ऑपरेशन कोह पैमा
“पहिल्या टप्प्यात आपण मुजाहिद्दीन आणि सैन्याला काश्मीरमधील कारगिल येथे घुसवून महत्त्वाच्या शिखरांच्या वर कब्जा करू. हा टप्पा आपण याआधीच पूर्ण केला आहे.
दुसऱ्या टप्प्यात आपण मुजाहिदीनना (पाक सैन्याला) जम्मू आणि लडाख मध्ये घुसवून तेथे बंडखोरी घडवून आणू.
तिसरा टप्पा त्यावेळी चालू होईल ज्यावेळी जम्मू व लडाख मधील बंडखोरीमुळे दबावात येऊन भारत सरकार आपले सैन्य लडाख आणि जम्मूकडे वळवतील आणि त्यामुळे श्रीनगर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याची उपस्थिती कमी असेल.
चौथ्या टप्प्यात पाकिस्तान मोठ्या संख्येने मुजाहिदीनना आता भारतीय सैन्य कमी संख्येने उपस्थित असलेल्या काश्मीर खोऱ्यात पाठवेल आणि मनिहाल पास (जो जम्मूला श्रीनगरशी जोडतो) आणि जोझीला पास (जो लडाखला काश्मीर खोऱ्याशी जोडतो) ब्लॉक करेल आणि त्यामुळे भारतीय सैन्याचा काश्मीर खोऱ्यात येण्याचा मार्ग रोखला जाईल.
शेवटच्या पाचव्या टप्प्यात भारतीय सैन्य आणि भारत सरकार हे गुडघ्यावर आलेले असेल आणि पाकिस्तानशी चर्चेसाठी भीक मागत असेल”
१७ मे १९९९ रोजी पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वरील शब्दात ऑपरेशन कोह पैमा (कारगिल मधील पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरी) बद्दल माहिती दिली. तसेच “सैन्याच्या या मोहिमेमुळे तुमच्या कार्यकाळात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे ज्यामुळे तुमचे नाव पाकिस्तानी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मोहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तानचे निर्माते म्हणून ओळखले जाते तर तुम्हाला ‘फतेह ई काश्मीर’ (काश्मीरचा मुक्तिदाता) म्हणून ओळखले जाईल”. असे म्हणत नवाझ शरीफ यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यात आले. आपल्या या स्तुतीने हुरळून गेलेल्या शरीफ यांना विसर पडला की कारगिलची ही मोहीम त्यांना म्हणजेच देशाच्या पंतप्रधानांना न विचारताच सुरू करण्यात आली होती.
शरीफ आणि वाजपेयी लाहोर जाहीरनाम्याद्वारे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असताना इकडे ऑक्टोबर १९९८ पासूनच पाकिस्तानी सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी सुरू केली होती. पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न असल्याने ही घुसखोरी उघडकीस आली तरी भारत तीव्र प्रत्युत्तर देणार नाही असा पाक सैन्याचा होरा होता. पण ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत ज्यावेळी भारतीय सैन्याने पाक सैन्याला दणके द्यायला सुरुवात केली त्यावेळी मात्र त्यांची भंबेरी उडाली. जगभरातून पाकिस्तानवर टीका करण्यात आली आणि माघारीसाठी दबाव टाकण्यात येऊ लागला. भारतीय सैन्याचा तीव्र प्रतिकार आणि जागतिक दबाव यामुळे पाकिस्तानने माघार घेतली खरी पण अखेरपर्यंत कारगिलच्या या घुसखोरीला काश्मीरच्या समस्येशी जोडण्याचा आटोकाट प्रयत्न पाकिस्तानी सरकारने केला पण त्याला जागतिक पातळीवर कोणीही दाद दिली नाही.
कारगिल मध्ये पाकिस्तानच्या झालेल्या फजिती नंतर पाकिस्तानातील सत्ताकारणानेही वेगळे वळण घ्यायला सुरुवात केली. सैन्यातील उच्च नेतृत्व यासाठी उघड उघड जबाबदार असतानाही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सुरुवातीला त्याविरुद्ध कोणतीही भूमिका घेणे टाळले. पण अखेर त्यांनी जनरल मुशर्रफ यांना बडतर्फ करण्याचा प्रयत्न केला जो त्यांच्याच अंगलट घेऊन पाकिस्तानात लष्कराने सत्ता आपल्या ताब्यात घेतली.
पाकिस्तानी लेखिका नसीम झेहरा या सर्व घडामोडी आपल्या ‘From Kargil to the Coup – Events that shook Pakistan’ या पुस्तकात मांडल्या आहेत. यातील काही गोष्टींशी कोणताही भारतीय कधीही सहमत होणार नाही. जसे काश्मीरला ‘भारतव्याप्त काश्मीर’ म्हणणे, दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक संबोधने इत्यादी इत्यादी. पण कोणताही पाकिस्तानी व्यक्ती असेच करेल हे लक्षात घेतले की या मग याकडे दुर्लक्ष करायला सोपे होते. पण लेखिकेचे कौतुक यासाठी की त्यांनी निर्भिडपणे कारगिल मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला हे आपल्या पुस्तकात मांडले (कारण पाकिस्तानी सैन्याच्या मते ते कारगिल मध्ये जिंकत होते पण पाकिस्तानी सरकारमुळे त्यांना माघार घ्यावी लागली).
या सर्वांमध्ये एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे – कारगिल मोहिमेला अखेर मंजुरी दिली कोणी?
पुस्तकाचे नाव – ‘From Kargil to the Coup – Events that shook Pakistan’
लेखक – नसीम झेहरा
भाषा – इंग्रजी
पब्लिकेशन्स – Sang-e-Meel Publications.