Eagles over Bangladesh – भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम

१६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच सी दिवाण यांनी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए ए के नियाजी (ज्यांनी पाकिस्तान तर्फे आत्मसमर्पणाच्या कागद पत्रावर स्वाक्षरी केली होती) यांना विचारले की तुमच्याकडे अजून काही काळ युद्ध करता येईल इतके सैन्य असताना तुम्ही आत्मसमर्पण का केले? त्यावेळी जनरल नियाजी यांनी दिवाण यांच्या युनिफॉर्म वरील पायलटच्या विंग (Flying Badge) कडे इशारा करत सांगितले, ‘याच्यामुळे आम्हाला आत्मसमर्पण करावे लागले. भारतीय हवाई दलामुळे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना दिवस असो वा रात्र, अक्षरशः विश्रांती मिळालीच नाही. तुमच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आणि थोडी विश्रांती मिळावी यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी आम्ही वारंवार आमची राहण्याची ठिकाणे बदलली. पण आम्हाला हवी तशी सुरक्षित जागा कधी मिळालीच नाही’.

१९७१ च्या युद्धामध्ये भारतीय हवाई दलाने निर्णायक भूमिका बजावली होती. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी कोलकाता, हासिमारा, गुवाहाटी, अगरतळा, बागडोगरा इत्यादी ठिकाणांहून पूर्व पाकिस्तान मध्ये तुफानी हल्ले चढवले. पाकिस्तानी हवाई दलाला पूर्णपणे निष्प्रभ करत जमिनीवरील पाकिस्तानी सैन्यावर आकाशातून आग ओकत भारतीय सैन्याचा ढाक्याला जाण्याचा मार्ग सुकर केला. मालवाहू विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी थलसेनेच्या जवानांना युद्धभूमीवर पोचवले, जखमी सैनिकांना वेळेत दवाखान्यात पोचवले आणि बंगाली निर्वासितांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी पोचवले.

भारताचे लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ पाकिस्तानी लष्कराला आत्मसमर्पण करण्याचा इशारा देत असताना पाकिस्तान मात्र शस्त्रसंधी साठी आग्रही होता. यासाठी पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर मलिक ढाक्यामधील संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकाऱ्यांसोबत गव्हर्नर हाऊस मध्ये एक बैठक घेत होते. मात्र भारतीय हवाई दलाने याच गव्हर्नर हाऊस वर हल्ला चढवून पाकिस्तानला ‘शस्त्रसंधी’चा आग्रह सोडून संपूर्ण ‘आत्मसमर्पण’ करण्यास भाग पाडले.

हवाई युद्ध कसे असावे याचा आदर्श परिपाठ भारतीय हवाई दलाने या युद्धामध्ये दाखवून दिला ज्याचा अभ्यास आजही लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये केला जातो. या युद्धामध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिकारी आणि जवानांना एकूण दोन महावीर चक्र, सव्वीस वीर चक्र आणि अठरा वायू सेना मेडल ने गौरवण्यात आले. भारतीय हवाई दलाची १९७१ च्या युद्धातील पराक्रमाची संपूर्ण गाथा जाणून घेण्यासाठी श्री जगन मोहन आणि समीर चोप्रा यांनी लिहिलेले ‘Eagles over Bangladesh‘ हे पुस्तक आवर्जून वाचा.

पुस्तकाचे नाव -‘Eagles over Bangladesh’

लेखक – जगन मोहन आणि समीर चोप्रा

पब्लिकेशन्स – हार्पर कॉलिन्स Publishers.

Eagles over Bangladesh - भारतीय हवाई दलाचा  १९७१ च्या युद्धातील पराक्रम
Eagles over Bangladesh

हे पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *