंशज आहेत आणि मनू कडे असलेले ते रहस्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी विद्यूतची आहे. त्याचबरोबर ते हडप्पाबद्दल वर्षानुवर्षे चालू असलेल्या अपप्रचाराबद्दल विद्यूतला माहिती देतात. ते सांगतात की ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक आर्यांच्या आक्रमणामध्ये हडप्पाचा विध्वंस झाल्याची खोटी माहिती इतिहासात पेरली आणि हडप्पाचा खरा इतिहास भारतीय जनतेसमोर येणार नाही याची दक्षता घेतली. कारण ब्रिटिशांना आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताच्या आडून भारतीय जनतेच्या मनावर त्यांचे मागासलेपण आणि पश्चिमेकडील गोर्‍या लोकांचे  (आर्यांचे) श्रेष्ठत्व बिंबवायचे होते. यामुळे त्यांना प्रचंड अशा भारतावर विनासायास राज्य करणे सोपे जाणार होते. सरस्वती नदीच्या किनार्‍यावर विकसित झाल्याने हडप्पा ही ‘सरस्वती संस्कृती‘ होती. पण ब्रिटिशांनी तिचे जाणीवपूर्वक ‘सिंधू संस्कृती‘ असे नामकरण केले.असे द्वारका शास्त्रींचे ठाम मत होते. वर्षानुवर्षे प्रस्थापित झालेला पाश्चातांचा हा अपप्रचार भारतीय जनतेच्या मनातून मिटवणे सोपे नसले तरी ते करणे आवश्यक आहे असेही द्वारकाशास्त्री विद्यूतला पटवून देतात. 

हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृतीचा विस्तार

वाराणसी मध्ये या मठात हडप्पाविषयी हा विचार विमर्श चालू असताना दूर पॅरिस मध्ये हडप्पाचे हे रहस्य काहीही करून उजेडात येऊ नये म्हणून हालचाली सुरू झालेल्या असतात. मास्केरा बियांका नावाचा एक रहस्यमय माणूस रोमी नावाच्या एका निष्णात मारेकर्‍याला विद्यूतची हत्या करण्यासाठी वाराणसीला पाठवतो. या रोमीची पहिली योजना द्वारका शास्त्रींच्या ‘दिव्य’ ज्ञानामुळे उधळली जाते आणि त्यांना या रहस्यामुळे पुढे होणार्‍या रक्तरंजित संघर्षाची चाहूल लागते. द्वारका शास्त्री आणि त्यांचा संपूर्ण मठ वर्षानुवर्षाच्या या रहस्याच्या आणि पर्यायाने विद्यूतच्या रक्षणासाठी सज्ज होतात. कारण विद्यूतही आजच्या जमान्यात देवतेचाच अवतार असतो. विवास्वन प्रमाणे तो सुद्धा एक ‘अर्ध मानव अर्ध देवता’ असतो.

दूर युरोपात जगातील शक्तीशाली अशा धर्मसंस्थेला या रहस्याची एवढी भीती का वाटत असते ज्यामुळे ते विद्यूतला मारण्यासाठी मारेकरी पाठवतात?अखेर हे रहस्य असते तरी काय? अशी कोणती गोष्ट आहे जी वाराणसी, हडप्पा आणि रोम ला एकत्र जोडते? अवाढव्य अशा हडप्पा संस्कृतीच्या अस्तामागचे भयंकर सत्य काय आहे? लेखक हे पुस्तक या सर्व प्रश्नांपाशी आणून संपवतो आणि मंत्रमुग्ध झालेला वाचक मात्र या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी या पुस्तकाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहू लागतो. प्राचीन, मध्ययुगीन आणि वर्तमानातील विविध घटनांची सांगड घालत कपट आणि हिंसा, देव व राक्षस, प्रेम आणि महत्वाकांक्षा यांनी परिपूर्ण अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी एकदा तरी नक्की वाचावी अशीच आहे.             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *