द रोझाबल लाईन – एक रहस्यमय धार्मिक कादंबरी

द रोझाबल लाईन हे एक धार्मिक रहस्य लपवून ठेवलेलं ठिकाण. काय होते हे रहस्य? रोमन कॅथलिक चर्च जगभरातील ख्रिश्चन नंबर धर्माचा गाढा प्रभाव कायम राहावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी काहीही (अगदी काहीही) करायची त्यांची तयारी असते. तर दुसरीकडे असतात इल्युमिनाटी. मे १७७६ मध्ये जर्मनीतील बव्हेरियात सर्वप्रथम स्थापन झालेला हा गुप्त गट लोकांवरील चर्चचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याच अनुषंगाने इल्युमिनाटीना काही संकेत मिळतात की येशू ख्रिस्त यांचा मृत्यू क्रुसावर झाला नव्हता. त्यातून ते बचावले होते आणि त्यानंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी भारतातील काश्मीर येथे व्यतीत केले. त्यांनी लग्न केले आणि त्यांची वंशावळ ही पुढे वाढत गेली.

अर्थात हे सत्य जगासमोर आले असते तर रोमन कॅथलिक चर्चच्या प्रभावाला सुरूंग लागला असता आणि म्हणूनच व्हॅटिकनला काहीही करून हे थांबवायचे असते. प्रसंगी ते त्यासाठी इस्लामी दहशतवाद्यांशीही हातमिळवणी करतात. भारताचे डॅन ब्राऊन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विन सांघी यांनी लिहिलेली ‘द रोझाबल लाईन’ ही धर्मावर आधारित रहस्यमय आणि काल्पनिक कादंबरी अनेक शतकांमधून व खंडामधून उलगडत जाते तेव्हा तुम्ही स्तिमित होऊन जाता.

द रोझाबल लाईन
द रोझाबल लाईन – इल्युमिनाटी संघटनेचे चिन्ह

लंडनमधील एका ग्रंथालयात एक खोका सापडतो. ग्रंथपाल तो खोका उघडतात त्यावेळी त्यांना त्यामध्ये लंडनमधीलच प्राध्यापक असलेल्या टेरी अॅक्टन यांचे शीर सापडते. टेरी अॅक्टन हे लंडन विद्यापीठात धर्मशास्त्राचे प्राध्यापक असतात. जगभरातील विविध धर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या हाती येशु ख्रिस्ताविषयी एक स्फोटक सत्य सांगणारा दस्तऐवज सापडतो. त्यानुसार येशू ख्रिस्त यांचा क्रुसावर मृत्यू झाला नव्हता. त्यातून वाचून ते काश्मीरला गेले होते. कारण काश्मीरमध्ये प्राचीन काळी इस्त्राईल मधून हरवलेल्या दहा ज्यू जमाती राहत होत्या आणि येशू ख्रिस्त स्वतः ज्यू होते.

याच दिशेने टेरी अॅक्टन यांचे संशोधन चालू असतानाच व्हॅटिकन मध्ये धोक्याची घंटा वाजते. कारण येशू ख्रिस्त हे क्रुसावर मरण पावले ही कथा वर्षानुवर्षे ख्रिश्चन श्रद्धाळू समाजावर बिंबवून रोमन कॅथोलिक चर्चने जनतेवर धर्माचा प्रभाव कायम राहील याची तजवीज केली होती. पण टेरी अॅक्टन यांचे संशोधन यशस्वी होऊन ते जगासमोर आल्यास ख्रिश्चन लोकांचा चर्चवरचा विश्वास उडून गेला असता आणि हेच इल्युमिनाटींना हवे होते. म्हणूनच व्हॅटिकनची एक गुप्त संघटना क्रक्स डेक्यूसाटा पर्म्युटा ही टेरी अॅक्टन यांना ठार मारते.

पण मृत्यूपूर्वी टेरी अॅक्टन यांनी तो गोपनीय दस्ताऐवज एका अमेरिकन प्रिस्ट फादर विन्सेंट सिंक्लेयर यांना दिलेला असतो आणि त्यावर पुढे संशोधन करण्याची विनंती केलेली असते. फादर सिंक्लेयर यांना परिचित माणसांची अस्वस्थ करणारी दृश्य स्वप्नामध्ये दिसत असतात. फक्त ही दृश्य व त्यातली लोकं कुठल्यातरी दुसऱ्याच काळातली आहेत असे त्यांना वाटत असते. या सर्व दृश्यांचा अर्थ लावण्यासाठी तसेच टेरी अॅक्टन यांनी दिलेल्या त्या दस्तऐवजावर पुढील संशोधन करण्यासाठी फादर सिंक्लेयर आपली आत्या मार्था सोबत भारतात येतात. पण त्यांच्यावरही क्रक्स डेक्यूसाटा पर्म्युटा ही गुप्त संघटना नजर ठेवून असते आणि त्यांच्या हत्येचीही योजना आखली जात असते.

