आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक

प्रस्तावना

‘आम्ही दोघांनी मिळून काल्पनिक गोष्टी जरी लिहिल्या, तर त्यावर सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही.” ‘The Spy Chronicles: RAW, ISI and the Illusion of Peace’ हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना समोर आली तेव्हा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय चे माजी प्रमुख जन. असद दुर्राणी यांनी वरील प्रतिक्रिया दिली. खरेच आयएसआय आणि भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ यांचे माजी प्रमुख अनुक्रमे जन दुर्राणी आणि अमरजीत सिंग दुलत यांनी म्हणजेच आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे एखादे पुस्तक लिहावे ही कल्पनाच अचंबित करणारी! परंतु या पुस्तकाच्या रूपाने ती प्रत्यक्षात उतरली. हे महत्वाचे कार्य तडीस नेले पत्रकार आदित्य सिन्हा यांनी (जे या पुस्तकाचे तिसरे सहलेखक आहेत).

𝐓𝐡𝐞 𝐒𝐩𝐲 𝐂𝐡𝐫𝐨𝐧𝐢𝐜𝐥𝐞𝐬: 𝐑𝐀𝐖, 𝐈𝐒𝐈 𝐚𝐧𝐝 𝐭𝐡𝐞 𝐈𝐥𝐥𝐮𝐬𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 𝐏𝐞𝐚𝐜𝐞’- आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक

भारत-पाकिस्तान संबंध

भारत आणि पाकिस्तान कधीकाळी एक देश होते व आता स्वतंत्र देश असून एकमेकांचे शेजारी आहेत. दोन्ही देशांच्या संबंधात नेहमी कमी अधिक प्रमाणात नेहमीच तणाव असतो. दोन्ही देशांमध्ये चार लढाया सुद्धा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख संयुक्तपणे एखादे पुस्तक लिहितात तेव्हा ते सनसनाटी घटनांनी भरलेले असेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा नक्कीच असेल. पण या बाबतीत हे पुस्तक पूर्णपणे निराशा करते. मुळात आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेले हे पुस्तक म्हणजे या दोन्ही माजी प्रमुखांमध्ये विविध विषयांवर झालेल्या चर्चांचा गोषवारा आहे. या दोघांनी भारत-पाकिस्तान संबंध, दहशतवाद, काश्मीर प्रश्न, अफगाणिस्तानचा प्रश्न, अमेरिका आणि रशियाच्या उपखंडातील भूमिका यासोबत इतर अनेक मुद्द्यांवर आपले मतप्रदर्शन केले आहे. हे पुस्तक वाचताना जाणवते ते म्हणजे या दोघांनी अनेक मुद्द्यांवर कोणतीही ठोस भूमिका न मांडता केवळ उथळ मतप्रदर्शन केले आहे. अर्थात माजी प्रमुख म्हणून ते एवढेच करू शकतात हेही तितकेच खरे!

आयएसआय आणि रॉ

आयएसआय पाकिस्तानमध्ये समांतर सरकार चालवते असे म्हटले जाते. त्यामुळेच अशा शक्तीशाली संघटनेचे प्रमुखपद भूषवलेल्या जन दुर्राणी यांना अनेक महत्वाच्या गोष्टी ठाऊक असणार याची अपेक्षा नक्कीच बाळगता येते. पण जन दुर्राणी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चक्क कानावर हात ठेवतात आणि फारशी माहिती नसल्याचे सांगतात. तीच गोष्ट दुलत यांची. कदाचित दोघांनाही काही गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतील. एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या या दोन्ही माजी प्रमुखांच्या या चर्चांमधून अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो पण त्यासोबतच या केवळ अनौपचारिक गप्पा असल्याने त्यातली मते ही किती गांभीर्याने घ्यायची हा प्रश्न पण उरतोच!

आयएसआय हे पाकिस्तानमधले छुपे सरकार आहे का या प्रश्नाला जन दुर्राणी थेट उत्तर न देता खुबीने बगल देतात आणि पाकिस्तानऐवजी इतर काही देशांमधल्या तथाकथीत छुप्या सरकारांकडे बोट दाखवतात. आयएसआय आणि रॉ यांच्यामधील तुलनेविषयी विचारले असता दोन्ही माजी प्रमुख एकमताने उत्तर देतात की दोन्हीही संस्था आपापल्या देशांसाठी एकदम व्यावसायिकपणे काम करतात आणि तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. यासोबतच त्यांनी इतर देशांच्या गुप्तचर संघटनांविषयी सुद्धा आपले मत व्यक्त केलेले आहे.

AS DULAT (LEFT) AND GEN DURRANI (RIGHT)

काश्मिर प्रश्न

काश्मिर प्रश्नावर दोघांच्या मते भारत आणि पाकिस्तानला “जैसे थे” परिस्थिती ठेवण्यातच रस असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलले जात नाहीत (दोघेही खासकरून दुलत या बाबतीत भारताच्या बाजूने सुरू असलेले प्रामाणिक प्रयत्न मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षितात). काश्मिरी राजकीय नेत्यांप्रमाणे हे दोघेही काश्मिर प्रश्न सोडवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेची भलामण करतात. मात्र काश्मिर मध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर दोघेही फारशी गंभीर चर्चा करत नाहीत. “दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत ” या मोदी सरकारच्या धोरणावर दोघेही टीका करतात. मात्र पाकव्याप्त काश्मिर मध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या, घुसखोरी, शस्त्रसंधीचे पाककडून वारंवार होत असलेले उल्लंघन इत्यादी विषयांवर मात्र ते अवाक्षर पण काढत नाहीत. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून दोन्ही देशांमध्ये अर्थपूर्ण संवाद कसा होईल याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी त्यांनी कदाचित वाचकांवर सोडली असावी. मुळात या पुस्तकातील काश्मिर प्रकरणात जन दुर्राणी पाकिस्तानच्या प्रत्येक (चुकीच्या!) कृतीचे समर्थन करतात आणि दुलत काही प्रमाणात त्यात वाहवत गेले हे वाचने खरंच दुर्दैवी वाटते. काश्मिरला समस्या म्हणणारे दुर्राणी बलुचिस्तानमध्ये मात्र आता तुलनेने शांतता असून पाकिस्तान हा त्यांच्यासाठी स्वातंत्र्य पेक्षा कमी वाईट पर्याय आहे असे म्हणतात. अनौपचारिक चर्चेतच का होईना पण दुलत यांनी अनेक अडचणीच्या मुद्द्यांवर जन दुर्राणी यांना घेरण्याची चांगली संधी गमावली असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

दहशतवाद आणि पाकिस्तान

या उथळपणामुळेच काश्मिरबद्दल या पुस्तकात जे काही लिहिले आहे ते केवळ त्यांचे मतप्रदर्शनच ठरते व वाचकांना त्यातून ठोस असे काहीच हाती लागत नाही. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधाचेही त्यांनी याच चष्म्यातून आकलन केल्याने तेथेही वाचकांची निराशाच होते. हाफिज सईद बाबतही दुर्राणी हातचे राखूनच बोलतात. तो पाकिस्तानात खुलेआम फिरत असताना व भारताविरोधात गरळ ओकत असताना जन दुर्राणी मात्र त्याच्या २६/११ च्या मुंबईवरील हल्यातील सहभागाविषयी अजून पुरावे पाहिजे म्हणून सांगतात (याच हाफिज सईद ला पाकिस्तानातील न्यायालयाने अवैध सावकारी प्रकरणात १९ नोव्हेंबर २०२० रोजी १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ही प्रामाणिकपणे केलेली कारवाई आहे की एफएटीएफ च्या कारवाई पासून वाचण्यासाठी केलेले एक नाटक आहे हे लवकरच स्पष्ट होईल).

पुलवामा हल्याचा मास्टरमाइंड असलेला मौलाना मसूद अझहर विषयी सुद्धा गुळमुळीत भूमिका घेणारे दुर्राणी चक्क असे म्हणतात की पाकिस्तानला त्याचा ठावठिकाणा ठाऊक नसून तेही त्याला अटक करण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत. इथे दुलत मात्र दुर्राणी यांचा खोटेपणा उघडा पाडण्याऐवजी त्यांच्या या मतावर विश्वास ठेवून म्हणतात की मग मसूद ला शोधण्यासाठी दोन्ही गुप्तचर संघटनांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. याद्वारे संयुक्त राष्ट्रात मसूद ला दहशतवादी घोषित करण्यामध्ये अडथळा ठरलेल्या चीनचे आपण नकळत समर्थन करत आहोत याचे भान सुद्धा दुलत यांना नसावे याचे आश्चर्य वाटते.

ओसामा बिन लादेन

अमेरिकेने ठार केलेल्या कुख्यात ओसामा बिन लादेन विषयी मात्र दुर्राणी वेगळा दावा करतात. त्यांच्या मते अमेरिकेने लादेनला ठार मारण्यापूर्वी तत्कालीन पाक लष्करप्रमुख जन कयानी यांच्यासोबत अनेक बैठका केल्या. दुर्राणी यांच्या मते या बैठकांमध्ये अमेरिकेने कयानी यांना लादेनच्या ठावठिकाणाविषयी आणि त्याला ठार मारण्याच्या योजनेविषयी कल्पना दिली. मात्र लादेनला ठार मारण्याचा लेखी आदेश देणारे तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘A Promised Land‘ या पुस्तकात स्पष्टपणे पाकिस्तानला अंधारात ठेवून ही कारवाई केल्याच स्पष्ट केले आहे. यावरून लादेन प्रकरणात पाकिस्तानची झालेली बेईज्जती लपवून पाक लष्कराला हिरो बनवण्याचा दुर्राणी यांचा केविलवाणा प्रयत्न लपून राहत नाही.

दुट्टपी पाकिस्तान

कुलभूषण जाधव, सर्जिकल स्ट्राइक इत्यादी अनेक मुद्द्यांवर या दोघा माजी प्रमुखांची चर्चा वाचल्यास वाचकांचा गोंधळच उडण्याची शक्यता अधिक!भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये चांगले संबंध असावेत आणि एकूणच भारतीय उपखंडात शांतता असावी याबाबत कोणाचेही दुमत नाही. पण त्यासाठी भारताप्रमाणे पाकिस्ताननेही प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाकिस्तानला दहशतवादावर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. पण या पुस्तकाचा एकूण रोख एकप्रकारे ‘पाकिस्तान दहशतवादावर निर्णायक कारवाई करणार नाही पण भारताने मात्र त्याकडे दुर्लक्ष करून संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा’ असाच आहे. भूतकाळात भारताने असे केले पण आहे पण प्रत्येकवेळी अशी अपेक्षा बाळगता येणार नाही.

आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेल्या या पुस्तकात बर्‍याच विषयांवर चर्चा विमर्श झाला असून त्यातून वाचकांना बरीच माहिती मिळते पण ती परिपूर्ण नाही. एखादा सिनेमा पोस्टरवरून ऍक्शनपट वाटावा पण प्रत्यक्षात मात्र सुमार दर्जाची प्रेमकथा असावी असे काहीसे या पुस्तकाच्या बाबतीत झाले आहे. सातत्याने तणावपूर्ण संबंध असणार्‍या दोन शेजारी देशांच्या माजी गुप्तहेर प्रमुखांना एकत्र आणून त्यांना अनेक विषयांवर बोलते करणे (अनौपचारिक का होईना) नक्कीच सोपे काम नाही. त्यामुळे हे शिवधनुष्य पेलणार्‍या आणि ते यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या पत्रकार आदित्य सिन्हा यांचे नक्कीच अभिनंदन केले पाहिजे. कोणत्याही ठरावीक गोष्टीचे आकलन अनेक व्यक्ती अनेक प्रकारे करू शकतात.पण माझ्या मते अनेक विषयांवर अजून अर्थपूर्ण चर्चा करून अनेक ठोस उपाय सूचवणे दोन्ही माजी प्रमुखांना शक्य होते. परंतु दोघांनीही काही अपवाद वगळता केवळ वरपांगी चर्चा करून एक मौल्यवान संधी गमावली हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

𝐓𝐡𝐞 𝐒𝐩𝐲 𝐂𝐡𝐫𝐨𝐧𝐢𝐜𝐥𝐞𝐬: 𝐑𝐀𝐖, 𝐈𝐒𝐈 𝐚𝐧𝐝 𝐭𝐡𝐞 𝐈𝐥𝐥𝐮𝐬𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 𝐏𝐞𝐚𝐜𝐞’- आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *