जानेवारी १९७८ ला काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष के ब्रम्हानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींची काँग्रेस मधून हकालपट्टी केली. काँग्रेस पक्षात फूट पडली आणि याचा मोठा तोटा इंदिरा गांधींना झाला. दोन गटांच्या भांडणात निवडणूक आयोगाने काँग्रेसचे तोपर्यंतचे निवडणूक चिन्ह गाय वासरू कायमचे गोठवले आणि बुटासिंग यांना इंदिरा काँग्रेस साठी नव्या चिन्हासाठी हत्ती, सायकल आणि हाताचा पंजा असे तीन पर्याय दिले. त्यावेळी इंदिरा गांधी नरसिंह राव यांच्या सोबत आंध्र प्रदेशात होत्या. त्यांची इच्छा जाणून घेण्यासाठी बुटासिंग यांनी इंदिरा गांधींना ट्रंक कॉल लावला. बुटासिंग यांच्या जड हिंदी उच्चारामुळे आणि टेलिफोनची लाईन साफ नसल्याने इंदिरा गांधी यांना ‘हात’ चा उच्चार ‘हाथी’ असा ऐकू येऊ लागला. इंदिरा गांधींना काहीच समजेना आणि अखेर वैतागून त्यांनी फोन नरसिंग रावांकडे दिला आणि डझनभर भाषांवर प्रभुत्व असलेल्या रावांना बुटा सिंग ना काय म्हणायचे आहे ते कळले. त्यांनी तेच इंदिरा गांधींना सांगितले आणि अशा प्रकारे ‘हाताचा पंजा’ हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बनले.
जवाहरलाल नेहरूंपासून ते आतापर्यंत काँग्रेसची वाटचाल कशी झाली हे जाणून घेण्यासाठी रशीद किडवई यांनी लिहिलेले ‘२४, अकबर रोड’ हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष कसा चालतो? त्याचे नेते परस्परांशी कसे वागतात देशाविषयी राजकारणाविषयी ते कशा पद्धतीने विचार करतात? हे सर्व हे पुस्तक वाचून कळते.
एक आवर्जून वाचावे असे पुस्तक.
पुस्तकाचे नाव – २४ अकबर रोड
मूळ लेखक – रशीद किडवई
अनुवाद – सुरेश भटेवरा
पब्लिकेशन्स – चिनार पब्लिशर्स