द रोझाबल लाईन
द रोझाबल लाईन – येशू ख्रिस्त

टेरी अॅक्टन, फादर सिंक्लेयर आणि एकूणच इल्युमिनाटिंकडून येशु ख्रिस्ताच्या स्फोटक सत्यावर चालू असणाऱ्या प्रयत्नामुळे व्हॅटिकनचे कार्डिनल व्हेलेरिओ चिंतेत असतात. ख्रिश्चन समाजाचा धर्मावर विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचा पवित्र ग्रंथ बायबल मध्ये जे सांगितले आहे तसे होणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत असते. पवित्र बायबलच्याबुक ऑफ रिव्हीलेशन मध्ये विविध प्रकारे पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसाचे वर्णन केले असते आणि जगातील अंतिम लष्करी कारवाई सध्याच्या इस्त्राईलमधील तेल मेगिदो मध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. बायबल मधील हे कथन तंतोतंत खरे करण्यासाठी व्हॅलेरिओ इस्लामी दहशतवादी बिन लादेनची मदत घेतात.

लादेनच्या मार्गदर्शनाखाली गालिब या दहशतवाद्याने स्वतःला ‘लष्कर-ए-तलतशार’ म्हणणारे १३ जणांचे सैन्य बनवलेले असते. हे १३ दहशतवादी बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे जगातील वेगवेगळ्या भागात विध्वंस घडवून आणतात. त्यांचा प्रमुख गालिब हा इस्त्रायल मधील तेल मेगिदो मध्ये अणुबॉम्बचा स्फोट घडवून आणणार असतो. यामुळे इस्लामी दहशतवाद वाढणार होता आणि त्यामुळे साहजिकच ख्रिश्चन समाज स्वतःला अधिक असुरक्षित समजणार होता. परिणामी लोक धर्माचे निस्सीम भक्तही बनणार होते. म्हणूनच व्हॅलेरीयो गालिबच्या यशासाठी मनोमन प्रार्थना करत होते. गालिब यशस्वी होतो का? हे पुस्तकात वाचणे मनोरंजक आहे.

द रोझाबल लाईन
पवित्र बायबल

इकडे येशु ख्रिस्ताच्या सत्याचा शोध घेण्यासाठी फादर सिंक्लेयर कसून शोध घेत असतात. दरम्यान त्यांच्या अपहरणाचा आणि त्यांना ठार मारण्याचा क्रक्स डेक्क्यूसाटा पर्म्युटाचा प्रयत्नही अयशस्वी होतो. टेरी अॅक्टन यांनी कागदपत्रावरून शोध घेता घेता फादर सिंक्लेयर गोवा मार्गे अखेर काश्मीरमध्ये श्रीनगरला पोहोचतात. तिथे त्यांना रोझाबल कबर येथे एक प्राचीन कागदपत्र मिळते. त्यावरून येशुने क्रुसावरून वाचल्यानंतर उर्वरित आयुष्य काश्मीरमध्ये व्यतीत केल्याचे सिद्ध होत होते. याच कागदपत्राचा इल्युमिनाटी अनेक शतके शोध घेत होते कारण या कागदपत्राच्या पायावरच इल्युमिनाटी या ख्रिस्त विरोधी संस्थेची स्थापना करण्यात आलेली असते. मग इल्युमिनाटी तो कागद फादर सिंक्लेयर कडून मिळवण्यात यशस्वी होतात का?

चर्चचा प्रभाव कमी करण्यात इल्युमिनाटी यशस्वी होतात का? गालिब तेल मेगिदो मध्ये अणुबॉम्ब हल्ला करण्यात यशस्वी होतो का आणि याद्वारे कार्डीनल व्हॅलेरीयो आपल्या मनसुब्यात यशस्वी होतात का? शेवटी येशू ख्रिस्ताचे सत्य काय असते?

ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांचा वापर करून खिळवून ठेवणारे हे नाट्यमय पण काल्पनिक असे कथानक वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आवर्जून वाचलेच पाहिजे. 

हे पुस्तक अमेझॉन वरून घेण्यासाठी खाली click करा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *